Home कथा Valentine’s Week कथा मालिका | चाप्टर ०३ चॉकलेट डे

Valentine’s Week कथा मालिका | चाप्टर ०३ चॉकलेट डे

by Patiljee
592 views

तिच्या मामाचा मुलगा रागातच माझ्या जवळ आला आणि म्हणाला, ” काय रे महेंद्र काय बोलत होतास तृष्णा सोबत.. आधीच सांगतोय हा लांब रहा तिच्यापासून नाहीतर परिणाम वाईट होतील” त्याचे हे बोलणे ऐकून मी घाबरलो खरतर मला आजवर असे कुणी धमकावले नव्हते, पण ज्या प्रेमात अशा प्रकारच्या अडचणी येत नाही ते प्रेम कसलं असे स्वतःशी पुटपुटत मी तिथून शाळेचा रस्ता धरला.

शाळेत पोहोचल्यावर क्लास तर सुरू झाला पण मी आणि तृष्णा मात्र एकमेकाकडे चोरून पाहत होतो. आमचे नजरेचे इशारे चालू होते. शिक्षक काय शिकवत आहेत याकडे आमचे लक्ष नव्हतेच मुळात आणि त्याच वेळी निवास सरांनी गोळीच्या वेगाने फेकलेला खडू माझ्या डोक्यात एक वेगळीच ऊर्जा करून गेला. एका क्षणार्धात हरवलेल्या स्वप्नांच्या दुनियेतून मी बाहेर आलो.

आज शाळा सुटली आणि आम्ही सोबतच घरी गेलो. खूप गप्पा झाल्या. असे वाटतं होत की तिच्या येणाऱ्या घराचा रस्ता संपूच नये आणि आम्ही खूप गप्पा माराव्या पण म्हणतात ना अशावेळी एक तासाचा रस्ता सुद्धा एक मिनिटाचा भासतो आणि रस्ता आणि वेळ कधी संपते हे आपल्याला सुद्धा कळतं नाही. इच्छा नसताना देखील मी तिला निरोप दिला. घरी येऊन फ्रेश झालो. टीव्ही समोर बसलो पण मनात मात्र तृष्णाचे विचार चालू होते.

आमच्याकडे मोबाईल नसल्याने दुसऱ्या दिवसाची वाट पाहण्यापलीकडे आमच्याकडे पर्याय नव्हता. मला माहित होत की तिचीही अवस्था काही माझ्यापेक्षा वेगळी नसेल. उद्या चोकलेट डे आहे त्यामुळे मस्त छान चोकलेट तिला उद्या मला द्यायचे आहे. बाबाकडून पैश्याची मागणी केली पण त्यांनी रागातच नाही म्हटलं. मन थोड अस्वस्थ झालं आणि झोपी गेलो.

सकाळी उठलो तर उशाशी ठेवलेले पैसे मिळाले. हे सर्व बाबा पण किती गोड असतात ना.. वरवर किती कठोर वागतात आणि आतून मात्र प्रेमळ, नेहमी आपली चिंता करणारे. खरंच हे वडील नावाचं कोड आजवर कुणाला सुटलं नाही. आज मी खूप जास्त खुश होतो. खिशात शंभराची नोट होती. आज चांगलं महागडं चॉकलेट मला तिला गिफ्ट द्यायचं होतं कारण आज ९ फेब्रुवारी होती म्हणजेच चॉकलेट डे.

नियमित वेळेच्या अगोदर घरातून निघालो. गावात असलेल्या मोठ्या दुकानात शिरलो. एक ८० रुपयाची केडबरी घेऊन बाहेर पडलो. मस्त छान लव आकारात ही चॉकलेट होती. तृष्णा पाहूनच खुश होईल याच उत्साहात मी शाळा गाठली. पण इथे येऊन पाहतो तर काय नियमित वेळेवर येणारी माझी वेडी आज आलीच नव्हती. मन निराश झालं पण ती येईल म्हणून तिच्या येण्याची वाट पाहू लागलो. पण शाळेची दहाची घंटा झाली पण मॅडम काही आल्याचं नाही.

