माझं गाव अगदी साधं तरीही तिथे जाण्याची ओढ मला नेहमीच खेचून नेते, इथल्यासारख म्हणजे आता मी शहरात कामानिमित्त राहत असतो पण तरीही माझ्या त्या गावाची आठवण आल्याशिवाय एकही दिवस जात नाही. गाव मोठ तर अजिबात नाही निव्वळ तीनशे ते साडेतीनशे घर असलेले माझे गाव त्यातील लोकवस्ती अगदीच कमी पण तरीही तेथील माणसे आणि त्यांच्यातील माणुसकी शहरामध्ये शोधूनही सापडणार नाही.
उन्हाळा आला की माझ्या गावात पाण्याची खूप टंचाई यायची. तेव्हा आम्ही आमच्या आई सोबत पायपीट करून खूप लांब पाणी आणण्यासाठी जायचो, पण तरीही ती केलेली पायपीट अजूनही आठवते. त्यावेळी सोबत आमच्या गावच्या बायका आणि पुरुष अनेक जन सोबत पाण्यासाठी मजा मस्ती करत जायचो. त्या माणसांमध्ये एक मुलगी होती तीच घर आमच्या घरापासून खूप लांब होत. पण का कुणास ठाऊक ती जवळ आली की आमच्या हृदयची धडधड नेहमीच वाढायची, ती सुध्दा माझ्याकडे बघून तेव्हा लाजायची हसायची. पण मला तिला कधी विचारायची हिम्मत झाली नाही. आता कदाचित तिला लग्न होऊन मुलं ही झाली असतील म्हणून तिचा तो विषय जेव्हा इकडे कामाला आलो तेव्हाच सोडला.
माझ्या गावचं पार अगदी छांन वाटायचं. त्याच्यावर बसून गप्पा टाकायला, त्या गावात असणारी अनेक तरुण आणि म्हातारी माणसे त्या परावर येऊन गप्पा मारायचे. त्या गप्पा कधी संपूच नये असे नेहमी वाटायचे. तिथे बसून अनेक जन टिंगल टवाळी करायचे आणि त्यावेळी हसून हसून पोट ही दुखायचे. संध्याकाळ झाली रे चला आता घरी असे म्हटल्यावर सगळी घरी जायलाही निघायची. घरी गेल्यावर आईने चुलीत लाकडे टाकून ती पेटवलेली असायची. एका बाजूला भाकरी थापत बसलेली असायची तर दुसरीकडे कालवण शिजत ठेवलेले टोप असायचे. त्याचा वास साऱ्या घरभर पसरलेला असायचा आणि त्या वासाने भूक अजुन लागायची, अजूनही तो वास नाकातून जात नाही.
गावात कोणीही डॉक्टर नव्हते. त्यावेळी एक आयुर्वेदिक उपचार करणारे काका होते. कोणाला काहीही झाले की तेच आमचे डॉक्टर होते. शाळा तर फक्त पाचवी पर्यंत होत्या. बाकीचे शिक्षण घेण्यासाठी पुढल्या गावात जायला लागायचे, पण तरीही त्या वेळी सगळं काही मजेत होतं.
गावात आंबा, पेरू, चिंच, सीताफळ, अशी अनेक फळ झाड होती. त्यांच्यावर दगडी मारून मारून ती फळ काढायचो आणि मग खायचो, आता सारखे पावडर लावलेली ती फळ नसायची. तर झाडावरच पिकलेली ती फळ खायलाही तितकीच गोड असायची. लाईट तर दिवसातून एक किंवा दोन तास असायची पण आता सारखी त्यावेळी लाईट असण्या आणि नसण्याने काहीच फरक पडत नव्हता. कारण तेव्हा इतक्या इलेक्ट्रॉनिक वस्तू ही नव्हत्या. एक टीव्ही होता तो ग्राम पंचायती मध्ये होता. आणि मोबाईल तर स्वप्नात ही नव्हते. ज्याकडे घड्याळ किंवा सायकल असे तो माणूस तेव्हा श्रीमंत. लाईट नसल्याने काहीच फरक पडत नव्हता कारण झाडं भरपूर असल्यामुळे वाऱ्याची आणि गारव्याची ही कमतरता नव्हती.
माझ्या गावात थोड जरी कोणाला काही झालं तरी अख्खा गाव जागा असायचा, सण ही आम्ही सर्व साजरे करायचो जमतील तसे तेव्हा माणसाकडे पैसा नव्हता पण वेळ भरपूर होता आणि आता माणसाकडे पैसा भरपूर आहे पण वेळ अजिबात नाही. ही आत्ताची परिस्तिथी खूप वेगळी आहे आता माझे लग्न झालेले आहे. सगळं काही आहे पैसा गाडी, घर, बायको आणि पोरं पण त्या गावाची आठवण अजूनही मनातून जात नाही. कारण त्या वेळच्या त्या सगळ्याच आठवणी अजूनही ताज्या आहेत. पण खरच का माझे ते गाव आज पर्यंत तसेच आहे का जसे मी त्याला त्या वेळी सोडून आलो होतो का ते ही बदललेले असेल?
आपण सर्व लोक ही अशाच गावाचे आहोत पण कधी काळी आपले गाव सोडलेले असते आणि त्या गावच्या आठवणी अजूनही आपल्याला नेहमीच येत असतात. कोणाला आठवते आपले गाव त्यांनी अभिमानाने कमेंट करून नक्की सांगा.