Home कथा तिचा निर्णय

तिचा निर्णय

by Patiljee
1391 views
निर्णय

वर्षा आणि माझी ओळख तीन वर्षापूर्वी झाली होती. आमच्याच कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला तिने प्रवेश घेतला होता. तिचे घारे डोळे तिला इतरांपेक्षा वेगळे भासवत होते. मी जेव्हा तिला पहिल्यांदा पाहिले तेव्हा तिच्या डोळ्याकडेच पाहत राहिलो. आमच्या ग्रुपमध्ये पण मी आधीच सांगितले होते की तुमची वहिनी आहे हिच्यावर कुणी प्रयत्न करायचा नाही. माझे मित्रांनी पण ह्या गोष्टीला होकार दिला कारण आमच्यातली मैत्री तेवढी घट्ट होती.

तिला इंप्रेस करण्यासाठी मी खूप काही प्रयत्न केले. ह्यात माझ्या मित्रांची साथ मला लाभली. ती कुठे राहते, कुठून आलीय, घरी कोण कोण असते, बाबा काय करतात, भाऊ काय करतो, कोण नातेवाईक आहे तिचे इथे अशा सर्वच गोष्टींची माहिती मित्रांनी माझ्यासाठी आणली होती. क्लास मध्ये पण जेव्हा ती यायची तेव्हा मित्र जोरात ओरडत असतं वहिनी आली वहिनी. तिला ह्या गोष्टीचा खूप राग यायचा. एकदा तर तिने सरांकडे कंप्लेंट सुद्धा केली होती. पण माझेच मित्र ते ऐकणार तर नव्हते.

अखेर तिने मैत्रिणीकडून चौकशी केली की नक्की कुणासाठी तिला वर्गातले वहिनी म्हणून हाक मारत आहेत. जेव्हा तिला माझे नाव कळले तेव्हा लंच टाईम मध्ये तीने येऊन मला गाठले. काय रे तुला कळत नाही का तुझे मित्र असे वर्गात मला बोलतात? अगं मला कळते ते सर्व पण ते खरं आहे तेच बोलतात त्यांना माहीत आहे मी तुझ्यावर प्रेम करतो. माझा हा हाजिरजबाबी पणा तिला आवडला होता. पण तरीही तिने लटक्या रागात म्हटलं की जर तुझे प्रेम आहे तर मला सांग ना असे वर्गात कशाला प्रदर्शन करतोय?

मला कळून चुकले होते की तिलाही माझ्याबद्दल काहीतरी नक्कीच वाटत आहे. त्या दिवसापासून आम्ही रोज काही ना काही कारणांनी बोलत राहिलो. एकत्र बसू लागलो, सोबत जेऊ लागलो. आताही सर्व मुलं आम्हाला चिडवायचे पण आता तिला ते आवडू लागले होते. कदाचित आमचे नाते तिने स्वीकारले होते. आमचा आता छान ग्रुप बनला होता. मी माझे मित्र ती आणि तिच्या मैत्रिणी बऱ्याचदा बाहेर फिरायला तर कधी सिनेमाला जात होतो. अभ्यासाचे शेवटचे वर्ष होतं म्हणून आम्ही अभ्यास सुद्धा सोबतच करत होतो.

अखेर आमच्या परीक्षाही झाल्या आणि रिझल्ट सुद्धा लागला. आमचा सर्व ग्रुप चांगल्या मार्कानी उत्तीर्ण झाला होता. आता जो तो आपापल्या आयुष्यात बिझी झाला होता. काही मुलींची लग्न झाली होती तर काही मुले अजुन बेरोजगार सुद्धा होती. माझ्या घराजवळ माझ्या ग्रुप मधील अनेक मित्र होते. आम्ही अजुन बेरोजगार होतो. जॉबच्या शोधात होतो. पण तिला मात्र असेच वाटतं होतं की मी त्यांच्या सोबत टवाळक्या करत फिरत असतो.

तिने तिची शपथ दिली आणि मला त्यांची साथ सोडायला लावली. माझ्यासाठी हे खूप कठीण होतं कारण बालपणापासूनचे मित्र असे कसे तोडणार मी परंतु मला ती माझ्या आयुष्यात हवी होती म्हणून मी तिचे म्हणणे ऐकले आणि सर्वांशी संबंध तोडून टाकले. जसजसे दिवस जात होते आम्ही अजुन जवळ येत होतो. वेळ मिळाला की भेटत होतो. तिला जॉब लागला होता पण मी अजुनही बेरोजगार होतो. पण आम्ही जेव्हा पण भेटायचो तेव्हा सर्व खर्च ती स्वतः करायची. मी पैसे द्यायला गेलो की ती मला नेहमी थांबवायची.

हातात पदवी असून सुद्धा मला जॉब मिळत नव्हता. खूप डिप्रेशन मध्ये चाललो होतो. ह्यात भर म्हणून ती मला सारखी जॉब बद्दल बोलू लागली होती. मी प्रयत्न तर खूप करत होतो. चांगल्या गुणांनी पास होऊन सुद्धा लोक गुणवत्ता न बघता ओळख किंवा पैसा बघतात. ह्याच मुळे माझे अनेक ठिकाणी काम होता होता राहिले होते. पण तिला मात्र असेच वाटतं होतं की मी मुद्दाम जॉब शोधत नाहीये.

हद्द तर तेव्हा झाली जेव्हा तिने मला फोन करून सांगितले की मी आता कंटाळले आहे तुझ्यासोबत, तुझा भविष्य काहीच नाहीये, उगाच तुझ्यासोबत राहून मी माझे आयुष्य खराब करत आहे आणि किती दिवस तू माझ्या पैशावर उड्या मारणारा आहेस. तिचे हे शब्द कानाला टोचत होते. अखेर तिने माझ्याशी ब्रेकअप करून अवघ्या सहा महिन्यातच श्रीमंत मुलासोबत लग्न केलं. मला तिचा खूप राग आला होता. तिच्यासाठी मी माझ्या जिवलग मित्रांना सोडून दिलं आणि तिने मला पुरेसा वेळ न देता जॉब नाही म्हणून सोडून दिलं.

हे माझ्यासाठी खूप हास्यास्पद होते कारण मी तिच्यावर खूप मनापासून प्रेम करत होतो आणि ती मात्र तिचे भविष्य पाहत होती. मान्य आहे मला प्रत्येक मुलीचे स्वप्न असते की तिचा होणार नवरा स्वतःच्या पायावर उभा असला पाहिजे पण मुली का हे समजत नाहीत की ह्या गोष्टी रातोरात होत नाहीत. त्या साठी वेळ द्यावा लागतो. पण तिच्या जाण्याने मला एक गोष्ट कळली की जिच्यासाठी मी माझ्या मित्रांना सोडले आज तेच मित्र माझ्या एकांतात माझ्या सोबत आहेत.

आज मी एका नामांकित कंपनीमध्ये रुजू आहे. चांगला पगार, चागलं घर आहे. कदाचित माझ्या आयुष्यात तिच्यापेक्षा कुणी चांगले असेल म्हणून ती मला नाही मिळाली.

कथेचे सर्व अधिकार लेखकाधिन आहेत, लेखकाच्या नावासोबत कथा शेअर करायला हरकत नाही.

लेखक : पाटीलजी (आवरे उरण)

Related Articles

Leave a Comment

error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल