Home कथा मैत्री प्रेम लग्न घटस्फोट भाग ५

मैत्री प्रेम लग्न घटस्फोट भाग ५

by Patiljee
447 views

राणी आज कॉलेजला आलीय हे पाहून माझा आनंद गगनात मावेनासा झाला. पण अशी कशी ही अचानक आली? काल तर मला म्हणाली होती की पाहुणे पाहायला येणार आहेत, मी येणार नाही? माझ्याशी खोटं बोलली की… पाहुणे लवकर पाहून गेले? काय झालं? कसे झालं? नक्की मुलगा पाहून गेला की नाही? कसे कळेल मला? काहीच सुचत नव्हते. वाटतं होतं सरळ जाऊन तिला समोरासमोर विचारावं पण मी तर तिच्यासाठी फक्त महेंद्र पाटील होतो. एक अभ्यासू किडा ज्याला अभ्यासाशिवाय दुसरं काहीच दिसत नाही.

मिस्टर अनोळखी तिच्यासाठी वेगळा होता. कदाचित तिने त्या अनोळखी बद्दल वेगळं काही ईम्याजिनेशन केलं असावं. काय करू काहीच कळतं नव्हतं. तिच्याकडे पाहिलं तर ती खूप आनंदात दिसत होती. छान केसात आज गजरा माळून आली होती. मॅडम वर्गात आल्या आणि शिकवू लागल्या पण माझे मन मात्र थाऱ्यावर नव्हते. मॅडमच्या नकळत अलगद बॅगेतून मोबाईल बाहेर काढला आणि राणीला मेसेज केला.

मी: आज तू कॉलेज येणार नव्हतीस ना मग कशी आलीस? कसा आहे मुलगा? नक्की पाहुणे आले होते की असेच आपले उगाच बोलून गेलीस?

मी मेसेज न राहून पाठवला पण तिचा मोबाईल तिच्या हातात नव्हता आणि मला हे माहीत होतं जोपर्यत लेक्चर संपत नाही तोपर्यंत ही काही मोबाईल हातात घेत नाही. मी तिच्या रिप्लायची वाट पाहत राहिलो. आज मॅडम काय शिकवत होत्या काहीच कळत नव्हते. कारण माझे लक्ष पूर्णपणे आज राणीकडे होते. एवढ्यात मोबाईलची नोटिफीकेशन वाजली.

ती: अरे लवकर पाहुणे येऊन गेले. मुलगा छान आहे. आवडला मला आणि घरच्यांनाही.

तिचा हा मेसेज बंदुकीच्या सुटलेल्या वेगवान गोळी प्रमाणे काळजाच्या आरपार झाला. डोळ्यातून आपोहुन अश्रू बाहेर पडू लागले. मी मॅडमची परवानगी घेत बाथरूमला जातोय अशी थाप मारत टेरेसवर पोहोचलो. इथेच कुणीच नव्हते. आता माझ्या अश्रूंचा बांध फुटला. मी जोरजोरात रडू लागलो. मला कुणी पाहिल? काय विचार करेल याची मला काहीच काळजी नव्हती. मी मोठ्याने रडत होतो. अखेर रडणं थांबलं पण ते फक्त वरून. अंतरमनातून रडणं चालूच होतं.

खाली क्लासमध्ये येताच मोबाईल बॅगेत टाकून दिला आणि डोकं दुखतयं सांगून शांत बसून राहिलो. या सर्वात राणीचा दोष नव्हता पण मीच तिला अजून अंधारात ठेवलं होतं. माझ्या मनातल्या गोष्टी तिला सांगितल्याच नव्हत्या. असे वाटतं होतं आज राणीला सांगून टाकावं सर्व पण मनात एक विचार आला की तिला आजच मुलगा पाहून गेलाय. तिला आणि घरच्यांना सुद्धा आवडला आहे. मग आपण कोण आणि कुठले? आपला विचार का करेल ती? म्हणून मी तिचा विषय मनातून काढण्याचा निर्णय घेतला.

पण हे सोपं नव्हतं कारण राणी फक्त मला प्रेयसी म्हणून आयुष्यात नको होती तर माझी अर्धांगिनी म्हणून तिची साथ मला म्हातारपणापर्यंत हवी होती. पण आज सगळं संपलं होतं. आज कॉलेज सुटल्यावर मी तिच्या स्टॉपवर सुद्धा गेलो नाही. माझ्या गावची बस एक तास उशिराने होती. तरी सुद्धा एक एक बस बदलत मी लवकर घरी पोहोचलो. दुपार पासून मोबाईलला हात सुद्धा लावला नव्हता. हात लावायची इच्छा सुद्धा नव्हती.

एवढ्यात अजय घरी आला. “आहेस का रे माही घरात? चल तुझ्यासोबत काम आहे, जरा बाहेर जाऊ.” त्याच्या या वाक्याने मी हो नाही काहीच म्हणालो नाही. सरळ त्याच्या मागे जाऊ लागलो. तो काहीतरी सांगत होता पण मला ते ऐकूच येत नव्हते. माझे मन आज वेगळ्याच दुनियेत हरवले होते. अजयला कळून चुकलं होतं की आज मला काहीतरी झालंय. त्याने मला एका जागेवर शांत बसवलं. “काय झालं माही, काही प्रोब्लेम आहे का?”

“नाही रे”

“दिसतेय तुझ्या चेहऱ्यावर, आता नीट सांगणार आहेस का? तुला असे पहायची सवय नाहीये रे.”

“अज्जा… यार तिचं लग्न होतंय”

एवढं बोलून मी त्याला मिठी मारत रडू लागलो, त्याला सुद्धा विषयाचे गांभीर्य लक्षात आलं होतं. त्याने मला माझा वेळ दिला. मी जेव्हा शांत झालो तेव्हा म्हणाला, “लग्न होतंय म्हणजे? तू तुझ्या मनातल्या भावना वहिनीला सांगितल्यास का?”

मी नकारार्थी मान हलवली.

“अरे बाबा मग तू तुझ्या मनातल्या गोष्टी सांगीतल्याच नाहीस तर त्यांना कसे कळेल?”

“अरे पण तिला आज मुलगा पाहून गेला. सर्वांना पसंद आहे. तिला सुद्धा.”

“अरे मुलगा फक्त पाहून गेलाय ना? पुढची बोलणी तर नाही ना झाली? कशाला काळजी करतोस?”

“म्हणजे?”

“अरे तू तुझ्या मनातलं सांग तर वहिनींना. एवढा चांगला मुलगा तू, तो ही हुशार, त्यांना का नाही आवडणार? त्यांच्या मनातले न जाणताच तू हिम्मत हारत आहेस, हे मला अजिबात नाही आवडलं.”

“अरे पण…”

“पण वैगेरे काही नाही. उद्या कॉलेजला गेल्या गेल्या मन मोकळे करून टाक त्यांच्या समोर मग बघू पुढचे कसे करायचे ते?”

अजयच्या बोलण्याने मला धीर तर आला होता म्हणून घरी येऊन मोबाईल हातात घेतला. पाहतो तर राणीचे १५ मेसेज होते.

ती: काय रे काय झालं?

ती: बोल की?

ती: अरे बोल ना?

ती: ओये मिस्टर अनोळखी.

ती: कुठे गायब झालात?

ती: माझ्या लग्नाचे ऐकून माझ्याशी बोलत नाहीस का?

ती: अरे आता फक्त मुलगा पाहून गेलाय,लग्न नाही झालं.

ती: माझ्या लग्नाचं ऐकून तू माझ्याशी बोलत नाहीस का?

ती: काय रे तू असा, बोल ना.

ती: मघापासून तुझा एक पण रिप्लाय नाही. ठीक आहेस ना?

ती: हे बघ मी बस स्टॉपवर बसली आहे, पाहतो आहेस ना मला.

ती: मिस्टर अनोळखी रागावले की काय आमच्यावर.

ती: भेटली मला बस.

ती: पोहोचले मी घरी.

ती: जेवायला ये.

तिचे एवढे सर्व मेसेज पाहून मला वाईट वाटलं. मी तिला इग्नोर केलं पण त्यामागे कारण आहे हे तिला कसे सांगू. न राहून मी तिला मेसेज केला.

मी: हॅलो

ती: आहेस कुठे तू ठोंब्या? दुपारपासून तुझा पत्ता नाहीये.

मी: आहे इकडेच.

ती: काय झालंय सांगशील मला?

मी: काही नाही.

ती: नक्कीच काही झालंय. नाहीतर माझा मिस्टर अनोळखी असा गप्प राहणाऱ्यातला नाहीये.

मी: असे काही नाही.

ती: माझ्या लग्नामुळे अपसेट झालास का तू?

मी: हो.

ती: का?

मी: कारण माझं…..

ती: काय तुझं?

मी: काही नाही.

ती: बोलणार आहेस आता मी माझे लग्न व्हायची वाट बघतो आहेस.

मी: म्हणजे?

ती: एवढा कसा रे तू मंद?

मी: असुदे. मला सांग कोण आहे मुलगा? का आवडला तुला?

ती: का म्हणजे? काल सांगितल्या प्रमाणे तो इंजिनीयर आहे, एकुलता एक आहे, मस्त गोरापान आहे, हँडसम आहे. साऊथ सिनेमाचा हिरो दिसतो.

मी: म्हणजे हँडसम आहे, सुंदर दिसतो म्हणून तू लग्न करणार? नात्यात प्रेम नको का?

ती: प्रेम तर हवं आहे पण आता लग्नानंतर पण प्रेम होईलच की.

मी: काय ग तू अशी?

ती: मी कशी?

मी: तुला कसे कळत नाहीये?

ती: तू नीट सांगशील तर कळेल की.

मी: मला तू आवडतेस….

ती: माहीत आहे मला.

मी: म्हणजे?

ती: तुला मी आवडते हे माहीत आहे मला?

मी: तुला कसे माहीत?

ती: ते महत्त्वाचे नाहीये? पण हे सांगायला एवढा वेळ घेतलास हे पाहून मला हसू येतेय.

मी: तुला कसे माहीत ते सांग आधी?

ती: दुपारीच कळलं मला.

मी: दुपारी? कसं काय? मी तर काहीच बोललो नाही तुला.

ती: तू नाही बोललास तरी तुझे डोळे बोलले की.

मी: तू मला संभ्रमात पाडते आहेस, असे कोड्यात नको बोलुस. नीट सांग ना. माझे डोळे म्हणजे? मला कळलं नाही.

ती: माझ्या लग्नाची बातमी ऐकताच खूप रडलास ना? डोळे सुजले होते तुझे? मी पाहिले तेव्हाच कळलं माझ्यावर तू प्रेम करतोस?

मी: म्हणजे? तुला माहित आहे मी कोण आहे?

ती: हो मिस्टर अनोळखी मला माहीत आहे तुम्ही कोण आहात.  आमच्या वर्गातील हुशार, समंजस, शांत, अबोल असे महेंद्र पाटील म्हणजेच मिस्टर अनोळखी आहेत. हे आम्हाला माहीत आहे.

मी लिहिलेल्या या काही निवडक कथा सुद्धा वाचा.

भाग सहा वाचण्यासाठी इथे क्लीक करा

लेखक: पाटीलजी

Related Articles

Leave a Comment

error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल