Home कथा मैत्री प्रेम लग्न घटस्फोट भाग १९

मैत्री प्रेम लग्न घटस्फोट भाग १९

by Patiljee
311 views
Featured Image Credit Anushree Mane

राणीबद्दल रोहनला कळलं नाही ऐकून थोडा आनंदित झालो, “अरे येड्या असे काही नाही रे बाबा, स्मिताबद्दल माझ्या मनात काहीच नाहीये. तुझा मार्ग मोकळा आहे तू बिनधास्त तिच्यावर जीव ओवाळून टाक.”

“नक्की ना महेंद्र? मस्ती नाही ना करत माझी?”

“नाही रे रोहन खरंच, मला स्मिता नाही आवडत.”

“मग कोण आवडते?”

“आहे एक?”

“आपल्या वर्गात आहे?”

“हो.’

“क्या बात है, नाव सांग ना”

“सांगेन वेळ आला की, नाव काय तुला भेटवेन सुद्धा पण आता लगेच नको.”

“मला आताच ऐकायचे आहे.”

“नाही रे बाबा थोडा धीर सांगेन तुलापण आणि सर्वांना पण.”

“सर्वांना सांगशील तेव्हा सांगशील पण मला आधी सांग.”

त्याला मी काही सांगणार एव्हढ्यात मुलींच्या ग्रुपमध्ये कसलीतरी कुजबुज सुरु झाली. काय झालं काही कळत नव्हते. स्मिता काहीतरी सांगत होती. राणी अचानक पणे जागेवरून उठली आणि रडत रडत बाहेर गेली. मी तिच्या पाठी जाणार एवढ्यात सर्व मुली माझ्याकडे पाहू लागल्या. मला कळून चुकलं होतं की स्मिताने आमच्या बद्दल सर्व मुलींना सांगितले आहे. काही मुली लांबूनच मला अभिनंदन करत होत्या तर काही नाराज होत्या.

हळूहळू ही बातमी संपूर्ण वर्गात पसरली. वर्गात आमच्या प्रेम कहाणीचा हॉट टॉपिक सुरू झाला. प्रत्येकाच्या मुखात फक्त आमचेच नाव होतं. रोहनला ही गोष्ट कळली तेव्हा त्याने माझ्याशी बोलणे बंद केलं. काही मुलींचे पण हेच होतं. आम्ही एकत्र बसून तासनतास गप्पा मारण्याचे कोडं सर्वांना उलगडले होते. अशी तशी करून ही बातमी आमच्या मॅडम पर्यत पोहोचली. त्यांनी मला क्लासरूम मध्ये बोलावले. मी काही बोलणार एवढ्याच त्यानेच बोलायला सुरुवात केली.

“महेंद्र दहावीला किती टक्के होते तुला?”

“७२% मॅडम.”

“आणि बारावीला?”

“८६% मॅडम.”

“मग आता आपले पेपर झाले त्यात एवढे कमी मार्क्स का? किती वेळा पहिला नंबर काढला आहेस आतापर्यंत?”

“पहिली पासून ते बारावी पर्यंत पहिलाच नंबर आला आहे.”

“हो ना! हे कळतेय ना? मग आता का मागे आहेस. प्रगती पाहिली आहेस का तुझी? पाच मुले तुझ्यापेक्षा पुढे आहेत वर्गात. चालेल का तुला हे?”

“सॉरी मॅडम.”

“सॉरी नकोय मला तुझा, रिझल्ट हवा आहे. एवढा हुशार तू आणि हे कशात अडकला आहेस. प्रेम करायला संपूर्ण आयुष्य बाकी आहे. हे वर्ष परत हातात मिळणार नाही. चांगला अभ्यास कर आणि काही दिवस तरी या प्रेमापासून लांब रहा. मी हे नाही म्हणत की प्रेम करणे चुकीचे आहे किंवा करू नकोस. फक्त थोडा स्वतःसाठी वेळ काढ. बाकी सर्व तुझ्या हातात आहे. दोन महिन्यांनी फायनल परीक्षा आहेत. बाकी मी तुझ्यावर सोडतेय. जा आता.”

मॅडमने चांगलाच बाळकडू मला पाजला होता. प्रेमाच्या नादात मी खरंच हे विसरून गेलो होतो की मी इथे प्रवेश नक्की का घेतला होता आणि पुढे जाऊन मला काय करायचे आहे? मनाशी काही निश्चय केला वर्गात आलो. सर्व माझ्याकडेच पाहत होते. राणीला इशाऱ्याने सांगितलें की सर्व ओके आहे.
जाऊन रोहन जवळ बसलो. तो आधीच माझ्यावर चिडला होता.

“सॉरी रोहन, तुला सांगणार होतो पण भीती वाटतं होती.”

“तू गप्पच बस महेंद्र सांगणार होतो म्हणे, कधी सांगणार होतास सर्वांना कळल्यावर, मला बेस्ट फ्रेंड म्हणतोस, राणीच्या पण येता जाता मी सोबत असतो आणि तरीही दोघांनी ही गोष्ट माझ्यापासून लपवली हे नाही आवडलं मला.”

“अरे हो तुझे रागावणे मी समजू शकतो हक्क आहे तुझा. पण तुला यासाठी सांगितले नाही कारण आम्हाला वाटले जर तुला कळले तर तू वेगळा अर्थ काढशील. आपण तिघेही चांगले मित्र होतो मग हे प्रेम आम्ही कुठून मध्येच आणले. तुला आमचा राग येईल म्हणून लपवलं. बाकी असे तुझ्यापासून लपवायचा काहीच उद्देश नव्हता.”

“अरे एकदा बोलून तर बघायचं ना रे, मी मित्रच आहे तुमचा दुश्मन नाही की समजून घेतलं नसतं. चल असुदे I’m Happy For Both of you. खूप छान दिसता तुम्ही एकत्र. तसेही स्मितासाठी आता माझा मार्ग मोकळा झाला.” असे म्हणत त्याने मला टाळी दिली आणि आम्ही जोरजोरात हसू लागलो..

आजच्या दिवसात खूप काही घडलं होतं. घरी आलो फ्रेश झालो आणि राणीला कॉल केला.

“राणीसाहेब आधी तुमचे अभिनंदन तुम्ही डान्स स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकावला. ही पण कला येते वाटते तुम्हास नी. आम्हाला पण दाखवा कधीतरी.”

“ते सर्व सोड मॅडम काय म्हणाल्या ते सांग आधी मला.”

“अरे हा गे सांगायचे राहून गेलं ना. काही विशेष असे नाही ग.”

“विशेष असे नाही कसे म्हणतोस, आज काय काय झाले वर्गात तुला माहित आहे. त्याच विषयावरून मॅडम तुला बोलल्या असतील. मला सविस्तर सांग पाहू काय काय झालं?”

“अग तेच आपले प्रेम प्रकरण मॅडम पर्यंत गेलं. या प्रेमामुळे अभ्यासाकडे माझे कसे दुर्लक्ष होतेय, काय भवितव्य आहे माझे असे काही ना काही ऐकवत होत्या.”

“वाटलेच मला असे काही असेल आणि कुठे चुकीचे म्हणतात त्या. वेळ मिळेल तेव्हा तर तू माझ्याशी बोलत असतोस. हल्ली अभ्यासासाठी तुझ्याकडे वेळच नसतो. खूप झालं आता. आपण खूप कमी बोलायचं आणि तसेही एकदोन महिन्यात परीक्षा आहेत, कॉलेजमध्ये प्लेसमेंट येणार आहेत. त्याकडे लक्ष देऊया. हे आपल्यासाठी आणि येणाऱ्या भविष्यासाठी चांगलं आहे.”

मी नाही नाही म्हणत होतो पण राणी तिच्या निर्णयावर ठाम होती. त्या दिवसापासून आम्ही कमी बोलू लागलो. अभ्यासाकडे पूर्ण लक्ष केंद्रित केलं. कॉलेजमध्ये गेलो तरी आम्ही जास्त बोलत नव्हतो. सर्वांना वाटतं होतं आमचं काही बिनसले आहे पण आम्ही हे सर्व ठरवून करत होतो. दोघांनीही अभ्यासाकडे पूर्णतः लक्ष केंद्रित केलं होतं.

कॉलेजमध्ये प्लेसमेंट आल्या आणि इथे आमची निराशा झाली. वाईट या गोष्टीचे नव्हते वाटले की आमची निवड नव्हती झाली. आम्ही दोघेही निवडलो गेलो होतो पण वेगवेगळ्या कंपनी मध्ये. मला भारत इलेक्ट्रॉनिक तळोजा कंपनी मिळाली होती तर तिला इस्पात वडखळ कंपनी मिळाली. आम्हा दोघांना एकत्र कंपनी मिळाली असती तर आम्ही खूप खुश असतो. याच कारणाने थोड वाईट वाटतं होतं पण तरीही ते आम्ही मान्य केलं.

परीक्षा सुरू झाल्या. अभ्यास आणि फक्त अभ्यास एवढेच सुरू होतं. वाटायचे राणी सोबत बोलावे थोडं, तिलाही तसेच काहीसे वाटतं असेल पण आम्ही ठरवलं होतं जोपर्यत परीक्षा होत नाहीत तोपर्यंत फोनवर बोलायचे नाही. पण एक गोष्ट मला माहित नव्हती ती अशी की राणीच्या घरी तिला लग्नासाठी आईने मुलं पाहायला सुरुवात केली होती. एक दोन मुलं पाहून सुद्धा गेली. राणी मुलं रिजेक्ट करत होती. महेंद्र बद्दल सांगणार तरी कसं? तो अजून शिकतोय मग आताच तो लग्न करणार तरी कसं? हे सर्व सांगून ती मला त्रास देणार नव्हती. म्हणून तिने ही गोष्ट माझ्याकडुन लपवून ठेवली.

सर्व पेपर छान गेले आम्ही खूप खुश होतो. शेवटच्या पेपर नंतर आम्ही सर्व मुलं उरण येथे पिरवाडी बीचवर गेलो. या तीन चार महिन्यांचा थकवा एंजॉय करून तिथेच विसरून आलो. आजपासून आम्ही सर्वच नव्या पर्वाला सुरुवात करणार होतो. प्रत्येकजण आपापल्या आयुष्यात व्यस्त राहणार. भेटणं आता थोडं कठीणच होऊन बसेल. जसा वेळ मिळेल तसे आपण सर्व सोबत भेटू असे आश्वासन घेत सर्वांनी एकमेकांचा निरोप घेतला.

पिरवाडी बीचपासून माझे घर जवळ असल्याने मी राणीला घरी येण्यासाठी विचारणा केली.

अरे तुझ्या घरी असतील ना आता सर्व? आई भाऊ वहिनी सर्वच असतील मग मी आले तर ते विचारतील ना ही कोण? मग काय सांगशील?

अग तू चल तर मग पाहू पुढचं पुढे.

आपल्या कथा आता ऑडियो स्वरूपात पण ऐकू शकता

पुढील भाग वाचण्यासाठी इथे क्लिक करा

मी लिहिलेल्या कथा तुम्हाला आवडत असतील तर एक विनवणी आहे. कॉइन्स देऊन तुमचं प्रेम तुम्ही दाखवू शकता. कथेची लिंक तुम्ही तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत शेअर करा. कारण जेवढ्या लोकांपर्यत तुम्ही ही कथा पोहोचवाल तेवढाच पुढे अजून लिहिण्याचा आनंद वाढेल.

लेखक: महेंद्र पाटील (पाटीलजी)

Featured Image Credit Anushree Mane

Related Articles

Leave a Comment

error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल