माझे लग्न नव्हते झाले तेव्हा आमच्या घराच्या पाठीमागे भरपूर शेती होती. ती शेत आमची नव्हती गावातल्या लोकांची होती. त्या शेतात पावसाळी भात पिकवला जायचं तर थंडीच्या महिन्यात वाल पिकवला जायचं. वाल हे कडधान्य तुम्हाला माहीतच असेल याची भाजी खायला खूप चविष्ट लागते हे तुम्हाला माहीतच असेल. पण या वालाचे कोवळे कोवळे कोम फुटतात त्यांची भाजी खाल्ली आहे का तुम्ही सर्वांनीच नसेल खाल्ली.
मला खूप आवडते ही भाजी लग्नाच्या अगोदर खूप खायचे पण आता फ्लॅटमध्ये तसलं काही खायला मिळत नाही. पाहिले पावसाच्या दोन ते तीन सरी येऊन गेल्या की शेतात ही भाजी उगवायची. त्याचे वरती आलेले कोंब पाहून मनाला एकप्रकारची समाधान मिळायचे. वाल खुडून झाला की त्यातील काही दाने शेतातच पडलेले असायचे हे दाने पहिल्या पावसाच्या सरींनी लगेच वर यायचे मग आम्ही मैत्रिणी हातात वाडगा नायतर पिशवी घेऊन हे वाल खुडायला जायचो.
वाल, मुग, लाल चवळी असे वेगवेगळ्या प्रकारची छोटे छोटे कोंब असायचे ते आम्ही सकाळचं उठल्यावर शेतात आणायला जायची. एक एक छोट रोप उचलून पिशवीत ठेवायची ज्या ठिकाणी जास्त रोप मिळतील तिथेच बसून हावर्या सारखी खुडत बसायचो. आमच्या गावातील भरपूर बायका यायच्या हे वाल काढायला. पण पाहिले जर कोणी येऊन खुडून गेले आणि तुम्हाला जायला उशीर झाला तर मात्र हे वाल पाहिजे तसे मिळत नव्हते.
मातीचा मस्त सुगंध घेत घेत वाल काढायचे आणि नेऊन घरी जाऊन त्याची मूळ काढून ते बारीक कापायचे पाण्यात उकळून पिळून काढायचे आणि मग कांदा लसूण, मिरची वापरून याची भाजी करायची. भाकरीसोबत छान लागते ही भाजी. अजूनही आठवले की तोंडाला पाणी सुटते पण आता कुठे तशा भाज्या खायला मिळतात का? मिळत असल्या तरी त्यांना तशी चव नाही कारण पहिल्यासारखी ती शेतात उगवलेली नसते.
ही भाजी तुम्ही घरात ही उगवू शकता. वालाचे दाने असतील तर हे दाने कुंडीत टाकून ठेवायचे ७ ते ८ दिवस लागतात ही भाजी उगवायला . करून बघा ही भाजी खायला खूप छान लागते.
लेखक : पाटीलजी