Home कथा मैत्री प्रेम लग्न घटस्फोट भाग २७

मैत्री प्रेम लग्न घटस्फोट भाग २७

by Patiljee
82 views

राणीच्या पोटात दुखतेय हे कळल्यावर मी गाडी वेगाने घराच्या दिशेने फिरवली. नेहमी सावकाश गाडी चालवणारा मी आज मात्र वाऱ्याच्या वेगाने घरी पोहोचलो. तिला आधीच दवाखान्यात घरच्यांनी हलवली होती म्हणून मी लगबगीने हॉस्पिटलकडे वळलो. हॉस्पिटलमध्ये पोहोचताच माझी नजर राणीला शोधत होती. “डॉक्टर डॉक्टर कशी आहे माझी बायको? ठीक आहे ना? तिला काही झालं नाही ना? आणि माझं बाळ ते ठीक आहे ना?” अशा असंख्य प्रश्नांचा भांडार माझ्या तोंडून बाहेर पडतं होता.

कथेचे मागील २६ भाग वाचण्यासाठी इथे क्लिक करा

माझे अश्रू थांबत नव्हते. काय हे नशिबात वाढून ठेवलं आहे काहीच कळतं नव्हतं. डॉक्टरांनी मला शांत केलं आणि एका जागेवर बसवलं. “लवकरच राणी आणि तुमच्या बाळा बद्दल आम्ही तुम्हाला सांगू” असे म्हणत ते आतमध्ये गेले. थोड्या वेळाने बाहेर येताच त्यांनी अशी काही न्यूज दिली की पुन्हा एकदा होत्याच नव्हतं झालं. माझं बाळ यावेळी सुद्धा या जगात येण्या अगोदरच हे जग सोडून गेलं होतं. यावेळी मुलगी होती.

माझे पाय थरथरत होते. त्या इवल्याश्या बाळाला घट्ट मिठी घेतले आणि फक्त तिच्या कडे पाहत बसलो. ना डोळ्यातून अश्रू बाहेर पडत होते ना कुणाचा आवाज कानी पडत होता. फक्त मी आणि माझी लेक जणू मनातल्या मनात एकमेकांशी बोलतोय असा भास होत होता. “बाबा तुम्ही खूप केलेत माझ्यासाठी, खचून जाऊ नका, मम्मीला धीर द्या आता तुम्हाला खंबीर राहण्याची गरज आहे. आपल्या मम्मी साठी, माहीत आहे मला यायला उशीर होतोय पण कदाचित गणपती बाप्पाने अजून काही छान तुमच्या आणि मम्मीच्या आयुष्यात वाढून ठेवलं असेल. त्यामुळे जास्त चिंता न करता मम्मीला सावरा बाकी मी येईलच काही वर्षांनी परत.”

माझ्या लेकीचे कानात ते भाबडे शब्द दुमदुमत असताना अचानक माझ्या भावाने माझ्या कानशिलात लगाउन मला पुन्हा एकदा या दुनियेत परत आणले. आता मात्र माझ्या अश्रूंचा बांध सुटला. “बाप्पा हे तू बरर नाही केलेस. आज सुद्धा संकष्टी आहे आणि पुन्हा एकदा आमच्या आयुष्यात तू तेच वाढून ठेवलेस? यापुढे मी तुझे नाव देखील काढणार नाही.” सर्वांनी मला खूप आधार दिला पण खऱ्या अर्थाने माझ्या राणीला माझ्या आधाराची गरज होती.

मी तिच्या रूममध्ये गेलो तर ती बेशुद्ध होती. आता ती शुद्धीवर आल्यावर मी तिला काय सांगणार होतो? पुन्हा एकदा आपल्या आयुष्यात तेच झाल आहे.. आता पुन्हा कसे उभे राहू आम्ही हे माझे मलाच कळत नव्हतं. पण मी अश्रू पुसले आणि मोठ्या हिमतीने पुन्हा एकदा उभा राहिलो. बरेच महिने गेले राणी यातून बाहेर निघत नव्हती. अबोल शांत आणि मध्येच घाबरून उठून बसणारी अशी तिची सवय झाली होती.

डॉक्टरांनी सांगितले की बिपी मुळे पुन्हा एकदा त्या मुलीला रक्तपुरवठा झाला नाही आणि म्हणून हा प्रसंग निर्माण झाला. पण यावेळी सर्व उपचार चालू होते, डॉक्टरांनी दिलेल्या महागड्या गोळ्या चालू होत्या, नेहमी चेकिंग चालू असायचे आणि तरीसुद्धा पुन्हा एकदा तेच झालं. यावेळी माझ्या कुटुंबानी हॉस्पिटलमध्ये खूप दंगा केला, डॉक्टरांना सुद्धा अनेक प्रश्न केले पण यातून आता काहीच सफल होणार नव्हते. कारण याने माझी लेक परत येणार नव्हती.

मी मोठ्या परिश्रमाने राणीला या सर्वातून बाहेर काढली. आमच्या संसारात मी वगळता ती कुठेतरी हरवून गेली होती. पण मी तिच्या पाठी खंबीरपणे उभा होतो. अनेकांनी सल्ला दिला की सोडून दे तिला… ती तुला मुल नाही देऊ शकत.. दुसरं लग्न कर. पण मी माझ्या विचारावर ठाम होतो. मुलं नाही झाले तरी चालतील पण माझी राणी मला माझ्या आयुष्यात कायम हवी आहे. आता मात्र आम्ही बाळाचा विचार करण्या अगोदरच हॉस्पिटलच्या वाऱ्या सुरू केल्या.

सर्व रिपोर्ट्स आधीच काढून पाहिले पण सर्व ठीक होतं. आठव्या महिन्यात आल्यावर राणीचा रक्तदाब जास्त वाढायचा आणि तेव्हाच बाळाला रक्तपुरवठा होत नव्हता. हे सर्व फक्त एक दोन दिवसात घडायचे की विचार करायला सुद्धा वेळ नव्हता मिळत. पण आता मात्र ते पुन्हा नव्हते करायचे. यावेळी आमची आधीच खूप साऱ्या गोष्टीची दखल घेतली.

दोन वर्ष आम्ही थांबलो आणि मग पुन्हा एकदा सुरू झाला आमचा बाळंतपणाचा प्रवास, खरतर आता याची सवय झाली होती की काही वाटत नव्हतं पण त्या घोष्टीचा शेवट आठवून अंगावर काटा यायचा. यावेळी आम्ही सर्व उपचार पेण शहरात ठेवले. राणीचे माहेर तिथेच असल्याने तिला पाच महिन्यापूर्वीच तिथे नेऊन सोडले. हा काळ आमच्यासाठी खूप कठीण होता पण यावेळी आम्हाला कोणत्याच गोष्टीची रिस्क घ्यायची नव्हती. म्हणून हा दुरावा आम्ही सहन केला आमच्या कुटुंबासाठी.

यावेळी मात्र आठवा महिना उजाडला तेव्हा आधीपासून मनात भीतीची एक वेगळी जागा निर्माण झाली होती. मी घरी होतो आणि राणी माहेरी पण चुकूनही कुणाचा फोन वाजला तरी मनात धडकी भरायची की रानी कडून फोन नसेल ना? पुन्हा काही झालं नसेल ना? कधी कधी याच भीतीने मी फोन सायलेंट करून ठेवायचो. एक मनाचे समाधान बाकी काहीच नाही. पण कदाचित आमच्या नशिबात सुख असे काही नव्हतेच, अचानक माझ्या मेहुण्याचा मला फोन आला. जिजू ताईच्या पोटात खूप दुखतेय तिला आम्ही हॉस्पिटलला आणली आहे.

माझ्या तर पायाखालची जमीनच सरकली. हाथ थरथर काफत होते. कॅलेंडरवर नजर टाकली तर अजून खूप मोठा धक्का बसला. आजही संकष्टी होती. देवा माझ्या नशिबात हे काय चाललेय तुला प्रत्येक वेळी माझेच वाईट करायचे असते का असे स्वतः सोबत पुटपुटत मी मित्राला घेऊन पेण शहर गाठलं. हॉस्पिटलमध्ये पोहोचताच डॉक्टरांनी मला आत बोलावले. “हे बघ महेंद्र आपण जे काही प्रयत्न करत आलोय ते योग्य होते पण पुन्हा एकदा तीच समस्या निर्माण झाली आहे. बाळाला रक्त पुरवठा होत नाहीये. आपल्याला लवकरच काही निर्णय घ्यावा लागेल. सिझर करावी लागेल तीही लवकरात लवकर.. तुम्ही होकार द्या आम्ही सुरू करतो.”

मी क्षणाचा सुद्धा विलंब न करता सिझर साठी होकार दिला. कारण मला एक क्षण सुद्धा वाया घालवायचा नव्हता. डॉक्टर आतमध्ये गेल्या आणि सुरू झाला एक विचित्र प्रवास.. जिथे पुढे काय वाढून ठेवलं आहे हे आम्हा कुणालाच माहीत नव्हतं. डॉक्टरांनी आधीच सांगितले होते की रक्त कमी आहे आपल्याला रक्त लागेल. तुम्ही आणून ठेवा. पेण उरण आणि पनवेल शहरात राणीला लागणारा रक्तगट मिळत नव्हता. शेवटी खोपोली शहरात जाऊन रक्त पिशवी सासरे बुवा घेऊन आले.

मी मात्र त्या रुमच्या बाहेर वाट पाहत बसलो. देवाचा खुप राग मनात होताच पण तरीही त्याला आपोहुन साद जात होती. एक तास झाले दोन तास झाले आतून काहीच उत्तर बाहेर येत नव्हतं किंवा कुणी फिरकत सुद्धा नव्हतं. मी मात्र त्या रूमच्या बाहेर घिरक्या घालत होतो. अखेर चार तास झाले तरी आम्हाला काहीच उत्तर मिळालं नव्हतं. आणि अचानक आतून बाळाच्या रडण्याचा आवाज आला…. आणि त्या क्षणी अलगद एक पापण्या भोवती फिरणारा अश्रू कधी गालावर ओसंबून वाहून गेला कळलं सुद्धा नाही.

पुढील कथा वाचण्यासाठी इथे क्लिक करा

मी लिहिलेल्या कथा तुम्हाला आवडत असतील तर एक विनवणी आहे. कॉइन्स देऊन तुमचं प्रेम तुम्ही दाखवू शकता. कथेची लिंक तुम्ही तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत शेअर करा. कारण जेवढ्या लोकांपर्यत तुम्ही ही कथा पोहोचवाल तेवढाच पुढे अजून लिहिण्याचा आनंद वाढेल.

लेखक: महेंद्र पाटील (पाटीलजी)

Related Articles

Leave a Comment

error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल