Home कथा मैत्री प्रेम लग्न घटस्फोट भाग १७

मैत्री प्रेम लग्न घटस्फोट भाग १७

by Patiljee
359 views

त्या संपूर्ण रात्री राणीचा मेसेज काही मला आला नाही. रात्रभर डोळ्याला डोळा लागला नाही. त्या रात्री मी स्वतःला ठामपणे बजावलं, आयुष्यात या पुढे दारूच्या बाटलीला हात देखील लावायचा नाही. पण राणीचे काय? तिची समजूत कशी काढू? घड्याळात पाहिले तर सव्वा तीन वाजले होते पण डोळ्यावर झोप नव्हती. नोटिफिकेशनचा आवाज कानी आला, मी मोबाईल हातात घेतला आणि माझ्या आनंदाचा पारा चढला.

राणीने मला व्हॉट्सॲप वर अनब्लॉक केलं होतं आणि तिचाच मेसेज होता.

“हे बघ महेंद्र मी पहिलं आणि शेवटचे सांगतेय, मला दारू पिणारी माणसे अजिबात आवडतं नाहीत, मला अशा लोकांच्या सहवासात राहणे, त्यांच्याशी बोलणे, ओळख ठेवणं सुद्धा आवडतं नाही. निर्णय तुला घ्यायचा आहे. एक तर दारू किंवा मी? माझ्या पहिल्या लग्नात सुद्धा रोज नवरा दारू पिऊन घरी यायचा आणि माझ्यावर अत्याचार करायचा. त्यामुळे आता हे सर्व मला नकोय. खूप सहन केलेय मी, तू पण असाच करशील असं नाही किंवा लिमिटमध्ये सुद्धा दारू घेशील, असे पण असेल पण मला आता माझ्या आयुष्यात दारू पिणारी माणसे नको आहेत. त्यामुळे तुझा निर्णय घ्यायला तू मोकळा आहेस.”

“अग राणी खरंच मला दारू आवडते किंवा नेहमी प्यायची आहे म्हणून मी आज नाही प्यायलो. मी मित्रांना तुझ्यामुळे वेळ देत नाही, माझा सर्व वेळ तुझ्याचसोबत जातो मग मी त्यांना कॉल करत नाही, मेसेज करत नाही एवढेच काय तर कॉल सुद्धा करत नाही. त्यामुळे आज ते घरी येऊन चिडले होते. कशीतरी मी त्यांची समजूत काढून त्यांना बाहेर नेले आणि त्यांनी एक ग्लास दारू पिण्यासाठी आग्रह धरला. खरतर मला नव्हती घ्यायची पण त्यांना पुन्हा राग येईल म्हणून घेतली आणि त्यांच्याकडून प्रॉमिस सुद्धा घेतलं आहे की ही पहिल्यांदा आणि शेवटची असेल. त्यामुळे प्लीज राणी मला माफ कर अशी चूक माझ्याकडुन पुन्हा कधीच होणार नाही.”

माझ्या या मेसेजने राणी थोडी शांत झाली. नवा दिवस नवीन सुरूवात म्हणत दुसऱ्या दिवशी मी कॉलेजला पोहोचलो. सर्व मुलं गप्पा गोष्टी करण्यात दंग होती. मात्र मी आणि राणी आमच्या गप्पा एकाच बाकावर बसून रंगवत होतो. एवढ्यात मॅडम क्लासमध्ये आल्या आणि म्हणाल्या, “उद्या आपल्या कॉलेजमध्ये प्रोग्राम आहे त्यामुळे सर्वांनी येताना ट्रेडिशनल कपडे घालून येणे. मॅडम एवढे म्हणताच मुलींची चर्चा सुरू झाली की तू कोणती साडी नेसणार? कोणता कलर असेल? सेम कलर नकोय? असे त्यांचे काही ना काही चालूच होते.

मी तर या गोष्टीमुळे खुश होतो की मी पहिल्यांदा राणीला साडीत पाहणार. आम्ही घरी आलो पण बरेच तास झाले तरी राणी ऑनलाईन नव्हती. अखेर तिचा मेसेज आला.

ती: खूप टेन्शन आलंय रे!

मी: का ग काय झालं?

ती: उद्याचे रे.. हेच काय घालू उद्या कळतं नाहीये.

मी: अग दुपारीच तर म्हणाली होतीस ना आईची ब्लॅक रेड कलरची साडी नेसणार आहेस मग आता काय झालं?

ती: अरे तशीच साडी सोनम नेसून येणार आहे. मग आता मी काय नेसू याचे मला टेंशन आलंय.

मी: अग टेन्शन काय घेतेस, नेस कोणतीही तसेही तुला प्रत्येक कलर चांगलाच दिसतो.

ती: तू मला चांगले वाटेल म्हणून काहीही बोलत जाऊ नकोस रे. जाऊदे मी येतच नाही उद्या.

मी: नाही हा.. अजिबात नाही. मला तुला साडीत पाहायचे आहे उद्या आणि तू नाही आलीस तर मी बोलणार नाही बघ तुझ्याशी.

ती: तू पण ना. ठीक आहे चल बघते काही. आता उद्याच बोलू गुड नाईट.

मी: दॅट्स माय गर्ल.. गुड नाईट राणी.

आजचा दिवस खूप सुखद वाटतं होता. आज आम्ही सर्व मुलं नवीन नवऱ्या सारखे दिसत होतो तर मुली नव्या नटलेल्या नवरी सारख्या भासत होत्या. सर्वच मुली छान छान साडी नेसून आल्या होत्या. आज प्रत्येक मुलगी सुंदर दिसत होती. नेहमी शाळेच्या ड्रेसवर पाहण्याची सवय झाली होती त्यामुळे पहिल्यांदा साडीवर पाहून आज प्रत्येक मुलगी कुणा ना कुणाचा क्रश झाली होती. पण आमच्या बाईसाहेब काही अजून आल्या नव्हत्या.

नेहमी वेळेवर येणारी आज कॉलेज सुरू होऊन पंधरा मिनिटे झाली तरी कशी आली नव्हती? माझी नजर सारखी दरवाजाकडे फिरत होती आणि तेवढ्यात राणी साहेबांचे आगमन झालं आणि मी फक्त तिच्याकडे पाहतच राहिलो. कारण माहीत आहे का? कारण तिने आमच्या आगरी कोळी मुलींसारखी साडी नेसली होती, अंगावर खूप सोनं घातलं होतं, नाकात नथ, केसात वेणी लावली होती. जसं की आज आमचं लग्न होणार आहे आणि माझी राणी नवरी बनून माझ्यासमोर आली होती.

तिने येऊन मला चिमटा काढला, “वेडा झालास का? कसा बघतो आहेस एकटक? कुणी पाहिले तर संशय घेईल ना आपल्यावर?” तिच्या चीमट्याने मी स्वप्नाच्या दुनियेतून बाहेर आलो.

“राणी काय हे? कसं सुचलं तुला हे आगरी कोळी पद्धतीचा पेहराव? कुणी सांगितले खरं खरं सांग हा?”

“अरे आमच्या शेजारी एक काकी राहतात त्या तुमच्याच आगरी समाजाच्या आहेत. त्यांना जाऊन भेटले आणि त्यांच्याकडून हे सर्व करून घेतले. आमचे अहो आम्हाला बघायला आतुर झाले असतील मग त्यांना surprice द्यायला नको का? म्हणून हे सर्व करून आलेय. आवडलं का तुला?”

“आवडले काय विचारतेस? असं वाटतंय आताच तुला उचलून गणपतीच्या मंदिरात घेऊन जावं आणि तुझ्याशी लग्न करावं. एवढी गोड दिसतेस तू आज.”

“इश्य… ठोंब्या तुझे आपलं काहीतरीच ना..!” लाजून राणी मुलींच्या घोळक्यात सामील झाली. पण आज माझी नजर फक्त तिच्यावरच होती. कुणी एवढं सुंदर कसे दिसू शकते? आणि एवढी सुंदर दिसणारी मुलगी माझी प्रेयसी आहे म्हणजे मी किती भाग्यवान आहे. असे काही चित्र विचित्र विचार माझ्या मनात सुरूच होते. थोड्याच वेळात मॅडम वर्गात आल्या आणि आम्हा सर्व मुलांना वर्गाच्या बाहेर काढलं आणि मुलींशी पंधरा मिनिटे काही बोलल्या आणि त्यांना घेऊन कॉलेजच्या हॉलकडे निघून गेल्या.

नक्की काय भानगड आहे आम्हाला काहीच कळलं नाही. कुठं गेल्या सर्व मुली? मुली शिवाय वर्ग शांत शांत वाटतं होता. पण नक्की त्या सर्व मुली गेल्यात कुठे? कुणाला काहीच आयडिया नव्हती. एवढ्यात मला राणीचा मेसेज आला आणि कळलं की मॅडम सर्व मुलींना डान्स स्पर्धेसाठी नेलं आहे आणि तिथे सर्व कॉलेजच्या मुलीच असणार आहे आणि त्यांची स्पर्धा तिथे पार पडणार आहे. म्हणजे मी राणीला एक दोन तास तरी पाहू शकत नव्हतो.

इथे आमच्या मुलांच्या गप्पा रंगत होत्या. ही मुलगी किती सुंदर दिसते तर ती मुलगी कशी हॉट दिसते. हद्द तर तेव्हा झाली जेव्हा वर्गातला एक मुलगा येऊन मलाच म्हणाला “अरे राणी कसली भारी दिसतेय ना? असं वाटतंय तिला आज प्रपोज करावं?” मनात असं आले की दोन कानशिलात लगावून देऊ त्यांच्या पण मी शांत राहिलो. एवढ्यात आमच्या वर्गातील मुलगी स्मिता वर्गात आली. “महेंद्र एक मिनिटे बाहेर येतोस तुझ्याशी काम आहे” असे म्हणत मला बाहेर घेऊन गेली.

“काय स्मिता काय चालू आहे तिकडे जरा सांग आम्हाला पण” असे म्हणत मी तिची मस्करी केली. पण ती काही वेगळ्याच मुड मध्ये दिसत होती.

“महेंद्र ऐक ना, तुला एक गोष्ट सांगायची आहे खूप अर्जंट आहे.”

“हो अग बोल ना काय झालं?”

“मला तू आवडतोस. तू खूप छान आहेस, शांत आहेस, अभ्यासू आहेस. तुझ्यात अशी एकपण वाईट गोष्ट नाही. कधी मुलींना वाईट नजरेने पाहत नाहीस, म्हणून तुझ्या प्रेमात कधी पडले हे मलाच कळलं नाही.” असे म्हणत तिने माझा हात पडकडला.

तिचे हे प्रपोजल ऐकून मला आधी शॉक बसला पण ४४० चा झटका तेव्हा बसला जेव्हा मी मागे वळून पाहिले तर राणीने आमचे बोलणे ऐकले होते.

क्रमशः

महेंद्रला वर्गातल्या मुलीने प्रपोज केला ते ही राणीच्या समोर? काय होणार पुढे? ते दोघं आपल्या नात्याबद्दल सर्वांना सांगतील का? की अजून काही होईल? हे सर्व कळेल तुम्हाला पुढच्या भागात. पुढचा भाग सर्वात आधी तुम्हाला वाचायचा असेल तर आजच आपले हे पेज फॉलो करा. कारण कथा फक्त आता सुरू झालीय. यात अजून ट्विस्ट येणार आहेत.

जर तुम्ही माझे Superfans झालात तर मी कथा पोस्ट केल्यानंतर लगेच तुम्हाला वाचता येईल. कोणताच भाग लॉक राहणार नाही आणि जर तुम्ही सुपर फॅन्स नसाल तर पुढचा भाग पोस्ट केल्यानंतर चार दिवसांनी तो फ्री होईल आणि तेव्हा वाचता येईल.

मी लिहिलेल्या कथा तुम्हाला आवडत असतील तर एक विनवणी आहे. कॉइन्स देऊन तुमचं प्रेम तुम्ही दाखवू शकता. कथेची लिंक तुम्ही तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत शेअर करा. कारण जेवढ्या लोकांपर्यत तुम्ही ही कथा पोहोचवाल तेवढाच पुढे अजून लिहिण्याचा आनंद वाढेल.

लेखक: महेंद्र पाटील (पाटीलजी)

Related Articles

Leave a Comment

error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल