Home कथा मैत्री प्रेम लग्न घटस्फोट भाग २५

मैत्री प्रेम लग्न घटस्फोट भाग २५

by Patiljee
133 views

मी राणीला आधी साडी बदलायला सांगितली कारण सकाळपासून ती ही साडी नेसून थकून गेली असणार हे मला माहीत होतं. तिने साडी बदलून एक ब्लॅक कलरचा नाईट गाऊन घातली. गाऊन सिल्की असल्याने तिचे सौंदर्य त्यातून अजून जास्त मोहक वाटतं होते. ती आधीच सुंदर होती आणि हा ब्लॅक कलर तिच्यावर अजून जास्त शोभून दिसत होता.

या कथेचे मागचे २४ भाग वाचायचे असतील तर इथे क्लिक करा

मी आणलेला दुधाचा ग्लास तिच्याकडे सरकावला आणि तिला दूध प्यायला दिले पण एव्हाना ते दूध थंड होऊन आमच्या रूम मधले तापमान वाढले होते. “मग काय राणी साहेब करायची का हनिमूनला सुरुवात” मी लाडात येऊन म्हटलं. ती लाजेने मला धक्का मारत पुढे सरकली पण मी तिचा एक हात पकडला आणि तुला स्वतःकडे ओढून घेतले. तिचे ते सोडलेले केस अजून जास्त मोहक दिसत होते. त्यात तिच्या केसातून येणारा तो सुगंध वास मला अजून जास्त मदहोश करत होता. मी माझ्या ओठांना अलगद तिच्या नाजूक ओठांचा स्पर्श दिला. दोन्ही हात कंबरेवर ठेऊन तिला वर उचलून घेऊन दीर्घ चुंबनाला सुरुवात केली. ती संपून रात्र फक्त आमची होती आणि या रात्रीसाठी आम्ही खूप काळ वाट पाहिली होती आणि अखेर ती रात्र कशी गेली हे आम्हाला देखील कळले नाही.

सकाळ झाली तरी आम्ही एक एकमेकांच्या मिठीत येऊन गप्पाच मारत होतो. राणीने सर्व रूम आवरून किचनचा ताबा मिळवला. सर्वांसाठी तिने नाश्ता केला. पहिल्याच दिवशी सून लवकर उठून घर आपल्या ताब्यात घेते हे पाहून सर्वच खुश होते. आम्ही आमच्या नव्या आयुष्याला सुरुवात केली होती. आता रोज आम्ही सोबत जॉबला जाऊ लागलो. राणी घरातली सर्व कामे आटोपून जॉब सुद्धा करत होती. तिची ती धावपळ मी उघड्या डोळ्याने पहायचो. मी कित्येकवेळा तिला म्हटले “एवढी घरातली कामे करू नकोस तू जॉब करतेस एक वर्किंग वूमन आहेस. घरातले समजून घेतील.”

पण तिचे म्हणणे होते “मलाच घरातली कामे करायला आवडतात म्हणून मी आवडीने करते.” पण म्हणतात ना कधी कधी अशा काही घटना घडतात ज्याची आपण कल्पना देखील करवत नाही. घरात काम करत असताना लादीवरून पाय घसरून ती पडली. पायाला जबर मार बसला होता. डॉक्टरांनी कमीतकमी दोन ते तीन महिने आराम करण्याची सक्त ताकीद दिली.

या काळात मी काही दिवस सुट्टी घेऊन राणी जवळ थांबलो कारण तिला माझी गरज होती हे तिच्या डोळ्यात दिसत होते. पण तीन महिने सुट्टी घेतल्याने राणीचा जॉब गेला. आमच्या संपूर्ण संसाराची धुरा माझ्या एकट्याच्या खांद्यावर येऊन पडली. पण मी सुद्धा ती त्याच ताकदीने उचलून धरली. हवं नको ते सर्व पाहिले.

काहीच महिन्याने राणीने मला सर्वात मोठी बातमी दिली. मी बाप होणार होतो. खरंच माझ्या आयुष्यातील आजवरची ही सर्वात आनंदाची बातमी होती. मी राणीला कळकळून मिठी मारली. आम्ही सर्वच खूप जास्त आनंदात होतो. आमच्या दोघात कुणी तिसरा येणार हे ऐकायला थोडं विचित्र होतं पण सुखद होतं.

मी बाप होणार या आनंदात खरंच मी काय करू आणि काय नको अशी माझी अवस्था झाली. पण तरीही मी थोडा चींतेंत तर होतोच कारण बाळ येणार हा आनंद तर होताच पण आम्ही त्या बाळाला एवढ्या लवकर या जगात आणण्यासाठी तयार आहोत का? त्यांचे संगोपन आम्ही करू शकतो का? तो या जगात आल्यानंतर आम्ही आमची आर्थिक परिस्थिती सांभाळू शकतो का? असे अनेक प्रश्न डोक्यात फिरत होते. कारण ते लहान लेकरू आपल्या आयुष्यात येणार आणि आपल्याला त्याचे संगोपन व्यवस्थित करता येईल का नाही याबाबत प्रत्येकाला थोडी का होईना शंका असतेच. तसेच काहीतरी आमच्या मनात देखील सुरू होते.

पण मी आणि राणीने सहमताने या बाळाला जगात आणण्याचा निर्णय घेतला. पहिल्या महिन्यापासून मी राणीची देखभाल करायला सुरुवात केली. तिचे सर्व डोहाळे पूर्ण करायचा प्रयत्न केला. अर्थात हातात एवढा पैसा शिल्लक नव्हता राहत पण याची कमी मी तिला कधीच भासवू दिली नाही. सर्व जबाबदारी स्वतःवर घेऊन अगदी मोठ्या हिमतीने तिची प्रत्येक इच्छा पूर्ण करत गेलो. या सर्वात माझ्या कुटुंबाची साथ मला होतीच.

बायको गरोदर असली की हॉस्पिटलच्या वाऱ्या सुरू होतात. हे त्यांनाच समजेल त्यांनी हे खूप जवळून अनुभवले आहे. कधी कधी नाहक टेस्ट सुद्धा काही डॉक्टर करायला लावतात आणि मग आपण घाबरून सर्व करून जातो. यात सुद्धा आपला बराच पैसा खर्च होतो पण आपल्याला आपलं बाळ चांगले राहावे हीच इच्छा असते. आम्ही सुद्धा अशा अनेक टेस्ट केल्या पण प्रत्येक टेस्टमध्ये बाळ धष्टपुष्ट आणि सुखरूप होतं.

पहिल्यांदा आम्ही जेव्हा सोनोग्राफी केली आणि आमच्या बाळाचे प्रतिबिंब त्या छोट्याश्या स्क्रीनवर पाहिले तेव्हा आम्हा दोघांच्याही डोळ्यात सोबत अश्रू होते. एकमेकांचा हात घट्ट हातात पकडुन आमच्या आमच्या बाळाला पाहत बसलो. खरंच किती गोड क्षण होता तो. आजही आठवला तरी अलगद चेहऱ्यावर हसू येतं. काही आठवणी असतात ना अशा ज्या कितीही विसरण्याचा प्रयत्न केला तरी आपण विसरू शकतं नाही.

सातव्या महिन्यात राणीचे डोहाळे जेवण करण्याचे त्यांच्या घरच्यांनी सुचवले. ते तिला सातव्याच महिन्यात घरी घेऊन जाणार असे म्हणत होते. आमच्या घरातील सर्वांनी सुद्धा या गोष्टीला मान्यता दिली. पण राणीला मला एकट्याला सोडून जायचे नव्हते. म्हणून तिने या गोष्टीला नकार दिला. पण मी तिला समजावले तिची आई बहीण घरी तिची योग्य काळजी घेइल, आपले बाळ तिथे जास्त सुखरूप राहील. पण तरीही तिने माझे एकमात्र ऐकले नाही. मलाही हेच हवं होतं की आमचे बाळ येत पर्यंत तिने माझ्यासोबतच राहावे. पण माहेरी गेल्याने तिची देखरेख चांगल्या रीतीने होईल हे ही राहून राहून वाटतं होतं.

डोहाळे जेवण मोठ्या थाटामाटात झालं. आम्ही छान फोटोज् काढले. ती सिनेमात किंवा मालिकेत दाखवतात तसे डेकोरेशन मी करून घेतलं होतं. पेढा की जिलेबी निवडण्याची जेव्हा वेळ आली तेव्हा अगदी माझ्या मनासारखेच झालं. जिलेबी समोर आली होती आणि मला आमचं पहिलं अपत्य मुलगीच हवी होती. राणी मात्र टथस्त होती. तिला मुलगा मुलगी काहीही चालणार होतं. तीन चार दिवस राणी तिकडेच तिच्या माहेरी राहिली पण पाचव्या दिवशी ती माझ्या दारात उभी होती. तिला माझ्यासोबतच अजून काही दिवस राहायचे होते. नवव्या महिन्यात मी माझ्या आई कडे निघून जाईन पण आता नाही असा तिने हट्टच केला. मग मी फारवेल तिला विरोध करू शकलो नाही.

सकाळी जॉबवर जाणे आणि संध्याकाळी जेवढ्या लवकर घरी परत येता येईल याचा प्रयत्न मी नेहमी करू लागलो. तिच्या बाळंतपणाचा आठवा महिना उजाडला. दोन दिवस आधी आम्ही सोनोग्राफी काढून आलो होतो. बाळ उत्तमरीत्या हलचाल करत होते म्हणून आम्ही नीच्छिंत होतो. पण आजचा दिवस आमच्यासाठी पुढे काय वाढून ठेवणार होता याची आम्ही कल्पना देखील केली नव्हती.

कथेचा पुढचा भाग इथे क्लिक करून वाचा

मी लिहिलेल्या कथा तुम्हाला आवडत असतील तर एक विनवणी आहे. कॉइन्स देऊन तुमचं प्रेम तुम्ही दाखवू शकता. कथेची लिंक तुम्ही तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत शेअर करा. कारण जेवढ्या लोकांपर्यत तुम्ही ही कथा पोहोचवाल तेवढाच पुढे अजून लिहिण्याचा आनंद वाढेल.

लेखक: महेंद्र पाटील (पाटीलजी)

Related Articles

Leave a Comment

error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल