Home कथा मैत्री प्रेम लग्न घटस्फोट भाग १४

मैत्री प्रेम लग्न घटस्फोट भाग १४

by Patiljee
391 views

माझी राणी जिव्यावर मी जीवापाड प्रेम करतोय, अगदी माझी अर्धांगिनी बनवण्याची स्वप्न पाहतोय तिचं लग्न झालंय? ती गरोदर होती? घटस्फोट झाला आहे? हेच सारखे डोक्यात फिरत होतं. मोबाईल स्विच ऑफ केल्याने राणी मला फोन करून थकली असेल पण मी हे कसे स्वीकारू की तिचं लग्न झालंय? पण एक मन हे सुद्धा म्हणत होतं की काय फरक पडतोय तिचं लग्न झालंय तिला दिवस गेले होते तर? शरीर तर कालांतराने म्हातारे होईल पण मी ज्या मनावर प्रेम केलं ते तर आयुष्भर माझ्यासोबत तसेच राहील ना?

माझ्या मनात असंख्य विचार येत होते. काय करू काय नको? याने डोकं पार भांबावून गेलं होतं. मी अजयचे घर गाठले तो घरात टीव्ही पाहत बसला होता. मी जाऊन त्याच्या जवळ बसलो. माझ्या मनात काहीतरी चालू आहे हे त्याने ओळखले. तो मला टेरेसवर घेऊन आला. “काय झालं भावा? सांगणार आहेस का नीट? चेहरा असा काय दिसतोय तुझा? तुला असे पहायची सवय नाहीये रे”

“अजय… माझ्या राणीचे लग्न झालं होतं रे आणि घटस्फोट सुद्धा झाला आहे.”

“काय? कसे? म्हणजे मला कळत नाहीये? एवढी मोठी गोष्ट तिने एवढे दिवस कशी लपवली?”

“नाही माहीत रे. पण आता काय करू काहीच सुचत नाहीये.”

“ये बाबा काय करू म्हणजे? हा काय प्रश्न आहे. सोडून दे तिचा विषय.”

“माझं प्रेम आहे रे तिच्यावर.”

“तू येडा झालास का रे..! प्रेम आहे म्हणे, प्रेम होईल परत, अजून तरुण आहेस तू, पण एका लग्न झालेल्या बाईशी लग्न केलेस असा ठप्पा लागला ना तुझ्यावर तर कुठे तोंड दाखवू शकत नाहीस, या गोष्टीचा विचार कर आणि आताच हा विषय थांबव.”

अजय जे बोलत होता ते योग्य होते. कारण एका लग्न झालेल्या  स्त्री सोबत लग्न करणे हे फक्त सिनेमात घडू शकते. खऱ्या आयुष्यात असे कुणी करत नाही. हेच विचार डोक्यात चालू होते. मी घरी आलो. आईनेने जेवायला आवाज दिला पण जेवायची इच्छाच मेली होती. राणी आणि तिचे विचार मनातून जातच नव्हते. सारखं लक्ष मोबाईलकडे जात होते. तिची एवढी सवय होऊन गेली होती की तिच्याशिवाय एक मिनिट सुद्धा माझे मन दुसऱ्या कशात लागत नव्हते आणि तिच्याशिवाय संपूर्ण आयुष्य कसे जगायचे? नाहीच होऊ शकत असे, कसे शक्य आहे. ती फक्त माझी राणी आहे आणि आता तिच्यावर पूर्ण माझा अधिकार असेल. तिने तिच्या आयुष्यात खूप काही सहन केलं आहे बस आता नाही मी तिला काही सहन करू देणार.

मी माझा मोबाईल स्विच ऑन केला. तिचा नंबर डायल केला, क्षणाचाही विलंब न लावता तिने फोन उचलला सुद्धा, माझ्या सारखी ती सुद्धा माझ्या कॉलची आतुरतेने वाट पाहत बसली होती हे मला कळून चुकले. ती काही बोलणार एवढ्यात मीच बोलायला सुरुवात केली.

“राणी… मनापासून सॉरी, खरंच मला माफ कर. सॉरी यासाठी की तुझे बोलणे ऐकले आणि काहीच न बोलता फोन ठेऊन दिला पण आता माझी एक गोष्ट चांगलीच ध्यानात ठेव. तुझे लग्न झालेय, तुला दिवस गेले होते, तू खूप काही सहन केले आहेस हा तुझा भूतकाळ होता. पण आता तुझा वर्तमानकाळ माझ्या हातात आहे आणि त्याने मी तुझा भविष्यकाळ बदलून टाकेन. फक्त तशी एक संधी मला दे. लग्न लग्न म्हणजे नक्की काय ग? दोन जीवांचे मिलन, नात्यातली ओढ, दोघांनी थाटलेला संसार, सात जन्म सोबत राहू अशी घेतलेली वचने म्हणजे लग्न ना ग? मग तुझ्या बाबतीत असे काहीच झालं नाही. तुमच्या संसारात तो नव्हताच तू एकटीच होतीस आणि तुझ्यापरीने तू खूप सावरण्याचा प्रयत्न केलास पण निष्फळ ठरला कारण तो माणूस नराधम होता. त्याला तुझे प्रेम आणि तू कशी आहेस हे कळलेच नाही. मुळात त्याने ते कधी जाणून घेण्याचा प्रयत्न केलाच नाही. त्याला फक्त घरात ठेवायला, कुटुंबांमध्ये मिरवायला बायको म्हणून एक बाहुली हवी होती. पण खरंच स्वामींच्या कृपेने काहीतरी विपरीत घडण्याच्या आतच तू त्याच्या तावडीतून सुटून बाहेर आलीस ही खूप मोठी गोष्ट आहे. राणी मोरे खूप झाला आता हा तुमचा त्रास, खूप काही सहन केलेत तुम्ही, बस… आता नाही. आता तू फक्त आनंदात राहायचे आणि तुझ्या आनंदाचे कारण मला बनायचे आहे. माझ्या रेशन कार्डवर थोडी जागा खाली आहे, मला तिथे मोठ्या अक्षरात राणी महेंद्र पाटील हे नाव पाहायला आवडेल. लग्न करशील माझ्याशी? माहीत आहे माझी परिस्थिती एवढीही चांगली नाही की मी तुला सुखात ठेवेन पण आपण दोघं मिळून आपल्या संसाराचा गाडा पुढे नेला तर एक दिवस आपण यशाच्या अशा शिखरावर असू जिथून आपल्याला आकाश ठेंगणं वाटेल. बोला राणी साहेब लग्न कराल आमच्याशी?”

माझे हे सर्व शब्द राणीला पुढे नव्याने आयुष्य जगण्यासाठी संजीवनी वाटतं होते. तिला सुद्धा तिच्या आयुष्याचा जोडीदार असाच तर हवा होता. ती फक्त आणि फक्त रडत होती. पुढील दहा मिनिटे आम्ही काहीच न बोलता फक्त फोनवर रडत होतो.

“महेंद्र मलाही आवडेल तुझ्याशी लग्न करायला, एवढेच काय तर आता नवरा म्हणून मला तुझाच चेहरा समोर येतो. तुझ्या रुपात मला माझ्या आयुष्याचे नवीन पर्व मिळाले आहे. तू माझ्या आयुष्यातून निघून गेला असतात तर मी दुसऱ्या लग्नाचा विचार सुद्धा केला नसता. कारण आता नवरा म्हणून मी ती जागा तुलाच दिली होती. मलाही आवडेल तुझी अर्धांगिनी व्हायला पण समाज काय म्हणेल? लोक खूप नावं ठेवतील? टोमणे मारतील? लग्न झालेल्या मुलीशी कोण लग्न करतो, घटस्फोट झाला आहे, दुसरी मुलगी मिळाली नाही का? हिला तर वापरून सोडून दिली असे असंख्य टोमणे तुला मारले जातील. मला या सर्वाची आता सवय झालीय कारण गेली अनेक वर्ष मी ऐकत आलेय पण तुझ्याबाबतीत हे नवीन असेल त्यामुळे कोणताही निर्णय घेताना विचार कर. तू नाही म्हणालास तरी मी हसत हसत तुझ्या आयुष्यातून निघून जाईल पण माझ्यामुळे तुला कुणी बोललेले मला नाही आवडणार.”

“राणी…एकच सांगेन. लोकं नेहमीच बोलतात मग आपण चांगले काही करो किंवा वाईट. त्यांचे ते कामचं असतं. मला माझे आयुष्य माझ्या परीने जगायचं आहे. लोकांची चिंता मला नाहीये. मला फक्त तू हवी आहेस आणि मला म्हातारपणापर्यंत तुझी साथ लाभेल असे वचन हवं आहे.”

आमच्या दोघांमधील शंका कुशंका सर्व दूर झाल्या होत्या. आजपासून आम्ही एका नव्या आध्यायला सुरुवात करणार होतो. दोघेही खूप जास्त खुश होतो. फोन ठेऊन राणी तिच्या घरगुती कामात व्यस्त झाली. पण मला मात्र राणी बद्दल आईला सांगायचे होते. मी एका मुलीवर मनापासून प्रेम करतो आणि तिच्याशी लग्न करायचे आहे. एवढेच नव्हे तर मला आईला हे देखील अंधारात ठेवायचे नव्हते की आधी तिचं लग्न झाले आहे. तो राणीचा भूतकाळ देखील तिला सांगायचं होता कारण मला आमच्या नात्याची सुरुवात कोणत्याच खोट्या गोष्टीवर सुरू करायची नव्हती.

“आई.. ऐकतेस का ग? थोडं बोलायचं आहे.” मी तिला आवाज दिला.

“अग बाई .. तुला माजाशी बोलाला कसा येल भेटला आज, फोन बंद परला वाटतं” असे म्हणतं आई हसू लागली.

मी तिचे दोन्ही हात पकडेले आणि तिला खुर्चीत बसवले आणि म्हणालो, आई मला लग्न करायचे आहे आणि ते देखील अशा मुलीशी जीचे अगोदर लग्न झालं आहे आणि घटस्फोट सुद्धा झाला आहे.

कथेचा पुढचा भाग वाचण्यासाठी इथे क्लीक करा

मी लिहिलेल्या कथा तुम्हाला आवडत असतील तर एक विनवणी आहे. याच कथेची लिंक तुम्ही तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत शेअर करा. कारण जेवढ्या लोकांपर्यत तुम्ही ही कथा पोहोचवाल तेवढाच पुढे अजून लिहिण्याचा आनंद वाढेल.

लेखक: महेंद्र पाटील (पाटीलजी)

Related Articles

Leave a Comment

error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल