तृष्णा दार उघडं.. काय करतेस आतमध्ये? एवढा का वेळ लागतोय तुला दरवाजा उघडायला? असे आवाज रूमच्या बाहेरून येत होते. आम्ही खूप जास्त घाबरलो. “महेंद्र तू जा लवकर जा रूम मधून, तुला इथे कुणी पाहिले तर तुझी खैर नाही”. मी सुद्धा खूप जास्त घाबरलो होतो. घाई घाईत खिडकीपाशी गेलो. उतरण्याच्या नादात पाय सटकला आणि जमिनीवर जाऊन आदललो. हाताला खूप मार लागला होता पण कशाचीच चिंता न करता मी तिथून पळ काढला.
धावत धावत घरी पोहोचलो. पण मी या गोष्टी कडे पाहिलेच नव्हते की माझा हात सुन्न पडला होता. मला माझा उजवा हात जाणवतच नव्हता. खूप घाबरलो आईला सांगितले की येताना पडलो रस्त्यात, तिने लगबगीने दवाखान्यात नेलं. आणि जे नव्हतं व्हायचं तेच झालं. माझा हात प्लास्टर केला. हाताला जबर मार लागला होता.
पण हाताच्या येणाऱ्या कळा पेक्षा तृष्णाच्या घरी काय झालं असेल या विचारांनी मी जास्त चिंतेंत होतो. त्यात आमच्यात जोडणारा कोणताच दुवा नव्हता जो मला तिची खबर देऊ शकेल. त्यामुळे वाट पाहण्यापलीकडे माझ्याकडे पर्याय नव्हता. त्यात डॉक्टरांनी एक दोन दिवस आराम करायला सांगितला होता मग शाळेत सुद्धा मी जाऊ शकत नव्हतो.
संपूर्ण रात्र डोळ्याला डोळा लागला नाही. सारखा तृष्णाचा विचार मनात येत होता. सकाळी उठलो तर आज हात थोडा जास्त दुखत होता. आईने बेड वरच आराम करायला सांगितलं. आपल्या आई पण किती भारी असतात ना? आपण कितीही मोठे झालो तरी त्यांना त्यांचं बाळ हे लहानच वाटतं. आणि त्यात आजारी असलो तर गोष्टच वेगळी. जेवढ्या रागावतील तेवढे प्रेम सुद्धा करतील. सकाळपासून आईची रेलचेल माझ्या मागे पुढे होती. मला काय हवंय काय नको पाहत होती.
वडिलांनी रागातच दम देत पुढच्या वेळी नीट रस्त्यात पाहून चालत जा म्हणत आपला मोर्चा कामावर वळवला. एकतर मी आज शाळेत जाणार नव्हतो, तृष्णाला भेटणार नव्हतो म्हणून मन उदास होत. त्यात आज १० फेब्रुवारी म्हणजेच टेडी दिवस होता. मी आज तिला भेटणार सुद्धा नव्हतो तर टेडी तर कसे देणार म्हणून सकाळपासून माझी सारखी चिडचिड होत होती. तृष्णा शाळेत गेली असेल का? घरात काही प्रोब्लेम तर नसेल ना झालं? असे अनेक प्रश्न डोक्यात फिरत होते.
त्यात घड्याळाचे काटे सुद्धा मंद गतीने फिरत होते. एवढ्यात एक नाजूक परिचयाचा आवाज कानी आला. तृष्णाचा आवाज होता. पण ती कशाला येईल माझ्या घरी मलाच भास होतात असे मी स्वतःसोबत पुटपुटलो. एवढ्यात आई बेडरूम मध्ये आली. बाळा तुझी वर्ग मैत्रीण आलीय बघ तूषणा… माझी नजर दरवजा कडे वळली तर माझी वेडा बाई खरंच आली होती. टेडी डे च्या दिवशी माझा टेडी मला भेटायला आला होता. काय भारी वाटतं होतं. मी आईला थांबवत म्हणालो, “अग आई तूषणा नाही तृष्णा नाव आहे तिचे” हो रे कारर्ट्या तेच ते असे म्हणत आई बाहेर गेली.
आम्ही एकमेकांकडे पाहत राहिलो बराच वेळ जणू आम्ही कित्तेक महिने एकमेकांना पाहिलेच नव्हते. महेंद्र लागलेय का रे तुला जास्त.. सॉरी रे खरंच सॉरी आणि बावळटा तुला काय गरज होती खिडकीतून यायची? घेतलास ना पराक्रम करून? मी फक्त हसत होतो आणि ती माझ्यावर रागवत होती. रागात सुद्धा किती गोड दिसतोय माझा टेडी असे मी मनातल्या मनात बोलत होतो.
तुझ्या घरी काही प्रोब्लेम नाही ना? कुणी काही बोलले नाही ना? हो रे सर्व ठीक आहे काहीच टेंशन नाही तू नको काळजी करू असे म्हणत तिने माझा प्लास्टर केलेला हातावर स्वतःचा हात ठेवला. एका हाताने बॅगेतून मार्कर काढून तिने गेट वेल सून ठोंब्या असे लिहिले. आणि जोरात हसू लागली. एवढ्यात आई चहा घेऊन आली. छान सोबत आम्ही चहा घेतला. एकदम नवरा बायको सारखी फिलिंग आज दोघानाही होत होती.
तिने पुन्हा एकदा तिच्या बॅगेत हात टाकला. आणि एका लाल पेपर ने पॅक केलेलं गिफ्ट माझ्यासमोर धरलं. एका हाताने मला ते खोलता येईना म्हणून तिनेच मदत केली आणि गिफ्ट ओपन केलं. एक सुंदर टेडी तिने माझ्यासाठी आणला होता. कसला गोड होता तो खरंच सारखं त्याकडे पाहायचा मोह होत होता. अगदी माझ्या तृष्णा सारखा गोंडस दिसत होता. मी थँक्स म्हटले आणि तिने अलगद माझा हात हातात घेतला. लवकर बरा हो मी वाट पाहतोय आपण पुन्हा एकदा शाळेतून सोबत यायची. हे सर्व आईने पाहिले आणि रागात माझ्याकडे बघत बसली आणि आमच्या समोर येऊन उभी राहिली.
कथेचा पाचवा भाग प्रॉमिस डे इथे क्लीक करून वाचा
लेखक : पाटीलजी (आवरे उरण, रायगड)