Home कथा मैत्री प्रेम लग्न घटस्फोट भाग ३०

मैत्री प्रेम लग्न घटस्फोट भाग ३०

by Patiljee
112 views

“दोन्ही किडन्या कशा खराब होतील डॉक्टर? किमान एकतरी काम करत असेल ना वो?” मी म्हणालो.

“काश मी हो असे म्हणालो असतो पाटील, पण दोन्ही किडनीची साईझ कमी झाली आहे. त्यांना आता डायलिसिस आत ICU मध्ये सुरू केलं आहे पण आता हे नेहमीच करावं लागेल. आठवड्यातून तीनवेळा तरी.” डॉक्टर म्हणाले.

माझ्या तोंडातून शब्दच बाहेर पडत नव्हते. काय बोलू काहीच सुचत नव्हते. “डॉक्टर काही उपाय नाहीये का या आजारावर? काहीतरी असेल ना प्लीज बघा ना?” मी त्यांच्या समोर हात जोडत म्हणालो.

“विज्ञान कितीतरी पुढे गेलं असलं तरी कृतीम किडनी लावून रुग्णांना बरं करणे अजून तरी शक्य नाहीये. एक तर तुम्हाला आयुष्यभर डायलिसिस चालू ठेवावा लागेल ज्यात तुमचे पैसे आणि वेळ दोन्ही पणाला लागेल आणि दुसरा उपाय की तुमच्या कुटुंबातील कुणी किडनी त्यांना दिली तर आपण ऑपरेशन करू शकतो पण यासाठी खूप पैसे खर्च करावे लागतील.” डॉक्टर म्हणाले.

क्षणाचाही विलंब न करता मी किडनी देण्यासाठी होकार दर्शवला आणि म्हणालो, “डॉक्टर माझी किडनी घ्या पण माझ्या राणीला वाचवा, मला ती हवी आहे. साधारण किती खर्च येतो ऑपरेशन साठी?” मी म्हणालो.

“हो चांगलं आहे तुम्ही किडनी देण्यासाठी लगेच तयार झालात पण ही प्रोसेस असं काम नाही करत. आधी आम्हाला तपासावी लागेल की तुमची किडनी त्यांना मॅच होऊ शकेल का नाही? तुमचा रक्तगट त्यांचा रक्तगट सर्वच गोष्टी पडताळून पाहाव्या लागतील आणि खर्चाचे म्हणाल तर प्रायव्हेट हॉस्पिटल मध्ये जर तुम्ही ऑपरेशन केलेत तर दहा ते बारा लाखापर्यंत हा खर्च करावा लागेल आणि सरकारी हॉस्पिटल मध्ये केलेत तर सहा ते सात लाखापर्यंत होऊन जाईल.” डॉक्टर म्हणाले.

खरतर एवढे पैसे लागतील हे पाहून मला टेंशन आलं होतं पण करू काहीतरी पैश्याचे हा विचार मी मनाशी ठामपणे ठरवलं. डॉक्टरांचा निरोप घेत मी त्यांच्या केबिन मधून बाहेर आलो. एवढ्यात नर्स ने मला आवाज दिला. ICU मध्ये मला एकट्याला जाण्याची परवानगी दिली. आतमध्ये जाताच राणी समोर बेडवर पडून होती. मी लांबूनच स्माईल करत तिच्या जवळ गेलो. नक्की काय झालं आहे तिला हे एवढ्यात मला सांगून अजून जास्त टेंशन द्यायचं नव्हतं.

मी पाहिले तर राणीच्या मानेत मोठी सुई लावली आहे आणि तिथूनच डायलिसिस सुरू आहे. मानेतून रक्त बाहेर काढून साफ केलं जातेय हे पाहूनच मला कसतरी होत होतं. माझी राणी हे किती सहन करत आहे हे पाहून रडू येत होतं. नर्सने तिला चहा आणायला सांगितला. बरेच तास झालं होतं तिने काहीच खाल्ल नव्हते आणि डायलिसिस सुरू असल्याने ती जेवण करू शकत नव्हती. म्हणून चहा बिस्कीट आणून तिला खाऊ घातले. सारखं सारखं आपण असे मानेतून डायलिसिस करू शकत नाही लवकरच पिस्तुला करून घ्या असा सल्ला डॉक्टरांनी दिला. आता ही पिस्तुला नक्की काय भानगड असते याबाबत मला जराही कल्पना नव्हती.

डॉक्टरांनी सांगितले की, “पिस्तुला डाव्या हातात करून घ्या त्यामुळे हाताच्या नस जाड होतील आणि डायलिसिसला लागणाऱ्या मोठ्या सुई सहज त्या नसामधून आतमध्ये जातील. कारण आता नेहमीच तुम्हाला डायलिसिस करावं लागेल.” ऐकूनच हे ऑपरेशन खूप विचित्र वाटतं होते. पुढं काय आणि कसे होणार काहीच डोकं काम करत नव्हते. मी बाहेर येऊन बाकावर बसलो. तसाच डोळे बंद करून पडून राहिलो. एव्हाना सकाळ झाली होती. नातेवाईक राणीला पाहायला येत जात होते पण ICU मध्ये जाण्याची परवानगी कुणालाच त्यामुळे ते फक्त आम्हालाच भेटून जात होते.

प्रत्येकजण एकच प्रश्न विचारत होता नक्की काय झालंय पण किडनी बद्दल मी कुणालाच काही सांगितले नव्हते. पण अशा गोष्टी फार काळ लपून राहत नाही त्या बाहेर येतातच. दुपारी बाराच्या सुमारास राणीला ICU मधून बाहेर काढली. आता ती छान वाटतं होती. एवढ्या दिवसात तिच्या चेहऱ्यावर दिसणारा थकवा आता जाणवत नव्हता. कदाचित डायलिसिस केल्याने शरीरातील घाण पाणी निघाले आणि तिचा थकवा दूर झाला असेल असा अंदाज मी बांधला.

पुन्हा काही तासाने राणीला डायलिसिस करण्यासाठी आतमध्ये नेणार होते. आधी १९ % एवढी घाण शरीरात होती ती आता १६ वर आली. त्यामुळे हळूहळू ती कमी होईल असे डॉक्टर म्हणाले होते. एवढ्यात राणीच्या घरचे सर्व तिला पाहायला आले. आज सकाळीच दादाने त्यांना फोन करून घडलेला सर्व प्रकार त्यांना सांगितला म्हणून ते धावत पळत इथे पोहोचले.

राणीची आई आणि बहिण आल्या आल्या रडू लागले. त्यांचे ते रडणे पाहून मी सुद्धा रडू लागलो. सासऱ्यानी मला आधार दिला. पण माझे अश्रू थांबत नव्हते. मी तिथून उठून बाहेर गेलो. एवढ्यात बिलिंग डिपार्टमेंट मधून मला फोन आला. “मिस्टर पाटील जरा तिसऱ्या मजल्यावर बिलिंग डिपार्टमेंट मध्ये या” मी त्यांच्या केबिन मध्ये पोहचलो.

“पाटील आम्हाला सांगायला हे दुःख होतेय पण तुम्ही जे मेडिकल पॉलिसीचे डॉक्युमेंट्स आम्हाला दिले आहेत त्यात तुमच्या आजाराची पॉलिसी बसत नाही. त्यामुळे लागणारा सर्व खर्च तुम्हाला करावा लागेल.” हे ऐकून मला धक्का बसला. “मॅडम असे कसे बसत नाही माझी पॉलिसी तर तीन लाखाची आहे. वार्षिक मी ८ हजार प्रीमियम भरतो ते ही न चुकता. मग माझी पॉलिसी या आजारात का बसत नाहीये?” मी रागातच म्हणालो.

“हो माझे आताच त्या पॉलिसी वाल्यांसोबत बोलणं झालं त्यांचं असं म्हणणं आहे की किडनी आजार आमच्या पॉलिसीमध्ये बसत नाही. एकदा का पॉलिसीला तीन वर्ष पूर्ण झाले की मग हा आजार पॉलिसीमध्ये येतो आणि तुमच्या पॉलिसीला दोनच वर्ष झाली आहेत म्हणून तुम्हाला याचा लाभ मिळणार नाही. तुम्हाला पैसे भरावे लागतील.” त्या मॅडम म्हणाल्या.

आता मात्र माझा पारा चढला पण त्या मॅडमला बोलून काहीच फायदा नव्हता कारण त्या त्यांचं काम करत होत्या. मी त्या पॉलिसी कस्टमर केअरला फोन केला आणि याबाबत त्यांना जाब विचारला. पण त्यांचेही हेच म्हणणे होते की आम्ही यात काहीच करू शकत नाही सर, पॉलिसी देताना सुद्धा टर्म अँड कंडीशन मध्ये दिले होते. पण हे असे एवढ्या छोट्या अक्षरात लिहून देतात की आपल्याला ते वाचायची कधी मिळतच नाही. आणि वेळ आल्यावर मग आपलीच वाट लागते. माझी खूप जास्त चिडचिड होत होती.

मी डॉक्टरांच्या भेटीला गेलो आणि घडलेला प्रकार त्यांना सांगितला पण त्यांनी सुद्धा हेच म्हटले की तुम्हाला पैसे भरावे लागतील. पॉलिसी मध्ये बसत नसेल तर आम्हीही काहीच करू शकत नाही. मी खूप जास्त निराश झालो. खूप जास्त राग येत होता. त्या मेडिकल पॉलिसी वाल्यांचा सुध्दा आणि स्वतः चा सुद्धा. पण सध्या ही वेळ संयम ठेऊन वागण्याची होती. मी खाली बिलिंग काऊंटरला गेलो आणि बिलाची चौकशी केली तर एक लाख १० हजार बिल झालं होतं.

पुढील भाग इथे क्लिक करून वाचा

मी लिहिलेल्या कथा तुम्हाला आवडत असतील तर एक विनवणी आहे. कॉइन्स देऊन तुमचं प्रेम तुम्ही दाखवू शकता. कथेची लिंक तुम्ही तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत शेअर करा. कारण जेवढ्या लोकांपर्यत तुम्ही ही कथा पोहोचवाल तेवढाच पुढे अजून लिहिण्याचा आनंद वाढेल.

लेखक: महेंद्र पाटील (पाटीलजी)

Related Articles

Leave a Comment

error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल