Home कथा मैत्री प्रेम लग्न घटस्फोट भाग ८

मैत्री प्रेम लग्न घटस्फोट भाग ८

by Patiljee
573 views

राणी माझ्या बाहुपाशात अशी काही विलीन झाली की आजूबाजूला लोक आहेत याची तिला चिंताच नव्हती. अलगद माझ्या कानाजवळ ओठ आणत म्हणाली, “हो ठोंब्या तू देखील आवडतोस मला.” तिचे हे एवढं वाक्य म्हणताच मी तिला अजून जास्त घट्ट मिठीत घेतलं. आजचा दिवस माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा दिवस होता. कारण स्वप्नात पाहिलेली मुलगी आज माझ्या मिठीत होती.

एव्हाना संध्याकाळ झाली. त्यामुळे मी आणि राणीने पनवेल गाठलं. ठरल्या प्रमाणे वाघेजला जाऊन वडापाव खाल्ला. दहाच मिनिटात तिची बस होती त्यामुळे आम्ही घाई घाईत सर्व खाऊन बस स्टॉप गाठलं. बस समोर लागलीच होती. राणी पुढे सरकावली आणि परत माझ्याकडे येऊन माझ्या गालावर किस करत पळून गेली. माझ्या आयुष्यातील पहिला किस असा असेल याची कल्पना मी केली नव्हती. गाडी समोरून निघून गेली पण मी मात्र तिथेच स्तब्धपणे उभा राहिलो. काय करू काहीच सुचत नव्हते.

आजचा दिवस एवढं काही देऊन जाईल याचा मी विचार देखील केला नव्हता. राणी आणि मी चाट करत करतच घरी पोहोचलो. ती तिच्या घरकामात अडकली पण आता तिच्याशिवाय मला करमत नव्हतं. म्हणून मी माझा मोर्चा आजोबांच्या घराकडे वळवला.

“आजोबा आहेत का घरात?”

“कोण? बाबू, ये ये.. बस इत. कसा व्हता दिवस?”

“दिवस छान गेला आजोबा. सर्व काही तुमच्यामुळे शक्य झाले. खूप खूप धन्यवाद” असे म्हणत मी आजूबाजूला पाहू लागलो. एवढ्या वर्षात मी त्यांच्या घरी कधीच आलो नव्हतो. एवढेच काय तर त्यांच्या घरी कोण कोण असते हे देखील मला माहीत नव्हतं.

“अरे बाबू.. असा काय नाय. तू आज पयल्यांदा पोरीसोबत फिराला गेलतास मग सगळा चांगला व्हवाला पायजे ना? माझ्या आयुष्यान पिरेम नाय भेटला तुला तरी मिलूदे बस.”

“म्हणजे आजोबा? तुम्ही सुद्धा कुणावर प्रेम केलं होतं का? जय झालं त्याच? सांगा ना आजोबा.” मी कुतुहलाने विचारले.

आजोबांनी त्यांच्या आयुष्यातील खूप मोठं पान माझ्या समोर सांगायला सुरुवात केली. त्यांचे शिक्षण बारावी पर्यंत झाले होते. पुढे जाऊन शिक्षक व्हायचे त्यांचे स्वप्न होते. पण परस्थितिमुळे त्यांना पुढचे शिक्षण घेता आले नाही. म्हणून त्यांनी शेतीची कामे करायला सरूवात केली. आजूबाजूच्या गावात जाऊन दुसऱ्याच्या शेतात मोलमजुरी करून आपल्या घरचे उदरनिर्वाह करणे हे आजोबांचे दिनक्रम बनले. इथेच त्यांची ओळख सुरेखा सोबत झाली.

आधी मैत्री मग हळुवारपणे ते एकमेकांच्या प्रेमात कधी पडले हे त्यांचं त्यांना सुद्धा कळले नाही. सुरेखा ही बाजूच्या गावात राहायची. आजोबा आणि सुरेखाच्या गावात फक्त एक नदी होती. प्रत्येक रविवारी न चुकता ते तिथे हातात हात घालून तासनतास बसून गप्पा मारायचे. आपल्या येणाऱ्या भविष्याबद्दल नेहमीच स्वप्न रंगवत असतं.

एक दिवस आजोबांनी सुरेखाला लग्नासाठी विचारले, ती खूप खुश झाली. कधी एकदा घरी जाऊन हे आईला सांगतेय असे तिला झाले होते. घरी गेल्यावर तिने सर्व हकीकत आईबाबांना सांगितली. त्यांच्या घरून पण होकार मिळाला. आता चहा पाण्याचा प्रोग्राम दुसऱ्याच दिवशी ठेवण्यात आला. दोघेही खूप खुश होते कारण ज्या व्यक्तीवर मनापासून प्रेम केलं त्याच व्यक्तीसोबत आपले लग्न होतेय आणि पुढे संसार सुद्धा होतोय त्यामुळे दोघेही खूप खुश होते. बाहेर मुसळधार पाऊस कोसळत होता. जणू त्या दोघांच्या चहा पाण्यासाठी संपूर्ण परिसर स्वच्छ करत होता. तो काही आज थांबायचं नाव घेत नव्हता.

दुसऱ्या दिवशी चहापाणी असल्यामुळे आजोबांनी सर्व तयारी आदल्या दिवशी करून घेतली आणि भविष्याची स्वप्ने उराशी घेऊन झोपी गेले. पण काळाने घात केला. जे व्हायला नव्हते पाहिजे तेच झाले. अचानक नदीला पूर आला आणि त्या पुरात मध्यरात्री खूप सारी घरे वाहून गेली. त्यात सुरेखाच पण घर वाहून गेले. मध्यरात्री अचानक अशी पूर परस्थिती नकळत आल्यामुळे कोणाला काहीच कळले नाही. गावातल्या खूप लोकांना आपला जीव गमावावा लागला. पण सुरेखाचा अजुन काही पत्ता नव्हता. आजोबांनी खूप दिवस तिचा शोध घेतला पण हाती काहीच लागले नाही. एका क्षणार्धात सर्व चक्रे फिरली. आणि आजोबांचे आयुष्य पार बदलून गेले.

खूप महिने लोटले पण आजोबा सुरेखाच्या आठवणीतून बाहेर निघत नव्हते. घरच्यांनी दुसरीकडे लग्नाची बोलणी सुद्धा करायला सरूवात केली पण आजोबांनी घरी सक्त ताकित दिली की “असे काही केलं तर मी घर सोडून निघून जाईन.” त्यांचं सुरेखावर मनापासून प्रेम होते आणि त्यांना हे माहीत होत की ती कधी ना कधी त्यांच्या आयुष्यात परत येणार. सुरेखा ज्या गावात राहत होती ज्या घरात राहत होती तिथे त्यांनी परत घर उभे केले आणि सूरेखाच्या आठवणीत तिथेच राहू लागले.

आम्ही लिहिलेल्या कथा तुम्ही इथे क्लिक करूया व्हिडीओ रुपात सुद्धा पाहू शकता.

ती कधी ना कधी त्यांच्या आयुष्यात परत येईल या आशेवर ते अजुन जगत आहेत. पुढे त्याच घरात त्यांनी आपला एकट्याचा संसार थाटला आणि अजूनही ही ते तिथेच आहेत. त्यांनी लग्न केलं नाही कारण त्यांना माहीत आहे की त्यांची सुरेखा त्यांना कधी ना कधी भेटेल.

आजोबांची ही स्टोरी ऐकल्यावर मी फार दुःखी झालो. नेहमी हसतमुख राहणारा माणूस, शांत दिसणारा माणूस मनाच्या कोपऱ्यात एवढे दुःख लपवून बसला आहे याची थोडी सुद्धा कल्पना आम्हा मुलांना नव्हती. हे सर्व सांगताना आजोबांच्या डोळ्यात अश्रू दिसत होते. त्यांचे सुरेखावर किती प्रेम असेल याची कल्पना मला आली होती.

थोड्या क्षणासाठी का होईना माझेही डोळे पाणावले. त्यांनी यातून स्वतःला सावरले आणि लगेच मला म्हणाले, “बाबू जे आपल्या नशिबान नसतं ना र.. ते नाय मिळत. मग आपण कवरा पण प्रयत्न केला तरी, आपल्याकर् फक्त एकुच पर्याय असतो तो म्हणजे वाट पाहणे.” त्यांच्या या बोलण्याने मी खरंच हरवून गेलो होतो.

त्यांना मी फक्त शेवटचा एकच प्रश्न केला “आजोबा एक विचारू? आजोबा पण हसत हसत म्हणाले, “इचर ना बाबू” “इतकी वर्ष वाट पाहिलीत थकला नाहीत का तुम्ही?” तेव्हा त्यांचं उत्तर ऐकुन माझे डोळे आपोआप पाणावले “नाय र पोरा, थकलो नाय कारण यखादी गोष्ट किंवा यखादे यड असं असतं ना की ज्याची वाट बगण्यात, ज्याच्या मागे धावण्यात सगळा आयुष्य निघून जातं, पुर… पूर… तर ती गोष्ट मिल्ली तरी तो प्रवासच येवरा सुंदर होऊन जातं की जगाची नवी उमिद मिळते आणि आठवणीनं जगण्यात जी मजा हाय ना त्याची नशाच काय वेगळी आहे र बाळा”

त्यांचे हे काही शब्द आताही माझ्या कानात फिरत आहेत. प्रेम कस करावे हे मला आजोबांनी नकळतपणे शिकवले होते. निरपेक्ष भावनेने नेहमी प्रेम करावे कारण प्रत्येकाला आपले प्रेम मिळतेच असे नाही पण ज्यांना मिळत नाही त्यातले काहीजण आजोबा सारखे असतात जे आपल्या प्रेमाची वाट पाहत असतात. निरंतर.

एवढे सांगून आजोबांचे डोळे पाणावले होते. पण त्यांनी स्वतःला सावरत मला चहा दिला. खरंच एवढी वर्ष मी आजोबा सोबत का बोललो नाही, याची खंत मला वाटतं होती. ते गेली अनेकवर्ष आपल्या प्रेमासाठी थांबले आहेत. त्यांची सुरेखा अजून या जगात आहे का नाही माहीत नाही पण त्यांचं प्रेम पाहून मनाला एक वेगळं समाधान मिळाले होते. राहून राहून मलाही काही चुकल्या सारखे वाटतं होतं. कारण माझ्या सुद्धा आयुष्यात एक अशी गोष्ट होती ती आजवर कुणालाच माहीत नव्हती. माझ्या मित्रांना सुद्धा नाही. आणि एवढी मोठी गोष्ट मी राणी पासून लपवून ठेवू शकणार नव्हतो.

कारण मला आमच्या प्रेमाची सुरुवात काही लपवून ठेऊन करायची नव्हती. पण कदाचित हो गोष्ट सांगितल्यावर ती माझ्यापासून लांब जाऊ शकते हे मला माहीत होतं पण मला ही रिस्क घ्यायची होती. राणी आयुष्यात येण्या अगोदर एक आधीच मुलगी माझ्या आयुष्यात होती.

कथेचा पुढचा भाग इथे क्लीक करून वाचा

आपल्या या काही निवडक कथा सुद्धा वाचा.

मी लिहिलेल्या कथा तुम्हाला आवडत असतील तर एक विनवणी आहे. याच कथेची लिंक तुम्ही तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत शेअर करा. कारण जेवढ्या लोकांपर्यत तुम्ही ही कथा पोहोचवाल तेवढाच पुढे अजून लिहिण्याचा आनंद वाढेल.

लेखक: पाटीलजी

Related Articles

Leave a Comment

error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल