ठाणे ते पनवेल हा माझा नेहमीचा ट्रेन प्रवास, माझे ऑफिस ठाण्यात असल्याने मला हा प्रवास नेहमीचा झाला होता. रोज सकाळी ती गर्दीची ट्रेन पकडून ऑफिसला जाण्यात सुद्धा एक वेगळी मज्जा असते. हे फक्त त्यांनाच समजू शकते जे ट्रेन ने प्रवास करतात.
आज ऑफिसमध्ये जास्त काम असल्याने मला उशीर झाला. प्लॅटफॉर्मवर पोहोचलो तर रात्रीचे ११.१५ वाजले होते. फलकावर पाहिले तर ११.२९ ची पनवेल येणार होती. हे पाहून आतूनच थोडा सुखावलो. नोव्हेंबर महिना आताच सुरू झाला होता त्यामुळे वातावरणात थोडी थंडी जाणवत होती. ट्रेन आली आणि मी ट्रेन मध्ये चढलो.
कानात हेडफोन्स घालून गझल ऐकण्यात जी काही मज्जा आहे ती वेगळीच, असे करत असताना माझे लक्ष समोरच्या डब्ब्यात गेले. दोन मुलं एका मुलीची छेड काढताना मला दिसले. एक मुलगा त्या मुलीची ओढणी ओढण्याचा प्रयत्न करत होता. त्या डब्ब्यात सुद्धा कुणी नव्हतं म्हणून त्यांना ही मोकाट संधी चालून आली होती. पाहताच मला ह्या गोष्टीचा राग आला. पुढील स्टेशनवर जाऊन मी माझ्या डब्ब्यातून उतरून त्यांच्या डब्ब्यात शिरलो.
अजब लग्नाची गजब गोष्ट, ज्येष्ठ पत्रकार माधवराव पाटील अखेर वयाच्या ६५ व्या वर्षी बोहल्यावर चढले
समोर मुलीला पाहताच म्हटलं, काय प्रगती कधी पासून कॉल करतोय उचलत का नाहीस? तिच्यासाठी मी अनोळखी होतो पण तरीसुद्धा त्या दोघांना पळवून लावण्यासाठी मला हे बोलावे लागले. आधी त्या मुलीला मी काय बोलतोय हे कळलंच नाही. नंतर तिच्या लक्षात आले आणि ती येऊन माझ्याजवळ उभी राहिली. ह्या मुलीसोबत कुणी आहे असे त्या दोघांना कळल्यावर त्यांनी त्या डब्ब्यातून काढता पाय घेतला.
त्या मुलीने माझे आभार मानले पण मला इतक्यात थांबायचे नव्हते. पनवेल स्टेशन वर उतरताच आम्ही झालेला प्रकार तिथल्या स्थानिक पोलिसांच्या कानावर घातला. आता दोघांचा शोध सुरू आहे. मी आधीच त्यांचा फोटो काढून ठेवला होता. त्याच आधारावर पोलिस त्यांना शोधून योग्य ती कारवाई करतील.
मित्रानो कसे आहे कधी कधी तुम्ही प्रत्येकाशी भांडून प्रश्न सोडवू शकत नाही. अशावेळी बुद्धीचा वापर करा पण जिथे अन्याय होईल तिथे व्यक्त व्हायला शिका. इतर कुणी नाही तर स्वतः पासून सुरुवात करा.