काहीच कळायला मार्ग नव्हता की नक्की झालंय काय? लोक इकडे तिकडे फक्त धावत होते. मी आधी तृष्णाला तिथून बाहेर काढली. तिची आई कुठे दिसत नव्हती त्यामुळे ती सुद्धा खूप घाबरली. मी तिला धीर दिला आणि त्या गर्दीतून बाहेर काढत बस स्टॉप गाठलं. इथे अनेक लोक जमा झाले होते. तिची आई सुद्धा तिथेच उभी होती.
मी काहीच न बोलता तिथून पल काढला कारण तिच्या आईने उगाच आम्हाला सोबत पाहिले असते तर तिला हजार प्रश्न विचारले असते. तृष्णा घरी निघून गेल्यावर मी पण घरी आलो. घरी आल्यावर मला कळलं की गॅदरिंग चालू असताना १० – १५ म्हशींचा जमाव आतमध्ये शिरला. त्यामुळे लोक घाबरली आणि पळापळ सुरू झाली. लोक पळतात पाहून म्हशीही घाबरल्या आणि त्या देखील सैऱ्यावयरा धावू लागल्या. आणि मग एकच गोंधळ निर्माण झाला.
हे ऐकताना हास्यास्पद वाटतं होतं पण तिथली परिस्थिती पाहून तेव्हा मी खूप घाबरलो होतो. अंथरुणात पडलो तेव्हा सारखं तृष्णा आणि माझ्या मिठीचा क्षण आठवत होतो. त्यात उद्या १३ फेब्रुवारी आहे म्हणजेच किस डे. कसा असेल उद्याचा दिवस? खरंच मी करू का तिला किस? किंवा ती करेल का मला किस? तिला राग आला तर? नको राहूदे नाहीच करत किस? पण तिला सुद्धा हवं असेल मग? अशा असंख्य विचाराने मी कधी झोपी गेलो हे माझे मलाही कळलं नाही.
आजची सकाळ खूप जास्त फ्रेश होती. हात सुद्धा दुखत नव्हता त्यामुळे मोठ्या उत्साहात मी शाळेत जायला निघालो. रस्त्यातच वेडा बाई दिसली. काय म्हणता तृष्णा बाई झोप लागली का काळ? की म्हशी आल्या होत्या स्वप्नात असे म्हणत मी खळखळून हसायला लागलो. मला हसताना पाहून म्हणाली किती गोड दिसतोय हसताना माझा माही.. ऐक ना आज शाळेत नको जाऊया चल कुठेतरी जाऊ बाहेर फिरायला?

ती अशी काही बोलेल यावर माझा विश्वास तर नव्हता पण आज पूर्ण दिवस आम्ही सोबत असू याचा आनंद जास्त होता. आमचे शेत दाखवण्यासाठी मी तिला गावच्या वेशी बाहेर आणलं. इथे छान एकांत होता. गार वारा आणि पक्षांचा किळकिळात कानी पडत होता. एका झाडाच्या पायथ्याशी आम्ही बसलो. तिने टिफीन बाहेर काढला त्यात बटाट्याची भाजी आणली होती आणि सोबत साजूक तुपातला शिरा सुद्धा होता.
“सकाळीच उठून हा शिरा खास तुझ्यासाठी बनवला आहे, खाऊन बघ ना कसा झालाय?” असे म्हणत तिने तिच्या हाताने शिरा मला भरवला. शिरा खूप छान झाला होता पण हा गोडवा साखरेचा होता की तिच्या हाताचा हे कळायला मला खूप वेळ गेला. पहिल्यांदा तिच्या हाताने बनवलेला पदार्थ मी खात होतो. आम्ही छान गप्पा मारल्या, एकमेकांचे जुने किस्से ऐकून खूप हसलो खिदळलो आणि घड्याळात पाहिले तर पाच वाजले होते. एवढ्या लवकर संध्याकाळ कशी झाली आताच तर आपण आलो होतो. पण आम्ही एकत्र असल्याने हा वेळ कसा आणि कधी निघून गेला हे आमच्या आम्हाला सुद्धा कळलं नव्हतं.
जाण्यासाठी आम्ही निघालो पण तिने माझा हात पडकला आणि म्हणाली, “एक गोष्ट विसरतोय तू?” मी आश्चर्याने तिच्याकडे पाहिले पण ती पापण्यांची उघडझाप न करता माझ्याकडे एकटक पाहत होती. काय विसरतोय ग मी? आज कोणता दिवस आहे? किस डे मग असेच जाणार मला किस न देता? तिचे हे उत्तर ऐकून खरतर माझ्या मनात थरकाप माजला होता. पाहायला गेलो तर हे मी तिला बोलायला हवं होतं आणि ती हे मला बोलतेय म्हणून थोडा घाबरून गेलो.
अग मी विसरलो नाही पण तुला आवडेल का नाही म्हणून गप्प होतो. आता तू नाही केलेस तर मी नक्की रागवेन म्हणत तिने डोळे बंद केलं.
या आधी आयुष्यात कधीच एवढी भीती वाटली नव्हती. अंग थरथर काफत होतं. ती मात्र डोळे बंद करून आमच्या पहिल्या किसची वाट पाहत होती. मी तिच्या जवळ गेलो. तिच्या मानेखाली माझे दोन्ही हात ठेवले. माझा स्पर्श तिच्या अंगाला होताच तिच्या अंगावर काटा आला हे मी डोळ्यांनी पाहत होतो. आता आमचा पहिला किस होणार आणि आम्ही प्रेमाच्या दुनियेत बुडणार असे तिला वाटत असताना मी अलगद माझे ओठ तिच्या ओठांवर न टेकवता तिच्या गालावर टेकवले.
किस करताच पटकन बाजूला झालो. ती काही म्हणायच्या आतच मी तिला म्हटलं, “खरंच मनापासून सॉरी मला माहित होत तुला कुठं किस हवा आहे पण मला नाही वाटत आपण अजून त्यासाठी तयार आहोत. अजून आपलं वय नाही की आपण या सीमा पार कराव्या. आणि तसेही मला आता हे असलं काही आपल्या प्रेमात नकोय. लग्न झालं की करू की हवं ते, हळूहळू नात्याचा उलगडा करू, आताच त्याची मज्जा आपण घालवली तर लग्नानंतर जे क्षण अनुभवायचे असतात ते आपण कसे अनभवू?” माझ्या या बोलण्याने खरतर कुणा दुसऱ्या मुलीला राग आला असता पण माझी आणि तृष्णाची विचार करण्याची पद्धत एक असल्याने तिलाही माझे म्हणणे पटलं.
कसा रे माझा माही असा एवढा वेडा म्हणत अलगद माझ्या मिठीत शिरली. खरंच प्रेमाच्या मिठीत जेवढी ताकत असते तेवढी कशातच नसते. आम्ही छान एकमेकांच्या मिठीत असताना कुणीतरी माझ्या पाठून येऊन कंबरेत लात घातली आणि मी आणि तृष्णा खाली जमिनीवर पडलो. अचानक हे काय झालं आम्हालाही कळलं नाही. वर नजर टाकून पाहिलं तर तृष्णाचे बाबा आणि चार पाच लोक सोबत होते.
कथेचा शेवटचा भाग Valentine Day इथे क्लीक करून वाचा
कथेचे सर्व अधिकार लेखकाधिन आहेत, लेखकाच्या नावासोबत कथा शेअर करायला हरकत नाही.
लेखक : पाटीलजी (आवरे उरण, रायगड)