बऱ्याच दिवसापासून विचार करत होतो की बाईकवर आपला पाटीलजी लोगो प्रिंट करून घ्यावा पण त्यासाठी वेळ मिळत नव्हता. अखेर आज शनिवारी मुहूर्त मिळाला म्हणून पनवेल मध्ये पोहोचलो. पण हवा तसा कुणी प्रिंट काढून देणारा मिळाला नाही. कुणाची प्रिंट मशीन त्या योग्यतेची नव्हती तर कुणाला आपला पाटीलजी लोगो व्यवस्थित एडिट करता येत नव्हता. अखेर निराश होऊन दुकान शोधत होतो.
ह्याच शोधा शोधीत आदई सर्कलवर एक दुकान सापडलं. माझ्या मनात कसा लोगो आहे कसा प्रिंट काढून द्यायचा आहे हे त्या युवक संदेश म्हात्रेला सांगितले तेव्हा त्याने मला सांगितले की थोड काम करावे लागेल पण एक दोन दिवस मला द्या मी तुमच्या आवडीप्रमाणे काम करून देतो. हे ऐकल्यावर मला थोड बरं वाटेल की वेळ लागला पण आपले काम तर होईल. मी त्याचे धन्यवाद मानले आणि दुकानातून निघणार त्याआधी एक वीस पंचवीस वर्षांचा युवक आपली नवीन बुलेट घेऊन त्या दुकानात आला.
दुकानात आल्यानंतर त्याने त्या दुकानदाराला सांगितले की मला छत्रपती शिवाजी महाराजांचां एक चांगला फोटो गाडीवर प्रिंट करायचं आहे, देणार का करून? त्यावर त्या दुकानदार मुलाने विचारले गाडीवर कुठे लावायचा आहे. त्यावर त्या मुलाने उत्तर दिलं मागच्या मड गार्डवर. हे ऐकुन त्या दुकानदाराने स्पष्टपणे त्या बुलेट वाल्या मुलाला नकार दिला. हे असले काम मी करत नाही. जर आपण छत्रपती शिवाजी महाराजांचां असा फोटो किंवा नाव गाडीवर लावले तर नेहमीच आपल्या गाडीवर धूळ, खराब पाणी आणि इतर गोष्टी उडत असतात आणि हा माझ्या राजाचा अपमान आहे. त्यामुळे मला हे जमणार नाही आणि मी तुझेच काय कुणाचेही असे शिवाजी महाराजांचे फोटो कुणाच्या बाईकवर लाऊन देत नाही.
हे सर्व ऐकुन झाल्यावर मी चकित झालो. थोडा विचारात गेलो कारण त्याने जे काही बोलले होते त्या वाक्यानी माझ्या मनात घर केलं होत. आपण सहज महाराजांचे फोटो बाईकवर लावत असतो पण नेहमीच त्या फोटो कडे लक्ष देतोच असे नाही. कितीतरी दिवस आपण गाडी धुवत नाही, गाडीवर धूळ बसते मग अशात त्या महाराजांच्या फोटोला आपण तिथं का लावावं? महाराजांना मनापासुन आचरण करायचं असेल तर त्यांचे विचार आचरण करा असे मला तरी वाटतं.
ह्या दुकानातील युवकाने खरचं मन जिंकले.ह्या मुलाने जो विचार केला तोच विचार ह्या क्षेत्रातील मुलांनी केला तर कोणत्याच गाडीवर असे महाराजांचे फोटो नसतील. पण माझ्या माहिती काही असेही शिवभक्त आहेत जे गाडीवर महाराजांचा फोटो लावतात ही आणि त्या फोटोला जपतात ही. त्यामुळे आता ही वेळ आपली आहे जर तुम्ही तुमच्या गाडीवर राजांचा फोटो लावताय तर त्या फोटोला जपायची जबाबदारी तुमची आहे.
#पाटीलजी