एकदा का घरातल्या घड्याळात नऊची घंटा वाजली की आपली बॅग, टिफीन आणि हेल्मेट घेऊन बाहेर पडण्याची जणू काही सवयच लागली आहे. रोज १० ते ६ जॉब पण तिथे पोहोचण्यासाठी कठोर मेहनत घ्यावी लागते. आता तुम्ही म्हणाल जॉबवर जायला तरी कसली मेहनत लागते? पण जे बाईकने किंवा पब्लिक ट्रान्सपोर्टने प्रवास करत असेल त्यांना ह्याचा अंदाज असेलच. पावसामुळे रस्त्यात एवढे खड्डे पडले आहेत की असे वाटते खड्ड्यात कुठेतरी मध्ये मध्ये रस्ते बांधले आहेत.
आज नेहमी प्रमाणे मी वेळेत निघालो, बाईक काढली आणि कमावरचा रस्ता पकडला. रस्त्यावरून जात असताना नेहमी एक युवक बाईकवर मला दिसायचा. मस्त लांब केस, शरीरयष्टी सुद्धा एका हिरोला लाजवेल अशी आणि डोळ्यावर काळाभोर चष्मा. मी मागील एक वर्षापासून त्या युवकाला पाहत आहे. पण त्याची एक विशिष्ट बाब म्हणजे मी जेवढ्या वेळा त्याला पाहिले तेव्हा कधीच मला त्याने बाईकवर हेल्मेट घातलेला दिसले नाही. कदाचित आपले लांब केस दाखवून शायनिंग मारत असेल असे मी स्वतःशी ठवरवून हसत असायचो.
तो मला रोज दिसायचा, आमची अजिबात कोणत्याच प्रकारची ओळख नव्हती पण एवढ्या दिवस चालत्या गाडीवर समोरासमोर यायचो म्हणून फक्त आम्ही एक एकमेकांना हॉर्न वाजवून साद द्यायचो. पण आज खूप दिवस झाले मी त्याला पहिलेच नाही, आधी मला वाटले होते की तो आजारी असेल किंवा सुट्टी असेल पण एक आठवडा झाला तरी तो मला दिसला नव्हता. पण मी कुणालाही विचारू शकत नव्हतो की तो आहे कुठे कारण मला त्याचं नाव, गाव काहीच माहीत नव्हतं.
काहीच दिवसानंतर कामावर जाताना एका गावात मी एक बॅनर पाहिला त्याच्यावर असे लिहले होते. भावपूर्ण श्रद्धांजली आणि त्या मुलाचा फोटो खाली होता. माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मी लगबगीने गाडी बाजूला लावली आणि बाजूच्याच असणाऱ्या दुकानदाराला विचारले काय झालं असे अचानक? काही दिवसापूर्वी मागून येणाऱ्या ट्रक ने त्याला धडक दिली आणि हेल्मेट नसल्याकारणाने डोक्याला जबर मार लागला आणि जागीच त्याचा मृत्यू झाला. हे ऐकुन माझ्या डोळ्यात पाणीच आले कारण त्याची चूक एवढीच होती त्याने हेल्मेट घातला नव्हता आणि जर घातला असता तर आज तो आपल्यात असता.
माझी ओळख एवढी जवळची नव्हती पण मला खूप वाईट वाटत होत कारण एका माणसासोबत आपली एक वेगळ्या प्रकारची ओळख निर्माण होते आणि असे काही कानी पडले तर मनावर काय परिणाम होईल ह्याचा अंदाज तुम्ही लाऊ शकता. मित्रानो मी तुम्हाला प्रत्येकाला एक सांगू इच्छितो, कितीही फॅशन करायची असेल तर ती कशीही करा पण बाईक चालवताना हेल्मेट जरूर वापरा. कारण तुमची एक चूक तुमच्या आयुष्य हिरावून घेऊ शकते. मला मिळालेला सर्वात मोठा धडा आहे, तुम्ही सुद्धा ह्यातून काहीतरी नक्कीच बोध घ्याल हीच आशा.