राणीने कॉलेजला न जाता आपण बाहेर कुठे जाऊया हे बोलून माझ्याशी मनातले तिच्या तोंडून वदवले होते. मलाही तर हेच हवं होतं पण पहिल्याच अशा समोरासमोर भेटीत मी कसा सांगणार होतो तिला की आज आपण कॉलेज बंक करूया. पण असो मी नाही तर ती तरी म्हणाली, एकंदर काय तर आम्ही आज संपूर्ण दिवस सोबत घालवणार होतो.
“ठोंब्या? कुठे हरवलास? संपूर्ण दिवस इथेच बसायचे आहे का?” ती माझ्याकडे पाहत म्हणाली.
“नाही ग नाही, आपण ना आधी सिनेमाला जाऊया, मग बीचवर जाऊ आणि संध्याकाळी पनवेल शहर फेमस वाघेज वडापाव खाऊ आणि मग तुला मी घरी सोडेन.” मी ही यावेळी न घाबरता म्हणालो.
“अरे वा मिस्टर अनोळखी! तुम्ही तर संपूर्ण प्लॅन करून आला आहात, आधीच ठरवून आला होतात का हे सर्व?” राणीने थोड लाडात येऊनच म्हटलं.
मी हसलो आणि तिला म्हणालो चल जाऊया थेटरमध्ये, पाहूया तिकडे कोणता सिनेमा लागला आहे.
रुपाली टॉकीजमध्ये पोहोचताच तिथे असलेली गर्दी पाहून मी थक्क झालो. आज विकेंड नव्हता आणि तरीही एवढी गर्दी? कसे तिकीट मिळेल म्हणून मी संभ्रमात पडलो. काऊंटरला जाऊन चेक केलं तर सिनेमा हाऊसफुल होता. तीन थे भाई हा सिनेमा लागला होता. मी सिनेमागृहात पाहिलेला हा पहिला सिनेमा ठरणार होता पण तिकीट संपल्याने मी नाराज झालो. कारण आमच्या संपूर्ण प्लॅनवर पाणी फिरणार होतं. राणीने धीर दिला म्हटलं करूया काही दुसरे प्लॅन म्हणत आम्ही बाहेर निघालो. पाहायला गेलात तर तिचाही मुड ऑफ झाला होता. महत्वाचे म्हणजे आम्ही दोन ते अडीच तास सोबत वेळ घालवायचा होता आणि सिनेमागृह त्या साठी योग्य ठिकाण होतं.
आम्ही सिनेमागृहातून बाहेर पडणार एवढ्यात एक ओळखीचा आवाज कानी आला, “बाबू तू ईखरर कसा?” मागे वळून पाहिले तर आमच्या गावातील आजोबा होते. हे तेच आजोबा जे रोज माझ्यासोबत सकाळी बसमध्ये असतात. हे इथे कसे? आता यांनी मला राणी सोबत पाहिले. हे गावी सर्वांना सांगतील, आता माझी वाट लागेल. माझे अंग घामाने भरून आले. एव्हाना आजोबांच्या लक्षात ते आले असावे. त्यांनी जवळ येऊन मला बाजूला नेलं.
“पोरा कला घाबरतस, मी नाय सांगी कुणाला तू इत पिक्चर बघाला आलास.”
त्यांचे हे वाक्य ऐकून मन थोड स्थिर झालं. “आजोबा मैत्रिणी सोबत आलो आहे पण सिनेमा हाऊसफुल आहे.”
त्यांनी राणीवर नजर टाकली आणि मला डोळा मारत म्हणाले “मैत्रीण हाय का? बरा हाय बरा हाय. चल.. य माझ्या मागं तुला न्हेतो आतमध्ये.”
असे म्हणत आजोबांनी आम्हाला दोघांनाही आतमध्ये नेले. त्यांच्या बोलण्यातून कळले की गेली अनेक वर्ष याच सिनेमागृहात काम करतात. त्यांचा इथे दरारा आहे. आता आजोबांची एवढी ओळख इथ आहे म्हटल्यावर दोन सिटची जागा आमच्यासाठी मिळवून देणे त्यांच्यासाठी सोपे होते. त्यांनी आम्हाला कॉर्नरच्या दोन सीट दाखवत म्हणाले, “या बग.. ईखरर बसाची जागा तुमची, काय लागला तर सांग. मी हाईच इत.”
राणी हे सर्व पाहून खुश झाली पण माझ्या मनात अजून चिंता होतीच की आजोबांनी कुणाला सांगितले तर..? माझ्या मनाची चिंता पाहत त्यांनी मला पुन्हा बाजूला घेऊन म्हटलं, “पोरा यो तुजा फिराचा वय हाय, आमी पण याच केला व्हता. तुज्या आजीला मी असीच फिराला नेव्हाचू.” एवढे बोलत आजोबा हसले आणि पुन्हा एकदा मला डोळा मारत माघारी गेले.
बसमध्ये कुणासोबत न बोलणारा हा माणूस आज माझ्याशी एवढं कसं आणि काय काय बोलून गेला की त्यांच्याबद्दल माझ्या मनात अजून जास्त आदर निर्माण झाला. आजोबांच्या घरी जाऊन मी त्यांच्याशी मनोसोक्त बोलणार असे मी ठरवले होते. हातात दोन पॉपकॉर्न आणि एक कोल्डड्रिंकची बॉटल घेऊन मी राणी जवळ आलो. राणीचा आनंद चेहऱ्यावर दिसत होता. कुणा सोबत असे सिनेमा बघण्याची तिची आणि माझी ही पहिलीच वेळ. त्यात आम्हाला एकमेकांची सोबत असल्याने आमच्या चेहऱ्यावरचा आनंद दिसून येत होता.
मी तिच्या बाजूला जाऊन बसलो. चित्रपटगृह हाऊसफुल होतं त्यामुळे लोक ओरडत होते, शिट्या मारत होते, किंचाळत होते पण आम्ही दोघं मात्र एकमेकांच्या बोलण्यात गुंग होतो. माझा हात सारखा राणीच्या सीटवरून मागे पुढे होत होता. मला तिला मिठीत घेऊन बसायचं होतं. पण हिम्मत होत नव्हती. माझ्या मनाची चलबिचल तिला समजली असावी बहुधा पण तिने स्वतःहुन असे काहीच केलं नाही. तिला काही कळलेच नाही असे ती भासवत होती.
का कुणास ठाऊक पण राहून राहून वाटतं होतं, राणीला मिठीत घ्यावं, माझ्या ओठांना तिच्या मऊशार ओठात विलीन करावं पण पहिल्याच भेटीत असे काही कारणे कितपत योग्य आहे याची जाणीव मला होती आणि यात आम्हाला एकमेकांबद्दल काय वाटतं हा विषय देखील झाला नव्हता. सिनेमा संपवून आम्ही बाहेर आलो. सिनेमा कसा होता? काय कथानक? अगदी अगदी तर कोण कोण कलाकार होते हे सुद्धा आम्हाला माहीत नव्हतं. कारण आम्ही एकमेकांच्या बोलण्यात गुंग होतो.
“मिस्टर अनोळखी बोला आता पुढे काय?” राणीने गमतीने मला प्रश्न केला.
आता आपण हॉटेलमध्ये जेऊया आणि मग बीचवर जाऊ. एवढे बोलून मी खिशात हात घातला आणि पॉकेट चेक केलं तर फक्त १२० रुपये शिल्लक होते. एवढ्याश्या पैशात हॉटेल मध्ये जाऊन जेवण करणे मला परवडणार नव्हते. माहीत नाही कसे पण राणीला हे कळलं आणि तिने विषय बदलला, “ऐक ना हॉटेल मध्ये जेवण नको, आपण बीचवर गेलो की तिथेच आपला टिफीन बॉक्स खाऊया. तसाही आपण तो आणलाच आहे तर वाया नको जायला.”
मी तिला सहज स्माईल दिली. किती समजूतदार आहे माझी राणी. माझ्या बद्दल बऱ्याच गोष्टी तिला मी न सांगता सुद्धा कळतात. जोडीदार असाच तर हवा जो आपल्या मनातील गोष्टी समोरच्याला न सांगताही समजू शकतो.
आम्ही पिरवाडी बीचवर पोहोचलो. हा बीच माझ्याच शहरात असल्याने इथे अनेकवेळा मी आलो होतो. पण आजची गोष्ट वेगळी होती. आज माझ्या सोबत राणी होती. समुद्राला सुद्धा मला ओरडुन सांगायचं होतं बघ मी आज कुणाला सोबत आणले आहे? नेहमी हसतोस ना माझ्यावर तू एकटा येऊन बसतोस माझ्या किनाऱ्यावर, आता पाहा मी एकटा नाहीये.
हातात हात घालून मी आणि राणी किनाऱ्यावर चालत होतो. तिने तिची बोटं घट्ट माझ्या बोटात अडकवली होती. जणू ती मला सांगत होती की हा हात मी आयुष्यभरासाठी पकडला आहे. कधीच मला तो सोडायचा नाहीये. समोरून येणाऱ्या वाऱ्याने बऱ्याचदा तिच्या केसांची बट उडत होती. तिने सुद्धा अनेकवेळा ती कानाच्या वर खोसण्याचा प्रयत्न केला पण त्या वाऱ्याने पुन्हा पुन्हा ती उडत होती. मी म्हटलं, “राहूदे ना अशीच ती बट, खूप छान दिसते.” असे म्हणत तिने कानावर नेलेली बट मी माझा हाताने काढून तिचा गाल जोरात ओढला.
हे मी कसे केलं मलाही कळलं नाही कारण आजवर कधीच कुणा मुलीला असा स्पर्श मी केला नव्हता. माझ्या नकळत झालेल्या स्पर्शाने ती भांबावली, तिच्याही अंगावर काटा आला आणि ती माझ्या मागे मला मारायला धावत सुटली. मी पुढे पळत होतो आणि ती माझ्या मागे धावत होती. असे वाटतं होतं हेच माझे जग आहे, आता मला कुणाचीच गरज नाहीये. मी माझ्या आयुष्याचा जोडीदार निवडला आहे.
मी थोड्या अंतरावर गेलो आणि लांबूनच मोठ्यात ओरडलो, “राणी मनोहर मोरे.. ऐका ना… मला आवडेल तुझ्याशी लग्न करायला, माझ्या नावापुढे तुझे नाव लावायला. लग्न करशील माझ्याशी?” माझ्या या अनेपेक्षित प्रश्नांमुळे ती गोंधळली. नेहमी शांत राहणारा महेंद्र संपूर्ण जगासमोर असे तिला प्रपोज करेल याची तिला कल्पनाही नव्हती. तिचे अश्रू थांबत नव्हते. आज जणु आकाश ठेंगणं झालं आहे असे तिला वाटतं होते. ती धावत येऊन मला बिलगली. जणू तिचे शरीर माझ्यात विलीन झाले असाच काहीसा भास होत होता.
क्रमशः
कथेचा आठवा भाग वाचण्यासाठी इथे क्लीक करा
मी लिहिलेल्या कथा तुम्हाला आवडत असतील तर एक विनवणी आहे. याच कथेची लिंक तुम्ही तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत शेअर करा. कारण जेवढ्या लोकांपर्यत तुम्ही ही कथा पोहोचवाल तेवढाच पुढे अजून लिहिण्याचा आनंद वाढेल.
ह्या पण Horror कथा वाचा.
- ऑफिस मधील नाईट शिफ्ट
- पोस्टमॉर्टम
- बस मधील ती सिट
- भयाण शांतता
- राक्षसी आत्मा
- लॉक डाऊन मधली ती भयाण रात्र
- अमावस्या
लेखक: पाटीलजी