Home कथा मैत्री प्रेम लग्न घटस्फोट भाग २०

मैत्री प्रेम लग्न घटस्फोट भाग २०

by Patiljee
198 views

आज पहिल्यांदा राणी माझे घर पाहणार होती. तसे पाहायला गेलात तर आमचे घर जुनं होतं पण सुंदर होतं. तिला सोबत घरी आणायचे म्हणजे घरातले, शेजारी पाजारी माझ्याकडे पाहत बसणार यात काही शंका नव्हती. कारण मी कधीच माझ्या अशा कोणत्याच मैत्रिणीला घरी आणले नव्हते. राणीला घेऊन येणार म्हणजे नक्कीच ती कुणी स्पेशल असेल असे ते विचार करतील याचा अंदाज होता मला.

राणीला घेऊन घरात शिरलो तर घरी आई मोठा दादा वहिनी होत्या. मी वहिनींना इशाऱ्यानी समजावले की हीच ती राणी जीच्याबद्दल तुम्हाला सांगितले होते. वहिनीनी परिस्थिती सावरून घेतली. आई समोर गेलो आणि तिला म्हटलं, “ही बघ तुझी होणारी सूनबाई” राणी लाजली आणि मान खाली घातली पण आईला खूप दिवसापासून राणीला भेटायचे होते. तिला पाहताच तिने तिच्या दोन्ही गालाना आपल्या हातात घेतले आणि आशीर्वाद दिला. आता राणीला सुद्धा कळलं होतं की आईला आमच्या नात्याला होकार आहे. तिने आईला नमस्कार केला. मी इशाऱ्यानेच राणीला संस्कारी मुलगी अशी उपमा दिली. तेव्हा ती लाजली आणि वहिनी सोबत किचनमध्ये शिरली.

राणी एकटीच किचनमध्ये आहे हे पाहून मी अलगद किचन मध्ये शिरलो. ती माझ्यासमोर पाठमोरी उभी होती. तिचे ते लांबसडक केस मला तिच्याकडे आकर्षित करत होते. मी जाऊन तिला पाठीमागून मिठी मारली. नाकातून गरम श्वास तिच्या पाठीवर सोडला आणि नाकानेच तिचे केस बाजूला केले. माझ्या दोन्ही ओठांना तिच्या पाठीवर ठेवले. आता मात्र ती कावरी बावरी झाली. “सोड ना कुणी येईल, काहीही काय तुझे” असे म्हणत तिने मला लांब केलं. पण मी तिचा हात पकडुन पुन्हा एकदा तिला स्वतःकडे ओढले आणि म्हटले, “पुढील दहा मिनिटे इथे कुणीच येणार नाही, तशी बाहेर ताकीद देऊन आलोय त्यामुळे तू काहीच चिंता करू नकोस, तुझी थोडी नशा मला चढू दे.

“तू ना खरंच बावळट आहेस. गप जाऊन बाहेर बस” ती म्हणाली. पण मी काही तिला मिठीतुन सोडायला तयार नव्हतो. पण कसे कुणास ठाऊक वहिनी अचानक किचनमध्ये आल्या. आम्हाला त्या अवस्थेत पाहून त्याही लाजल्या, “सॉरी सॉरी मी काही नाही पाहिले, चालुद्या तुमचे” म्हणत त्या किचन बाहेर गेल्या. राणी ने मला धक्का दिला आणि ती पण वहिनी पाठोपाठ बाहेर गेली. हे असे सर्व संसारात होतं ना? बायको छान किचनमध्ये जेवण बनवत असते आणि नवरा येऊन रोमान्स करतो. मला हे सर्व लवकरात लवकर अनुभवायचे होते. लग्न करून राणीला पाटलीन बाई करायचं होतं.

काही वेळात दोघी जावांनी मिळून साजूक तुपाचा शीरा बनवला. त्या वेळेपासून राणीला हे अजिबात वाटलं नव्हतं की ती माझ्या घरी पहिल्यांदा आलीय. ती या घरचीच आहे अशी वावरत होती आणि माझ्या घरातले तिला सुनबाई सारखे मान देत होते. आजचा दिवस राणीसाठी खूप स्पेशल होता कारण तिला हक्काचे असे मोठं कुटुंब मिळालं होतं. आता फक्त राणीच्या घरच्यांचा होकार बाकी होता.

काहीच दिवसात आमच्या कॉलेजचा निकाल जाहीर झाला आणि सर्व अचंबित झाले. नेहमी पहिला येणारा मी यावेळी मात्र हरलो होतो. मला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. पण मला वाईट वाटले नाही, दुःख तर अजिबात वाटलं नाही कारण पहिला क्रमांक राणीने पटकावला होता. आयुष्यात पहिल्यांदा मी माझा पहिला नंबर गमावला होता आणि तो सुद्धा अशा व्यक्तीकडून जी माझ्या आयुष्याची अर्धांगिनी होणार आहे.

आमच्या कॉलेजच्या व्हॉट्सॲप ग्रूपवर सर्वांचे शुभेच्छा मेसेज येत होते. मॅडमने सुद्धा आम्हा दोघांना शुभेच्छा दिल्या. कारण आम्ही आमच्याच कॉलेजचा विक्रम मोडीत काढला होता. आजवर कॉलेज मध्ये ८८ टक्क्याच्या वर कुणाला मिळाले नव्हते पण यावेळी मला ९१ टक्के तर राणीला ९४ टक्के मिळाले. त्यामुळे सर्वच स्तरावरून आमचे कौतुक होत होतं.

पुढील काही महिन्यांत आम्ही जॉबवर रूजू झालो. दोघेही आपल्या कामात एवढे बुडून गेलो की आम्हाला एकमेकांसाठी वेळच मिळत नव्हता. अखेर एक दिवस राणीने माझ्याजवळ ही खंत व्यक्त केली. त्यात राणीला लग्नासाठी मागणी सुरू होत्या. एकतर तिचे आधीचे लग्न होऊन घटस्फोट झाला होता त्यात तिचे वय सुद्धा वाढत होते. म्हणून तिचे घरचे लग्नासाठी मागे लागले. कॉलवर बोलता बोलता ती सहज बोलून गेली.

“महेंद्र मला तुला त्रास नाही द्यायचा आणि एवढ्या लवकर कोणत्याच बंधनात नाही ओढून घ्यायचे पण घरचे मला लग्नासाठी खूप पाठी लागले आहेत. प्रत्येक आठवड्याला एकतरी मुलगा पाहून जातो. मी तरी कितीवेळा वेगवेगळी कारणे देऊन नकार देऊ. आपण कधी लग्नाचा विचार करायचा तू मला तसे सांग मग मी माझ्या घरात बोलून घेईल.”

महेंद्रने दीर्घ श्वास घेतला आणि म्हटले, “खरतर यात विचार काय करायचे? लग्न तर आपल्याला करायचेच आहे ते नंतर केलं काय आणि आता केलं काय सारखेच आहे. तू आताच माझ्या सोबत राहिलीस तर ते मला सर्वात जास्त आवडेल कारण जे काही आपण करू ते सर्व सोबत करू. मग का थांबायचे आपण लग्नासाठी? तसेही माझ्या घरातले तयार आहेत लग्नासाठी मग अधिकचा हा विलंब कशाला? उद्या रविवार आहे मग उद्याच येतो तुझ्या घरी, सांगून ठेव घरात आणि आधी मी एकटाच येतो आणि त्यांना सर्व गोष्टी समजावून सांगतो कारण आपल्या नात्याबद्दल जेव्हा त्यांना कळेल तेव्हा लगेच ते होकार नाही देणार, एकतर आपल्यात वयाचे अंतर आणि तुझे आधीचे लग्न. मीच येऊन त्यांना व्यवस्थित समजावतो.”

माझे एवढे बोलणे ऐकून राणी खूप जास्त आनंदित झाली. कदाचित तिलाही माझ्या तोंडून हेच ऐकायचे होते पण कधी स्वतः हून बोलता आले नाही. महेंद्र एवढा समजूतदारपणे बोलतोय की असं वाटतंय तो सर्व व्यवस्थित करेल.

खरं सांगायचं झालं तर मी हे राणीला बोलून गेलो खरं पण मनावर एक दडपण आलं होतं. कसे होईल? त्यांच्या घरच्यांना मी आवडेल का? मी गरीब किंवा श्रीमंत हा मुद्दा तर नाही उठणार ना? आमच्यामध्ये असलेले वयाचे अंतर समस्या नाही ना बनणार? ते माझ्याशी व्यवस्थित बोलतील का भांडतील? असे असंख्य प्रश्न माझ्या डोक्यात फिरत होते.

माझी शरीरयष्टी सडपातळ असल्याने तिच्या घरच्यांना मुलगा थोडातरी धाकड दिसावा म्हणून मी दोन टीशर्ट आणि वर शर्ट परिधान केला होता. हे थोड विचित्र होतं पण First Impression Is Last Impression म्हणून मला ही संधी गमवायची नव्हती. मी बस पकडली आणि पेण शहर गाठलं. बसस्टॉप वर मला राणीची बहीण घ्यायला आली होती. एक प्रकारे ती माझी मेहुणी होती पण पहिल्याच भेटीत थोडी खडूस वाटली. “चला माझ्यासोबत” एवढेच म्हणाली आणि पुढे पुढे चालू लागली, ना हाय.. ना हॅलो.. डायरेक्ट मुद्द्याची गोष्ट. वाह हे भारी होतं. या मोरे कुटुंबातील मुलीच अशाच, जोपर्यत ओळख होत नाही तोपर्यंत अशाच भाव खातात.

तिच्या घरी पोहोचताच हृदयाचे ठोके ट्रेनच्या इंजिन सारखे वाढू लागले. आता खूप जास्त भीती वाटतं होती. त्यात मी एकटाच मला कुणी सावरणारे पण नव्हतं. पण मी स्वतःला शांत ठेवलं आणि घरात प्रवेश केला तर माझे शांत मन अजून जास्त घाबरले. कारण तिथे एक दोन नव्हे तर बारा माणसे बसली होती. तिचे आई बाबा, काका काकी, त्यांची मुलं, मामा मामी त्यांची मुलं, आजी, शेजारी पाजारी. असा भलामोठा समूह माझी इंटरव्ह्यू घ्यायला बसला होता त्या सर्वांना पाहून माझी बोलतीच बंद झाली.

पुढचा भाग वाचण्यासाठी इथे क्लिक करा

लेखक: महेंद्र पाटील (पाटीलजी)

Related Articles

Leave a Comment

error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल