बँकेत चेक टाकायचा होता म्हणून घाई घाईत मित्राकडून त्याची गाडी घेऊन बँकेत हजेरी लावली. उशीर करायचा नव्हता म्हणून चारचाकी ऑफिस मधेच ठेवली. बँक बंद व्हायला अवघी दहा मिनिटे शिल्लक होती. कशीतरी जागा करून गाडी बँकेच्या आवारात लावली आणि बँकेत शिरलो. चेक टाकायचा होता पण गार्ड नाटके करत होता. वेळ निकल गई अभी कल आना म्हणून बोंबलत होता. पण आपणही हाडाचा मराठी माणूस त्याला घड्याळाचे काटे दाखवत अजुन सात मिनिटे बाकी आहेत म्हणून सांगून चेक बँकेत टाकून बाहेर पडलो.
येऊन गाडीवर बसलो आणि गाडीचा हॅण्डल लॉक काढू लागलो पण तो उघडायलाच तयार नव्हता. अखेर खूप मेहनत केली पण नाहीच काही होत.आजूबाजूची लोक सुद्धा पाहायला लागली माझ्याकडे,आता मात्र खूप वेगळं वाटत होत पण ह्या मित्राच्या गाडीने दगा दिला होता. काही केल्या हॅण्डल लॉक निघत नव्हतं. मीच बावळट जो एवढ्या कामी वेळात हॅण्डल लॉक करून गेलो म्हणून मी स्वतःला दोष देत होतो. अखेर गाडी थोडी मागे घेऊन जागा बनवून प्रयत्न करू लागलो.
येणारी जाणारी माणसे बघत होती, आजूबाजूच्या मुली खिदी खिदी हसत होत्या. खूप लाजल्या सारखे तर होत होते पण पर्याय काहीच नव्हतं. शेवटी बाजूच्या गाडीवर बसलेलं एक जोडपं होतं त्याने आवाज दिला आणि विचारले मी काही मदत करू का? दुष्काळात पाणी मिळावं अशी काहीशी तेव्हा माझी परिस्थितीत झाली होती. मी त्याला हो म्हणायला मार वर केली तर बघितले अरेच्चा ते जोडपं तर मी आणलेल्या माझ्या त्याच मित्राच्या गाडीवर बसले होते आणि मी मात्र दुसऱ्याच गाडीचा लॉक उघडण्यात व्यस्त होतो.
आता मात्र माझी अवस्था मेल्याहून मेल्यासारखी झाली होती. ते जोडपं माझ्यावर खूप हसत होत. मी काहीच न बोलता गाडी स्टार्ट केली आणि तिथून पळ काढला. डोक्यात विचार करत बसलो कधी कधी माणूस एवढा वेंधल्या सारखा का वागतो? ह्याचे उत्तर तुम्ही द्याल तर बरे होईल. आणि तुमच्यासोबत असा काही प्रसंग घडला आहे का कधी? आम्हाला आवर्जून कळवा.
लेखक : पाटीलजी (आवरे उरण)