“अहो, ते तुमच्या मोबाईल मध्ये असलेले माझे नथ घातलेले, पैठण्या घातलेले, वेगवेगळे दागिने घातलेले फोटो पाठवा जरा, 3 महिन्यांपूर्वी माझ्या मोबाईलला फॉरमॅट केल्याने सगळे जुने फोटो गेलेत.” आमच्या पत्नीने फर्मान सोडलं.
“आता कशाला मध्येच ते सगळे फोटो हवेत तुला?” मी पण आपल्या पुरुषी ठेक्यात तिला विचारलं.
“अहो, आजकाल ते वेगवेगळे चॅलेंज चालू आहेत ना व्हाट्सएपवर, त्यासाठी हवेत. तुम्ही पाठवा लवकर.. “तेव्हा माझ्या लक्षात आले आणि मी सुद्धा बरेच स्टेटस पाहिले, त्यात नथीचा नखरा ह्या चॅलेंजखाली खूप सुंदर असे नटलेले सजलेले फोटो प्रत्येक स्टेटसला दिसत होते.
छान चाललं होतं ह्या स्त्रियांचं. घरात बसून एक विरंगुळा. फक्त दिवसभर कोरोना कोरोना ऐकत बसण्यापेक्षा हे काहीतरी नवीन होतं, दिवसभर फक्त घरकाम, धुणी भांडी करून कंटाळा आला होता, कुठे बाहेर पडायला मिळत नव्हतं. कोणीतरी सुपीक डोक्यातून हे चॅलेंज काढले आणि त्यामुळे मन दुसरीकडे रमायला लागलं. पण त्यातही कोणीतरी दुधात मिठाचा खडा टाकावा असा खो घातला. काय तर म्हणे, बाहेर चाललंय काय आणि ह्या बायकांचं काय चाललंय? ह्यांना जरा तरी भान आहे का? ज्यांच्यावर आज वाईट प्रसंग आलाय त्यांना हे असे स्टेटस बघून कसं वाटेल, हे तरी ह्या स्त्रियांनी लक्षात घ्यावं. आपल्या मधील कित्येक स्त्रिया डॉक्टर, नर्स, पोलीस कर्मचारी आहेत, आणि त्या त्यांची जबाबदारी पार पाडत आहेत. त्यांना हे असे स्टेटस बघून कसं वाटेल?
हे सगळं कमी पडलं म्हणून कोणीतरी लक्ष्मीकांत बेर्डे ह्यांचा नथ घातलेला फोटो बाहेर काढला, कोणी म्हशीला नथ घातलेला फोटो शोधून काढला. एवढंच नव्हे तर ह्या नथीच्या नखऱ्यावर नाना प्रकारचे विनोद बाहेर पडले. नाकात कापूस घालायची वेळ आलीय ह्यांना नथीचा नखरा सुचलाय..!
कधी आपण विचार केलाय का? नथ का घालतात? कुठल्या प्रांतात घालतात? स्त्रियांनी नथ का घालावी? नाही ना माहीत, मग शोधा गुगलवर. एकदा की सत्य समोर आलं की आपल्याला खात्री पटेल की आपला महाराष्ट्र काय दर्जाचा आहे. नसेल वेळ तर हे वाचाच..
महाराष्ट्रामध्ये स्त्रियांनी नाकात नथ घालणे हा आपल्या संस्कृतीचा भाग आहे. कितीही मेकअप केला आणि दागिने घातले तरी नथ घातल्याशिवाय स्त्रीच्या चेहऱ्याला शोभा येत नाही. आपल्याकडे अनेक प्रकारच्या नथी बाजारात मिळतात, त्यात अलीकडेच भर पडली आहे ती म्हाळसा आणि भानू नथ.
आपल्या महाराष्ट्र धर्मात एक प्रथा होती. पुरुषाच्या कानात बुगडी (भिकबाळी) आणि स्त्रियांच्या नाकात नथ असायचीच. त्या दोन्हींमध्ये मोती असायचा, कारण मोत्याची विशिष्टता आहे की तो शरीरातील उष्णता, दाह शांत करतो. असं म्हणतात की पुरुषाला राग आला की त्याच्या कानातून वाफा निघतात आणि स्त्रीला जर राग आला तर तिचा नाकाचा शेंडा लाल होतो. दोन्हीकडचा दाह शांत करण्यासाठी मोती हा उपयुक्त आहे, परंतु नुसता मोती तिथे ठेवू शकत नाही, म्हणून हे दागिने तयार केले गेलेत.
एवढंच नाही तर, स्त्रियांनी नथ घातल्यामुळे त्यांना शांत झोप येते, नाकपुडी संबंधित आजारापासून सुटका होते, मासिक धर्म दरम्यान होणाऱ्या वेदनांपासून सुटका होते.
अश्या अनेक प्रकारचे फायदे सोन्यामध्ये बनवलेली नथ घातल्याने होतात. नाकाला आणि कानाला छेद केल्याने होणारे फायदे अँक्युप्रेशरचे डॉक्टर नेहमी सांगत असतात. एवढंच नव्हे तर स्त्रियांनी काळ्या मण्यांचे मंगळसूत्र, बांगड्या, फेरवी घालण्यामागे काही वैज्ञानिक कारणे आहेत. कंबरेच्यावर सोन्याचे दागिने आणि कमरेच्या खाली चांदीचे दागिने घालणे ह्या सगळ्यांची कारणं आपल्याला शोधल्यावर वाचायला मिळतील.
मग आता आपल्याला प्रश्न पडला असेल की, हे आत्ताच कशाला पाहिजे, ह्या कोरोना महामारीच्या संकटामध्ये? बरोबर आहे तुमचं, पण स्त्रियांनी नथीचा नखरा आणि इतर चॅलेंज स्वीकारलेले फोटो स्टेटसला ठेवले तर कोरोना वाढणार आहे का? आणि नाही ठेवले तर कमी होणार आहे? काय संबंध स्टेटसचा आणि महामारीच्या? एका मोठ्या पदावर कार्यरत असलेल्या माझ्या पोलीस मैत्रिणीला मी विचारलं, तुम्हाला नाही वाईट वाटत का हो, हे असले स्टेटस बघून? तुम्ही दिवसभर उन्हातान्हात राबत असता, तहान नाही भूक नाही, जेवणाची वेळ नाही. कधी आपल्यामध्ये ह्या रोगाची लक्षणे दिसतील हे सांगू शकत नाही. त्याऊलट घरात बसलेल्या ह्या स्त्रिया असे सजलेले, नटलेले फोटो स्टेटसला टाकत असतात.
त्यावर तिने दिलेलं उत्तर माझ्या मनाला भावलं, ती म्हणाली, आम्ही आज उन्हातान्हात उभे राहून ह्या रोगाचा सामना करतो हे बरोबर आहे, परंतु एवढे छान छान स्टेटस बघून आम्हाला एवढं सुख वाटतं ना, की आज सगळ्या स्त्रिया घरात अडकलेल्या असून सुद्धा एकदम आनंदात आणि सुखात आहेत. आमच्या कष्टाचं चीज होतंय. त्या घरात राहून सामना करतात आणि आम्ही बाहेर राहून. बघा किती मोठ्या मनाच्या असतात आपल्या पोलीस, डॉक्टर, नर्स आणि इतर अत्यावश्यक सेवेतील रणरागिणी.
हा लेख लिहिण्याचा मुद्दा एवढाच, की उगीच आपल्या संकुचित वृत्तीमुळे महाराष्ट्राची संस्कृती लोप पावेल असे वागू नये. एकतरी हे दिवस म्हणजे लग्नसराईचे होते. स्त्रियांसाठी नवनवीन साड्या, वेगवेगळे दागिने मिरवण्याचे होते. परंतु अचानक उद्भवलेल्या ह्या संकटामुळे मनासारखं करता आलं नाही. कित्येक जणांनी आपली लग्न पुढे ढकलली आहेत. मग निदान जुने फोटो स्टेटस ला टाकले तर कुठे बिघडलं?
एक लक्षात असुद्या, आज आपण आहोत म्हणून आपली पत्नी नथ घालते. उद्या आपल्या नाकात कापूस घातला की तिची नथ कायमची लांब जाईल. समाजात आपल्यानंतर तिला ती नथ घालुन मिरवता येत नाही, घातली तर काही होत नाही, परंतु लोकं नाव ठेवतील ह्याची भीती असते. मग कुठे बिघडलं तिने आत्ताच नथीचा नखरा केला तर..!!
माझ्या आई बहिणींनो, करा बिनधास्त चॅलेंज आणि संपूर्ण जगभरात महाराष्ट्राची संस्कृती होऊदे फेमस. आणि हो, आमच्या मिशीचा नखरा चॅलेंजच पण बघा तेवढं….!!!
श्री. अतिष म्हात्रे
आगरसुरे- अलिबाग
मोबाईल- ९७६९२०९९१९
(व्हाट्सएप साठी)
समाप्त
© या कथेचे सर्व हक्क लेखकास्वाधिन आहेत. लेखकाच्या नावासहित ही पोस्ट शेअर करायला हरकत नाही.