इंस्टाग्रामवर आज एक नोटिफिकेशन झळकली. पाहतो तर एक सुंदर मुलाने मेसेज केला होता. मस्त लाँग हेअर, डोळ्यावर गॉगल, चेहऱ्यावर स्मित हास्य हे त्याचे रूप पाहून कुणीही मुलगी घायाळ होईल, अगदी असाच होता तो. पण माझ्या मनात मात्र शंकाने काहूर माजवले होते की ह्या मुलाने मला का मेसेज केला असेल? माझा तर डिपी सुद्धा नाहीये. मी कशी दिसतेय हे सुद्धा त्याला माहीत नाहीये मग तरीही त्याने मेसेज का केला असावा ह्या विचारात मी पडली.
विचारात एवढी मग्न झाली की त्याला हॅलो म्हणून कधी रिप्लाय दिला हे माझे मला सुद्धा कळलं नाही. माझा मेसेज त्याला पोहोचला आणि क्षणार्धात त्याने तो रीड करून मला रिप्लाय केला. कुठून आहात आपण? त्याच्या ह्या अहो जाओ करण्यामुळे मला तो मुलगा डीसेंट वाटला. मग काय आमचे रोज बोलणे चालू झाले. सकाळी गुड मॉर्निंग पासून ते रात्री गुड नाईट पर्यंतचा प्रवास सुरू झाला. दिवसभरात काय काय घडले ते आम्ही एकमेकांना सांगू लागलो. एक दिवस सुद्धा बोलणे झाले नाही तर मन अस्वस्थ व्हायचं.
एक दिवस त्याने समोरून विचारले “आपण भेटू शकतो का?” मी थोडी घाबरली कारण असे अनोळखी व्यक्तीला कसे भेटणार ना? पण तसा तो अनोळखी नव्हता पण भेटू कशी हा प्रश्न मनात होताच. कारण एवढ्या महिन्यात मी त्याला एकदाही माझा चेहरा दाखवला नव्हता. आम्ही फक्त ऑनलाईन बोलत होतो. एवढेच काय तर त्याने किंवा मी एकमेकांचा आवाजही ऐकला नव्हता. ह्या सर्व गोंधळात भेट कुठून मधेच आली म्हणून मी त्याला नकार दिला. पण त्याने जास्तच आग्रह केला म्हणून मग मीही विषय न तानवता त्याला भेटण्यासाठी होकार दर्शवला.
ठरल्या प्रमाणे आम्ही कॅफे मध्ये भेटणार होतो. तो येऊन अर्धा तास आधीच बसला होता. मी कॅफे मध्ये गेले पण तो कुठे दिसत नव्हता मी त्याला मेसेज केला कुठे आहेस? अग इकडे बघ कोपऱ्यात रोमँटिक कपलचे फोटो आहे ना त्या खाली बसलोय. अच्छा अच्छा ते ठीक आहे पण आता बाजूला सरक ना मी मागेच उभी आहे. आणि दोघेही हसायला लागले. मी त्याला फोटो मध्ये पाहिले होते पण समोरून तो खूप जास्त सुंदर दिसत होता. पण त्याला मला बघण्याची ही पहिलीच वेळ पण त्याने बघून सुद्धा न बघण्यासारखे केले आणि गप्पा मारू लागला.
मला नवल ह्या गोष्टीचे वाटत होत की आमची पहिलीच भेट आणि ह्याला त्याबद्दल काहीच वाटत नाही. एवढ्या महिन्याने माझा चेहरा बघितला त्याचे ह्याला काहीच नाहीये. म्हणुनी त्याला रागातच म्हटले, माझा चेहरा आवडला नाही का तुला बघत सुद्धा नाहीस? पहिल्यांदा बघतोय तू त्यामुळे तुझ्या चेहऱ्यावर असे काहीच हावभाव दिसत नाहीये. तो माझ्याकडे बघून गोड हसला आणि म्हणाला कसे आहे ना मॅडम तुम्ही मुली जेवढ्या हुशार असताना तेवढ्याच मंद सुद्धा.
त्याचे हे वाक्य खरतर माझ्या डोक्यावरून गेले होते पण पुढे काय बोलणार म्हणून मी ऐकत होतो. आपण सहा महिने बोलतोय ना मॅडम मग ह्या सहा महिन्यात तुम्ही कधी तुमचा चेहरा आम्हाला दाखवला नाही मान्य आहे आम्हाला पण तुमच्यामते मी तुम्हाला आज बघतोय पण असे नाहीये ना पोरी मी तुला आधीच पाहिले होतं. आता मात्र माझे डोकं भिनभिनले होते कारण मी त्याला कधीच माझा फोटो दाखवला नव्हता मग ह्याने मला कसे पाहिले? म्हणून मी त्याला प्रश्न केला.
मी तुला माघाशीच बोललो ना की तू हुशार तर आहेस मला फोटो दाखवला नाही पण तुझ्या इंस्टाग्राम वर जो युजर आयडी आहे तोच युजर आयडी फेसबुकवर सुद्धा आहे. त्यामुळे तुझे लहानपापासूनचे फोटो, तुझे कुटुंब, शाळा, कॉलेज, जॉब, मित्र अगदी सर्वच मला माहिती आहे. आणि हो फेसबूकवर आताच दहा मिनिटांपूर्वी जी ती पोस्ट टाकली आहेस ना “Meeting Someone Special” ते पण मी पाहिली आहे बरं का.
आता मला लाजल्याहून लाजल्यासारखे झाले होते. एवढी कशी मी मंद असू शकते म्हणून स्वतः ला कोसत होते. पण त्याने ज्याप्रकारे मला सर्व सांगितले ते ऐकुन खरंच खूप छान वाटलं होत. मग काय तो आमचा संपूर्ण दिवस छान मस्त गेला आणि आम्ही आमच्या घरची वाट धरली.
कथेचे सर्व अधिकार लेखकाधिन आहेत, लेखकाच्या नावासोबत कथा शेअर करायला हरकत नाही.
लेखक : पाटीलजी (आवरे उरण)