सकाळी उठल्यावर अचानक राणीच्या पोटात खूप दुखायला लागलं. एवढं दुःखत होतं की तिला वेदना असह्य होत होत्या. मी खूप काही गोष्टी केल्या पण वेदना काही कमी होण्याचे नाव नव्हते. त्यात हॉस्पिटलला जायचं म्हटलं तर हॉस्पिटल ३५ किमी अंतरावर म्हणून आमच्या गावातल्या गावंड सुईन बाईचे घर मी गाठले. त्या घरात नव्हत्या. त्यांच्या मुलीकडे वस्तीला गेल्या होत्या. तसेच बाइकचा किक मारत मी बाजूच्या गावात त्यांच्या मुलीकडे गेलो. गाडी चालवत असताना मनात खूप विचार येत होते. राणीच्या वेदना डोळ्यासमोर येत होत्या. पुढे काय होईल? कसे होईल? हा विचार करूनच डोकं भांबावून गेला होते. मी त्यांच्या मुलीच्या घरी पोहोचलो. त्या सुईन काकी आताच उठल्या होत्या.
झालेला प्रकार मी त्यांना सांगितला. क्षणाचा ही विलंब न करता त्या माझ्या गाडीवर येऊन बसल्या. त्यांना घरी घेऊन आलो. आई, वहिनी आणि काकी राणीच्या जवळ बसल्या होत्या पण अजूनही तिच्या वेदना चालूच होत्या. सुईन बाई घरात शिरल्या. मला मात्र बाहेरच ठेवलं. मलाही माझ्या राणी सोबत रहायचं होतं. तिच्या वेदनेत थोड का होईना पण सहभागी व्हायचं होतं पण तसं झालं नाही. कारण शहरात हॉस्पिटलमध्ये नवऱ्याला गरोदरपणात डॉक्टर रूममध्ये घेतात पण असे गावा ठिकाणी सर्व स्त्रियाच हे करतात. पुरुषाला जवळपास फिरकू पण देत नाहीत.
या कथेचे मागचे 25 भाग वाचायचे असतील तर इथे क्लिक करा
आतमध्ये काय चालू आहे? माझी राणी ठीक आहे ना? आतमध्ये नक्की काय चालू आहे? का कुणी काही सांगत नाहीये मला? कधी येणार हे सर्व बाहेर? असे असंख्य प्रश्न माझ्या मनात फिरत होते. आता जवळ जवळ अर्धा तास झाला तरी रूमच्या आतून कुणी बाहेर आलं नव्हतं. नक्की आतमध्ये असं काय चाललं आहे काहीच कळायला मार्ग नव्हता. पण स्वतःहून मी आतमध्ये जाऊ शकत नव्हतो.
अचानक दरवाजा उघडण्याचा आवाज कानी आला मी समोर पाहिले तर सुईन बाई माझे बाळ हातात घेऊन येत होत्या. त्याला बघून एवढा आनंदित झालो की या आधी असा आनंद मी कधीच अनुभवला नव्हता. माझं बाळ आता माझ्या हातात येणार आणि हातात घेऊन पहिल्यांदा पाहणार या आशेने मी पुढे सरसावून माझ्या बाळाला हातात घेतलं, अलगद माझे ओठ त्याच्या गालावर ठेवले. त्याची नाजूक बोटं माझ्या हातात घेतली.
पण एक गोष्ट मला जाणवली की एवढं लहान बाळ आणि त्याला सुईन बाईनी असेच उघडेच का आणले आहे? किमान कपड्यात तरी गुंडाळायचे? पण हे सर्व घडत असताना मी एका गोष्टी कडे लक्षच दिले नव्हते की माझं बाळ रडतच नाहीये आणि त्याचे डोळे बंद आहेत. रूम मधून आई आणि काकी रडतच बाहेर आल्या तेव्हा मला कळलं की आमचं बाळ या जगामध्ये येण्या अगोदरच हे जग सोडून निघून गेलं.
त्या इवल्याश्या बाळाला घेऊनच मी जमिवर बसलो. हात थरथरत होते आणि डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते. देवा हे काय केलेस माझ्यासोबत? एवढा वाईट आहे का मी की माझ्या वाट्याला हे असे दुःख दिलेस? यात या निरागस बाळाचा काय दोष? त्याने तर हे जग बघण्या आधीच तू त्याचा जीव घेतलास? एवढा कसा कठोर रे बाप्पा तू? आज संकष्टी आहे आणि तुला मी मनापासून मानतो, तुझी मनोभावे सेवा करतो आणि त्याचे हे फळ तू मला दिले आहेस? असे मी जोरजोरात ओरडत रडत होतो.
माझ्या बाळाच्या त्या नाजुक डोळ्यांकडे पाहत होतो किती सुंदर होत माझं बाळ, मुलगा झाला होता मला पण देवाला हे सुख पाहावले नाही आणि आमच्या नशिबात असा वाईट दिवस वाढून ठेवला होता. देवाचा खुप राग येत होता. या सर्वात मी राणीचा विचार तर केलाच नव्हता. ती बेशुद्ध झाली होती. शुद्धीवर येत नव्हती. गावातले डॉक्टर आले आणि तिला पाहून गेले. तिला शुद्धीवर येण्यासाठी किमान तीन दिवस तरी लागले. तालुक्याच्या हॉस्पिटल मध्ये तिला एडमिट केली होती.
जेव्हा ती शुद्धीवर आली तेव्हा तिला आमच्या बाळाच्या जाण्याची बातमी कळली तेव्हा तिने अवसान टाकले. खूप रडली, जेवण करणे सोडून दिले, कुणाशी बोलणे सोडून दिले, एकटी एकटी राहू लागली आणि काहीच दिवसात याचा परिणाम तिच्या शरीरावर दिसला. नेहमी सुंदर आणि मोहक दिसणारी माझी राणी आता वेगळी दिसू लागली होती. याचे कारण होते की तिने स्वतःकडे पाहणेच सोडून दिले. तब्येत कमी झाली होती आणि तिने जगण्याची उमेद सुद्धा सोडली होती.
तिला पुन्हा एकदा दैनंदिन जीवनात आणायला मला बराच वेळ गेला. या कालावधीत मी खूप खंबीरपणे तिच्या पाठी उभा राहिलो. आमच्या बाळाचे जाणे आमच्यासाठी खूप मोठा धक्का होता पण त्यापेक्षाही माझी बायको मला परत हवी होती. म्हणून मी सर्व दुःख विसरून तिला कसे खुश करता येईल याकडे लक्ष देऊ लागलो. आमचे बाळ का गेलं? अचानक हे असे काय झालं? दोन दिवसांपूर्वी सोनोग्राफी केली होती तेव्हा ठीक होत मग या दोन दिवसात असे काय झालं? असे अनेक प्रश्न डोक्यात होते खरे पण मी त्याकडे दुर्लक्ष करत माझा आणि राणीचा विचार केला. पुढे जाऊन आमचे आयुष्य पुन्हा नॉर्मल कसे होईल याकडे माझा कळ जास्त होता.
झाले गेले विसरून नव्याने आयुष्याला सुरुवात केली. एकदा हे असे झाल्यावर मला आता लवकर बाळाचा विचार करायचा नव्हता पण राणी मात्र हट्टाला पेटली होती. तिला काही करून लवकरात लवकर बाळ हवं होतं. कारण लोक तिला मागून बोलतील असे वाटत होते. म्हणून नाईलाजाने मी या गोष्टीला होकार दिला पण यावेळी मी सर्व ठीक होईल यासाठी प्रयत्न केले. पनवेलमध्ये चांगल्या डॉक्टरचा सल्ला घेतला. झालेला प्रकार त्यांना सांगितला तेव्हा आम्हाला कळलं की पहिल्या बाळंतपणी नक्की काय झालं होतं.
डॉक्टरांनी आम्हाला सांगितले की राणीला रक्त दाबाचा त्रास आहे. तिचा बीपी हाय होतो. आणि अशातच आठव्या महिन्यात अचानक तुमचं बाळ गेलं तेही दोन दिवस अगोदर सोनोग्राफी काढलेली आणि बाळ ठीक असताना देखील. याचे कारण की रक्त दाब वाढल्याने तुमच्या बाळाला रक्त पुरवठा झालाच नाही आणि त्यामुळेच तुमचे बाळ या जगात येण्या अगोदरच देवा घरी गेले. हे ऐकून आम्हाला खूप वाईट वाटलं. खूप रडायला येत होतं की असेही होऊ शकतं आणि आम्ही त्याचा विचार देखील केला नव्हता.
पण यावेळी आम्हाला कळलं होतं आमचं कुठं चुकलं आहे. त्यासाठी आम्ही अगोदरच ट्रीटमेंट सुरू केली. काहीच दिवसात आमच्या घरात पुन्हा एकदा बाळाची चाहूल लागली. यावेळी सर्वात जास्त सुखी माझी राणी होती. तिचे चेहऱ्यावरचे हरवलेले सुख मला पुन्हा एकदा दिसू लागले होते. आणि तिच्या आनंदात मी खुश होतो. यावेळी खूप जास्त खर्च होत होता पण मी खर्चाचा विचार केला नाही. मला काही करून हे बाळ हवं होतं.
यावेळी आम्ही राणीच्या गरोदरपणाची बातमी कुणाला सांगितली नाही. फक्त नातेवाईक आणि मित्रांनाच या गोष्टीची कल्पना होती. गरोदरपणाचा प्रत्येक महिना आम्ही किती काळजी घेऊन पुढे ढकलला हे फक्त आम्हालाच माहीत. अशातच आठ महिने कसे गेलं कळलेच नाही. हा महिना भीतीचे वातावरण घेऊन येतो हे आम्ही मागच्या वेळेस अनुभवले होते आणि यावेळी आम्हाला ती रिस्क घ्यायची नव्हती. आठव्या महिन्यात मी आणि माझ्या घरच्यांनी राणीची अजून जास्त काळजी घ्यायला सुरुवात केली. माझ्या एका मित्राच्या साखरपुड्याला मी गेलो असता माझ्या आईचा मला फोन आला “बाबू पुन्हा एकदा सुनेच्या पोटात तसेच दुःखत आहे जसे मागच्या वेळी दुखत होतं लवकर घरी ये”
पुढील भाग वाचण्यासाठी इथे क्लिक करा
मी लिहिलेल्या कथा तुम्हाला आवडत असतील तर एक विनवणी आहे. कॉइन्स देऊन तुमचं प्रेम तुम्ही दाखवू शकता. कथेची लिंक तुम्ही तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत शेअर करा. कारण जेवढ्या लोकांपर्यत तुम्ही ही कथा पोहोचवाल तेवढाच पुढे अजून लिहिण्याचा आनंद वाढेल.
लेखक: महेंद्र पाटील (पाटीलजी)