Home कथा मैत्री प्रेम लग्न घटस्फोट भाग ११

मैत्री प्रेम लग्न घटस्फोट भाग ११

by Patiljee
1062 views

माझ्या राणीचा घटस्फोट झाला आहे? काय सांगतेय ही? कसे शक्य आहे? तिला मी काही अजून प्रश्न विचारणार तेव्हा तिनेच पुढे सर्व सांगायला सुरुवात केली.

“हे बघ महेंद्र तुला हे ऐकून कसे वाटेल याचा विचार मी करत बसले तर तुला अंधारात ठेवण्यासारखे होईल आणि नेमकं मला हेच करायचे नाहीये” पुढे तिने सांगायला सुरुवात केली.

घरात मोठी असल्याने घरची संपूर्ण जबाबदारी माझ्यावर पडली. आई आजाराने ग्रस्त होती त्यामुळे तिच्याकडून काही कामे होत नव्हती. वडील मोलमजुरी करून घर खर्च भागवायचे. घरात मी आणि माझी छोटी बहिण. तशी ती माझ्यापेक्षा चार वर्ष लहान होती त्यामुळे सर्वच घरातले मला पाहायला लागायचे. एवढी बिकट परिस्थिती असताना सुद्धा वडिलांनी चांगलं शिक्षण दिलं. कधी कशाची कमी पडू दिली नाही.

बारावी परीक्षा चांगल्या मार्काने पास झाले त्यामुळे पुढे जाऊन अजून छान शिकून घरचा डोलारा स्वतःच्या खांद्यावर घ्यायचा असा विचार मी केला होता पण म्हणतात ना आपण तीच स्वप्न पाहत असतो जी कधी पूर्ण होऊ शकत नाहीत. मला लग्नासाठी श्रीमंत घरातून मागणी आली. आम्ही गरीब होतो पण मुलाला गोरीपान मुलगी हवी होती आणि त्याने मला कुठतरी पाहिलं होतं. एवढ्या श्रीमंत घरातून मागणी आल्याने आमचे घरचे आनंदात होते. कारण घरात गरिबी असली तरी आमची मुलगी तरी तिचे पुढचे आयुष्य चांगल्या घरात आनंदाने राहील असे आई बाबांना वाटतं होते.

लग्न करायची माझी इच्छा मुळात नव्हतीच कारण मला माझ्या कुटुंबाला असे वाऱ्यावर माझ्या सुखासाठी सोडून जाणे पटतं नव्हते. पण वडिलांनी समजावले आणि मला त्यांची शपथ दिली. “किमान आमच्यासाठी तरी तू हे लग्न कर, तू तरी सुखी हो पोरी.”

वडिलांना स्वतः समोर पहिल्यांदा रडताना पाहून मी त्यांना नाही म्हणून शकले नाही. मुलाकडचे बघायला आले. पहिल्यांदा साडी नेसली होती त्यामुळे कसे तरीच वाटतं होतं. पण मुलाकडच्या लोकांची इच्छा होती की मुलींनी साडीच नेसावी. मुलगा त्याची आई आणि मामा मामी आले होते. मुलाला वडील नव्हते म्हणून मामाच त्यांच्या बाजूने बोलत होते. मी चहा घेऊन आली आणि सर्वांना चहा दिला, मुलाने चहा घेताना अलगद माझ्या हाताचा चिमटा काढला. मला हे अजिबात आवडलं नव्हतं. कारण पहिलीच भेट होती. नीटशी आमची ओळख सुद्धा नाही तरीही हा मला कसा स्पर्श करू शकतो? ते सुद्धा एवढ्या लोकांच्या समोर,मला खूप राग आला होता पण तरीही मी गप्प राहिले.

“जा रे सुरेश मुली सोबत बोलून घे एकांतात, काही विचारायचे असेल तर बाहेर अंगणात बसा तुम्ही” त्याचे मामा म्हणाले. “काहीच बोलायचे नाही मला, मुलगी पसंद आहे लग्न लगेच उरकून टाकू.” “असा काय हा? किमान दोन शब्द माझ्याशी बोल, माझ्या मनात काय आहे जाणून घे, तुझ्या मनातल्या दोन गोष्टी मला सांग, अशीच तर नवीन नात्याची सुरुवात होते ना मग हा का असा वागतोय?” मला खूप राग आला होता पण वडिलांमुळे गप्प बसले.

पाहुणे गेल्यावर मी घरात खूप चिडचिड केली, भांडले सर्वांशी पण माझे कुणी ऐकूनच घेतले नाही. मुलांकडच्या लोकांना घाई आहे म्हणून वीस दिवसातच लग्नाचा मुहूर्त काढला. सर्व खूप घाई घाईत होत आहे हे मला दिसत होते पण आई वडिलांना आपली मुलगी चांगल्या घरात जातेय याचे सुख जास्त होते. त्यामुळे त्यांच्याकडे पाहून मी सुद्धा शांत राहिले.

मला त्या मुलाला अजून एकदा भेटायचे होते, तो नक्की कसा आहे, स्वभाव कसा आहे? मी कशी आहे आमचे खरंच जमेल का? हे जाणून घ्यायचे होते आणि तसा निरोप देखील मी धाडला. पण त्याने चक्क नकार दिला. लग्ना आधी मला भेटायचे नाही. लग्न काहीच दिवसात होईल त्यामुळे जे काही आहे ते लग्नानंतर बोल असे सांगून चक्क तो मोकळा झाला. असे सांगितल्यावर मला वाईट वाटेल, राग येईल याचे त्याला काहीच वाटले नसावे का? तरीही मी शांत राहिले. कारण आई बाबांचा चेहरा डोळ्यासमोर दिसत होता.

“एखाद्या माणसाचा स्वभावच असा असतो, मी बदलेन त्याला माझ्या प्रेमाने” असे म्हणत मी स्वतःची समजूत काढली. लग्नाचा दिवस उजाडला. आज माझ्या साठी खूप मोठा दिवस होता पण तरीही चेहऱ्यावर हसू नव्हते. त्यात लग्नात सुद्धा अनेक समस्या आल्या. नवऱ्याकडची फक्त १०० माणसे येतील असे आम्हाला सांगण्यात आले होते. तरीदेखील आम्ही १५० माणसाचे जेवण बनवले पण लग्नात ५०० च्या वर माणसे आली आणि आमची तारांबळ उडाली. आम्ही मानपान नीट नाही केलं म्हणून नवरा देखील चिडला होता. वडिलांनी कसे तरी हातपाय हलवून जेवणाची लवकरात लवकर व्यवस्था केली.

लग्न पार पाडले, माझ्या गळ्यात नवऱ्याने वरमाला टाकली. माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा आणि हा सुखाचा क्षण होता पण वरमाला टाकताना तो म्हणाला, “तुझ्या बापाने जी आम्हाला आज वागणूक दिलेय ना त्याचा बदला मी तुझ्याकडुन घेणार, तू फक्त आज घरी चल मग बघतो तुला.” हे ऐकून मला रडूच आवरले नाही मी खूप जोरात रडू लागले. सर्वांना वाटले मी सासरी जातेय म्हणून रडतेय पण माझे दुःख फक्त मलाच माहीत होतं. लग्न लागताच फक्त दोन तासात नवऱ्या कडच्या लोकांनी वऱ्हाड काढायला सुरुवात केली.

आमच्या कुटुंबातील लोकांनी समजावण्याचा प्रयत्न केला की संध्याकाळी सात नंतर संपूर्ण गावात वऱ्हाड फिरणार मग तुम्ही तुमच्या घरी जाऊ शकता, प्रथा आहे आमची तशी. पण नवरा एवढा चिडला होता की कुणाचेच ऐकले नाही. माझ्या काकांसोबत भर मांडवात त्याने भांडणे केली आणि वऱ्हाड घरी आणली. तो एवढ्या रागात होता की माझ्या सोबत कुणीच आणून दिले नव्हते. मी या नवख्या घरात एकटी होती. दिवसभराचा थकवा जाणवत होता. पण तरीही मी स्वतःला शांत ठेवत होते. कदाचित आता हेच माझे आयुष्य आणि इथूनच माझे भविष्य एका वेगळ्या वळणावर जाणार म्हणून मी चेहऱ्यावर आनंद दाखवते होते.

नवऱ्याने त्याच्या घरात आलेल्या सर्व नातेवाईकांच्या पाया पडायला सांगितले. असलेली ती १०० ते १५० माणसे आणि मी सर्वांच्या एक एक करत वाकून नमस्कार करत होते. सर्व मला आशीर्वाद तर देत होते पण माझी अवस्था कुणाला दिसत नव्हती. मी पार गळून गेली. असे वाटत होतं शरीर आता काम करणे बंद करेल. असली कसली ही लोकं? मी सकाळपासून दमली असेल, यांना हे देखील कळतं नाही का? माझ्या रागाचा पारा आता खूप चढला होता पण हे मी सांगणार कुणाला होते कारण आता मी इथे एकटीच पडली होती. नवरा फक्त नावाला होता. तो आपल्या मित्रांच्या टोळीमध्ये दारू पित बसला होता.

मला आज कळलं की नवरा दारू पितो. माझ्या घरी माझे वडील, माझे काका सर्वच निर्व्यसनी आणि नवरा दारू पितोय. ते देखील मला लग्नाच्या पहिल्याच दिवशी कळलं. याहून दुःखद काही असूच शकतं नाही. आज माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा आणि आनंदाचा दिवस सगळ्यात वाईट ठरत होता. मी आमच्या रूममध्ये आली. एव्हाना काही पाहुणे निघून गेले होते. मी घड्याळात पाहिले तर रात्रीचे १२.३० वाजले होते. त्या जड साडीत मला कसेतरी झालं होतं. पण तरीही मी नवऱ्याची वाट पाहत बसले. अचानक माझा डोळा लागला आणि मी झोपी गेले. जाग आली तेव्हा कळलं की घड्याळात तीन वाजलेत आणि अजून नवरा रूममध्ये आला नाही. शेवटी मी जाऊन कपडे बदलून घेतले आणि पुन्हा झोपण्यासाठी बेडवर पडले तर दाराची कडी वाजली. दरवाजा उघडला तर नवरा पूर्ण दारूच्या नशेत समोर उभा होता.

मी काही बोलणार तेवढ्यात त्यानेच माझ्या कानशिलात लगावली, “तुला कुणी सांगितले साडी काढायला? मी आलो होतो का रूममध्ये? नाही ना? मग का काढली साडी? पहिली रात्र मधूचंद्राची असते हे तुला कुणी शिकवले नाही का? असे म्हणत त्याने मला केसाला पकडले आणि खेचत नेऊन बाथरूम मध्ये ढकलले. पुन्हा साडी घालून बेडवर ये पाच मिनिटात” असे म्हणत त्याने जोरात दरवाजा आपटला.

हे मी काय करून बसले, नवरा असा असतो याच्यावर माझा विश्वास बसत नव्हता. आजवर माझ्या घरच्यांनी एकदा सुद्धा माझ्या अंगाला हात लावला नव्हता आणि याने पहिल्याच रात्री मला मारझोड केली. मी बाथरूम मध्ये हुंदके देऊन रडत होते. तो बाहेरून दारूच्या नशेत ओरडत होता. कशी बशी साडी मला लावता देखील येत नव्हती तरीही मी लावली आणि बाहेर आली. त्याने पुन्हा एकदा माझे केस पकडले आणि मला बेड वर ढकलले आणि म्हणाला “ब्लाउस काढ.”

क्रमशः

राणी सोबत लग्नाच्या पहिल्याच रात्री हे काय घडलं? असा असतो का नवरा? लग्न करून तिने चूक केली होती का?
हे सर्व कळेल तुम्हाला पुढच्या भागात. पुढचा भाग सर्वात आधी तुम्हाला वाचायचा असेल तर आजच आपले हे पेज फॉलो करा. कारण कथा फक्त आता सुरू झालीय. यात अजून ट्विस्ट येणार आहेत.

मी लिहिलेल्या कथा तुम्हाला आवडत असतील तर एक विनवणी आहे. याच कथेची लिंक तुम्ही तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत शेअर करा. कारण जेवढ्या लोकांपर्यत तुम्ही ही कथा पोहोचवाल तेवढाच पुढे अजून लिहिण्याचा आनंद वाढेल.

लेखक: महेंद्र पाटील (पाटीलजी)

Related Articles

Leave a Comment

error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल