Home कथा मैत्री प्रेम लग्न घटस्फोट भाग २

मैत्री प्रेम लग्न घटस्फोट भाग २

by Patiljee
1793 views

तिच्याकडे पाहिले आणि फक्त पाहतच राहिलो. खरंच स्वप्न पाहतोय का मी? असं कसं असू शकतं की ज्या गोष्टी मी स्वप्नात पाहिल्या आहेत त्या सर्व या मुलीमध्ये आहेत. आधी मला हे स्वप्नच वाटलं म्हणून स्वतःला जोरात चिमटा काढला आणि कळलं नाही महेंद्र हे स्वप्न नाहीये. हीच तुझी स्वप्नातली मलिका आहे. डोळ्याच्या पापण्याही न हलवता मी फक्त तिच्याकडे पाहत होतो.

कथेचा पहिला भाग इथे क्लिक करून वाचा

ती माझ्या समोरून माझ्याकडे पाहून मागे जाऊन बसली पण मी मात्र एकटक तिच्याकडे पाहत होतो. एकवेळ तर तिलाही वाटलं असेल काय मंद मुलगा आहे, मुलगी कधी पाहीली नाही का? पण तिला काय सांगू की मुली तर खूप पाहिल्या आहेत पण तुझ्या सारखी अगदी तुझ्या सारखी दिसणारी माझी स्वप्न सुंदरी अशी समोर कधी पाहिली नव्हती. खऱ्या अर्थाने आता शहरातील कॉलेजला यायचं सार्थक झालं होतं.

काही वेळाने कळलं तिचं नाव राणी मोरे आहे. वाव कसलं भारी नाव आहे राणी.. माझी राणी… राणी महेंद्र पाटील. wahhh कसलं भारी जुळून आलंय. पण आता हा प्रश्न पडला होता की या मुलीशी मी बोलणार कसं? काहीतरी कारण तर शोधावा लागणार पण ते कारण लवकरात लवकर शोधावं लागेल नाहीतर दुसरा कुणी येऊन बाजी मारेल.

असेच काही दिवस गेले राणी काही मुलांसोबत बोलायला लागली पण मी मात्र बोलत नव्हतो. इच्छा तर होती पण सुरुवात कशी करू हा प्रश्न पडला होता. कारण ती जेव्हा क्लास रूममध्ये आली होती तेव्हा तिच्याकडे एकटक पाहून मी माती खाल्ली होती. मी तिला थोडा घाबरूनच होतो. मी तिच्याकडे सारखा पाहत राहायचो आणि जेव्हा तिची नजर माझ्या नजरेला भिडायची तेव्हा ती असा काही कटाक्ष टाकायची की माझी परत तिच्याकडे पाहण्याची हिम्मतच होत नसे.

पण बोलायचं कसं हा प्रश्न राहून राहून सतावत होता. असेच एका वर्गातील मित्राकडून नंबर घेतला. तो तिच्याच सोबत बस ने ये जा करायचा. त्यामुळे त्याच्याकडे तिचा नंबर होता आणि मला ही संधी सोडायची नव्हती. नंबर देताना त्याने माझ्याकडे वेगळ्या भावनेने पाहिले पण मी काही लक्ष दिलं नाही. घरी आलो आणि विचार करू लागलो सुरुवात कशी करू. कॉल करू का? की फक्त मेसेज करू? पण मेसेज करून विचारू काय? सर्व कडून अडकलो होतो. पण आज काही करून मला माझ्या राणी सोबत बोलायचं होतं. मी मेसेज केला.

मी: हॅलो..!

ती : कोण?

मी: मी कोण आहे हे तुला सांगू शकतो पण एवढ्यात नाही सांगणार. जरा मला पहायचं आहे तू मला ओळखू शकतेस का?

ती : का? तुला ओळखायला तू काय कोणत्या सिनेमाचा हिरो आहेस का?

मी : नाही नाही हिरो तर नाही पण हा राजकुमार नक्कीच आहे. माझ्या छोट्याश्या घरचा.

ती : तुझ्या घरचा आहेस ना मग मला का मेसेज करून त्रास देतोस? रहा ना तुझ्याच घरी.

मी : एवढी वर्ष घरीच तर होतो पण आता कुठं जग पाहतोय, एक अशी व्यक्ती पाहिली आहे जिचा चेहरा नजरेसमोरून जात नाहीये.

ती : चांगलं आहे ना मग, तिचाच चेहरा पहा मला काय त्रास देत आहेस. ब्लॉक करेन मी तुला?

मी : तिचाच चेहरा पहायची इच्छा आहे पण ती तर तिच्या मोबाईल समोर बसून रागवत आहे.

ती : म्हणजे?

मी : म्हणजे वाघाची पणजे.. एवढेही कळतं नाही का तुला?

ती : यात काय कळायचं आहे? तुला एक मुलगी आवडते.

मी : हो आणि ती तू आहेस..!

ती : सकाळपासून कुणी मिळालं नाही का तुला, बावळट मुलगा.. काहीही बोलतोय.

मी : काहीही नाही खरंच तू आवडतेस मला!

ती : पण मला नाही आवडत तू..

मी : ठीक आहे ना.. पण मला आवडतेस तू, आणि आयुष्भर आवडणार..अगदी शेवटच्या श्वासापर्यंत.

ती : तू जरा जास्तच सिनेमे पाहतो का रे? किती फिल्मी बोलतो.

मी : एवढे सिनेमे नाही पाहत पण मनात येणार टाइप करतोय कदाचित तेच तुला फिल्मी वाटतंय.

ती : फिल्मीच आहे हे. फक्त चाटमध्ये आवडतं का कुणी? आणि न बघता आवडते का? ही कुठली आहे प्रेमाची व्याख्या जी न बघता सुद्धा प्रेम घडवून आणते

मी : मी कुठे म्हणालो की मी तुला पाहिले नाही. मी तुला पाहिले आहे. अगदी माझ्या स्वप्नातली मलिका आहेस तू.

ती : बस्स… हा बस्स. आता खूप झालं. आणि मला सांग ना नंबर तुला कुणी दिला आणि तू आहेस तरी कोण?

मी : नंबर कुणी दिला हे महत्त्वाचे नाहीये. पण हा मी कोण आहे हे खूप महत्त्वाचं आहे. मी तुझ्यासाठी सध्या अनोळखी असलो तरी लवकरच तुझ्यासाठी एक खास व्यक्ती होईल.

ती : ये बाबा, परत फिल्मी बोलू नकोस. मला नाहीये या सर्वात इंटरेस्ट.

मी : मग कशात इंटरेस्ट आहे तुला?

ती : ते मी तुला का सांगू?

मी : मिस्टर अनोळखी म्हणून सांगू शकतेस मला.

ती : मला नाही आवडत अनोळखी लोकांशी बोलायला.

मी : गेली पंधरा मिनिटे आपण बोलतोय, आणि अजून मी अनोळखी आहे. चल असो.. माझे नाव सध्या तरी मिस्टर अनोळखी राहूदे. घरात आई आणि दोन मोठे भाऊ आहेत. वडील नाहीयेत मला. घरात मी सर्वात लहान आहे. बाकी असे काही सांगण्या सारखं नाहीये.

ती : 😆🙏

मी : आता हे काय होतं?

ती : तू असे सर्व मुलींना सांगत बसतो का डिटेल्स?

मी : अजिबात नाही… फक्त तुला सांगितले आहे.

ती : का? मला का?

मी : तू खास आहेस?

ती : पण का?

मी : खूप मोठी गोष्ट आहे सांगेन कधीतरी?

ती : असे कोड्यात बोलू नकोस आताच सांग.

मी : वाजलेत बघ किती घड्याळात? तुला उद्या कॉलेजला जायचं आहे. सकाळी ८.३० ची बस नाही मिळाली तर उशीर होईल आणि उशीर झाला तर तुमच्या पुंतांबेकर मॅडम ओरडतील हो.

ती : तुला हे एवढं सर्व माहीत आहे माझ्याबद्दल? सर्व माहिती काढली आहेस वाटतं?

मी : हो मग… आपल्या माणसा बद्दल माहिती असणे चांगलं असतं.

ती : असुदे माहिती झोपते मी आता.

मी :हो चालेल गूड नाईट.

ती : hmm.

आज राणी सोबत अनोळखी म्हणून बोलून एवढं भारी वाटतं होतं की झोपच लागत नव्हती. सारखा तिचाच विचार डोक्यात चालू होता. मी काही चुकीचं तर करत नाही ना? जेव्हा तिला कळेल मिस्टर अनोळखी म्हणून तिच्याच वर्गातील महेंद्र आहे तेव्हा तिला काय वाटेल? रागवेल का ती माझ्यावर? राग आला तर परत शांत होईल का? की मी खोटं बोलून तिला फसवले म्हणून आयुष्भर माझ्याशी बोलणार नाही.

असे असंख्य विचार माझ्या डोक्यात चालू असताना अलार्म वाजला. सकाळचे सहा वाजले होते. म्हणजे तिच्या नादात मी संपूर्ण रात्र तिच्या विचारात जागून काढली होती. अंथरुणातून उठून अंघोळ करून पनवेल बस पकडली. आज बसमध्ये मोजकीच माणसे होते. गावातले काही दुकानदार सामान आणण्यासाठी पनवेलला नेहमी ये जा करत असतात. एक म्हातारे आजोबा रोज या बसने प्रवास करतात पण कुठे जातात माहीत नाही. काही शाळकरी मुलं सुद्धा होती. नेहमीच्या या सर्वात एक तरी माणूस कमी असला तरी त्या प्रवासात सारखं चुकल्या चुकल्यासारखं वाटतं. बरोबर ना?

व्हॉट्सअप ओपन केलं, राणी ऑनलाईन होती. विचार केला गूड मॉर्निंग मेसेज करावा. पण हा ही विचार केला की रात्री खूप बोललो आहे तिच्याशी, कदाचित ती स्वतः मेसेज करेल. म्हणून मी देखील मेसेज केला नाही. वर्गात पोहोचलो, आज ट्रॅफिक मुळे मला थोडा उशीरच झाला होता. सर्व मुलं मुली आले होते. मॅडमने लेक्चरला सुरुवात देखील केली. मॅडम आत येऊ? असे विचारताच सर्व माझ्याकडे पाहायला लागले.

मॅडमने डोळे मोठे करत बसण्याचा इशारा केला. त्यांना कदाचित हे म्हणायचे असेल की हे असे उशिरा येणे चालणार नाही, जा जाऊन बस बाकावर. पण कॉलेज सुरू होऊन फक्त काही दिवस झाले होते म्हणून त्या जास्त काही म्हणाल्या नाहीत. मी पाहिले तर आज राणी दोन वेण्या बांधून आली होती. कॉलेजला कोण दोन वेणी बांधून येत म्हणून थोडं हसू आलं पण आनंद या गोष्टीचा वाटला की तिला लोकांची पर्वा नाहीये. तिला जे आवडेल नेहमी ती तेच करते.

अशातच लंच ब्रेक झाला आणि आम्ही सर्व मुलं एकत्र जेवायला बसलो. मोबाईल चेक केला तर नोटिफिकेशन मध्ये राणीचा मेसेज आला होता.

राणीने काय मेसेज केला असेल? तिला कळेल का महेंद्रच मिस्टर अनोळखी आहे की हे असेच चालू राहील? कथेत पुढे काय होईल हे वाचण्यासाठी आपले हे पेज आताच फॉलो करून ठेवा. म्हणजे या कथेचा जेव्हा पण मी पुढचा भाग पोस्ट करेन तो आधी तुम्हाला वाचायला मिळेल. या सुद्धा काही कथा वाचा.

भाग तीन वाचण्यासाठी इथे क्लिक करा

लेखक: पाटीलजी

Related Articles

Leave a Comment

error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल