Home कथा संघर्ष एका स्त्रीचा

संघर्ष एका स्त्रीचा

by Patiljee
520 views

गोष्ट आहे सुधाची. ती घरात सर्वात मोठी असल्यामुळे आयुष्याच्या खूप कमी वयातच ती समजूतदार झाली होती. लहानपणापासून तिने घरातली गरिबी आणि आई वडिलांचा संघर्ष खूप जवळून पाहिला होता. तीचे आई वडील आणि लहान भाऊ असे त्यांचे छोटे कुटुंब. याच अशा हाळाखीच्या परस्थितीत सुधाने आपले शिक्षण पूर्ण केले होते. तिची इच्छा होतीकी स्वतःच्या पायावर उभे राहून आईवडिलांना मदत करावी. पण तिची ही इच्छा अपूर्णच राहिली कारण याच काळात तिच्या घरच्यांनी तिचे लग्न ठरवले.

सुधाला कळत नव्हते की ती खुश होऊ की दुःखी? पण तिने नियतीच्या मनात कदाचित हेच असेल हे म्हणून लग्नासाठी होकार दिला. पण तिच्या मनात मुळीच लग्नाचा विचार नव्हता. तिला बघण्यासाठी आलेला स्वप्नील एका चांगल्या कंपनीमध्ये कामाला आहे आणि त्याची परिस्थिती खूप गडगंज आहे असे सांगण्यात आले होते. त्यामुळे नकळत का होईना पण तिच्या घरचे आणि ती खुश होती. कारण जे सुख तिला आईवडीलाकडे मिळाले नव्हते ते सुख ऐश्वर्य तिला नवऱ्याकडून मिळणार होते.

लग्न करून सुधा सासरी आली तेव्हा तिला कळले की स्वप्नील कोणत्याच कंपनीमध्ये काम करत नाही तर एक छोटासा व्यवसाय करतोय, आणि तो पण फक्त नावाला आहे. त्याच्या घरची परिस्थिती सुद्धा खूप बिकट होती. हे सर्व पाहून तर तिच्या पायाखालची जमीन सरकली. कारण तिच्या आईवडीलाकडे पण तिने असेच गरिबीत दिवस काढले होते आणि आता तिचे बाकीचे आयुष्य पण तिला असेच काढायचे होते, हे तिला कळून चुकले होते. पण तिने हार मानली नाही तिने व्यवसायात पतीला मदत करायला सुरवात केली. पण पुढे व्यवसायात स्वप्नीलने खूप चुकीचे व्यवहार केल्यामुळे व्यवसाय डबघाईस गेला. ह्याचमुळे खूप कर्ज अंगावर चढत गेले आणि म्हणूनच ते त्यांच्या गावी निघून आले.

पण इथे सुद्धा संघर्ष होताच कारण सर्व गोष्टींना नव्याने सुरुवात करायची होती. मग त्यांनी गावात एक छोटेसे हॉटेल टाकले. हॉटेलला चांगले दिवस येण्यासाठी त्यांनी एक पंजाबी आचारी ठेवला. या आचारिमुळे हॉटेलची प्रचिती हळूहळू पंचक्रोशीत झाली. त्याच्या हाताचे जेवण जेवण्यासाठी खूप लोक दुरून येत असत. त्यामुळे सर्व एकदम सुरळीत चालले होते. पण पुढे त्या आचारीच्या घरी काही समस्या असल्यामुळे तो आचारी दोन दिवसाच्या सुट्टीवर निघून गेला.

तरीसुद्धा सुधाने स्वतः लक्ष घालून आचारीची कमतरता भासून दिली नाही. कारण सुधाचा आता हॉटेलवर जम बसला होता. तिने बनवलेलं नॉन वेज जेवण त्या हॉटेल मध्ये प्रसिद्ध झाले. या हॉटेलच्या कमाईमुळे त्यांच्या डोक्यावरचे कर्ज कमी होत गेले. हे सर्व सुधाच्या मेहनतीमुळे होत होते, त्यामुळे ती खूप खुष होती. पुढे हॉटेल मध्ये खूप काम वाढत गेले त्यामुळे सुधाला एकटीला सर्व काम करायला जमत नसत म्हणून तिने तिच्या हाताखाली कामवाली बाई काम करण्यासाठी ठेवून घेतली.

त्यामुळे सुधा आणि स्वप्निलच्या आयुष्यात सर्व सुरळीत चालले होते. पण तिला एकच गोष्टीची खंत होती ती म्हणजे लग्नाला एवढी वर्ष होऊन सुद्धा त्याला मुल नव्हते. यामुळे खरेतर ती अस्वस्थ होती, कारण तिच्यासोबत असलेल्या सर्व मैत्रीणीना मुले झाली होती. तिने खुप डॉक्टर केले, भरपूर देवांना नवस केले पण तिच्या हाती काहीच लागत नव्हते. त्यामुळे तिची चिडचिड व्हायला लागली होती. याच कारणामुळे त्या दोघांमध्ये भांडणे होत होती. 

सुधाने अखेर एक निर्णय घेतला की तिच्या जवळ असलेल्या माणसांना ती जीव लावेल त्यांना प्रेम देईल. तिने जी बाई कामावर ठेवली होती तिचा नवरा रोज रात्री दारू पिऊन तिला खूप मारायचा आणि तिला जेवण सुद्धा देत नसतं पण सुधाने तिला आपल्या लहान बहिणीसारखी वागणूक दिली. नवऱ्याने मारल्यावर ती तिला गपचूप जेवण द्यायची.

त्याच गावात राजू नावाचा मुलगा होता, तो गावातल्या गावात छोट्या मोठ्या चोऱ्या करत असत. एक दिवस सुधाने त्याला समजवण्याचा प्रयत्न केला की हे बघ राजू तू हे चोरी सोडून दे मग मी तुला रोज जेवायला देत जाईल, मुलाप्रमाणे तुझे लाड करेल फक्त हे चोरी करणे सोडून दे आणि त्याने सुद्धाचे हे ऐकले. पण तो रोज जेवायला येत नव्हता पण जेव्हा यायचा तेव्हा म्हणायचा “काकू मला जेवायला द्या ना खूप भूक लागली आहे” असे तो हक्काने तिच्याकडे जेवण मागत असत. सुधाला पण त्याची सवय झाली होती, तिने नवीन काय पदार्थ बनवला की अवर्जून त्याला बोलवून ती खायला घालत असत.

दिवाळीच्या काही दिवसासाठी ती माहेरी आली होती, खरतर तिला स्वप्नील आणि हॉटेलला सोडून यायची अजिबात इच्छा नव्हती पण तरीही ती आईवडीलासाठी आली होती. त्याच्या दुसऱ्याच दिवशी राजुने तिला फोन करून सांगितले की “काकू घरी या हॉटेल मधले वातावरण बिघडले आहे, तुम्ही लवकर या” हे ऐकुन सुधाने कोणताच विचार केला नाही ती तडकाफडकीने परत आली. तेव्हा हॉटेलचे सेटर बंद होते, तिने राजुला विचारले “बाळा काय झाले आहे रे??” तेव्हा राजू म्हणाला “काकू मी तुम्हाला काय झाले आहे ते नाही सांगू शकत तुम्हीच सेटर उघडून बघा”

सुधा खूप अस्वस्थ झाली होती….

काय झाले असेल??

स्वप्नील कुठे आहे??

त्याला काही झाले तर नसेल ना??

हॉटेलच्या आतमध्ये काय झाले असेल??

सर्व ठीक असेल ना??

अशा असंख्य प्रश्नांनी तिचे डोके भंडावून सोडले होते. तिने हिम्मत करून हॉटेलचे सेटर उघडले आणि समोरचे दृश्य पाहून तिच्या पायाखालची जमीन सरकली. तिचा नवरा आणि तिने कामावर ठेवलेली ती बाई नग्न अवस्थेत तिच्या समोर दोघेपण उभे होते. एका क्षणार्धात तिला काहीच कळले नाही, हे स्वप्न तर नाही ना कारण ज्या नवऱ्यावर एवढा जीव लावला, त्याच्या दुखःमध्ये त्याच्या सोबत राहिली, कधीही कुठल्या गोष्टीची अपेक्षा केली नाही, एवढा १५ वर्षाचा संसार याचे हेच फळ दिले का ह्याने मला.

तिने रागाच्या भरात दोघांना पण मारायची सुरवात केली, स्वप्नीलची कॉलर पकडून ती फक्त एवढेच म्हणाली “मी कुठे चुकले रे?? मी बायको म्हणून कुठे कमी पडले तुझ्यासाठी सांग मला?? तुझ्या वाईट काळात पण तुझा आधार म्हणून राहिले आणि त्याचे हे फळ दिलेस का तु मला?” पण त्याच्या चेहऱ्यावर आपण चुकलो आहोत असे काहीच दिसत नव्हते. ज्या कामवाली बाईसाठी सुधाचा विश्वासघात त्याने केला होता, ती बाई अशिक्षित होती, आणि तिचे लग्न होऊन तिला दोन मुली पण होत्या. तरी सुद्धा आपल्या सुशिक्षित बायकोला सोडून स्वप्नील तिच्या नादी लागला होता. त्याचे म्हणणे असे होते की त्याला सुधा सोबत आणि त्या बाईसोबत पण राहायचे होते. दोघी सुद्धा त्याला हव्या होत्या. पण सुधाला हे मान्य नव्हते कारण आपला नवरा तिला दुसऱ्या कोणत्याच बाई सोबत वाटून घ्यायचा नव्हता. असे सुधा काय पण कोणतीच बाई आपला नवरा दुसऱ्या बाई सोबत वाटून घेणार नाही. म्हणून सुधाने घटस्फोटाचा निर्णय घेतला आणि स्वप्निल पासून वेगळी झाली. तर याउलट स्वप्नील ने त्या महिलेशी लग्न करून तिच्या दोन्ही मुलींना जवळ केलं.

पण इथेच सुधाचा संघर्ष संपला नाही तर तो अजून वाढला. कारण तिच्या घरच्यांना असे वाटत होते की तिने जुळवून परत तिच्या नवऱ्याकडे परत जावे पण तिने तस केलं नाही म्हणून नेहमी घरात तिला याबाबत खूप अशा गोष्टी ऐकून घ्याव्या लागत असत. तिची आई तर तिला खूप टोचेल असे बोलायची. या सर्व गोष्टीमुळे सुधा खूप अवस्थ होती. तिच्या मनात नको नको ते प्रश्न येत होते. तिला असे वाटत होते की मी नक्की यांचीच मुलगी आहे ना की मला कुठून अनाथ आश्रम मधून घेऊन आले आहेत? का मला माझ्या घरचे समजून घेत नाही? का त्यांना कळत नाही माझ्या मनातले…?

या काळात ती खूप डिप्रेशन मध्ये गेली. खूप त्रास होत होता. तिचे म्हणने फक्त एवढेच होते की घरच्यांनी मला समजून घ्या, मला प्रेम द्या, पण घरच्यांकडून हे काही तिला मिळत नव्हते. डिप्रेशन मुळे तिला मायग्रेन सारखा आजार झाला. या आजाराच्या लास्ट स्टेपला ती जाऊन पोहोचली होती. यामुळे तिचे जगणे मुश्कील झाले होते कारण रोज तिचे डोके एवढे दुखत असतं की गोळ्या घेतल्यामुळे सुद्धा तिला बर वाटत नसतं. रात्र रात्रभर ती जागत बसायची त्या असह्य वेदना सहन करायची. खूप बिकट अशा परिस्थितीत ती आपले आयुष्य काढत होती. पण या परस्थितीत सुद्धा तिला अजूनही असे वाटत आहे की घरचे कधी ना कधी तिला समजून घेतील आणि त्यांचे प्रेम हीला नक्की मिळेल. त्यांना कधीतरी तिची बाजू समजेल.

तिला असे वाटत होते की या आजारामुळे आपण कधीपण मरून जाऊ शकतो मग आपले घरच्यांना तेव्हा तरी माझी दया येईल का?? आणि मी जर मेलो तर हे माझे अंतविधी तरी करतील का?? याच प्रश्नामुळे तिने अंतविधी साठी लागणार खर्च साठवून ठेवला आहे. असे पत्र सुद्धा तिने आईवडीलासाठी लिहून ठेवले आहे. आणि ती रोज आपल्या मरणाची वाट बघत आहे..!

तिला मरण येईल की तिच्या आयुष्यात दुसरे वळण येईल माहीत नाही पण घटस्फोट झाल्यानंतर नेहमी स्त्रियांना हा त्रास का होतो याचा कधी कोणी विचार सुद्धा करत नाही. घटस्फोट झाल्यानंतर पुरुष तर दुसरे लग्न करून मोकळे होतात पण स्त्रियांना या सर्व गोष्टीतून निघताना खूप वेळ जातो. लग्न करून एकदा केलेली चूक त्यांना परत करायची नसते म्हणून त्या दुसऱ्या लग्नाचा विचार सुद्धा मनात आणत नाही. या सर्व स्त्रियांना माझे एवढेच म्हणणे आहे की तुम्ही विचार तर करून बघा.. जर कोणी चांगला मिळाला तर नक्की दुसरे लग्न करा.. उगाच आपले आयुष्य असे दुसऱ्याच्या चुकीमुळे फुकट घालवू नका.

कथा सत्य घटनेवर आधारित आहे आणि आपल्याच पेजवरील एका स्त्रीची हि कथा आहे. पुढे तिने काय करावं यासाठी तुम्ही सर्वांनी कमेंट करा जेणेकरून ती या सर्व कॉमेंट्स वाचेल आणि जगण्याची एक नवीन उमेद मिळेल.

महेंद्र गुरुनाथ पाटील (पाटीलजी)
आवरे उरण रायगड

Related Articles

Leave a Comment

error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल