सध्या फेसबुकवर हनी ट्रॅप म्हणून एक गोष्ट तुफान वायरल आहे. आता तुम्ही म्हणाल हे हनी ट्रॅप आहे तरी काय? किंवा काही लोकांना माहीत देखील असेल. चला मी या विषयावर आज सविस्तर माहिती देतो. या विषयाकडे खूप गांभीर्याने लक्ष द्या. कारण तुमच्या इज्जतीचा प्रश्न आहे आणि मग हा विषय जीव देण्यापलीकडे जातो.
सध्या सोशल मीडियावर तुम्हाला अनोळखी मुलीच्या नावाने फ्रेंड रिक्वेस्ट येते आणि मग आपली जवान पोरं किंवा अशी व्यक्ती ज्यांना सोबतीची गरज आहे ते या गोष्टीला बळी पडतात. रिक्वेस्ट आल्यानंतर समोरची मुलगी तुमच्याशी गोड बोलेल, तुमच्या बद्दल विचारेल, जानू बेबी म्हणत तुम्हाला तिच्या जाळ्यात अडकवेल. काहीच वेळ बोलणं झालं की मग ती से*क्सी चाट करायला सुरुवात करेल.
तरुण मुडमध्ये आलोय हे पाहून झालं की व्हिडिओ कॉलची मागणी करेल. एकदा का व्हिडिओ कॉल आला की ती समोरची मुलगी तिचे सर्व कपडे आपल्या समोर काढायला सुरुवात करेल. आणि असे करत असताना तुम्ही देखील त्याच हौसेने तुमचे कपडे काढलेत तर इथे तुम्ही मोठ्या संकटात अडकलात म्हणून समजा. कारण त्या मुलीला देखील हेच हवे असते की आपण कॅमेरा समोर कपडे काढावे. कारण हे करत असताना ती स्क्रीन रेकॉर्ड करून ठेवते.
इथून सुरू होतं ब्लॅक*मेलिंगचा प्रवास. एकदा का कॉल ठेवलात की काहीच वेळात तिने रेकॉर्ड केलेली व्हिडिओ ती मुलगी तुम्हाला पाठवते. त्याबदल्यात ती एक ते दोन हजार रुपयांची मागणी करते. पैसे नाही दिले तर तुझ्या फ्रेंडलिस्ट मध्ये असलेल्या सर्व मित्रांना ती व्हिडिओ पाठवेन अशी धमकी देते. आपल्या एक दोन मित्रांना ही व्हिडिओ पाठवली आहे असे स्क्रीनशॉट सुद्धा दाखवते. आपल्या इज्जती मुळे आणि भीती मुळे आपण त्या मित्रांना व्हिडिओ आलीय का? असे विचारू सुद्धा शकत नाही. आपला तरुण या सर्व गोष्टींना घाबरतो. आपण चूक केलीय हे त्याला उशिरा समजते पण इथे वेळ निघून गेलेली असते.
एक ते दोनच हजार मागते ना मग देतो पैसे असे म्हणत तरुण तिला पैसे पाठवतात. इथेच तुम्ही चुकता कारण जेव्हा तुम्ही पैसे पाठवता तेव्हा त्यांना कळते की हा माणूस पूर्णतः आपल्या जाळ्यात अडकला आहे. मग एकदा का पैसे मागितले आणि तुम्ही ते दिले की त्यांची मागणी वाढत जाते. आधी हजार मग पाच, दहा, पंधरा, पंचवीस, पन्नास आणि एक लाखापर्यंत पैश्यांची मागणी केली जाते.
तुम्ही जेवढ्या वेळ पैसे द्याल त्यानंतर विषय थांबत नाही. त्यांची हाव आणि मागणी वाढत राहते. अशाने माणूस डिप्रेशन मध्ये जायला सुरुवात होते आणि मग स्वतच्या जीवाचे काही बरं वाईट सुद्धा करून घेतो.
अशा परिस्थितीत काय करावे?
या ट्रॅप पासून वाचायचे असेल तर अनोळखी मुलींच्या किंवा मुलांच्या रिक्वेस्ट स्वीकारू नका. अशा व्यक्तीशी बोलणे टाळा. पण आधीच तुम्ही ही चूक केली असेल तर जेव्हा ती तरुणी तुम्हाला व्हिडिओ पाठवून पैश्याची मागणी करते तेव्हा अगोदर एक गोष्ट करा. आधी तर तिचा प्रोफाइल ब्लॉक करा. काही दिवसासाठी तुमचे फेसबुक किंवा जे सोशल मीडिया अकाउंट असेल ते डीॲक्टिव करून टाका.
हे असे केल्याने ती तरुणी तुमच्यापर्यंत आणि तुमच्या फ्रेंड लिस्ट मधील मित्रांपर्यंत पोहोचू शकत नाही. आणि यामुळे विषय तिथेच थांबतो. हा फ्रॉड सध्या महाराष्ट्रतील गावातल्या मुलांना टार्गेट करत आहे. कारण अशी मुलं लवकर यांच्या जाळ्यात अडकतात. कॅमेरा समोर मुलगी असली तरी त्यांची भलीमोठी टीम या मागे असते. असे अनेक युवक रोज ते आपल्या जाळ्यात अडकवून लाखोंची कमाई करतात. यामुळे या गोष्टीला वेळीच आला बसला पाहिजे. पोलिसात जाऊन भीतीने काही लोक कम्प्लेंट करतात तर काही इज्जती मुले विषय पुढे नेत नाहीत. पोलिसांकडे सुद्धा अशा अनेक केसेस पडल्या आहेत.
म्हणून ही पोस्ट प्रत्येक मित्र मैत्रिणीने आवर्जून शेअर करा. कारण तुमचे अनेक मित्र या फ्रौड पासून वाचू शकतात. माझ्या दोन मित्रासोबत ही घटना घडली आहे. एकाने ५१ हजार तर दुसऱ्याने ३४ हजार गमावले आहेत. एक मित्र तर जीव द्यायला निघाला होता. पण मी त्याला समजवून कसेतरी यातून बाहेर काढलं. आता गरज आहे तुम्हाला या सर्व गोष्टी पासून वाचायची. गोष्ट खूप साधी आहे. कोणत्याही अनोळखी मुलीशी फेसबुकवर बोलू नका. आणि बोललात तर व्हिडीओ कॉल पर्यंत गोष्टी आणू देऊ नका नाहीतर तुम्ही सुद्धा या स्कॅम मध्ये अडकू शकता.
तुम्हाला कुणाला याबाबत अजून मार्गदर्शन हवे असेल तर आमच्या patiljeee@gmail.com या मेल आयडीवर मेल करा. आम्ही तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन करू. फीचर्स इमेज क्रेडिट मिस्टर ग्रोथ यूट्यूब.