समोर बसलेली ती एवढी माणसे पाहून मन सैरभैर झालो. कारण मी कुणालाच ओळखत नव्हतो आणि फक्त राणीला ओळखतो होतो ती तर कुठे दिसत सुद्धा नव्हती. राणीच्या वडिलांनी मला बसायचा आग्रह केला. आता तुम्ही म्हणाल की मला कसे माहीत तेच राणीचे वडील तर मी त्यांचे फोटो तिच्या मोबाईलमध्ये पाहिले होते.
मी समोरच्या सोफ्यावर जाऊन बसलो तर त्या माणसांचे २४ डोळे फक्त माझ्याकडेच पाहत होते. ते सर्वच मला निरखून पाहत आहेत, माझ्याकडे एकटक बघत आहेत तर माझ्या तोंडातून काय शब्द फुटणार? खूप तयारी करून आलो होतो,आज मी हे बोलेन,असे समजावेन, सर्वांना व्यवस्थित बोलून आपलेसे करेन पण कसले काय हो हे फक्त सिनेमात होतं. खऱ्या आयुष्यात काय फजिती होते हे फक्त मलाच माहीत.
माझ्या समोरच्या टेबलवर चहा, कांदेपोहे, शीरा, जिलेबी आणि दोन तीन प्रकारची बिस्किटे ठेवलली होती. पण माझी काय बिशाद की माझा हात तिकडे जाईल, मी गप्पच बसून होतो. एवढ्यात मी पाहिले की राणी दरवाजाच्या मागे लपून माझी मज्जा बघतेय, मनातल्या मनातच मी म्हटलं, वाह लडकी, मजे ले रही है तू, देखता हुं बाद में तुझे.”
त्यांच्या काकीने विषय काढला, “तुम्हाला तर माहीत आहे आमच्या राणीचे आधी कसे झालेय, आम्हाला पुन्हा तेच करायचे नाही आहे म्हणून आज आम्ही इथे सर्व जमलोय, तुम्ही घाबरु नका किंवा काळजी करू नका इथे जमणारा प्रत्येक माणूस फक्त राणीसाठी आला आहे.”
या काकी मला थोड्या समंजस वाटल्या, त्यांच्या बोलण्याने माझा भार थोडा हलका होणार एवढ्यात आत्या म्हणाली, “पण मुलगी बघायला तुम्ही एकटे का आले? एकट्याने पाहतात का कोण मुली? एक दोन घरची माणसे तरी सोबत आणायची.”
पण आता मात्र मला घाबरून चालणार नव्हतं, मी दीर्घ श्वास घेतला आणि म्हणालो, “खरतर माफ करा त्यासाठी की मी एकटा आलो. पण मला आधी तुम्हा सर्वांना विश्वासात घ्यायचे होते, मी राणीसाठी कसा योग्य आहे हे सांगायचे होते. जेव्हा आपले व्यवस्थित बोलणं होईल तेव्हा मी माझ्या कुटुंबाला घेऊन तुमच्या घरी येणारच आहे. तसे मी घरी सांगून सुद्धा आलोय”
मामा म्हणाले, “घरी कोण कोण असते तुमच्या?”
“मी, आई, एक मोठा भाऊ त्याची बायको आणि एक मुलगा आहे त्यांना. बस एवढेच.” मी म्हणालो.
परत ते म्हणाले, “आणि वडील?”
*वडील मी लहान असतानाच वारले.” मी म्हणालो.
तिचे काका म्हणाले, “तुम्हाला तर माहितीच आहे की राणीचे आधी लग्न झालं होतं आणि घटस्फोट सुद्धा झाला आहे, राणी ने तसे सांगितले असेलच तुम्हाला. हे तुम्हाला मान्य आहे ना? कोणताही दबाव किंवा दडपण नाही ना? कारण आता आमच्या मुलीला आम्हाला पुन्हा एकदा त्याच त्रासात नाही पाठवायचे.’
“हो मला माहीत आहे तिचं लग्न झालं आहे आणि मला काहीच हरकत नाही याबद्दल मला फक्त राणी हवी आहे.” मी म्हटलं.
“पण तिचे लग्न झाले आहे हे तुमच्या घरी माहीत आहे का?” आत्या म्हणाली.
“हो मी माझ्या घरी सर्वांना सांगितले आहे आणि सर्वांना याबद्दल काहीच हरकत नाही आहे. त्यांना माझे सुख महत्त्वाचे आहे.” मी म्हणालो.
“पण तुमची जात आगरी आहे आणि आमची वेगळी, दोन्ही समजाच्या पद्धती वेगळ्या, विचारधारा वेगळ्या, काही कमी जास्त झाले तर समजून घ्याल ना?” राणीची आई म्हणाली.
‘अहो आई, म्हणजे माफ करा हा तुम्हाला आईच म्हणतोय पण जात धर्म हे फक्त कागदोपत्री असतं आपण माणूस म्हणून कसे आहोत हे महत्त्वाचे आहे आणि तसेही आमच्या आगरी समाजात सर्व धर्मांना समान वागणूक देण्याची शिकवण दिली जाते त्यामुळे आम्हाला जातीचा काहीच विषय नाही. राहिला प्रश्न पद्धतींचा तर काही गोष्टी आम्ही समजून घेऊ काही तुम्ही घ्या. सर्व काही सुरळीत होईल नका काळजी करू.” मी म्हटलं.
तसे मला सर्व समंजस म्हणतात पण मला कधी याबद्दल काही वाटले नाही पण आज प्रत्येकाशी बोलताना वाटतं होतं की किती समजवून सांगतोय मी सर्वांना पण योग्य बोलतोय ना? की काहीही बरलतोय. पण राणीने आतून चांगले सुरू आहे असे म्हणत इशारा केला.
“आमच्या मुलीचे लग्न झालंय आधी आणि तरी तुम्ही तिच्याशी लग्न करायला तयार झालात ही खूप मोठी गोष्ट आहे. खरंच आम्ही तुमचे काय पाण्याने धुवून ते पाणी प्यायलो पाहिजे.” तिचे वडील म्हणाले.
“नाही वो बाबा असे काय म्हणता, मी काहीही जगावेगळं नाही करत. मला राणी आवडते आणि मला माहित आहे माझे तिच्याशी लग्न झालं तर मी आयुष्भर सुखी असेल कारण तुमची मुलगी एवढी गोड आहे की ती ज्याच्याही घरी जाईल त्या घराचे सोनं करेल. म्हणून मला तिला माझ्याच घरी न्यायचं आहे ते ही तुम्हा सर्वांच्या परवानगीने.” मी म्हटलं.
मी असे म्हणताच सर्व राणीकडे पाहू लागले. ईशाऱ्याने सर्व तिला सांगत होते की मुलगा चांगला आहे ,योग्य निवड आहे, समजूतदार आहे. कुठे भेटला तुला हा हिरा वैगेरे वैगेरे.
“आमच्या समाजात हुंडा देण्याची पद्धत आहे. तुमच्या मनात काही असेल तर सांगा आम्ही जमेल तसे करू.” काका म्हणाले.
मी थोडा गालाताच हसलो आणि म्हणालो, “खरं सांगायचे तर मला हुंडा हवा आहे आणि हुंड्यामध्ये मला फक्त आणि फक्त तुमची मुलगी आणि तुमची सर्वांची आमच्या लग्नासाठी परवानगी हवी आहे. आमच्या आगरी समाजात आम्ही कधीही हुंडा घेत नाही आणि हुंडा देत नाही. सून म्हणून आलेली मुलगी आमच्याच घरातली लेक होऊन जाते. त्यामुळे हुंडा हा विषयच नकोय आपल्यात.” मी म्हणालो.
माझे एवढे बोलताच त्यांच्या त्यांच्यात कुजबुज सुरु झाली आणि त्यांचे मामा म्हणाले, “आमचा तसाही लग्नाला होकार आहे कारण आम्ही शोधून पण सापडणार नाही असा मुलगा आमच्या मुलीने शोधला आहे त्यामुळे आम्ही खुश आहोत. फक्त आधीच्या लग्नात आमचा खूप खर्च झाला होता त्यामुळे हे लग्न आम्हाला साध्या पद्धतीने करायचे आहे.”
“हो मला काहीच हरकत नाही फक्त या विषयावर कसे आणि काय करू शकतो ते बोलायला माझे घरचे आणि मी येईलच तेव्हा आपण सविस्तर बोलू.” मी म्हणालो.
सर्वांना माझी गोष्ट पटली आणि प्रत्येकजण मला खाण्यासाठी आग्रह धरू लागला कारण मागील अर्धा तास मी फक्त प्रश्नांची उत्तरे आणि माझी बाजू मांडत होता. समोर वाढून ठेवलेल्या पदार्थांपैकी एकालाही मी हात लावला नव्हता. एवढ्यात आत्या म्हणाली, मुलगा लहान नाही का वाटतं तुम्हाला राणी पेक्षा? त्यांच्या या प्रश्नाने मी अर्धवट तोंडात टाकलेली जिलेबी खाली ठेवत म्हणालो, “हो मी आहे लहान तिच्यापेक्षा, पाच वर्षांनी लहान आहे आणि मला या गोष्टीने सुद्धा काहीच हरकत नाहीये. माझे आणि राणीचे याबद्दल बोलणे झालं आहे. आम्हाला फक्त एकमेकांसाठी आम्हीच जोडीदार म्हणून हवे आहोत.” मी म्हणालो.
“पण हे वयाचे अंतर घरी माहीत आहे का?” आत्या म्हणाली.
पुढचा भाग वाचण्यासाठी इथे क्लिक करा
लेखक: महेंद्र पाटील (पाटीलजी)