Home कथा मैत्री प्रेम लग्न घटस्फोट भाग २४

मैत्री प्रेम लग्न घटस्फोट भाग २४

by Patiljee
109 views

मी ती परिस्थिती खरंच हाताळू शकत होतो का? याबाबत थोडी शंका होती. कारण दोन्ही बाजूने मोठी मंडळी बोलत असताना आणि मी त्यांच्यामध्ये बोलणे कितपत योग्य होतं मला माहित नाही पण जर बोललो नसतो तर परिस्थिती आणखी हाताबाहेर गेली असती. मी म्हणालो, “सर्वांनी एक मिनिट माझ्याकडे लक्ष द्या, ऐका.. ऐका.. इकडे पहा. तुमच्या दोन्ही बाजूंचे म्हणणे बरोबर आहे. आमच्या घरातील सर्व मंडळींना असं वाटतं की घरातील हे शेवटचे लग्न आहे मग ते थाटामाटात व्हावे आणि तुमच्या घरातल्यांना वाटते की आधीच तुमचा एवढा खर्च आहे आणि या लग्नाचा गाजावाजा तुम्हाला करायचा नाहीये हे मी समजू शकतो. आपण दोन्ही कुटुंबांनी प्रत्येकाच्या विषयावर अडून राहिलो तर यातून तोडगा निघणे थोडं कठीणच आहे. म्हणून मी काय सांगतोय ते ऐका जर पटले तर आपण तसे करूया नाहीतर दुसरा काही पर्याय शोधू सर्वच माझ्याकडे पाहत होते की मी पुढे काय म्हणणार.

“आम्हाला लग्न थाटामाटात करायचे आहे मान्य आहे पण तुम्हाला तसे नकोय तर तुम्हाला कोर्ट मॅरेज हवंय. तर आपण असे करू शकतो की कोर्ट मॅरेज करूया आपण काहीच हरकत नाही फक्त दुसऱ्या दिवशी एक मोठं रिसेप्शन आमच्याकडे व्हावं म्हणजे आमच्या लोकांना देखील ते बरं वाटेल आणि रिसेप्शन नंतर पूजा देखील आम्ही ठेऊ. याने आमच्या घरात कार्यक्रम सुद्धा होईल आणि सर्व नातेवाईक घरी येऊन आम्हाला आशीर्वाद देतील.” मी म्हणालो.

माझा हा पर्याय सर्वांना आवडला होता पण आत्या अजून कुरकुर करत होती पण तिच्याकडे एवढं कुणी लक्ष दिलं नाही. आजचा दिवस खूप छान गेला. साखरपुड्यात थोडं विघ्न तर आले पण ते क्षणिक होते. बाकी सर्व सुरळीत पार पडले. दहाच दिवसातच लग्नाची तारीख काढण्यात आली. लग्न कोर्ट मॅरेज होत असल्याने जास्त काही करण्याची गरज नव्हती.

कॉलेजपासून सुरू झालेला माझा आणि राणीचा प्रवास एवढ्या लवकर या वळणावर येईल असे वाटले नव्हते. सर्व स्वप्नच वाटतं होतं पण हे खरं होतं. आम्ही दोघं जगातील सर्वात सुखी व्यक्ती आहोत असेच भासत होते. एवढ्या दिवस ते गपचूप भेटणे, कुणालाही न सांगता एकमेकांसाठी वेळ काढणे, रात्री लपून छपून तासनतास फोनवर बोलणे हे सर्व आता बंद होणार होतं. थोडं विचित्र तर वाटतं होतं पण आता आम्ही हक्काने भेटू शकतो, जेव्हा मनात येईल तेव्हा फोनवर बोलू शकतो, ते ही कुणी येईल आणि आम्ही फोन कट करू याची चिंता न ठेवता.

आमच्या दोघांच्याही घरात लग्नाची लगबग सुरु झाली. कोर्ट मॅरेज असले तरी कपडे, दागिने, नव्या संसारासाठी नवनवीन सामान अशी भलीमोठी शॉपिंग होत गेली. यावेळी मात्र आम्ही स्वतःच्या आवडीने लग्नाच्या दिवशी घालणारे कपडे पसंत केले. मला हुंडा नको होता तरी सुद्धा सासुवडीच्या माणसांनी मला सोन्याची चैन केली. मी नाही नाही म्हणत होतो पण त्यांनी माझे यावेळी काही ऐकले नाही. अखेर मी पण जास्त अडून बसलो नाही त्यांनी आनंदाने दिलेली वस्तू स्वीकारली.

अखेर लग्नाचा दिवस उजाडला. आम्ही सर्व कोर्टात पोहोचलो. आमचा पहिलाच नंबर असल्याने सर्वात आमच्या लग्नाचा बार उडाला आणि लग्न संपन्न झालं. अथक परिश्रमाने राणी माझी अर्धागिनी झाली. तिच्या गळ्यात मंगळसूत्र घालताना तिच्या डोळ्यातना येणारे अश्रू मला जाणवले. मी अलगद माझ्या बोटाने तिचे अश्रू पुसले.

लग्न झालं आणि सर्वांचा निरोप घेण्याची वेळ आली. राणीचे अश्रू थांबत नव्हते ती आई वडिलांना मिठीत घेऊन कलकळून रडत होती. ते दृश्य पाहून माझ्याशी डोळ्यात पाणी आलं मी राणीला सावरले आणि गाडीत बसवले. तिची पाठराखण म्हणून बहीण सोबत आली. आम्ही राणीच्या घरच्यांचा निरोप देऊन आमच्या घरची वाट धरली. राणी माझ्या बाजूला बसून अजूनही रडत होती. मी तिचा हात हातात घेतला आणि म्हणालो, “आताच हवं तेवढं रडून घ्या सरकार, यानंतर असे तुला कधीच रडू देणार नाही, शब्द आहे माझा” असे म्हणत मी अलगद माझे ओठ तिच्या ओल्या झालेल्या पापण्यांवर ठेवले.

“अरे माही घरी तर पोहोचू दे तू आताच सुरू झालास” असे गाडी चालवत असलेला प्रफुल मस्करित म्हणाला. त्याचे हे शब्द ऐकताच रडणाऱ्या राणीच्या चेहऱ्यावर हसू आलं. आम्ही घरी पोहोचलो. राणी या आधी सुद्धा माझ्या घरी आली होती पण आता हे घर फक्त माझे नव्हते तर तिचे पण होते. ती तिच्या हक्काच्या घरात आली होती. आमच्या कुटुंबातील सर्वच आमची वाट पाहत होते. त्यांनी आम्हाला उखाणा घेण्यासाठी आग्रह धरला. “जोपर्यत उखाणा घेणार नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला आत सोडणार नाही” असे म्हणत सर्वांनी दरवाजा समोर बस्तान मांडले.

शेवटी राणीने आधी सुरुवात केली. ती लाजत लाजत नाव घेत म्हणाली, “दोन जीवांचे मीलन जणू शतजन्मांच्या गाठी महेंद्र रावांचे नाव घेते तुमच्या आग्रहासाठी”

राणीचे नाव ऐकून सर्व टाळ्या वाजवून ओरडू लागले. दादा आता तुझी वेळ उखाणा घेण्याची असे म्हणत सर्व माझ्याकडे पाहू लागले. मग मी सुद्धा म्हटले, “मेथीत भाजी मेथीची राणी माझ्या प्रितीची” माझा उखाणा ऐकून सर्व हसायला लागले. “नाही हा नाही हा टिपिकल उखाणा नाही चालणार दुसरा हवा आहे आम्हाला नाहीतर बस रात्रभर इथेच आम्ही तुला आतमध्ये सोडणार नाही फक्त वहिनीला सोडून देऊ.”

ही पण कथा वाचा सिनेमागृहात भेटलेली ती

आता माझ्याकडे दुसरा काही पर्याय नव्हता. तसे पाहायला गेलो तर खूप उखाणे मी पाठांतर करून ठेवले होते पण अशावेळी एक सुद्धा आठवत नाही. काहीतरी आठवून मी म्हणालो, “मनी माझ्या आहे सुखी संसाराची आस, राणी तू फक्त आता आयुष्भर गोड हास.”

माझा उखाणा एवढा काही जास्त कुणाला आवडला नाही पण तरीही मीच म्हटले वाजवा रे टाळ्या.. तेव्हा सर्वांनी टाळ्या वाजवायला सुरुवात केली. बऱ्याच वेळाने आम्हाला आतमध्ये सोडले. तिथे असलेल्या सर्व नातेवाईकांना पाहून राणी सर्वांच्या एक एक कडून पाया पडू लागली. एवढ्यात माझी काकी म्हणाली, “राणी नको पाया पडूस आमच्या कुणाच्या, तू ही सकाळपासून खूप थकली आहेस, आता जरा आराम कर. पाया पडायला आता संपूर्ण आयुष्य पडले आहे” राणीने हे ऐकताच अलगद तिच्या डोळ्यातून अश्रू बाहेर पडले. किती फरक होता तिच्या आधीच्या लग्नात आणि आताच्या लग्नात? तेव्हा तिला संपूर्ण रात्रभर प्रत्येक नातेवाईकांच्या पाया पडायला लागले होते आणि आता इथे तिला समजून घेत होते ती तिचा भूतकाळ आठवून अवस्थ तर झाली पण माझ्या कुटुंबातील सदस्यांनी तिला एकटं पडू दिलं नाही.

आज माझ्यापेक्षा राणी जास्त सुखी दिसत होती आणि तिला असे आनंदात पाहून मी खूप जास्त सुखावलो. पाहुणे एक एक करून आपापल्या घरी जात होते. तसे पाहायला गेलात तर आपल्या मराठी कुटुंबात कधी हनिमून पहिल्याच दिवशी होत नाही. याचे कारण एकतर अवतीभवती खूप पाहुणे असतात मग तो हवा तसा एकांत मिळत नाही. पण आम्हाला तो एकांत मिळाला होता.

माझ्या सर्व मित्र मैत्रिणींनी मिळून आमची रूम सजवली होती. मी रूमच्या आत शिरलो राणी बेडवर बसली होती. मी तिच्या जवळ गेलो.

कथेचा पुढचा भाग इथे क्लिक करून वाचा

मी लिहिलेल्या कथा तुम्हाला आवडत असतील तर एक विनवणी आहे. कॉइन्स देऊन तुमचं प्रेम तुम्ही दाखवू शकता. कथेची लिंक तुम्ही तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत शेअर करा. कारण जेवढ्या लोकांपर्यत तुम्ही ही कथा पोहोचवाल तेवढाच पुढे अजून लिहिण्याचा आनंद वाढेल.

लेखक: महेंद्र पाटील (पाटीलजी)

Related Articles

Leave a Comment

error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल