Home कथा मैत्री प्रेम लग्न घटस्फोट भाग ३१

मैत्री प्रेम लग्न घटस्फोट भाग ३१

by Patiljee
129 views

फक्त तीन दिवसात एवढं भलंमोठं बिल पाहून मी चक्रावून गेलो पण हा आजारच असा होता की याबद्दल आजपर्यत फक्त सिनेमात किंवा मालिकेत पाहिले होते. त्यात हे हॉस्पिटल प्रायव्हेट असल्याने बिल वाढीव असेल याचा अंदाज आम्हाला होताच. डॉक्टरांसोबत बोलून थोडाफार डिस्काउंट घेतला. त्यांच्या हॉस्पिटलमध्ये पिस्तुला सर्जरी नसल्याने आम्ही मुंबईमध्ये जाऊन ती सर्जरी करून घेतली.

डॉक्टरांनी सक्त ताकीद दिली होती की पुढील तीन महिने आठवड्यातून तीनवेळा डायलिसिस करायचं आहे मग आपण चेक करून की तिच्या शरीरात किती Creatinine चे प्रमाण कमी झालं आहे. त्यानुसार आपण ठरवू की कितीवेळा डायलिसिस करण्याची गरज लागेल. पण आता हे आयुष्भर करावे लागेल यासाठी नेहमीच जास्त पैसे लागतील. या गोष्टीची तयारी करून ठेवा. आम्ही राणीला घेऊन घरी आलो. एव्हाना तिला काय झालं आहे हे नातेवाईकांकडून कळलं होतं. मला तिला ही गोष्ट अशी नव्हती सांगायची पण म्हणतात ना जे मनात असते ते कधीच घडत नाही. आपल्या मनाच्या विपरीत गोष्टी नेहमी घडत असतात. गरज असते आपल्याला मार्ग काढण्याची.

डायलिसिस केल्याने राणीला बर तर वाटतं होतं पण तिची तब्बेत खालावत चालली होती. या काळात आम्ही बऱ्याच इतर डॉक्टरांचा सल्ला घेतला पण सर्वांनी किडनी ट्रान्सप्लांट हा एकच उपाय सांगितला. काही आयुर्वेदिक डॉक्टरांनी विश्वासात घेऊन आम्ही तुमच्या बायकोला बर करतो आमच्यावर विश्वास ठेवा आणि उपचार सुरू केले पण तिथेही हाती निराशा पडली. आता शेवटचा उपाय म्हणून मीच राणीला किडनी देण्याचा विचार केला.

माझ्या या निर्णयाने राणी अजिबात खुश नव्हती कारण तिला माहित होत जर मलाही काही झालं तर आमच्या त्या नऊ महिन्यांच्या बाळाचे कसे होईल? त्यांचे संगोपन कोण करेल? म्हणून तिने शेवटपर्यंत या गोष्टीला नकारच दिला. पण मी हट्टाला पेटलो होतो. मला माझी राणी माझ्यासोबत कायम हवी होती आणि तसेही एका किडणीवर पण माणसे जगतात की मग काय फरक पडतो म्हणून मी माझ्या किडनी ट्रान्सप्लांटसाठी प्रोसेस सुरू केली.

पण म्हणतात ना देवाने एकदा तुमच्याकडून नजर फिरवली की आयुष्यात काहीच चांगलं होत नाही. तसेच काहीसे आमच्याबद्दल पण झाले. माझी किडनी राणीला मॅच नाही झाली. त्यामुळे आता दुसरा डोनर पाहिल्याशिवाय पर्याय नव्हता. त्यात आपल्या भारतात असे नियम आहेत की फक्त घरातले नातेवाईकच किडनी डोनेट करू शकतात. बाहेरून कुणाची किडनी स्वीकारली जात नाही. असे केल्यास कठोर शिक्षा भोगावी लागते.

तिच्या आई वडिलांचे वय ६५ वर असल्याने ते नियमात बसत नव्हते आणि बहिणीचे लग्न नाही झाले त्यामुळे जर तिची किडनी घेतली तर तिच्याशी लग्न कोण करेल हा प्रश्न होताच आणि आम्हाला तिचे आयुष्य खराब करायचे नव्हते. सर्वच बाजूने आमची कोंडी झाली. पण अधिक माहिती घेतल्यानंतर मला कळलं की आपण किडनीसाठी नाव नोंदवलं की आपल्याला बाहेरून किडनी मिळते. जे अपघातात गमावतात किंवा इच्छामरण घेतात त्यांची किडनी अशा रुग्णांना दिली जाते.

कुठून तरी आम्हाला आशेचा किरण दिसला होता. या सर्वात तीन महिने निघून गेली. दर आठवड्याला सोमवार, बुधवार आणि शनिवारी जाऊन आम्हाला डायलिसिस तर करावा लागतच होता. यामुळे राणीच्या शरीरावर त्याचा परिणाम दिसून आला. गोल मटोल दिसणारी माझी राणी अचानक बारीक होत चालली होती. आधी तिचे वजन ६२ होते आणि तेच वजन आता ५४ वर आलेले. हे असेच डायलिसिस चालू राहिले तर राणीच्या शरीराची पूर्णतः वाट लागेल याचा अंदाज मला होताच म्हणून मी किडनी नोंदणीसाठी लवकर हात पाय चालवायला सुरुवात केली.

पण वाटतं तेवढी सोपी ही पद्धत नाहीये हे मला तेव्हा कळलं जेव्हा यात मी पूर्णपणे उतरलो. आमच्या आधी सुद्धा अनेक लोक रांगेत होते ज्यांची किडनी खराब झाली आहे आणि त्यांनी आधीच नंबर लाऊन ठेवला आहे. कमीतकमी आमचा नंबर येण्यासाठी चार ते पाच वर्ष लागणार होते. हा आकडा पाहूनच मी पुन्हा माझे अवसान गळाले. तीन महिन्यात माझ्या राणीची ही अवस्था आहे आणि अजून चार पाच वर्ष लागले तर काय होईल? हे विचार करूनच भीतीने छाती भरून आली.

पुढे काय होणार काहीच कल्पना नव्हती. माझे लेकरू खूप लहान होतं. त्याच्या आईला काय झालं आहे हे त्या इवल्याश्या बाळाला काय कळणार होतं. हळूहळू त्या बाळाकडून तिचे लक्ष राहिले नाही. कारण नेहमीच तिला चक्कर येणे, अंग दुखणे, ताप येणे, अचानक चालता चालता बेशुद्ध होणे, रक्त कमी होणे, जेवण न जाणे अशा समस्या होत होत्या.

अनेकांनी मला तिला घटस्फोट दे असा सल्ला दिला. तुझा मुलगा लहान आहे, आता तुझ्या बायकोचे त्याच्याकडे लक्ष नाहीये, तुझ पण वय कमी आहे. दुसरं लग्न कर, तुझ्यासाठी नाही तर त्या बाळासाठी तरी कर असा सल्ला मला खूप जणांनी दिला पण मी माझ्या निर्णयावर ठाम होतो. सात फेरे घेताना मी माझ्या राणीला वचन दिलं होतं की आयुष्यभर तुझी साथ कधी सोडणार नाही. मग हे असे आमच्यावर संकट आल्यावर मी तिला मध्येच सोडून जाणे हे माझ्या स्वभावातच नव्हते.

राणीने पण बऱ्याचदा मला दुसऱ्या लग्नासाठी आग्रह धरला होता पण मी माझ्या निर्णयावर ठाम होतो. जे काही होईल ते आपण करू लवकरच तुला बरं करू असा विश्वास मी तिला देत होतो. पण या सर्वात माझे माझ्या जॉब वरचे लक्ष कमी झाले. माझ्या होणाऱ्या सारख्या सुट्ट्या या बॉसच्या नजरेत आल्या होत्या. त्याने वेळोवेळी मला तशी ताकीद दिली होती पण राणीचे आजारपण असे होते की नेहमीच मला अचानकपणे सुट्ट्या घ्यावा लागत असे. याचाच परिणाम म्हणून मला कामावरून काढून टाकण्यात आलं.

