Home कथा मैत्री प्रेम लग्न घटस्फोट भाग २८

मैत्री प्रेम लग्न घटस्फोट भाग २८

by Patiljee
124 views

मागच्या दोन वेळेस जेव्हा असे झालं होतं तेव्हा बाळाचा आवाज कधीच कानी पडलाच नव्हता पण यावेळी मात्र माझं बाळ आतून जोरात रडत होतं. मी जाऊन दरवाजाला चिपकलो. त्याचा आवाज ऐकण्याचा प्रयत्न करू लागलो. काय झाले नक्की आतमध्ये माहीत नव्हतं. माझी बायको ठीक असेल ना? माझे बाळ सुखरूप असेल ना..? मुलगा की मुलगी हा प्रश्न माझ्या मनात फिरत सुद्धा नव्हता, मला फक्त माझं बाळ सुखरूप हवं होतं मग ते मुलगा असो किंवा मुलगी मला काहीच फरक पडणार नव्हता.

आणि माझ्या मनात होत तसेच झालं. नर्स इवल्याश्या बाळाला हातात घेऊन बाहेर आल्या आणि अलगद माझ्या हातावर टेकवत म्हणाल्या, “अभिनंदन तुम्हाला मुलगा झाला आहे आणि बाळ आणि आई दोघेही सुखरूप आहे.” हेच तर… हेच ते वाक्य जे एवढ्या वर्षापासून मला ऐकायचे होते. “तुमचं बाळ आणि बाळाची आई सुखरूप आहे.” खरंच याच वाक्यात माझ्यासाठी स्वर्ग सामावलं होतं. एवढा आनंद झाला होता की आकाश ठेंगणं झालं होतं.

मागील चार ते पाच तास मी फक्त उभा होतो पण याची जाणीव, थकवा त्या इवल्याश्या बाळाच्या स्पर्शाने कधी दूर पळून गेला होता हे कळलं सुद्धा नाही. मग काय या बातमीने एवढा जास्त खुश झालो की मोबाईल मध्ये सेव्ह असलेल्या प्रत्येक नंबरवर कॉल करून ही आनंदाची बातमी मी त्यांना देऊ लागलो. कुणा कुणाला आणि किती फोन करू याचे मला भानच राहिले नव्हते. खरंच माझ्या आयुष्यातील आज पर्यतचा सर्वात आनंदाचा दिवस होता. पण हा आनंद फार काळ टिकला नाही. डॉक्टरांनी केबिनमध्ये बोलवून बाळा बद्दल अशी काही गोष्ट सांगितली की पुन्हा एकदा माझा चेहरा पडला.

“अभिनंदन महेंद्र, अखेर आपल्या प्रयत्नांना यश आलं. बाळ आणि आई दोघेही छान आहेत. काही नॉर्मल प्रोसेस आहे मग आज संध्याकाळी किंवा उद्या आपण त्यांना डिस्चार्ज देऊ शकतो. तुम्ही त्यांना घरी घेऊन जाऊ शकता. पण यापुढे एक गोष्ट तुम्हाला चांगली लक्षात ठेवावी लागेल, तुमचे बाळ हे आठव्या महिन्यात म्हणजे एक महिना आधी जन्माला आले आहे त्यामुळे त्याच्या शरीराची वाढ व्यवस्थित झाली नाहीये. तुम्हाला नेहमीच त्याची काळजी घ्यावी लागेल.” डॉक्टर म्हणाल्या.

“हो डॉक्टर ती काळजी आम्ही घेऊच बाकी असे टेंशन घेण्याचे कारण नाही ना?” मी चिंतेच्या स्वरात म्हणालो.

“नाही बाकी असे काहीच नाही सर्व ठीक आहे फक्त बिल्स तेवढे चेक करा आणि भरून घ्या.” असे म्हणत डॉक्टर ने बिल माझ्याकडे सरकावले. बिलाची रक्कम पाहून मी चक्रावून गेलो. दीड लाख बिल झालं होतं. माझ्या खिशात सध्या एवढे पैसे नव्हते. तिच्या घरच्या लोकांकडून काही पैसे घेतले पण तरीही बिलाची रक्कम पूर्ण नव्हती होत.

आम्हाला मुलगा झालं या आनंदात तर मी होतोच पण एवढी रक्कम कुठून जमा करू याची काळजी लागून राहिली होती. रक्कम मोठी असल्याने लगेच कुणाकडे मागितले तर कोण देईल? म्हणून कुणाकडे मागण्यात पण अर्थ नव्हता. मी घरी आलो. वहिनीने सर्वांना ही बातमी आधीच सांगितली होती. प्रत्येकजण दिसेल तो मला बाप झालो म्हणून शुभेच्छा देत होता. त्यांनाही माहीत होत की मी आणि राणीने या दिवसासाठी किती मेहनत घेतली होती.

घरी आलो शांत बसलो. तेवढ्यात आठवले की HDFC बँक व्यतिरिक्त Union बँकेत सुद्धा माझे एक खाते आहे. काही रक्कम त्यात सुद्धा असेल. एक दोन वर्ष मी त्याकडे लक्ष दिले नव्हते. त्या बँकेचा पासबुक शोधण्यासाठी माझी एक जुनी बॅग मालावरून खाली उतरवली. या बॅगेत माझ्या आयुष्यातील जोडलेल्या अशा अनेक गोष्टी आहेत ज्या मी जपून ठेवल्या आहेत. जसं की इयत्ता पहिली पासून ते कॉलेज पर्यंतचे रिझल्ट, हॉल तिकीट, राणीने मला दिलेले गिफ्ट, मित्राकडून मिळालेले गिफ्ट, पाचव्या वाढदिवसाला आईने दिलेला शर्ट अशा असंख्य गोष्टी या पेटीत होत्या.

