आज आमच्या गावची महाशिवरात्र. संपूर्ण तालुक्यातील सर्वात मोठी पालखी म्हणून ह्या सणाची आमच्या गावची ओळख आहे. गावातील कोणताही व्यक्ती शहरात काम धंद्या निमित्त बाहेर राहत असले तरी ह्या दिवशी ते काहीही झालं तरी गावात येणार म्हणजे येणार. आमच्या गावातले भोलेनाथाचे मंदिर स्वयंभू आहे. म्हणून आजूबाजूची लोक श्रद्धने दर्शनाला येत असतात.
आज एक वर्षाने सोनिया मला दिसली. नवऱ्यासोबत ती शिव शंकराच्या दर्शनाला आली होती. मोठी कार, गळ्यात अनेक तोळा सोना पण चेहऱ्यावर नैराश्य. खूप दुखी दिसत होती ती. ते पाहून मला खूप वाईट तर वाटलं कारण तिचे आणि माझे दोन वर्ष प्रेम होते. आमचे प्रेम संपूर्ण गावात जगजाहीर होते. कॉलेज मध्ये ती माझी ज्युनियर होती. तालुक्याच्या कॉलेज मध्ये आम्ही सोबत येत जात होतो. त्यामुळे आमच्यात कधी प्रेम झालं कळलंच नाही.
मी डिग्री घेऊन एका प्रायव्हेट कंपनी मध्ये रुजू झालो. नवीन काम असल्याने पगार तर कमी होता पण कंपनी छान होती. शिकायला खूप साऱ्या गोष्टी मिळणार होत्या म्हणून मीही तो जॉब स्वीकारला. सर्व काय सुरळीत चाललं होतं. आमच्या घरात तर आधीपासून आमचे प्रेम प्रकरण माहीत होतं म्हणून आईने लग्नाचा विषय काढला. मीही हो म्हणून टाकलं. कारण सोनिया सोबत मलाही लग्न करायचं होतं. माझे आई बाबा जेव्हा सोनियाकडे मागणी टाकायला गेले तेव्हा मात्र त्यांचा अपमान झाला.
तिच्या वडिलांनी खूप काही माझ्या आई बाबाला ऐकवले. तुमचा मुलाला आता कुठे मिश्या फुटल्यात आणि तुम्ही त्याचे लग्न लावत आहात? आणि तेही माझ्या मुली सोबत? तुमची लायकी काय आहे हे ओळखा जरा? आमचे कुटुंब बघा किती श्रीमंत आहे आणि तुम्ही मध्यमवर्गीय? चालते व्हा माझ्या घरातून. परत कधी तोंड दाखवू नका मला.
माझी बाबांनी खूप समजवण्याचा प्रयत्न केला. त्यांचे प्रेम आहे एकमेकांवर असे ते वारंवार सांगत होते.पण तिच्या वडिलांनी काहीएक ऐकले नाही. जेव्हा हे सर्व मला कळलं तेव्हा माझा पारा खूप जास्त चढला. मी लगबगीने तिचे घर गाठले. तिच्या वडिलांसमोर तिला विचारलं पण ती आता मात्र बदलली. आमचे अजिबात प्रेम नाही असे सांगून मोकळी झाली. आपलाच शिक्का खोटा आहे असे समजून मी घरी परतलो.
तरीसुद्धा मनात येत होतं की कदाचित वडिलांच्या दबावाखाली तिने असे म्हटले असेल. म्हणून मी तिला फोन केला. पण माझा फोन तिने कट केला. परत मी फोन केला तर तिने माझा फोन ब्लॉक लिस्ट मध्ये टाकला होता. काही वेळात समोरून तिचा मेसेज आला. हे बघ महेंद्र जे झालं ते आता विसरून जा. माझे वडील जे बोलतात ते बरोबर आहे. तुझी आणि माझी बरोबरी नाही होऊ शकत कधी. जे झालं तो फक्त टाईमपास होता असे समज आणि मला विसरून जा.
तिचे हे बोलणे माझ्या मनाला खूप जास्त लागले होते. पण मी दुःखी न होता हा विचार केला जी मुलगी माझे मन नाही ओळखू शकली ती मुलगी माझी बायको बनण्याच्या लायकीची अजिबात नव्हती. आता मी संपूर्ण लक्ष स्वतःला घडवण्यात लावेल आणि जी मुलगी माझ्या पैस्याकडे न बघता माझे मन पाहिल तिच्यासोबतच लग्न करेल. काही महिन्यांनी तिचे लग्न ठरले. वाईट तर खूप वाटतं होतं कारण पहिलं प्रेम होतं पण मी माझ्या मनावर ताबा मिळवला होता.
तिचा होणारा नवरा खूप श्रीमंत आहे अशी गावात खबर पसरली होती. ज्या दिवशी तीच लग्न झालं त्या दिवशी संपूर्ण गाव त्यांच्या कुटुंबावर हसत होतं. श्रीमंतीच्या हव्यासासाठी तिचे लग्न तिच्या वडिलांनी तिच्या वीस बावीस वर्ष मोठ्या व्यक्ती सोबत लावले होते. वाईट तेव्हा मलाही वाटले पण तिच्या कर्माची फळे तिलाच भोगायला लागलीत म्हणून मी ही गप्प बसलो.
माझी तमाम मुला मुलींना एक विनंती आहे. जर तुम्ही कुणावर मनापासून प्रेम केलं असेल तर ते प्रेम लग्नात रूपांतरित करा. कारण तुम्ही असेच कुणाला स्वतः च्या एवढ्या जवळ येऊ देत नाहीत. अनेकवेळा विचार करूनच प्रेम करता ना? मग लग्नाची गोष्ट आली की कुटुंब, पैसा, जात ह्या गोष्टी कुठून येतात? तुमचा जोडीदार तुम्हाला आयुष्यभर सुखी ठेवणार असेल तर ह्याहून सुंदर गोष्ट काहीच नाहीये. त्यामुळे ज्या व्यक्तीवर प्रेम केलं आहे त्याच्याशीच लग्न करा.
पाटीलजी