पण ही वेळ खचून जाण्याची नव्हती. मी रिक्षा चालवायला सुरुवात केली. हवं तेव्हा काम करणे आणि माझ्या राणीला जेव्हा गरज असेल तेव्हा तिच्यासोबत राहणे हा माझा दिनक्रम बनला. लोकं म्हणत होते खरे प्रेम कसे असते हे महेंद्र करून शिकावं पण माझे या गोष्टींकडे अजिबात लक्ष नव्हते. मला माझ्या राणीला काहिकरून बर करून पुन्हा आमच्या संसाराचा गाडा सुरळीत करायचा होता.

एव्हाना आमचा मुलगा दीड वर्षाचा झाला होता. आमच्यावर कितीही मोठं संकट असलं तरी त्या इवल्याश्या बाळासोबत खेळताना सर्व दुःख विसरून जायला व्हायचे. पण नियतीच्या मनात आज काहीतरी वेगळेच होते. अचानक आज राणीची तब्बेत बिघडली. ती चक्कर येऊन खाली पडली आणि बेशुद्ध झाली. हे अचानक झालं की आम्हाला काहीच कळलं नाही. आमच्या फॅमिली डॉक्टरकडे नेल्यावर त्यांनी सांगितले की तुम्हाला लवकरच डायलिसिस साठी न्यावे लागेल. शरीरात पाण्याचे प्रमाण वाढले आहे. आमच्या उरण शहरात एकही डायलिसिस सेंटर किंवा कोणत्या हॉस्पिटलमध्ये ही सुविधा उपलब्ध नव्हती. आम्हाला त्यासाठी पनवेल गाठावे लागणार होते.

गाडी काढून आम्ही थेट पनवेलकडे मोर्चा वळवला पण देव आज आमची परीक्षा घेणार हे ठरवलं होतं. रस्त्याला खूप ट्रॅफिक लागल्याने जिथे आम्ही दीड दोन तासात पोहोचणार तेच आम्हाला साडे तीन तास लागले. मी राणीला हातात उचलून धावत धावत उन्नती हॉस्पिटल गाठलं. डॉक्टरांनी तिला आतमध्ये घेतले पण मी सोबत होतो. तिने माझा हात घट्ट पकडला होता. पण मला जाणवले की तिच्या हाताची पकड सैल होत आहे आणि त्या क्षणी राणीचा हात माझ्या हातातून निसटला.

मी हात पुन्हा हातात घट्ट पकडला पण ज्याचा मी विचार सुद्धा केला नव्हता तेच झालं. डॉक्टरांनी तिला तपासले आणि मृत घोषित केलं. माझी राणी मला आणि माझ्या इवल्याश्या बाळाला सोडून गेली. मी कॅलेंडर कडे पाहिले तर आजही संकष्टी होती.

मैत्री पासून सुरू झालेला हा प्रवास या वळणावर संपेल याची कल्पना तुम्ही वाचकांनी केली नसेल पण प्रत्येक प्रेम कथेचा शेवट हा आनंदी असतो असा नाही. काही गोष्टी या अपूर्ण राहतात. आपल्या आयुष्यावर एक वेगळा परिणाम सोडून जातात. या कथेतून तुम्ही काय बोध घेतलात? काय वाटतं तुम्हाला? तुमच्या प्रत्येकाच्या रिप्लायची मी वाट पाहतोय. तुम्हाला मला काही प्रश्न विचारायचे असतील तर इंस्टाग्रामवर @patiljee_official म्हणून माझे अकाउंट आहे. तिथे येऊन तुम्ही मला डायरेक्ट मेसेज करू शकता.

अशाच अजून खूप साऱ्या कथा वाचायच्या असतील लगेच आपले हे पेज फॉलो करा कारण अजून अशा बऱ्याच कथा आपल्या पेजवर येणार आहेत.

समाप्त.

लेखक : महेंद्र गुरुनाथ पाटील (पाटीलजी)

Related Articles

Leave a Comment

error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल