आज २० वर्षांनी आईच्या माहेरी आले होते. हे गाव माझ्यासाठी खूप काही होत पण ह्या गावाने अशा काही आठवणी माझ्यासाठी दिल्या होत्या ज्या मी कधीच आयुष्यात विसरू शकत नव्हते. माझं पाहिलं प्रेम, अनुज मला इथेच मिळाला होता. निस्वार्थी मनाने त्याच्यावर प्रेम केलं होतं, त्याचेही माझ्यावर खूप प्रेम होत. आयुष्यभर तुझ्याच पदराला बांधून राहील अशी काही आश्वासने सुद्धा दिली होती. पण म्हणतात ना मुली सुद्धा ह्या अशा आश्वासनांना बळी पडतात. माझेही अगदी तसेच झाले, मी त्याच्या नदी प्रवाहात मुक्त झालेल्या मास्यासारखी वाहत गेले.
जेव्हा आमचे प्रेम प्रकरण त्याच्या वडिलांना समजलं तेव्हा त्यांनी खूप धिंगाणा घातला. कारण ते त्या पंचक्रोशीतील एक नामवंत श्रीमंत व्यक्ती होते आणि त्यांना ह्या गोष्टीचा माज होता. पण खंत ह्या गोष्टीची वाटली की अनुजने काहीच न बोलता नाते तोडून टाकले. माझ्या मागे खंबीरपणे उभा राहणार अनुज आता मात्र त्याच्या वडीलांसमोर एक शब्द सुद्धा बोलू शकला नाही. त्यानंतर मी घरी निघून आले आणि परत कधीच त्या गावात परतले नव्हते. ना मी अनुजला कॉन्टॅक्ट केला ना त्याने मला कॉन्टॅक्ट केला होता. त्याला विसरण्यासाठी बरीच वर्ष गेली. कसे विसरू शकत होते त्याला? पहिलं प्रेम होतं माझं ते, खूप वर्षांनी मी त्याला विसरू शकले पण मनातल्या आठवणी थोडीच विसरता येतात.
पुढे माझे लग्न झाले, नशिबाने चांगला जोडीदार मिळाला. आता मुलंही मोठी झालीत. पण आज अचानक नियती २० वर्षानंतर मला पुन्हा एकदा ह्याच गावात घेऊन आली होती. ते गाव समोरून पाहताना फक्त आणि फक्त अनुजच्या आठवणी डोळ्यासमोर येत होत्या. मन अजिबात थाऱ्यावर नव्हते. माझे मन कधी मला त्याच्या घराजवळ घेऊन गेले मला कळले सुद्धा नाही. पण आता तिथे त्याच घर राहिले नव्हते. एक भली मोठी सोसायटी उभी झाली होती. मी बाजूच्या काकांना त्याच्या कुटुंबाबद्दल विचारले.
आज अचानक का असं झालं की दोन वर्षांनी तो माझ्या समोर आला, माझ्या संसारात मी खुश होते पण तरीसुद्धा का एवढा त्याचा विचार करत होते
काका ही जागा ज्यांची आहे त्यांची मुलं पण आता मोठी झाली असतील ना? कुठ राहतात ते? काका म्हणाले “त्यांची दोन्ही मुले चांगल्या हुद्द्यावर काम करतात, एक बिल्डर आहे तर एक डॉक्टर आहे” काका दोन मुलं कशी तीन मुलं आहेत ना त्यांना? (मी प्रश्नचिन्ह असलेल्या भावनेने त्यांना विचारले) हा तीन मुले होती त्यांना पण मागील वीस वर्षापासून एका मुलाचा पत्ता नाहीये, त्याला एका मुलीवर प्रेम झालं होतं पण त्याच्या वडिलांना ते मान्य नव्हते म्हणून त्याने त्यांची सर्व संपत्ती आणि हे घर सोडून हे गाव सोडून दिले. आता तो कुठे असतो कुणालाच माहीत नाहीये.
भयाण शांतता..
समाप्त
कथेचे सर्व अधिकार लेखकाधिन आहेत, लेखकाच्या नावासोबत कथा शेअर करायला हरकत नाही.