Home कथा मैत्री प्रेम लग्न घटस्फोट भाग ९

मैत्री प्रेम लग्न घटस्फोट भाग ९

by Patiljee
320 views

आज रविवार असल्याने मी कॉलेजला जाणार नव्हतो. पण काल आजोबांची प्रेम कथा ऐकून अजून डोळ्यात अश्रू कुठेतरी थांबून राहिले होते. याच कारणाने मला आज काहिकरून राणीला माझा भूतकाळ सांगायचा होता. मला आज याची पर्वा नव्हती की मी माझा भूतकाळ सांगितला तर ती मला सोडून जाईल की दुसरं काही निर्णय घेईल. पण आज काही करून मला मन मोकळं करायचं होतं. मी राणीला मेसेज केला.

मी: गुड मॉर्निंग.. आहेस का ऑनलाईन?

ती: गुड मॉर्निंग ठोंब्या. का रे काय झालं?

मी: तुला काहीतरी सांगायचे आहे.

ती: काय रे.. सर्व ठीक आहे ना?

मी: हो पण आणि नाही पण.

ती: नीट सांगणार आहेस का?

मी: हो. कॉल करू का?

ती: आता घरात पप्पा आहेत, थोड्या वेळात कॉल करते थांब.

मी: ठीक आहे.

राणीच्या कॉलची वाट पाहत मी बसलो एवढ्यात अजय आणि विजय घरी आले. “आहेस का रे महेंद्र घरात” विजय म्हणाला. “काय आज दोघांची स्वारी आमच्या घरी कशी?” मी म्हणालो. अरे उरणला जाऊन थोडी शॉपिंग करू म्हटलं, चल हो लवकर तयार.” अजय म्हणाला. माझी इच्छा तर खूप होती पण राणीचा फोन यायचा होता म्हणून मी त्यांना नकार दिला. दोन शिव्या देत ते माघारी फिरले.

एवढयात राणीचा फोन आला, “काय रे काय झालं? सर्व ठीक आहे ना?”

“हो ग राणी सर्व ठीक आहे पण मला तुला काहीतरी सांगायचे आहे, ते नाही सांगितले तर आपले नाते पुढे नाही जाऊ शकत.”

“काय रे असे काय आहे? मला टेंशन येतेय, सांग लवकर.”

मी राणीला माझा भूतकाळ सांगायला सुरुवात केली.
दोन वर्षापूर्वीची गोष्ट आहे. असाच एका संध्याकाळी माझा फोन वाजला. समोरून एक गोड आवाज माझ्या कानी आला. “दिपेश मी रुपाचे बुक आणले आहेत पण तिचा फोन लागत नाही आहे, नाक्यावर घ्यायला येशील का?” हे तिचे पहिले गोड शब्द. मी तिला सांगितले की सॉरी हा रुपेशचा नंबर नाही आहे, माझे नाव महेंद्र आहे. तेव्हा तिने पटकन सॉरी बोलून फोन ठेवून दिला.

पण त्या मुलीचा आवाज एवढा गोड होता की माझ्या कानात सारखाच रेंगाळत होता. परत तिला कॉल करावा का? असे खूप वेळा मनात आले पण…. कॉल करून बोलणार काय? हा पण विचार डोक्यात होताच. म्हणून माझ्या मनाला जरा सावरून मी तिचा नंबर True Caller वर सर्च केला तर तिथे गणेश पवार असे नाव मला दिसले. मी नंबर व्हॉटसअपला चेक केला पण तिथे तो नंबर एक्टिव नव्हता. माझ्या सर्व आशाच मावळून गेल्या होत्या.

मला तो आवाज काही करून पुन्हा ऐकायचा होता. पण मी काहीही करू शकत नव्हतो. पण कदाचित देवाच्या मनात आम्ही परत बोलावे असेल म्हणून मला तिचा समोरून मेसेज आला “सॉरी हा actully मला ना माझ्या मैत्रिणीच्या भावाला फोन लावायचा होता पण चुकून तुम्हाला लागला सॉरी” खरे तर अशी चूक रोज व्हावी असे मला वाटत होते. मी पण तिला रिप्लाय दिला की “its ok होत कधी कधी असे.” आणि परत तिच्या मेसेजची वाट पाहत बसलो. पण समोरून काहीच मेसेज आला नाही.

दोन दिवस गेले तरी तिचा रिप्लाय आला नव्हता. मी खूप अस्वस्थ झालो कारण मला तिचा तो गोड आवाज पुन्हा ऐकायचा होता. शेवटी न राहून मीच तिला शुभ सकाळचा मेसेज केला. काही वेळातच तिचा फोन आला. “कोण आपण?” मी थोडा घाबरलो. काय उत्तर देऊ कळत नव्हते. शेवटी म्हणालो “मी महेंद्र, त्या दिवशी आपले चुकून फोनवर बोलणे झाले होते ना तो मुलगा.” तिने ओके म्हणत फोन ठेवून दिला. पण नंतर तरीसुद्धा काहीच समोरून रिप्लाय येत नव्हता. माझे मन तिच्या त्या गोड आवाजात अडकले होते पण तिच्याकडून काहीच रिस्पॉन्स येत नव्हता.

मी परत तिला मेसेज केला “मी मेसेज केलेले आवडत नाही का तुला? तसे असेल तर सांग नाही करणार मी परत मेसेज.” तिचा थोड्यावेळाने रिप्लाय आला. “अरे असे काही नाही जरा बिझी होते. बोल आता. काय करतोस तू? कुठे राहतोस? आणि खरंच सॉरी हा त्या दिवशी चुकून फोन लागला होता.” मी पण तिच्या मेसेजचे एक एक करून रिप्लाय देत होतो आणि ती सांगत होती मी ऐकत होतो. असेच आमची हळू हळू बोलणे वाढत गेले.

बोलणे एवढे वाढत गेले की आम्हाला एकमेकांशिवाय करमत नव्हते. रोज एक तास तरी आम्ही फोनवर बोलायचो पण ती दिवसातून फक्त एक ते दोन तासच बोलायची पण खूप बोलायची. तिला गाणी म्हणायची खूप आवड होती. रोज मला एकतरी गाणे ऐकवायची. तिचा आवाज एवढा मधुर होता की मला तर सारखे असेच वाटत होते की तिने फक्त गातच राहावे आणि मी ऐकत राहावे. तिचा आवाज मी आजही माझ्या मोबाईलमध्ये जपून ठेवला आहे.

एक दिवस तिचा फोन आला, तिच्या बोलण्यात आज जरा जास्त गोडवा दिसून येत होता. “महेंद्र मला तुला काहीतरी सांगायचे आहे. पण कसं सांगू कळत नाही.” मला वाटले नेहमी प्रमाणे काहीतरी सांगायचे असेल पण तिने साक्षात स्वतःहून मला प्रपोज केले. मला आजही तिचे ते गोड शब्द कानात ऐकू येतात. “माही मला काहीच कळत नाही आहे रे, सर्व कडे तुझाच भास होतोय, मी प्रेमात पडलीय रे तुझ्या. I LOVE YOU Mahi” मला पण हेच हवे होते पण तिला मी हो म्हणू शकलो नाही कारण आजपर्यत आमचे फक्त फोनवर बोलणे झाले होते. समोरासमोर आम्ही एकमेकांना पहिले सुद्धा नव्हते. ती कशी दिसते आणि मी कसा दिसतो हे आम्हा दोघांना पण माहीत नव्हते. मी दिसायला सावळा होतो त्यामुळे कदाचित मी तिला असे सांगितले की “हे बघ आपण अजुन एकमेकांना पाहिले नाही आहे. आपण एक दिवस भेटूया जर का तुला मी किवा मला तू आवडलीस तर आपण पुढे जाऊ.” खरे तर मला तिला त्या क्षणीच सांगायचे होते की आवडतेस मला पण असे नाही सांगता आले.

आमच्या भेटीचा दिवस ठरला. मला आजही आठवत आहे तो दिवस. कदाचित कधीच विसरू शकणार नाही मी ते. पनवेलला भेटण्याचे ठरले आमचे. मी पनवेल बस स्टॉपवर आधीच पोहचून तिची वाट पाहत बसलो. ती कशी असेल? तिला मी आवडेल का? की मला बघूनच पळून जाईल? असे खूप सारे प्रश्न माझ्या डोक्यात फिरत होते. कारण आम्ही एकमेकांना पाहिले सुद्धा नव्हते. तिचा फोन वाजला “अरे कुठे आहेस तू? मी बस स्टॉपवर पोहचले आहे. तिकीट काउंटरच्या बाजूला उभी आहे.”

मी लगबगीने तिथे पोहोचलो. फोन चालूच होता. मी तिला लांबूनच विचारले, “कोणता ड्रेस घातला आहेस तू?” तिने लाल म्हणून सांगितले. मी लाल कलर शोधत होतो आणि मला समोर एक परी सारखी दिसणारी मुलगी दिसली जिने लाल कलरचा छानसा ड्रेस घातला होता. मस्त काळेभोर डोळे, लांब केस अगदी कंबरेखाली येत होते आणि समोर येणारी केसांची छोटी बट. खरंच अगदी परीच दिसत होती ती आणि तीच माझी सोनाली होती. माझा तर माझ्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता की एवढी सुंदर मुलगी मला का म्हणून हो बोलेल. मला तर असे वाटत होते की इथूनच पळून जावे. पण हिम्मत करून मी तिच्या समोर जाऊन उभा राहिलो. हा बघ मी असा दिसतोय.

पुढचा भाग वाचण्यासाठी इथे क्लीक करा

मी लिहिलेल्या कथा तुम्हाला आवडत असतील तर एक विनवणी आहे. याच कथेची लिंक तुम्ही तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत शेअर करा. कारण जेवढ्या लोकांपर्यत तुम्ही ही कथा पोहोचवाल तेवढाच पुढे अजून लिहिण्याचा आनंद वाढेल.

लेखक: महेंद्र पाटील (पाटीलजी)

Related Articles

Leave a Comment

error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल