आज ऑफिसमध्ये नवीन मुलगी जॉईन झाली. सारा नाव होतं तिचे. कलर केलेले केस, डार्क लिपस्टिक, घारे डोळे, त्यावर असलेला चष्मा, गालावर पडणारी ती खळी आणि तिच्या चेहऱ्यावरचे ते गोंडस हसू पाहून आमच्या ऑफिस मध्ये मुलांना जणू वाळवंटात पाणी मिळाल्या सारखे झाले होते. त्यांच्या प्रमाणे माझीही अवस्था अगदी तशीच होती. कारणही अगदी तसेच होते म्हणा कारण आमच्या डिपार्टमेंट मध्ये मोजून मापून दोन मुली होत्या आणि त्यांची सुद्धा लग्न झाली होती. साराच्या येण्याने सर्वानाच जणू एकतर्फी प्रेम झालेच होते.
पहिल्याच दिवशी डांगे सरांनी सर्वांशी तिची ओळख करून दिली. पहिला दिवस तिला काम समजण्यातच गेला मग पुढे काही दिवसात ती छान आमच्या डिपार्टमेंटमध्ये रुळली. माझ्या डिपार्टमेंटमध्ये सर्वांशी ती छान मोकळेपणाने बोलत होती पण माझ्याशी फक्त हाय हॅलो बस त्यापलीकडे काहीच नाही. ते सर्व पाहून माझे मित्र मला नेहमी चिडवायचे, “साल्या तिच्याकडे चुकीच्या नजरेने बघत असशील तू म्हणून तुझ्याशी धड बोलत नसेल ती” पण मी तिच्याकडे अशा कोणत्याच नजरेने पाहिले नव्हते.
एक महिना झाला पण तरीही तिचे तेच चालू होते. अखेर मी तिला कँटींगमध्ये गाठून तिला विचारलेच. काय सारा मी काही चुकीचा वागलो आहे का तुझ्याशी? तू ऑफिस मध्ये जॉईन झाल्यापासून मी पाहतोय की तू माझ्याशी नीट बोलत सुद्धा नाहीस. हो तसे तर तू खूप चुकीचा आणि विचित्र वागला आहेस माझ्याशी, हाय हॅलो करते कारण तू माझा एक कलिग आहेस म्हणून नाहीतर ते सुद्धा केलं नसतं. अग पण मी तर तुला आताच ओळखतो आहे आणि ह्या काही दिवसात मी असे तुझ्याशी काहीच वागलो नाहीये.
असे कसे ड्रोला बघ आठवून जरा. तिने मला ड्रोला संबोधले तेव्हा मला कसेतरीच झाले कारण हे नाव मला माझ्या शाळेतल्या मित्रांनी दिले होते. ड्रोला हे माझे शाळेतले टोपणनाव तुला कसे माहीत? पाचवीला १७, सहावीला ३४ आणि सातवीला २१ रोल नंबर होता तुझा, आठवतेय का काही? आता मात्र मी संभ्रमात पडलो. ह्या सर्व गोष्टी हिला कशा माहीत? मीच अनेक प्रश्न विचारणार त्या आधीच तिने सांगायला सुरुवात केली.
मी सारा नाव तर तुला माहित आहेच. पण तुला आठवतेय आपल्या तालुक्याच्या शाळेत एक जाडजूड मुलगी होती, चष्मा लावायची, तिला तुम्ही मुलं नेहमी ढिम्मा म्हणून चिडवायचां. ती मीच आहे. सारा काय सांगतेस तू हे? खरंच अरे यार, मी कसे ओळखले नाही तुला? कसे ओळखणार ना तू तेव्हा तुझे लक्ष तर प्रियाकडे असायचे. शाळेतला हिरो होतास ना तू तेव्हा? आणि तुझ्या मते प्रिया हिरोईन, म्हणून तू कुणालाच भाव देत नव्हतास. तुला तर हे पण नसेल माहीत की मी तुझ्या वर्गात होते की नव्हते? पण तू माझा क्रश होतास.
तुझे ते वाऱ्यावर उडणारे केस आजही आठवले मी हळूच चेहऱ्यावर गोड स्माइल येते. पण तुला तर माझे नाव पण माहीत नव्हते. मी बोलायला गेले तुझ्याशी की मला चिडवायचास, म्हणून मी तो सगळा राग ह्या एक महिन्यात काढला तुझ्यावर.
आता मात्र आम्ही दोघेही जोरात हसू लागलो. कारणही तसेच होते. एवढ्या दिवस ज्या मुलीशी बोलण्यासाठी मी वाट पाहत होतो तीच मुलगी शाळेत असताना माझ्याशी बोलण्यासाठी वाट पाहत बसायची. म्हणतात ना आपले पाप आणि पुण्य ह्याच जन्मात आपल्याला भोगायला लागतात. त्या दिवसापासून आमच्यात छान गट्टी जमली. सारा इतरांपेक्षा आता मला वेळ देऊ लागली होती. माझे कलीग आता मात्र माझा राग राग करू लागले कारण एवढी सुंदर मुलगी की त्यांच्यापासून हिरावून घेतली होती.
लेखक : पाटीलजी
(आवरे- उरण)
समाप्त
© या कथेचे सर्व हक्क लेखकास्वाधिन आहेत. लेखकाच्या नावासहित ही पोस्ट शेअर करायला हरकत नाही.