Home कथा मैत्री प्रेम लग्न घटस्फोट भाग २९

मैत्री प्रेम लग्न घटस्फोट भाग २९

by Patiljee
140 views

डॉक्टर हे काय म्हणतात मला कळलेच नाही, “डॉक्टर नक्की काय झालंय? जरा नीट सांगाल का मला टेंशन आलंय.” मी म्हणालो.

“महेंद्र काळजी करण्याचे कारण नाही असे बोलायला मलाही आवडले असते पण विषय गंभीर आहे. मी आताच तुझ्या बायकोचे सर्व रिपोर्ट्स चेक केले. तुला आता जमेल का तिला हॉस्पिटल न्यायला? पण आपल्या उरण मध्ये तिच्यासाठी हवी असलेली सुविधा उपलब्ध नाहीये. तुला पनवेल जावे लागेल. जमेल का एवढ्या रात्री जायला?” डॉक्टर म्हणाले.

“डॉक्टर एवढं काय झालंय माझ्या राणीला, नीट सांगाल का? सविस्तर सांगा मला. गरज पडली तर आताच्या आता तिला घेऊन जातो मी पनवेल, पैसे लागतील का जास्त? ते ही घेतो मी सोबत.” मी म्हणालो.

“खरतर हा आजार असा आहे की आता आयुष्भर तुझा खिसा मोठाच ठेवावा लागेल आणि जेवढ्या लवकर नेता येईल तेवढे लवकर त्यांना घेऊन पनवेल पोहोच. मी आताच लाईफ लाईन हॉस्पीटलमध्ये फोन केला होता पण तिथे बेड खाली नाहीये. तू एक काम कर नवीन पनवेलमध्ये अष्टविनायक हॉस्पिटल आहे तिथे त्यांना घेऊन जा. माझ्या ओळखीत देशमुख डॉक्टर आहेत तिथे मी त्यांना सांगून ठेवतो.” डॉक्टर म्हणाले.

“पण डॉक्टर नक्की झालंय काय? नीट सांगाल का मला? प्लीज असे कोड्यात नका सांगू मला” मी थोड्या रागातच म्हणालो.

“महेंद्र.. तुझ्या बायकोची किडनी खराब झाली आहे. आपण जे खातो पितो त्याची घान आपल्या शरीरात तयार होते. हीच घाण मुत्राच्या वाट्याने बाहेर पडते. ही घाण शरीरातून वेगळं करण्याचे काम किडनी करत असते. किडनी काम करत नसल्याने ती घाण शरीरात साठून राहिली आहे म्हणूनच तुझ्या बायकोची तब्बेत दिसत आहे. ही तब्बेत नाही तर सूज चढत चालली आहे. शरीरात त्या घाण पाण्याचे प्रमाण वाढले आहे. त्याला Creatinine असे म्हणतात. सामान्यता शरीरात Creatinine ०.७ ते १.३ चालते. पण तुझ्या बायकोच्या शरीरात सध्या ह्याच प्रमाण १९ एवढं झालं आहे. हॉस्पिटल मध्ये जाऊन लवकरात लवकर डायलिसिस करावं लागेल तेव्हा हे प्रमाण कमी होईल. पण आता यापुढे नेहमीच हे डायलिसिस करावं लागेल, महिन्याला आठवड्याला की रोज हे तुला तिथलेच डॉक्टर सांगतील. त्यामुळे लवकर घाई कर आणि हॉस्पीटल गाठ नाहीतर तुझ्या बायकोच्या जीवाला धोका आहे. कारण प्रमाण १९ एवढं झालं आहे.” डॉक्टर म्हणाले.

एवढं सर्व ऐकून मी जागीच कोसळलो. डायलिसिस हे काय असते याची जराही कल्पना मला नव्हती. डोळ्यातून फक्त अश्रू वाहत होते. “काय देवा? हे नक्की काय चालवलं आहेस तू आमच्या आयुष्यात? सुखाने एक क्षण तरी नीट जगू दे आम्हाला.” मी खूप जास्त मोठमोठ्या रडत होतो. एव्हाना आजूबाजूचे सर्व नातेवाईक जमू लागले. भावाने त्याच्या मित्राला फोन करून गाडी बोलावली आणि आम्ही थेट पनवेल गाठलं.

अष्टविनायक हॉस्पिटलमध्ये पोहोचताच राणीला ICU मध्ये भरती केलं. आमच्या डॉक्टरांनी आधीच सर्व इथल्या डॉक्टरांसोबत बोलून घेतलं होतं. जगातील सर्वात मोठं दुःख कधी असतं माहीत आहे? आय सी यू च्या बाहेर बसने आणि आपली जवळची व्यक्ती आतमध्ये असणे. क्षणिक जरी दरवाजा उघडला तरी डोळे त्या दरवाजा कडे फिरतात. डॉक्टर आता येतील आणि सांगतील सर्व ठीक आहे काळजी करू नका. मनात देवाचं नामस्मरण सुरू असते. हा काळ आणि वेळ दोन्ही खूप कठीणच. एक एक सेकंद एक वर्षासारखा भासत राहतो.

डायलिसिस म्हणजे नक्की काय करतात हे मला माहीत देखील नव्हते. मी गुगलवर हे नाव सर्च केलं तर रक्त शुद्धीकरण असा अर्थ समोर आला. मग मी याबद्दल अजून माहिती वाचत गेलो तेव्हा कळलं की मशीन द्वारे दोन मोठ्या सुया रुग्णाच्या शरीरात टोचल्या जातात. एका सुई मधून शरीरातील संपूर्ण रक्त बाहेर काढून त्या मशीन मध्ये टाकलं जातं आणि या मशीन मधून रक्त शुद्ध होऊन दुसऱ्या सुई मार्फत पुन्हा शरीरात टाकलं जातं. ही पद्धत एवढी विचित्र वाटतं होती की मला ते वाचूनच अंग थरथरायला सुरुवात झाली आणि माझी राणी आतमध्ये हे सर्व अनुभव असेल? काय तिची अवस्था झाली असेल? विचार करूनच मला तिची खूप काळजी वाटतं होती.

नर्स बाहेर आली, “या काही गोष्टी लिहून दिल्या आहेत तुम्ही मेडिकल मध्ये जाऊन पटकन घेऊन या, मेडिकल पॉलिसी आहे का तुमची? असेल तर खाली काउंटरवर बिलिंग डिपार्टमेंट मध्ये भेटा आणि त्यांना डिटेल्स द्या ते सर्व फ्री मध्ये करून देतील. लवकर जा.” नर्स म्हणाली.

“हो आहे पॉलिसी मी जातो खाली पण माझी बायको बरी आहे ना?” मी चिंतेतच म्हणालो.

“हो ते डॉक्टर सांगतील सविस्तर आता तुम्ही खाली जा आणि प्रोसेस पूर्ण करून ह्या लिहिलेल्या गोष्टी घेऊन या.” नर्स म्हणाली.

मी खाली बिलिंग डिपार्टमेंट मध्ये आलो. माझी मेडिकल पॉलिसीचे सर्व डॉक्युमेंट्स तिथे सबमिट केले आणि त्यांनी पुढील प्रोसेस सुरू केली. मेडिकल मधून मी दिलेल्या सर्व गोष्टी घेऊन पुन्हा ICU गाठलं. आतमध्ये नक्की काय सुरू आहे याची जराही कल्पना मला नव्हती. बाहेर वाट पाहण्या पलीकडे मला काहीच करता येणार नव्हते. माझा फोन सारखा रिंग करत होता. जवळचे सर्व व्यक्ती फोन करून विचारपूस करण्यासाठी फोन करत होते. पण मला सध्या कुणाशी बोलण्याची तिळमात्र सुद्धा इच्छा नव्हती. मी फोन भावाकडे देऊन त्यालाच बोलायला सांगितले. मी ICU च्या बाहेर राहून डॉक्टर बाहेर येण्याची वाट पाहत होतो.

काही तासाने डॉक्टर बाहेर आले. बाहेर येताच मी त्यांना गाठलं. “डॉक्टर बायको कशी आहे माझी? ठीक आहे ना ती?” मी म्हणालो.

“तुम्ही मिस्टर का पेशंटचे, या केबिन मध्ये जरा महत्त्वाचे बोलायचं आहे तुमच्याशी.” असे म्हणत डॉक्टर त्यांच्या केबिन मध्ये शिरले. त्यांच्या पाठोपाठ मी सुद्धा आतमध्ये गेलो.

“या पाटील बसा इथे, आधी कधी याबद्दल तुम्हाला अंदाज नाही का आला? असे शेवटच्या स्टेजवर येऊन तुम्ही तिला दवाखान्यात घेऊन आलात?” डॉक्टर म्हणाले.

“नाही वो डॉक्टर कधीच असं काही जाणवलं नाही. ती आजारी पडायची पण काही दिवसात बरी सुद्धा व्हायची. असे एवढं काही होईल असे वाटले नाही.” मी म्हणालो.

“एवढं काही होईल नाही खूप काही झालं आहे. मला सांगा प्रेगनन्सी मध्ये काही जाणवले नाही का हे? तेव्हाचे काही रिपोर्ट्स आहेत का तुमच्याकडे?” डॉक्टर म्हणाले.

“हो रिपोर्ट्स आहेत, मी मागवून घेतो. पण तेव्हा तर सर्व नॉर्मल होते आम्ही बऱ्याचदा रिपोर्ट्स काढले होते. कारण आमची दोन मुलं आठव्या महिन्यातच गेली.” मी म्हणालो.

“मुलं जाण्याचे कारण काय सांगितले डॉक्टरांनी?” डॉक्टर म्हणाले.

“आठव्या महिन्यात बाळाला रक्तपुरवठा होत नसे. राणीला बिपीचा त्रास होता.” मी म्हणालो.

“इथेच तुम्ही चुकलात. तिला बीपी आहे मग गोळ्या का नाही चालू ठेवल्यात तुम्ही?” डॉक्टर थोडे चिडून म्हणाले.

“हो डॉक्टर पण बीपी फक्त गरोदरपणात वाढायचा. बाकी दिवसात नॉर्मल असायचा.” मी म्हणालो.

“हे तुम्हाला कसं माहीत तुम्ही रोज बीपी चेक करत होता का?” डॉक्टर म्हणाले.

“रोज असे नाही पण गरोदरपणानंतर डॉक्टरांनी बिपीच्या गोळ्या दिल्या होत्या. त्या डॉक्टरांनी रोज खायला सांगितल्या होत्या. काही दिवस तिने खाल्या पण जेव्हा बरं वाटायला लागले तेव्हा तिने खाणे बंद केल्या. मी जेव्हा याबाबत तिला विचारले, तिच्यावर भडकलो सुद्धा होतो, नेहमी गोळ्या खा असे सुद्धा म्हटलं होतं. “गोळ्या खाते, हो मी आज खाल्ल्या, विश्वास नाही का तुझा?” असे म्हणायची. एक दिवस म्हणाली, की “बर वाटतंय.. बीपी वाढत नाहीये तर उगाच कशाला गोळ्या खाऊ? असे करत राहिलो तर आयुष्यभर मला गोळ्या खाव्या लागतील. मला बरे वाटते आहे म्हणून मी आता गोळ्या खात नाही.” मी म्हणालो.

“इथेच तर त्यांचं चुकलं बीपी आहे मग आयुष्यभर गोळ्या खाव्या लागतील म्हणून गोळ्या खाल्या नाहीत आणि आता आयुष्यभर हे तुम्हाला सहन करावे लागेल. पाटील तुमच्या मिसेसच्या दोनी किडनी खराब आहेत.

पुढचा भाग वाचण्यासाठी इथे क्लिक करा

मी लिहिलेल्या कथा तुम्हाला आवडत असतील तर एक विनवणी आहे. कॉइन्स देऊन तुमचं प्रेम तुम्ही दाखवू शकता. कथेची लिंक तुम्ही तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत शेअर करा. कारण जेवढ्या लोकांपर्यत तुम्ही ही कथा पोहोचवाल तेवढाच पुढे अजून लिहिण्याचा आनंद वाढेल.

लेखक: महेंद्र पाटील (पाटीलजी)

Related Articles

Leave a Comment

error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल