Home कथा मैत्री प्रेम लग्न घटस्फोट भाग १३

मैत्री प्रेम लग्न घटस्फोट भाग १३

by Patiljee
826 views

“काय म्हणतोय काय हा माणूस? रोज रात्री दारूच्या नशेत येऊन माझ्यावर पिसाटलेल्या कुत्र्या सारखा तुटून पडतो, स्वतःच सुद्धा या माणसाला भान नसते आणि म्हणतो मी प्रिकोशन घेतलं. DNA टेस्ट करायची आहे. आजवर प्रेम तर खूप लांबची गोष्टी मी कोणत्या मुलासोबत मैत्री सुद्धा केली नव्हती आणि हा निर्लज्ज माणूस माझ्या चारित्र्यावर संशय घेतोय? देवा मी का केलं अशा माणसासोबत लग्न ज्याला बाई फक्त शरीर सुखाचे साधन वाटते.”

यावेळी की खूप जास्त भडकले आणि नवऱ्याला उलटून प्रश्न केला, इथेच त्याचा इगो हर्ट झाला. माझी बायको माझ्यावर आवाज चढवते हे पाहून त्याने माझे केस पकडून समोरच्या कपाटाकडे ढकलून दिले. या सर्वात माझ्या डोक्याला जबर मार बसला होता. डोक्यातून रक्त वाहू लागले. रक्त पाहून मी जागीच बेशुद्ध पडले. जेव्हा शुद्ध आली तेव्हा मी तिथेच पडलेले होते.

नवऱ्याने ना डॉक्टर बोलावला होता ना त्याने दुसरं काही उपाय केले होते. तो मला त्याचं अवस्थेत टाकून तिथून निघून गेला होता. “मी हे काय करून बसले होते हे माझे शिकायचे वय आणि या वयात घरच्यांच्या मर्जीसाठी लग्न केलं आणि लग्न झाल्यानंतर सुखी आयुष्य वाट्याला येईल असे वाटत असताना हे काय भोगतेय मी? बस… बस झालं आता. नाही सहन होत.” असे म्हणत मी कशीबशी उठून रुमच्या बाहेर आली. बाहेर पाहिले सासू झोपली होती. ही संधी होती मला घरातून पळ काढण्या साठी. माझी बॅग भरली आणि मी घराबाहेर पडणार इतक्यात नवऱ्याने मागून येऊन माझा कंबरेत लाथ घातली आणि मी पोटावर आपटले.

त्याने मला पायाला खेचत घरात आणले. हे सर्व आजूबाजूचे शेजारी पाहत होते पण त्याला कुणीच थांबवायला आले नाही. त्याने रूममध्ये येऊन मला पुन्हा मारझोड केली. खूप मारलं. सर्वकडून रक्त वाहत होतं. “तू बायको आहेस माझी..! कळलं? तुला आता या उंबरठ्या बाहेर पाय जरी टाकलास तरी तुझे तंगड तोडून ठेवेन.” असे म्हणत त्याने बाहेरून दरवाजाला लावून घेतला आणि मला आतमध्ये डांबून ठेवलं.

“मी आई होणार” हे वाक्य जेव्हा कोणत्याही घरात जेव्हा दुमदुमतं तेव्हा आनंदाचे वारे आपोहून वाहू लागतात. मग मीच काय असे कर्म केले आहेत जे जिवंतपणी मला हे भोगायला लागतेय? डोक्यात खूप विचार येत होते, जीव देऊन संपवावं हे सर्व असे राहून राहून वाटतं होतं पण त्यासाठीही हिम्मत होत नव्हती. पुढील दोन दिवस मी काहीच न खाता पिता त्या रूममध्ये पडून होते. माझे रक्त वाहून वाहून थांबलं होतं. घरच्यांनी अन्नाचा एक कण सुद्धा दिला नव्हता. घरून आवडती काही चोकलेट आणली होती, ती बॅगेत पडून होती आणि सोबत एक पाण्याची बॉटल. याच गोष्टीवर दोन दिवस कसेतरी ढकलून काढले.

मी आतून जिवाच्या आकांताने ओरडत होते पण कुणीच दरवाजा उघडण्यासाठी रूमकडे फिरकला नाही. अखेर त्या दुपारी नवऱ्याने दरवाजा उघडला आणि मला डॉक्टरकडे DNA टेस्ट करण्यासाठी घेऊन आला. हॉस्पिटलमध्ये संधी साधून तिथून पळ काढला. तिथून कशी निसटली हे माझे मला देखील कळलं नाही. माझी अवस्था खूप बिकट होती. घरी जायला पैसे सुद्धा नव्हते आणि चालण्यासाठी अंगात ताकद सुद्धा राहिली नव्हती.

पण म्हणतात ना देव आहे, नक्कीच आहे. ज्यावेळी सर्व रस्ते बंद होतात त्यावेळी फक्त देवच धावून येतो. बाजूलाच एक श्री स्वामी समर्थांचे मंदिर मला दिसले. तिथे महाप्रसाद चालू होता. जेवणाची किंमत काय असते हे आज मला खऱ्या अर्थाने कळले. तिथे जेवण करून त्याच मठाच्या दान पेटीतून मी २०० रुपये घेतले आणि माझे माहेर गाठले. घरी पोहोचताच माझी अवस्था पाहून वडील रडूच लागले. आजवर त्यांनी कधी आपल्या मुलीला असे पाहिलेच नव्हते. “हे काय करून ठेवलं आहे हे माझ्या मुलीचे?” असे म्हणत ते सारखे रडतं होते मी झालेला सर्व प्रकार सर्वांना घरी सांगितला. आम्ही सर्व जाऊन पोलीस केस करून आलो पण आमच्या अगोदरच त्या नराधमाने आधीच माझ्या नावावर केस केली होती की मी कुणा दुसऱ्या सोबत पळून गेली. काही महिने गेले पण या सर्वात मला खूप मानसिक त्रास झाला. अनेक आरोप प्रत्यारोप झाले. कसेबसे आम्ही त्याच्याकडून घटस्फोट मिळवला. कदाचित देवाच्या मनात सुद्धा नसावे की त्याच मुल माझ्या पोटात राहावे म्हणून माझा miscarriage झाला.

मी त्याच्या तावडीतून सुटले होते पण तो माझ्या मनातून जात नव्हता. त्याची भीती मला अजून सुद्धा जाणवत होती. याचमुळे मी डिप्रेशन मध्ये जात चालली होती. कशातच मन लागत नव्हतं. माझ्या चेहऱ्यावरील सर्व तेज गायब झालं. असे वाटतं होतं मी काहीच दिवसांची सोबती आहे. कारण आता मी लग्न झालेली, नवऱ्याने सोडलेली, घटस्फोट झालेली, नवऱ्याकडे राहून आलेली स्त्री होते. येणारा जाणारा माझ्याकडे विचित्र नजरेने पाहत होता. नवऱ्याने मला सोडली की मी नवऱ्याला सोडलं हा विचार कधीच कुणी केला नसेल. प्रत्येकाला हेच वाटतं राहील की ही नवऱ्याकडून परत आली. “हो आली मी परत.. काय चूक केली? आयुष्यभर त्या नरकात सडत राहण्यापेक्षा मी माझ्या घरी येऊन सुखाने राहील.” पण आपला समाज असा आहे की घटस्फोट झालेल्या संसारात नेहमी स्त्रीला दोष दिला जातो, तिला तुच्छ वागणूक दिली जाते आणि हे लवकर बदलणार नाही. हे. निरंतर चालूच राहील.

एका दुपारी पेण शहरात आई सोबत गेले असताना तो नराधम पुन्हा मला दिसला. त्याच्यासोबत एक बाई होती. तिची सुद्धा माझ्याच सारखी अवस्था पाहून मला कळून चुकलं होतं की त्याने दुसरं लग्न केलं आणि हा अजूनही असाच वागतोय. म्हणजे त्याला माझ्यात खोट वाटतं नव्हती तर मुळात हा माणूसच तसा आहे. मी स्वामींना मनापासून हात जोडले आणि त्यांचे आभार मानले की त्यांनी मला या सर्वातून वाचवून सुखरूप बाहेर काढलं.

त्या दिवशी मी मनाशी ठाम निर्णय केला, “बस झालं आता मी सुद्धा माझ्या आयुष्याचा नव्याने विचार करणार, पुढचे शिक्षण घेऊन जॉब करून घरची जबाबदारी घेणार.” मग पुढे पाहू लग्न करायचे का नाही कारण एकदा लग्नाचा हा असा अनुभव आल्याने लग्न संस्थेवर माझा विश्वास उडाला होता. पण मला हे देखील माहीत होतं की माझ्याशी आयुष्यात कुणी असेल जो फक्त माझा असेल, माझी काळजी घेईल, मला जीव लावेल, माझ्यावर मनापासून प्रेम करेल. पुढील काही वर्ष मी फक्त आणि फक्त कुटुंबाकडे पाहिले.

या सर्वात अनेकदा असे वाटले की मी जे जे निर्णय घेतले ते स्वामींच्या कृपेने योग्य झाले. मग मी माझ्या नव्या आयुष्याचा विचार करूच शकते. या सर्वात माझी तुझ्यासोबत ओळख झाली महेंद्र आणि मला जगण्याची नवी उमेद मिळाली. मला माहित आहे मी घटस्फोट झालेली बाई आहे, हे तुला पचवायला खूप जड जाईल पण ही गोष्ट मला तुझ्यापासून लपवायची नव्हती. आता पुढे जो काही निर्णय असेल तो तुझा असेल. तू माझ्या आयुष्यातून निघून गेलास तरी मी तुला काहीच म्हणणार नाही. कारण तू खूप कमी वेळात खूप काही चांगल्या आठवणी दिल्या आहेस.

राणीचा एक एक शब्द माझ्या हृदयावर घाव करत होता. मी ज्या मुलीवर मनापासून प्रेम केलं तिचा घटस्फोट झाला आहे? तिला दिवस सुद्धा गेले होते? हे डोक्यात सारखं फिरतं होतं. मी तिचे बोलणे चालू असताना फोन कट करून स्विच ऑफ केला.

कथेचा पुढचा भाग वाचण्यासाठी इथे क्लीक करा

राणीचा घटस्फोट? नवऱ्यापासून राहिलेले गरोदरपण? हे सर्व महेंद्र स्वीकारेल का? हे कळेल तुम्हाला पुढच्या भागात. पुढचा भाग सर्वात आधी तुम्हाला वाचायचा असेल तर आजच आपले हे पेज फॉलो करा. कारण कथा फक्त आता सुरू झालीय. यात अजून ट्विस्ट येणार आहेत.

मी लिहिलेल्या कथा तुम्हाला आवडत असतील तर एक विनवणी आहे. याच कथेची लिंक तुम्ही तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत शेअर करा. कारण जेवढ्या लोकांपर्यत तुम्ही ही कथा पोहोचवाल तेवढाच पुढे अजून लिहिण्याचा आनंद वाढेल.

लेखक: महेंद्र पाटील (पाटीलजी)

Related Articles

Leave a Comment

error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल