आज सकाळीच वृत वाहिन्यांवर घरातून बाहेर पडू नका म्हणून सांगत होते, रायगड मध्ये वादळ येणार आहे असा इशारा होता. पण आमचं ऑफिस दोन महिन्याच्या लॉक डाऊन नंतर चालू होऊन फक्त दोनच दिवस झाले होते त्यामुळे आज ऑफिसला दांडी मारणे शक्यच नव्हते. घाईघाईत तयारी करून ऑफिसला जायला निघालो. वातावरण तसे शांत होते, पण कदाचित वादळापूर्वीची ही शांतता होती.
बाईक सुरू करायला गेलो तर ती सुरू होण्याचे नाव घेत नव्हती. जणू ती सुद्धा मला सांगत होती मालक आज कामावर जाऊ नका पण मी काही ऐकले नाही. अर्ध्या तासाच्या मेहनती नंतरही माझी गाडी काही सुरू झाली नाही. अखेर बाजूवाल्याकडून त्याची गाडी घेऊन मी स्वारी ऑफिसकडे वळवली. मोरबे ते पलस्पे असा माझ्या कामाचा २२ किमीचा प्रवास रोज मला जवळ वाटतो पण आजचे चित्र काही वेगळेच होते. रस्त्याला खूप कमी गाड्या दिसत होत्या.
अखेर मी ऑफिस मध्ये पोहचून कामाला सुरुवात केली. पण कोकणात वादळाचे तीव्र तांडव माजवले आहे अशा बातम्या व्हॉटसअपवर झळकू लागल्या. शेवटी आमच्या बॉसने आम्हाला घरी पाठवण्याचा निर्णय घेतला.(मनात होतेच की पाठवायचे होते मग बोलावले कशाला, पण देर आये दुरुस्त आये, म्हणून आम्ही विषय मारून नेला) आम्ही ऑफिस मधून निघालो. पण माझा हा प्रवास एवढ्यात संपणारा नव्हता.
पुढच्या सिग्नलला पोहोचताच मी आणलेली बाजू वाल्याची बाईक सुद्धा बंद पडली. खूप कष्ट घेतले तिला परत सुरू करण्यासाठी पण सर्व निष्फळ. अखेर मी गाडी धक्का मारत पुढे पुढे कुणी मेकॅनिक भेटतोय का शोधू लागलो. पण पनवेलमध्ये सुद्धा जनता कर्फ्यु सुरू असल्याने मला कुठेच मेकॅनिक मिळाला नाही. जवळजवळ मी दोन किमी गाडीला ढकलत आणली पण कुठेच काही सापडत नव्हते. त्यात तो हळुवार पडणारा पाऊस अजून त्रास देत होता. अखेर एक मेकॅनिकचे दुकान समोर उघडे दिसले. मी लगेच गाडी त्याच्या दुकानात टाकली.
तो ही घरी जायला निघतच होता पण माझ्यासाठी तो बिचारा थांबला. त्याने गाडी पूर्ण चेक केल्यावर मला सांगितले की आजतरी तुमची गाडी होणार नाही. तिचा पट्टा तुटला आहे आणि तो पट्टा माझ्याकडे सध्या नाहीये. नशिबात आज काय वाढून ठेवलं होतं हे त्या देवालाच माहित. मी ती गाडी त्याच्या कडे ठेऊन एका जवळच राहणाऱ्या मित्राला फोन केला. त्याची बाईक मी त्याला घेऊन यायला सांगितले. आजवर अनेक चांगले मित्र कमावले आहेत ते नेहमीच असे वेळोवेळी कामी येतात.
त्याने गाडीची चावी मला दिली. मी त्याला त्याच्या घरी जाऊन सोडलं आणि माझ्या घरची वाट धरली. पण देवाने आज माझी परीक्षा घ्यायचे ठरवलेच होते. काही किमी पुढे गेल्यावर जोरदार वारा सुरू झाला, झाडे झुडपे अतिशय वेगाने आक्रोश करीत होते. आजवर मी असे काही निसर्गाचे विक्राळ रूप समोरून पाहिलेच नव्हते. मी गाडी चालवत असताना समोरच एक मोठं झाड रस्त्यावर पडलं. थोडक्यात मी बचावलो. पण मी समोर डोकावून पाहिले तर रस्त्यात तीन चार झाडे पडली आहेत. आणि पुढे जाण्याचा रस्ता पूर्णतः ब्लॉक झाला होता.
आता मात्र मी खूप वैतागलो होतो. आज खरंच माझ्या आयुष्यातील सर्वात वाईट दिवस होता. एका मागून एक अशी संकटे येतच होती. मी परत गाडी मागे फिरवली आणि त्याच गावात राहणाऱ्या माझ्या मित्राकडे ठेवली. घरी फोन केला तर भावाने सांगितले की बरीच झाडे रस्त्यावर पडली आहेत. इकडून वाहने तिकडे आणि तिकडून वाहने इकडे येऊ शकत नाही. तुला चालत घरी यावे लागेल. हे ऐकुन खर तर माझा धीर पूर्ण सुटला होता.
अजून घरी जाण्यासाठी १० किमी अंतर बाकी होतं. शेवटी मी चालत जाण्याचा निर्णय घेतलाच आणि पुढे चालू लागलो. पशु पक्षी पूर्णतः गायब झाले होते. त्याचा तो मंत्रमुग्ध करणारा आवाज जणू कुणी दाबला गेला होता. तो सोसाट्याने वाहणारा वारा खूप भीतीदायक होता. पावसात पूर्ण भिजलो होतो. सर्वांना पहिला पासून आवडतो पण ह्या वर्षीचा पहिला पाऊस नेहमीच स्मरणात राहील असाच आहे. अखेर एवढी मोठी पायपीट करून मी घरी पोहोचलो आणि सुटकेचा निःश्वास सोडला. माझ्या आयुष्यातील सर्वात भयाण हा अनुभव होता.
आता मला उद्या घरातून निघून माझी गाडी दुरुस्तीला टाकून, प्रवास करून मित्राची गाडी घेऊन त्याला त्याच्या घरी जाऊन देऊन, परत प्रवास करून जिथे मी बाजुवाल्याची गाडी दुरुस्तीला टाकली आहे तिथे जाऊन मग मला ऑफिसमध्ये जावे लागेल. मला माहित आहे तुम्हाला वाचताना खूप हे मजेशीर वाटत असेल पण मी आज जे अनुभवले आहे ते कुणीच कधी अनुभवू नये. तसेही २०२० ने आपल्याला खूप काही दाखवले आहे. कधीही आयुष्यात न पाहिलेल्या गोष्टी आपण २०२० मध्ये पाहिल्या आहेत. फक्त आता एलियन आणि झोंबी तेवढे बघायचे राहिले आहेत कदाचित अजून वर्ष संपायला सात महिने बाकी आहेत, ती ही आपली इच्छा पूर्ण होईल.
लेखक : पाटीलजी (आवरे,उरण)