मी एक एक गोष्ट खाली करून पासबुक चेक करत होतो. अशातच एक गोष्ट मला ओळखीची दिसली, त्यावरील पेपर बाजूला करत मी ती गोष्ट हातात घेतली आणि हसू की रडू हे मलाच कळलं नाही. तुम्हाला हे काय आहे कळलं तर तुम्ही सुद्धा आनंदी व्हाल. ही वस्तू होती मी साखरपुड्याला राणीसाठी केलेली डायमंड रिंग जी मला वाटले माझ्याकडून हरवली आहे. पण ती तर मी इथे ठेवली होती. माझ्या सर्वात जवळच्या वस्तू मी या बॅगेत ठेवतो हे मला तेव्हा शोधताना लक्षातच आलं नाही. मी त्या अंगठी कडे फक्त पाहत राहिलो.

देवाच्या मनात सुद्धा हेच असावे की कठीण काळात ही अंगठी माझ्या अडी अडचणीला येईल म्हणून अशी लपून राहिली. आज ही अंगठी मला पैसे देऊन माझ्या मनावरचा खूप मोठा भार कमी करणार होती. पण मला ही अंगठी अजिबात विकायची नव्हती. कारण भरपूर मेहनतीने राणीसाठी घेतलेली मी ही सर्वात महागडी गोष्ट होती. मी सोनाराकडे जाऊन ती अंगठी गहाण ठेवली. आलेले पैसे घेऊन मी थेट हॉस्पिटल गाठलं.

हॉस्पिटल नातेवाइकांचे येणे जाणे चालू होते. आमच्या बाळासाठी सर्वच खूप जास्त खुश होते. अखेर आम्ही हॉस्पिटलचा सर्व बिल देऊन आमच्या बाळाला राणीच्या घरी आणले. काही दिवस ते दोघे तिकडेच राहणार होती. माझी अजिबात इच्छा नव्हती कारण मला माझे बाळ माझ्या घरी हवे होते. पण म्हणतात ना मुलीचे पहिले बाळंतपण आणि त्यानंतरचे काही दिवस तिच्या माहेरी केलं जाते मग ही जास्त आग्रह धरला नाही.

त्या दिवसापासून आमच्या नवीन आयुष्याला सुरुवात झाली. बाळाच्या येण्याचे जणू आमचे नशीब उजळले. मला जॉबवर प्रमोशन मिळालं, हातात पैसे येऊ लागले, अडलेली बरीच कामे होत गेली अगदी सर्वच खूप छान पणे सुरू झालं. ते म्हणतात ना आयुष्यात खूप काही त्रास सहन केल्यानंतर चांगले दिवस सुद्धा पाहायला मिळतात तसेच काहीसे आमचे झाले. या आधी आम्ही फक्त दुःख आणि दुःखच भोगले होते पण आता आम्ही आमच्या सुखी संसाराचे दिवस अनुभवत होतो.

गहाण ठेवलेली ती डायमंड रिंग सुद्धा सोडवून आणली. राणीच्या हातात ती अंगठी घालताना तिच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून माझ्याही डोळ्यात पाणी आलं. सर्व काही छान सुंदर चालू होतं. पण एवढे छान सुंदर चालेल ते आमचे आयुष्य कसलं? काही ना काही संकटे तर येणार हे आमच्या भविष्यात जणू लिहिलेच होते.

मागील काही दिवस राणीला नीट जेवण जात नव्हतं, काही खाल्ले तरी कशाचीच चव येत नव्हती, ताप, डोकेदुखी, चक्कर हे चालूच होतं. गोळी खाल्ली की गेलेला ताप पुन्हा एक दोन दिवसात हजर असायचा. अचानक तिचे वजन सुद्धा वाढायला लागले. नक्की काय होतेय काहीच कळतं नव्हतं. आमच्या फॅमिली डॉक्टरांनी तिचे संपूर्ण बॉडी चेकप करण्याचा सल्ला दिला. त्यांच्या सांगण्यानुसार आम्ही सर्व चेकप करून घरी आलो. अंगातून तपासणी साठी रक्त काढले म्हणून राणीला अशक्तपणा होताच. म्हणून ती लवकर झोपी गेली. संध्याकाळपर्यंत सर्व रिपोर्ट मिळाले. मी ते सर्व रिपोर्ट आमच्या डॉक्टरांना व्हॉट्सॲप केले. काही मिनिटातच त्यांचा कॉल आला, “महेंद्र मन घट्ट करून हे तुला ऐकावे लागेल आणि याचा तुला खूप त्रास सुद्धा होणार आहे.”

पुढील भाग वाचण्यासाठी इथे क्लिक करा

मी लिहिलेल्या कथा तुम्हाला आवडत असतील तर एक विनवणी आहे. कॉइन्स देऊन तुमचं प्रेम तुम्ही दाखवू शकता. कथेची लिंक तुम्ही तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत शेअर करा. कारण जेवढ्या लोकांपर्यत तुम्ही ही कथा पोहोचवाल तेवढाच पुढे अजून लिहिण्याचा आनंद वाढेल.

लेखक: महेंद्र पाटील (पाटीलजी)

Related Articles

Leave a Comment

error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल