Home कथा दुसरं प्रेम

दुसरं प्रेम

by Patiljee
8274 views

तिने नकार दिल्यापासून आयुष्य अगदी संपल्या संपल्या सारखे वाटतं होत. दोन वर्षाची मैत्री होती आमची. कुठेही जायचं असलं तरी आम्ही सोबत जायचो मग ते शॉपिंग असो किंवा सिनेमा आम्ही बरोबरच असायचो. ज्या बस स्टॉपवर आम्ही रोज चहा प्यायचो त्या चहा वाल्याला सुद्धा असेच वाटत होतं की ती माझी प्रेयसी आहे. पण तिच्या मनात माझ्याविषयी काहीच नव्हतं. सर्व भावना एकटवून मी तिला सर्व सांगून टाकले पण ती चक्क नाही म्हणाली आणि खूप स्तूपिड अशी कारणं दिली.

तिच्या मते मला असा मुलगा नवरा म्हणून हवा जो सेटल असेल, ज्याचे मुंबई मध्ये स्वतःचे घर असेल, मी सासू सासऱ्यांसोबत नाही राहणार, मला राजा राणीचा संसार हवा आहे, मी कमावलेलं सर्व पैसे मी माझ्यावर खर्च करेल त्याचा हिशोब नाही मागायचा. तिच्या ह्या अटी पाहून मी गांगरून गेलो. काय बोलणार होतो मी तिला? अहो मीच काय कोणता मुलगा काय बोलेल अशा परिस्थितीत? खरंच मुली का समजून घेत नाही मुलांना? एवढ्या कमी वयात स्वतःचे घर तर सोडा वो कोणता मुलगा सेटल पण नसतो? पण नाही ह्या अशा काही मुली फक्त स्वतःचा विचार करतात.

तिच्या मी ह्या अपेक्षा पूर्ण नाही करणार हे तिला चांगलेच माहीत होत म्हणून तिने मला नकार दिला आणि आमची दोन वर्ष असलेली एवढी घट्ट मैत्री पण तोडून टाकली. बरेच दिवस त्रास झाला. कारण शेवटी तिची खूप सवय झाली होती पण मी त्यातून स्वतःला सावरलं. आज घरी येताना पनवेल रेल्वे स्टेशनवर उतरलो. चालत बसस्टॉप कडे जात होतो एवढ्यात माझ्या समोर एक उंच अशी मुलगी मला दिसली. तिची उंची कमीतकमी ६ फूट तरी असावी असा मी अंदाज लावला. माझीही उंची तेवढीच असल्या कारणाने माझा अंदाज बरोबर होता. तिने तोंडाला स्काफ बांधला होता. तिचा चेहरा दिसत नव्हता फक्त डोळेच दिसत होते.

ते डोळे एवढे सुंदर होते की जणू त्या डोळ्यात तासनतास पाहत राहावे असेच मला वाटू लागले. जरी तिचा चेहरा व्यवस्थित दिसत नसला तरी तिच्या शरीरयष्टी ने माझे ह्रदय जिंकल होत. कारण ती इतर मुलींपेक्षा खूप वेगळी वाटत होती. मी कधी तिच्या पुढे कधी मागे करत तिचा पाठलाग करतच होतो. माझे नशीब की काय माहीत नाही पण ती सुद्धा बस स्टॉपवर येत होती. बस स्टॉपमध्ये जाण्यासाठी एक छोटीशी जागा आहे तिथून जाताना नकळत माझा स्पर्श तिच्या हाताला झाला. नकळत झाला की मी जाणीवपूर्वक केला हे माझे मलाही माहीत नाही पण तो स्पर्श होताच तिने तिष्ण नजर माझ्याकडे वळवली. पण मी घाईतच तिथून पळ काढला.

जिथे अलिबाग बसेस लागतात त्याच स्टॉपवर ती मला परत एकदा दिसली. वीणा वाहकच्या तिकीट रांगेत ती उभी होती. मी तिला पाहून खूप खुश झालो. पण मी एक चूक करून बसलो होतो त्यामुळे परत जाऊन तिच्याशी ओळख करण्याचा प्रश्नच येत नव्हता. पण एक गोष्ट मी पाहिली की मी जेव्हा जेव्हा तिच्याकडे बघतोय तीही माझ्याकडे बघतेय. हे पाहून मी थोडा घाबरलो आणि चांगले सुद्धा वाटत होतं. माझी अतिशय द्विधा मनस्थिती निर्माण झाली होती. पण अचानकपणे त्या तेवढ्या गर्दीत तिने मला आवाज दिला आणि स्वतःकडे बोलवून घेतलं. खरं तर मी खूप घाबरलो कारण मला वाटतं होतं की माझ्याकडून नकळत झालेल्या स्पर्शाचा आता मला जाब विचारणार?

पण असे काहीच झाले नाही. तिने मला फक्त एवढेच विचारलं तुझी पास आहे का तिकीट काढणार आहेस? मी खाल मानेने पास आहे म्हणून सांगितले. तिने स्वतःचा तिकीट काढून आम्ही जाऊन एकाच सीटवर बसलो. पुढची पाच मिनिटे भयाण शांतता आमच्या दोघांमध्ये होती. तिला आणि मला हेच कळत नव्हतं की आता पुढे बोलणार कोण आहे? तिनेच थोड्या वेळात विषय काढला? काय नाव ? कुठे जॉब करतोस? कुठे राहतोस? असे अनेक प्रश्नांचा पाढा माझ्यासमोर मांडला. मीसुद्धा एका वाक्यात उत्तरे द्या अशी उत्तरे तिला देत होतो.

पण मी राहून राहून एक प्रश्न तिला केला की तू मला ओळखत नाहीस? मी तुला ओळखत नाही? मग मघाशी तिकीट काउंटरवर मला जवळ हाक मारून का बोलावलेस? ती गालात हसली आणि म्हणाली मी ओळखते तुला. आता मात्र मी स्तब्ध झालो होतो कारण ती ओळखते मला आणि हे मला माहितीच नाहीये. मग तिने सांगायला सुरुवात केली की मी मागील सहा महिने झाले पेण पनवेल असा प्रवास करतेय. ह्या प्रवासात अनेकवेळा मला तू बस मध्ये दिसला आहेस. तुझ्याकडे मी जेव्हा जेव्हा पाहायचे ना तेव्हा तेव्हा मला असेच वाटायचे मी खरंच माझा नवरा असावा तर असा. तुझ्याशी ओळख करायची होती पण तुझ्यासोबत एक मुलगी नेहमीच असायची.

म्हणून मग मी थोडी लांब राहिले कारण मला वाटले तुझी प्रेयसी असेल पण नेहमीच तुमच्या दोघांकडे बघून असेच वाटायचं की तुमच्यामध्ये काहीच नसेल आणि त्यात काही महिने झाले ती तुझ्यासोबत येत नाही दुसऱ्या बसने जाते. म्हणून मला वाटलं की तुझ्याशी ओळख करायची हीच ती योग्य वेळ म्हणून तुला मी आज आवाज दिला. आणि हो आणखी एक आज स्टेशनवरून येताना तू मला पाहत होतास हे मी नोटीस केले आहे बरं का? आणि ती मोठ्याने हसू लागली. तिचे ते हसताना केसांसोबत खेळणे माझ्या मनात घर करून गेलं.

आपणही कुणाचे क्रश असू शकतो ह्याचा विश्वास बसायला मला काही मिनिटे गेली. पण त्या पनवेल पेण दीड तासाच्या प्रवासात आम्ही खूप गप्पा मारल्या, नंबर एक्सचेंज केले. आजपासून माझ्या आणि तिच्या नात्याला एक वेगळी सुरुवात होणार होती. त्यामुळे आम्ही दोघेही खूप खुश होतो. तुझ आहे तुजपाशी पण तू जागा चुकलाशी अशीच काही माझी अवस्था झाली होती.

कथेचे सर्व अधिकार लेखकाधिन आहेत, लेखकाच्या नावासोबत कथा शेअर करायला हरकत नाही.

लेखक : पाटीलजी (आवरे उरण)

Related Articles

Leave a Comment

error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल