लग्नाचा मंडप सजला होता काही वेळातच वऱ्हाडी मंडपात येणार म्हणून लगबग चालूच होती. भीमराव सर्वांना ओरडून ओरडून कामे करून घेत होते. कारण त्यांच्या मुलीच्या लग्नात त्यांना कोणताही हलगर्जीपणा नको होता. भीमरावाची एवढी ऐपत नसताना सुद्धा लग्नाचा एवढा मोठा डौलारा त्यांनी एकुलत्या एक मुलीसाठी उभारला होता. कारण आपली मुलगी आता सासरी जाणार मग तिचे निरोप मोठ्या थाटामाटात व्हावे एवढीच त्यांची अपेक्षा होती. लग्नाला बारा वर्षानंतर त्यांना मुलगी झाली होती त्यामुळे त्यांनी तिला फुलासारखे जपलं होतं. कधीच कोणत्या गोष्टीची कमी पडू दिली नाही. असे सर्व असताना आपलं लेकरू दुसऱ्याच्या हवाली करताना काय वाटतं असेल ह्या त्या बापालाच माहिती.
अग राधा बघ जरा साधनाचा तयारी झाली का? कधीपासून खोलीत बसून मेकअप करतेय. तिला सांग आता बस झालं लग्न होणार आहे आज. असे मिश्किल हसत भिमराव मंडपात आले. एव्हाना सर्व वऱ्हाडी मंडपात बसले होते. मुहूर्ताची वेळ सुद्धा झालीच होती. भटजी बुवा जोरजोरात ओरडत होते मामांनी लवकरात लवकर मुलीला मंडपात आणण्याची कृपा करावी. मुहूर्ताची वेळ निघून चालली आहे. पण बराच वेळ झाल्यानंतर सुद्धा मुलगी मंडपात पोहोचली नव्हती. आता मात्र भिमराव थोडे चिडले आणि रागातच ते साधनाच्या खोलीकडे सरकावले. पण आतून दरवाजा बंद होता. बाहेरून सर्व तिला आवाज देत होते पण ती दरवाजा उघडत नव्हती.
आता मात्र भीमरावांच्या राग चिंतेत उतरला. कारण साधना काही केल्या दरवाजा उघडत नव्हती आणि आतून आवाजही देत नव्हती. काही नातेवाईकांच्या मदतीने दरवजा तोडला पण आतमध्ये साधना नव्हतीच. कुठे गेली काहीच पत्ता नव्हता. इकडे वऱ्हाडी आणि नवऱ्याकडची माणसे हजार प्रश्न विचारत होते. काय उत्तर द्यावे हे भीमरावाना कळतं नव्हते. अशातच ती सोडून गेलेली चिठ्ठी तिच्या आईला सापडली. त्यातला मजकूर वाचून भीमराव जागीच कोसळले.
आई बाबा तुम्ही नेहमीच मला जे हवं ते दिले. पण लग्नाच्या बाबतीत मला नाही वाटत की मी ह्या मुळासोबत लग्न करेल. कारण माझे प्रणयवर खूप प्रेम आहे. आपल्याच बाजूच्या गावात तो राहतो. तुम्हाला कधी हे सांगायची हिम्मत नाही झाली कारण तो सध्या कुठेच जॉबला नाहीये. मग असे असताना तुम्ही माझा हाथ त्याला दिला नसता. तुम्ही लग्न करत असलेला मुलगा खूप चांगला आहे श्रीमंत आहे पण मला नाही वाटत मी त्याच्यासोबत सुखी राहील. प्लीज मला माफ करा मी प्रणय सोबत पळून जाऊन लग्न करत आहे.
भीमराव मात्र पार गळून गेले होते. एकदा बोलून तर बघायचं ना पोरी माझ्याशी, आजवर तुझी प्रत्येक गोष्ट पूर्ण केली मग ही नसती केली का? का नाही समजली तू तुझ्या बापाला, एवढा नीच आहे का मी? त्यांना सावरता सावरता इकडे नवऱ्या कडच्या लोकांनी धिंगाणा घातला. आमचे चार पाच लाख लग्नात संपले आहेत ते आताच्या आता आम्हाला द्या. नाहीतर आम्ही पोलीस केस करू. आधीच खूप इज्जत गेली होती म्हणून भीमराव ह्यांनी इथून तिथून पैसे जमवून नवऱ्याकडील मंडळीला पैसे देऊ केले आणि तडक बाजूच्या गावात प्रणयच्या घरी पोहोचले.
त्या दोघांनी मंदिरात जाऊन लग्न सुद्धा केले होते. आणि बाप समोर आल्यावर साधनाने एका शब्दात सुद्धा त्यांना आवाज दिला नाही. भीमराव तिच्याशी बोलायला गेले तर प्रणयने त्यांना आडवले आता तुमचा तिच्याशी संबंध नाहीये ती माझी आहे. त्यामुळे तुम्ही इथून जा आणि त्यांना धक्का दिला. तिचा नवरा वडिलांसोबत असा वागत आहे तरी साधना काही बोलत नाही गप्प उभी आहे ही गोष्ट पाहून भिम रावांना जास्त त्रास झाला आणि ते तिथून निघून आले. पण पुढे काही महिन्यात व्हायचं तेच झालं माझी सोन्या सारखी पोर त्यांना नको वाटू लागली.
प्रणय तर तिला मारायचां पण तिचे सासू सासरे पण छळ करत होते. एक दिवस असा उजाडला मी साधना सरळ निघून आपल्या घरी आली. भीमराव सुद्धा मागचे सर्व विसरून तिला घरात घेतलं. शेवटी बापाचे काळीज वो ते मुलिसमोर पाघळणारच. प्रणय कधीच परत तिच्याकडे आला नाही कारण त्याच्याबाजूने कधी प्रेम नव्हतेच फक्त वासना होती आणि ती कधी साधनाला कळलीच नाही. काही दिवसांनी त्यांचा घटस्फोट झाला.
पण ज्या मुलीची बाजू बापाने नेहमी घेतली त्या मुलीचे सुद्धा काही कर्तव्य बनतं का नाही? प्रेमाच्या ओघा पाई तुम्ही जन्मदात्याना विसरता हे कसलं प्रेम. म्हणून माझी प्रत्येक मुलीला एक विनवणी आहे. तुम्ही प्रेम करा मी नाही म्हणत नाही पण आई वडिलांना विसरु नका. लहानाचे मोठे त्यांनी आपल्याला हे दिवस दाखवण्यासाठी नाही केलं आहे. एवढं मात्र विसरू नका.
ह्या पण कथा वाचा
लेखक : पाटीलजी (आवरे उरण)