अचानक काय झालं? आज शाळेत का नाही आली? तिच्या मामाच्या मुलाने घरी काही सांगितले तर नसेल ना? तिच्या बाबांना आमच्या बद्दल कळले तर नसेल ना? असे असंख्य प्रश्न माझ्या मनात घुसमळत होते. तिच्या मैत्रिणीकडे चौकशी केली तर तिलाही तिच्या शाळेत न येण्याचे कारण माहीत नव्हते. तिच्या न येण्याने माझेही मन थारावर नव्हते. म्हणून मधल्या सुट्टीतून मी शाळेतून पळ काढला.

सरळ जाऊन तिचे घर गाठले तर तिच्या घराबाहेर माणसाची रेलचेल होती. दरवाजातून समोर कसे जाऊ आणि गेलोच तर काय सांगू हा प्रश्न होताच. त्यात तिच्या मामाचा मुलगा अंगणात बसला होता मग तर अजूनच मनात भीती भरली. पण आज काही करून मला तिला चॉकलेट द्यायचं होतं. मागच्या बाजूने जाऊन मी पाहिले तर पहिल्या मजल्यावर तिचे कपडे वाळत होते. हीच तिची रूम म्हणून पुढचा मागचा विचार न करता फिल्मी स्टाईलने वर चढलो पण ही काय फिल्म नव्हती की ही एकाच प्रयत्नात मला यश येईल.

वर चढलेलो रूम तिची नव्हतीच तर तिच्या आजीची होती. थोडा घाबरलो आणि खाली उतरलो. पण मनाशी ठाम ठरवलं होतं की आज काही करून मला तृष्णाला भेटायचं आहे. म्हणून पुन्हा एकदा बाजूच्या रूमकडे मोर्चा वळवला आणि वर चढलो. पाहतो तर काय हिच रूम होती. आणि शेठ मस्त झोपल्या होत्या. मी तिला आवाज दिला तर आधी ती घाबरली. जवळ येऊन मला हात दिला आणि वर खेचलं. तिचा हात हातात येताच तीच अंग मला गरम लागलं. तिला ताप होता आणि म्हणून ती आज शाळेत आली नव्हती.

“काय रे पागल आहेस का तु? इथे का आलास? तो ही असा वर चढून? कुणी पाहिले तर आधी तुला आणि मग मलाही मारतील”. तिचे हे असे चिडणे स्वाभाविक होते पण मी तिला शांत केलं आणि बेडवर बसवलं. “सॉरी ना येडू खरंच सॉरी पण आज तू आली नव्हतीस शाळेत आणि माझे अजिबात मन लागत नव्हतं आणि त्यात आज चॉकलेट डे आणि मला तुला भेटणे असे मिस नव्हते करायचे. अरे यार या नादात विसरून गेलो की चॉकलेट आणले”. असे म्हणत मी खिशात हात घातला आणि चॉकलेट बाहेर काढलं.

पाहतो तर काय एव्हाना ते चॉकलेट मेल्ट झालं होतं. आणि त्यावर जे लव आकार होता तो सुध्दा मिटला होता. हे पाहूनच मला मेल्याहून मेल्यासारखे झाले. पण तृष्णाने माझ्या मनातील भाव ओळखले म्हणून तिने विषय बदलत म्हटले, “अरे वा ड्रायफ्रूट चॉकलेट आणलेस तू? मला खूप आवडते आणि हे तुला कसे माहीत? असे म्हणत तिने चॉकलेट फोडून खायला सुरुवात केली. ते मेल्ट चॉकलेट खाताना सुद्धा माझी ही वेडाबाई किती गोड दिसत होती.

तिने चॉकलेटचा एक तुकडा तोडत अलगद माझ्या तोंडात टाकला आणि तो खाता खाता ते मेल्ट चॉकलेट माझ्या ओठा भोवती लागले. तिने तिच्या ओढणी ने ते लागलेले चॉकलेट पुसून काढले. माझ्या आयुष्यातील आजवरचा सगळ्यात रोमँटिक क्षण हा होता. आमचे प्रेम ऊतू जात होते आणि रूम बाहेरून कुणीतरी जोरात कडी वाजवत होतं.

कथेचा चौथा भाग टेडी डे इथे क्लिक करून वाचा.

लेखक : पाटीलजी, आवरे उरण, रायगड

Related Articles

Leave a Comment

error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल