Home कथा नकार दिलेल्या प्रेयसीस पत्र

नकार दिलेल्या प्रेयसीस पत्र

by Patiljee
3235 views

प्रिय भावना,

खरतर प्रिय बोलण्या इतपत तुझ्या आयुष्यात माझी किंमत आहे का नाही खरंच माहीत नाही. पण तरीही कुठूनतरी सुरुवात करावी म्हणून पत्राला सुरुवात करतोय. हातात पेन घेऊन गेली दोन तास हाच विचार करत बसलोय की मी नक्की ह्या पत्रात काय लिहू? पण लिहावे तर लागेलच कारण तू माझे बोलणे नीट ऐकलेच नाहीस. नीट बोलली सुद्धा नाहीस आणि आपली एवढ्या वर्षाची मैत्री क्षणार्धात तोडून निघून गेलीस.

मला अजिबात असे वाटतं नव्हतं की आपल्या नात्याचा शेवट असा होईल. एवढा वाईट आहे का ग मी? आठवतोय शाळेतला तुझा पहिला दिवस जेव्हा तू पांढरा कुर्ता आणि लाल कलर दुपट्टा घालून आली होतीस. शालेचा युनिफॉर्म सुद्धा नव्हता त्यामुळे सर्वांच्या नजरा फक्त तुझ्यावर खिळल्या होत्या. माझ्याच काय तर सर्वांच्या मनात तू घर केले होतेस.

Crush म्हणजे काय असते ह्याची जाणीव मला तेव्हा तुला पहिल्यांदा पाहून झाली. मी तुझा चेहरा खूप दिवसांनी पाहिला मला फक्त तू परिधान केलेल्या हातातील त्या रंगबिरंगी बांगड्याचे आकर्षण जास्त होते. जेव्हा तू वर्गात यायचीस ना तेव्हा मी फक्त आणि फक्त तुझ्या त्या बांगड्याकडे पाहत बसायचो आणि माझा हाच स्वभाव तू हेरलास. पण कधी बोलून नाही दाखवलेस. वर्गातील सर्व मुलं तुझ्याशी बोलण्यासाठी काही ना काही कारण काढून तुझ्या जवळ यायची पण मी फक्त तुझ्या बांगड्या आणि माझे स्वप्नातले विश्व ह्यातच खुश होतो. एव्हाना ही गोष्ट तुझ्या लक्षात आली होती म्हणा.

तुला आपले पहिले बोलणे आठवतेय, आले ना आठवण? नक्कीच चेहऱ्यावर हसू आले असेल. लिहिताना माझेही तेच झालं आता. माझा मित्र जयेश आणि मी मस्ती करत असताना मी मस्तीतच जोरात पेन फेकून त्याच्या अंगावर फेकून दिला आणि चुकून तो तुला जाऊन लागला. खरंच त्या दिवशी एवढा घाबरलो की माझी तारांबळ उडाली होती. घाबरून जाऊन लायबरी मध्ये लपलो होतो. मला वाटले आता माझी खैर नाही पण जेव्हा वर्गात परत आलो तेव्हा सर्व आधीसारखे वाटले तेव्हा कुठं मन थाऱ्यावर आलं.

मधल्या सुट्टीत तूच जवळ आलीस तेव्हा पुन्हा घाबरलो, तू काय म्हणशील? पूर्ण वर्गासमोर माझा पाणउतारा करशील ह्याची जरा जास्त भीती वाटत होती. पण तू तसे नाही केलेस. म्हणालीस हाय महेंद्र, महेंद्रच ना? आणि जोरात हसलीस. तेव्हा मी काय उत्तर देऊ कळलेच नाही. फक्त होकारार्थी मान हलवली. तू अलगद मला सरकवून माझ्या बाजूला बसलीस. तुझा नकळत झालेला तो स्पर्श आजही मला तितकाच आपलासा वाटतो.

तेव्हा खऱ्या अर्थाने हक्काने आपली मैत्री झाली. आणि त्या दिवसापासून तुझ्या आणि माझ्या मैत्रीला सुरुवात झाली. पुढे जाऊन आपली एवढी घट्ट मैत्री झाली की आपले जेवण, अभ्यास, मस्ती, दंगा अगदी सर्वच सोबत सुरू झाले. मला माहित आहे हे सर्व तुला माहित असेल पण तरीही हे लिहिण्याचा मोह मला आवरत नाही. कारण माझ्यासाठी ह्या आठवणी खूप जास्त अविस्मरणीय आहेत.

आपण आठवी पासून बारावी पर्यंत सोबत होतो. कॉलेजची मज्जा असो किंवा शाळेतला दंगा आपण मनमोकळेपणाने सर्व गोष्टी सोबत पार पाडल्या. आपल्या मैत्रीत कुणा तिसऱ्याची गरजच भासली नाही. सर्वांना हेच वाटायचे की आपल्यात काहीतरी सुरू आहे. सर्वांना काय मलाच कधी कधी वाटायचे की नक्कीच आपलं हे नातं मैत्री पलीकडे जाऊन पोहोचले आहे. खूप वेळा मनमोकळे करावेसे वाटले सुद्धा पण नेहमी वाटायचं की तुझ्याशी मनात तेच असेल का जे माझ्या मनात आहे? शक्यता तर वाटतं होती की तुझेही माझ्यावर प्रेम असेल कारण माझ्या सोबत तू नेहमी निर्धास्त असायचीच. वागण्या बोलण्यात कधीच आपल्या मध्ये बंधन नसायचं.

पण अशातच सिनियर मोहनने संपूर्ण कॉलेज समोर तुला प्रपोज केलं. दिसायला रुबाबदार, देखणा ह्याचीच मला भीती वाटली की तू ह्या मुलाला होकार देतेस का? पण सुदैवाने तू रागात त्याला नाही म्हणालीस आणि पुढे निघून गेलीस. नंतर काही दिवसांनी तुझ्या बाबांनी त्या मुलाला घरी जाऊन दम दिला होता. तुला आजही कळले नाही की तुझ्या बाबांना ही गोष्ट कशी कळली? राग नको मानू पण मीच ही गोष्ट तुझ्या वडिलांना सांगितली होती.

तुला हे पत्र लिहिताना काय लिहू आणि काय नको असे झालेय. सर्व भूतकाळ डोळ्यासमोरून जातोय. तुला आठवतेय बारावीच्या लेखी परीक्षेत तू आजारी पडली होतीस. धड बेडमधून तुला उठताठी येत नव्हते तेव्हा तुझे सर्व राहिलेले अभ्यास मी पूर्ण करून दिला होता. किती कौतुक केलं होतेस तू माझे तेव्हा आणि जोरात माझ्या गालाना ओढलं होतेस. तुझ्या स्पर्शात खरंच एक जादू आहे. जेव्हा जेव्हा तुझा स्पर्श होतं माझं हृदय काम करणं थांबत. माहित आहे तुला माझ्या अशा फिल्मी लाईन्स आवडत नाहीत पण जे खर आहे तेच बोललो.

आपली बारावी झाली आणि कॉलेज संपले. तरीसुद्धा काही ना काही कारणांनी आपल्या भेटी होत राहिल्या. तुझ्याशी घरी माझ्याबद्दल माहीत होतं म्हणून त्यांनी सुद्धा कधी आक्षेप घेतला नाही. सध्या मला चांगला जॉब आहे आणि तुझेही घरचे तुझ्या लग्नासाठी मुलगा बघत आहेत म्हणून न राहवून मी माझ्या मनाचा बांध तोडला आणि काल तुला प्रपोज केला. मी ही खूप उत्सुक होतो कारण मला माहित होतं तुझा होकार आहे. कारण नकार द्यायला काहीच कारणे नव्हती.

पण तरीसुद्धा तू मला नकार दिलास. तुझ्यामते मी फक्त एक मित्र म्हणून चांगला आहे नवरा म्हणून चांगला नसेल. अग असे कसे म्हणतेस तू? एवढी वर्ष मला ओळखतेस, कधीतरी तुला दुसऱ्या कुणाशी मैत्री करावीशी वाटली का? नेहमीच मी तुझी काळजी करत आलो, अगदी कशाचीही कमी पडू दिली नाही तुला आणि तरी तुला वाटते की मी आयुष्याचा जोडीदार म्हणून तुझ्यासाठी योग्य नाही. खरंच हे ऐकून रडावे की शांत बसून राहावे अशीच माझी अवस्था आहे.

जोडीदार म्हणजे नक्की काय असते ग भावना सांग मला? जो तुमच्यावर जिवापाड प्रेम करेल, तुमची आयुष्भर काळजी घेईल, खूप प्रेम देईल आणि लहान बाळा सारखा तुम्हाला जपून ठेवीन. मग ह्या सर्व गोष्टी माझ्यात आहेत की, तरीसुद्धा मला नकार दिलास. वाईट वाटतेय ग खूप जास्त, एक तर मी तुला ओळखण्यात कमी पडलो किंवा तूच मला अजून एवढ्या वर्षात नीट ओळखू शकली नाहीस. मान्य आहे माझ्याकडे खूप पैसा नाहीये हा पण आता चांगला जॉब आहे आणि मला माहित आहे एक दिवस परिस्थिती अजून चांगली असेल. त्यासाठीच तर मला तुझी साथ हवी होती. जेव्हा पासून प्रेम काय असते हे कळलं आहे तेव्हापासून प्रत्येक स्वप्नात मी तुलाच माझ्यासोबत इमॅजिन केलं आहे. मग आता तुझा नकार कसा पचवू तेच समजत नाहीये.

हे पत्र मी तुझे मनपरिवर्तन करण्यासाठी लिहत नाहीये. फक्त तू नकार दिल्यापासून मनात खूप साऱ्या गोष्टी घर करत आहेत म्हणून व्यक्त व्हायचं होतं. मी तुला नाही आवडत हा तुझा निर्णय आहे. कदाचित असेलही माझ्यात काही कमतरता. पण एकच सांगतो तुला माझ्या एवढे प्रेम कुणीच करू शकत नाही कारण तुला काय आवडते काय नाही? तुझा आवडता रंग, फिरण्याचे ठिकाण, कधी तुला राग येतो कधी लाडात येतेस ह्या सर्वच गोष्टी मी चांगलाच जाणून आहे. तुझ्या आयुष्यात नवीन येणाऱ्या व्यक्तीला सुद्धा ह्या गोष्टी कळतील पण त्यासाठी खूप वर्ष जातील ह्यासाठी भावना. बघ तूच अजूनही विचार कर माझा. कारण माझे तुझ्यावर जीवापाड प्रेम आहे. आई नंतर सर्वात जास्त जीव मी तुला लावला आहे.

पण तरीही तुझा नकार असेल तरी मी तुझ्या निर्णयाचे स्वागत करेन कारण मला तुला सुखात पाहायचे आहे मग त्या सुखाचे कारण मी असो किंवा दुसरं कुणी ह्याने काहीही फरक पडत नाही. शेवट करता करता एक नक्की सांगेन जो काही निर्णय घेशील तो भावनेच्या आहारी जाऊन घेऊ नकोस, विचार कर आणि मगच घे. ही चिठ्ठी वाचताना माझा राग आला तर नक्कीच रागव, तेवढा हक्क दिलाय मी तुला पण असे बोलणे बंद करू नकोस. कारण तुझ्याशी नाही बोललो की मला करमतच नाही. कारण एवढ्या वर्षाची ती सवय लागली आहे.

माझी खरीखुरी प्रेमकथा वाचा.

तुझा मित्र,
महेंद्र पाटील

लेखक: पाटीलकी, आवरे, उरण रायगड.

Related Articles

Leave a Comment

error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल