कथेचे आधी सात भाग आले आहेत ते सुद्धा वाचून घ्या तरच कथा काय आणि कशी पुढे गेली हे समजेल.
तिच्या बाबांना आणि त्यांच्या माणसांना पाहून मी घाबरलो. मी काही म्हणण्याच्या आतच त्यांनी मला मारायला सुरुवात केली. तृष्णा मध्ये येऊन मला वाचविण्याच्या प्रयत्न तर करत होती पण ते निष्फळ होतं. त्यांच्या माणसांनी तिला माझ्यापासून वेगळं करून घरी नेलं.
“हरामखोर… तुझी हिम्मत कशी झाली माझ्या मुलीला हात लावायची? समजतोस कोण स्वतःला? कुठला राजकुमार आहेस का? माझ्या पोरीपासून आतापासून लांब रहायचं नाहीतर चालताही येणार नाही एवढं मार खाणार तू.. आता कमीच मारलेय पण पुढे याचे परिणाम खूप वाईट होतील”. असे म्हणत तिच्या वडिलांनी आणि त्यांच्या माणसांनी मला मारून तिथेच सोडून दिलं. कसा बसा उठून तिथल्या एका आजोबांच्या मदतीने मी घर गाठले.
घरी मला अशा परिस्थितीत पाहून सर्वच घाबरून गेले. आई तर रडूच लागली. मी कुणाही काही सांगण्याच्या मनःस्थितीत नव्हतोच. त्या आजोबांनी झालेला सर्व प्रकार माझ्या घरी सांगितला पण मला कुणीच काही बोलले नाही. घरी डॉक्टर येऊन माझं चेकअप केलं आणि पट्टी केली. माझ्या डोक्यात एवढं होऊन सुद्धा फक्त तृष्णाचा विचार येत होता. तिच्या वडिलांनी तिला देखील मारले असेल का? यात त्या बिचारीची काय चूक? मला खूप अस्वस्थ वाटतं होतं. एवढ्या बेडरूमचा दरवाजा उघडण्याचा आवाज आला. वर नजर टाकून पाहिलं तर आई होती. मी तिला काही म्हणण्याच्या आतच तिने विषय काढला.
“बाळा मी तुला आधीच सांगितलं होतं की या भानगडीत नको पडूस, कारण पुढे काय होणार हे मला माहीत होतं आणि तसचं झालं. मी तुला फारसे काही बोलणार नाही, मुळात तुझे हे वयच असे आहे की तुला सांगून पण काही गोष्टी कळणार नाहीत. तुझं ठीक आहे रे तिच्यावर प्रेम आहे पण किती खरं आहे की फक्त आकर्षण हे तुलाच माहीत. त्यात मुलांचे बरं असते प्रेमात घरच्यांचं विघ्न आलं की ते सर्व विसरून जातात पण आम्हा मुलींचे काय? आम्ही ज्या व्यक्तीला आपलं मानतो तीच व्यक्ती अशी मध्येच सोबत सोडून जाते मग पुढचा प्रवास खूप खडतर असतो. आता तुला वाटत असेल तुझी आई अशी काय म्हणतेय? मी सुद्धा शाळेत असताना माझंही एका मुलावर खूप प्रेम होतं. आम्ही पुढे जाऊन लग्न करणार होतो पण माझ्या घरी समजले आणि तुझ्या आजोबांनी त्याला खूप मारलं आणि मग तो पुन्हा माझ्याकडे फिरकलाच नाही. अगदी एका दिवसात सर्व काही विसरून गेला, जसं की आमच्यात काहीच झालं नाही. त्यानंतर अनेक वर्ष गेली मला या सर्वातून बाहेर पडायला. देव कृपेने तुझ्या बाबांच्या रूपात मला चांगला नवरा मिळाला पण कुठेतरी खंत आहेच की माझे पहिलं प्रेम यशस्वी नाही झालं ते सुद्धा त्याच्या घाबरण्यामुळे, जर त्याने पुढाकार घेऊन घरी येऊन माझ्या घरच्यांना समजावण्याचा प्रयत्न केला असता तर नक्कीच काहीतरी फरक पडला असता पण असे काहीच झालं नाही. म्हणून पोरा तुला सांगते जर तुझे तूषना वर खरंच मनापासून प्रेम असेल तर तिला असे अर्ध्यावर सोडून देऊ नकोस. उद्या आपण तिच्या घरी जाऊ रीतसर काही असेल तर बोलून घेऊ. तू या गोष्टीचा नीट विचार कर रात्रभर आणि उद्या सकाळी मला तुझा निर्णय सांग आपण काय करायचे.”
आज आईच्या तोंडून तिचा भूतकाळ ऐकून डोळ्यातून वाहणारे पाणी थांबत नव्हतं. मनाशी ठाम निर्णय केला. काही झालं तरी आता माघार नाही. उद्याच जाऊन तिच्या वडिलांशी बोलेल. त्यात उद्या १४ फेब्रुवारी आहे म्हणजेच व्हॅलेंटाईन डे. प्रेमाचा दिवस आणि मला माझ्या मनातल्या गोष्टी सांगण्यासाठी या दिवसासारखा दिवस पुन्हा भेटू शकत नाही. सकाळी उठल्यावर मी आईला माझा निर्णय सांगितला आणि तिच्यासोबत तृष्णाचे घर गाठले.
मला पुन्हा एकदा समोर पाहून तिच्या वडिलांचा पारा आणखी चढला. त्यांनी समोर येईन पुन्हा एकदा माझ्या कानशिलात भडकावली. पण यावेळी मी डगमगलो नाही. त्यांना ठामपणे उत्तर दिलं. तुम्ही मला कितीही मारा पण मला तृष्णा सोबत लग्न करायचे आहे आणि नेहमीच तिच्यासोबत रहायचं आहे. माझे हे बोलणे ऐकून तिच्या वडिलांनी पुन्हा एकदा मला मारायला सुरुवात केली. माझ्या आईने त्यांना थांबवले. एवढ्यात तृष्णा सुद्धा खाली आली. तिने येऊन सर्वासमोर मला मिठी मारली.
आमच्या दोघांच्या डोळ्यात हे दिसत होतं की आम्ही एकमेकांसाठी काहीही करू शकतो. हे पाहून तिचे वडील सुद्धा हतबल झाले आणि म्हणाले, “अरे तुमचे वय तरी किती आहे? जेव्हा तुमच्या लग्नाचे वय होईल तेव्हा एकमेकांना विसरून पण जाल, त्यामुळे हे प्रेम बिम अस काही नसतं.” मी बोलणार एवढ्यात तृष्णाच म्हणाली, “बाबा आमचे प्रेम एवढं नाजूक नाही की ते अशा छोट्या छोट्या गोष्टींमुळे वेगळं होईल. आम्ही अंतरमनाने एकमेकांना स्विकारलं आहे आणि सोबत मरेपर्यंत असणार आहोत. आज प्रेमाचा दिवस आहे आणि बाबा या दिवसाची साक्ष घेऊन सांगते मला फक्त आणि फक्त महेंद्र माझ्या आयुष्यात हवा आहे.”
मुलीचं हे असे वागणं वडिलांसाठी नवीन होतं. त्यांचेही डोळे पाणावले. “मुली वाटतं तेवढं सोपं नाहीये तुझे आयुष्य. काही गोष्टी आम्ही अजून तुलाही सांगितल्या नाहीत. जर त्या गोष्टी या महेंद्रला सुद्धा कळल्या ना तर तो सुद्धा सोडून जाईल तुला?” “बाबा हे काय म्हणताय असे तुम्ही अशा काय गोष्टी आहेत माझ्याबद्दल ज्या मलाही माहित नाहीत?” तृष्णाचे बोलणे अर्धवट थांबत मी पुढे सरकून तिच्या वडिलांचे हात पकडले “बाबा खरंच माझं खूप प्रेम आहे तुमच्या मुलीवर, तिच्याबाबत कोणतीही गोष्ट मला माहित असो अथवा नसो मी आयुष्यभर तिची साथ सोडणार नाही.”
माझे शब्द ऐकून तिच्या बाबांनी माझे हात झटकले, “अरे या फक्त बोलायच्या गोष्टी आहेत.” असे म्हणत ते जवळच्या खुर्चीत बसले. त्यांच्या डोळ्यातले अश्रू थांबत नव्हते. “माझ्या मुलीच्या दोन्ही किडनी खराब आहेत. सहा महिन्यांपूर्वी चेकअप केलं तेव्हा समजले. पण अजून क्रिएटिनिन दोनवर आहे. पुढे जाऊन क्रिएटिनिन वाढेल आणि मग आठवड्याला तिला डायलिसिस करावा लागेल.” एवढे बोलून ते रडायला लागले.
तृष्णाला या गोष्टीची माहितीच नव्हती पण आता सत्य समोर आलं तर जागेवरच कोसळली. माझ्याही पायाखालची जमीन सरकली. एवढी मोठी गोष्ट आणि आम्हाला माहीत देखील नाही, आम्हाला कळलं कसे नाही. म्हणून मी सुद्धा रडू लागलो. पुढील दहा मिनिटे तिथलं वातावरण रडण्याच्या आवाजाने भरून आलं. पण मी स्वतःला सावरलं. तृष्णाकडे जाऊन तिला उभ केलं. ती फक्त रडत होती. तिच्या वडिलांजवळ येऊन म्हटलं, “बाबा मला खरंच माहीत नव्हतं असे काही असेल पण या कारणासाठी माझं तिच्यावर असलेलं प्रेम तर कमी नाही होणार. मी अगदी मनापासून जीव लावला आहे तिला. मला फारसे या आजारातले काही कळत नाही, बहुदा डायलिसिस हा शब्द सुद्धा मी पहिल्यांदा ऐकला. पण मी तुम्हाला एक सांगू शकतो, माझा निर्णय अजूनही ठाम आहे. मी लग्न फक्त आणि फक्त तृष्णा सोबतच लग्न करणार आणि पुढे जाऊन माझी एक किडनी पण तिला देणार. मी वाचले आहे की एका किडनी वर सुद्धा माणूस जिवंत राहू शकतो. मग जर माझ्या वेडीला अशा प्रसंगी मी साथ देऊ शकलो नाही तर माझे प्रेम काय कामाचे? मला फक्त तुमच्या सर्वांची सहमती आमच्या नात्याला हवी आहे. बाकी पुढे जे होईल ते मी स्वीकारायला तयार आहे.”
एवढ्या कमी वयात माझ्यातला समंजसपणा पाहून सर्व अवाक झाले होते. कुणी आपल्या मुलीवर एवढं प्रेम कसे करू शकतं की एका क्षणात पुढचा मागचा विचार न करता किडनी द्यायला तयार होतो. खरंच असा मुलगा आपल्या मुलीला शोधून देखील सापडणार नाही म्हणत तिच्या बाबांनी मला मिठीत घेतलं आणि ते सुद्धा रडू लागले. माझी तृष्णा फक्त माझ्याकडे पाहत होती. तिलाही कळलं होतं की तिची निवड योग्य आहे. राहिला प्रश्न माझ्या आईचा तर आधी वाटले होते की माझा हा निर्णय तिला आवडणार नाही पण तिच्या चेहऱ्यावरचे हसू सर्व काही सांगून जात होतं.
तिच्या आई बाबांनी अखेर आमच्या लग्नाला परवानगी दिली आणि Valentine Day च्या दिवशी आमच्या प्रेमाला एक वेगळी ओळख मिळाली. खरतर अजून बरीच वर्ष आम्ही लग्न तर करू शकणार नव्हतो पण घरच्यांनी काहीच दिवसात आमचा साखरपुडा करण्याचा निर्णय घेतला होता. एवढ्या मोठ्या आजारची बातमी तृष्णाला कळली खरी पण त्यावर मात करत तिने आमचे लग्न होणार आणि आणि नवरा बायको होणार हे स्वप्न पाहूनच खुश होती.
समाप्त
कथेचे सर्व अधिकार लेखकाधिन आहेत, लेखकाच्या नावासोबत कथा शेअर करायला हरकत नाही.
लेखक : पाटीलजी (आवरे उरण, रायगड)