सोनालीने मला खालून वर पर्यंत पाहिले आणि एवढंच म्हणाली “बोला पाटीलजी कुठे नेणार मग आम्हाला?” तिने पहिल्यांदा मला पाटीलजी असे संबोधले. तिचे हे असे हसून बोलणे माझ्यासाठी ग्रीन सिग्नल होता. पण मला खरंच विश्वास बसत नव्हता की एवढी सुंदर मुलगी मला कशी हो म्हणेल. आम्ही त्या दिवसभर सिनेमा पाहिला बीचवर गेलो आणि खूप गप्पा सुद्धा मारल्या. दिवसभर ती माझ्यासोबत अशी काही राहिली की जणू आम्ही अनेक वर्ष एकमेकांना चांगले ओळखतोय. आम्ही सोबत छान वेळ व्यतीत केला. घरी जाताना परत तिने मला प्रश्न केला, “आता तरी पाहिलेस ना मला मग काय? होकार आहे ना तुझा? की रडू आता मी?” माझ्याकडे तिला नाही बोलण्याचे कारणच नव्हते कारण अशी मुलगी मला शोधून सुद्धा सापडणार नव्हती. मग पुढे रोज आमचे मेसेजवर बोलणे फोनवर बोलणे हे चालूच होतें. वेळ काढून आम्ही एकमेकांना भेटत सुद्धा होतो.
पण काही दिवस झाले तिचा मेसेज कीवा कॉल येणे बंद झाले. मी थोडा अस्वस्थ होतो. पण कदाचित ती आजारी असेल किंवा घरात काही प्रोब्लेम असेल म्हणून ती मेसेज करत नसेल, असे मी स्वतःला समजावले. एक हप्ता झाला एक महिना झाला पण सोनालीचा काहीच पत्ता नव्हता. आता मात्र मला खूप घाबरायला झालं. पण तिला शोधणार कसं हे मला सुचत नव्हते कारण मला फक्त एवढेच माहीत होते की ती घाटकोपरला राहते. पण कुठं हे मला काहीच माहीत नव्हते आणि तिच्या कोणत्याच मित्राची माझी ओळख नव्हती. त्यामुळे तिला शोधणे माझ्यासाठी खूप कठीण होते. तिचा कधीतरी कॉल येईल या आशेवर मी जगत राहिलो. पण सहा महिने उलटून गेले तरी तिचा काहीच काँटॅक्ट झाला नाही.
आता मात्र मी पार खचून गेलो. कदाचित तिच्या घरच्यांनी तिचं लग्न लावून दिले असेल आणि मुलगा खूप चांगला असेल म्हणून आता सोनाली माझ्यासोबत बोलत नसेल असे मला राहून राहून वाटतं होतं. तिच्या विरहामुळे मी खूप डिप्रेशन मध्ये गेलो. मला सावरण्यासाठी काही महिने गेले. पण तरीसुद्धा तिची आठवण मनातून जात नव्हती. पण वाईट वाटत होते की ती माझ्या आयुष्यातून अशी अचानकपणे निघून गेली. तिने स्वतः जरी मला सांगितले असते तर मीच निघून गेलो असतो तिच्या आयुष्यातून पण तिने असे वागायला नको होतं. मी तिलाच सारखा मनातल्या मनात दोष देत राहिलो.
एक दिवस ऑफिसच्या कामानिमित्त मी घाटकोपरला गेलो असताना मला मागून आवाज आला “तू महेंद्र आहेस ना? महेंद्र पाटील.” मी मागे वळून पहिले तर एक अनोळखी मुलगी होती. मी तिला पहिल्यांदा पाहत होतो. पण तरीसुद्धा तिला माझे नाव कसे माहीत हे कळले नाही. मग तिने सांगायला सुरवात केली. ती सोनालीची मैत्रीण होती आणि तिच्या मोबाईलमध्ये तिने खूपवेळा माझा फोटो पाहिले होते म्हणून तिने मला ओळखले. कितीही काही झाले तरी प्रेम विसरता येत नाही म्हणून मी तिला विचारले, “सोनाली कशी आहे? सुखी आहे ना तिच्या संसारात?” हे ऐकुन ती थक्कच झाली.
“अरे असे काय विचारतोस? मस्करी करतोस का माझी? तुला माहित नाही का? काहीच महिन्यापूर्वी घरात सिलेंडरचा स्फोट होऊन ती या जगातून कायमचा निरोप घेऊन निघून गेली.” त्या मुलीचे हे शब्द ऐकून मी खालीच पडलो. मला माझ्या कानावर विश्वासच बसत नव्हता की सोनाली हे जग सोडून गेली आहे आणि हे मला आता कळतेय.
मी तर तिला खूप काही बोललो, माझ्या आयुष्यातून अचानकपणे गेल्याने तिला दोष दिला पण आता मला त्याचा त्रास होत होता. का केले देवाने असे? अरे किमान असे झाले तर मला तिला शेवटचे बघण्याचे क्षण पण माझ्या नशिबी नाही आले. खरंच माझा देवावरचा विश्वास तेव्हाच उडाला होता. पण काही महिन्याने स्वतःला सावरलं. सोनाली म्हणजे सर्व जग नाही. नक्कीच तिच्या आठवणी माझ्या सोबत आहेत पण ती आता परत येणार नाही हे मला माहीत आहे. म्हणून मी स्वतःला पूर्णपणे अभ्यासात झोकून दिलं. पण देवाने पुन्हा एकदा माझ्या नशिबातले प्रेम तुझ्या रुपात आणलं राणी आणि हे नातं मला फक्त प्रेमापुरते नाही तर त्याचं रूपांतर लग्नात करायचे आहे.
मी एक एक शब्द राणीला सांगत होतो आणि माझ्या सोबत ती देखील रडत होती. मला वाटले माझा भूतकाळ ऐकल्यावर ती माझ्यावर रागवेळ, चिडेल पण असे काहीच झालं नाही. उलट ती नव्याने माझ्या प्रेमात पडली. माझ्या प्रेमाची जाणीव तिला झाली होती. तिने मला शांत केलं आणि म्हणाली, मी नक्कीच मागच्या जन्मी काही पुण्य केले असतील की एवढं मनापासून प्रेम करणारा ठोंब्या माझ्या नशिबात आला. खरतर मलाही तुला काही सांगायचं आहे. पण कसे सांगू कळत नाहीये. ही गोष्ट मुळात अशी आहे की कुणालाही कळलं तर तो स्वीकारू शकत नाही, म्हणून तुला सांगायला थोडी भीती वाटतेय, भीती या गोष्टीची वाटते की मी तुला गमावून बसेन, खूप प्रेम करते रे तुझ्यावर आणि तुझ्यापासून दूर जाणे कठीण होऊन जाईल. पण मला तुला हे सांगावेच लागेल, तुझ्यापासून एवढी मोठी गोष्ट मी नाही लपवू शकतं.
मी राणीला पुढे काही अजून बोलणार एवढ्यात थांबवलं. खरतर जी गोष्ट तू सांगणार आहेस ते मला माहित आहे आणि मला त्या गोष्टीपासून काहीच प्रोब्लेम नाहीये.
मी असे बोलताच राणी आश्चर्याने माझ्याकडे पाहत राहिली, तुला माहित आहे? कसे? काय? कुणी सांगितले? आणि तरीही तू हसतोस? मला सांग सविस्तर तुला कसे आणि कुणी सांगितले.
तिच्या प्रश्नांच्या मारा माझ्यावर बरसत होता. मी शांतपणे म्हणालो, ” जेव्हा तुला पाहिले होते तेव्हाच तुझ्याबद्दल माहिती गोळा करायला सुरुवात केली होती. मला माहित आहे माझ्यापेक्षा तू पाच वर्ष मोठी आहेस आणि खर सांगू मला हे जेव्हा कळलं तेव्हा असे अजिबात काही चुकीचे वाटले नाही. कारण मी कधीच तुझं दिसणं, तुझे राहणे याच्यावर प्रेम केलं नाही. मी फक्त आणि फक्त तुझ्यावर प्रेम केलं आहे. आता तुला वाटेल मला कसे माहीत तुझे वय तर जे डॉक्युमेंट्स जे कॉलेजमध्ये सबमिट केले आहेस ते मी गपचूपपणे पाहिले आहेत.” एवढे बोलून मी हसू लागलो. पण समोरून तिचा काहीच आवाज आला नाही. मी हॅलो हॅलो करत राहिलो आणि राणी मात्र गप्प होती.
“फक्त वयाची गोष्ट होती तर ठीक होतं ते पण इथे गोष्ट वेगळी आहे.”
आता मात्र मला थोड टेंशन आलं. कारण वयाची गोष्ट इथे नव्हतीच ती दुसऱ्याच गोष्टीवरून चिंतेत होती. मी तुला म्हणालो, “राणी काळजी करू नकोस, जे काही असेल ते बिनधास्तपणे सांग, कोणतीही गोष्ट असली तरी मी स्वीकारेन कारण कोणत्याही गोष्टी साठी मी आता तुझ्यापासून दूर जाऊ शकत नाही.
ती काहीशी रडक्या आवाजातच म्हणाली, “सॉरी महेंद्र खरतर तुला कसे आणि काय सांगू कळत नाहीये पण ही गोष्ट अशी आहे की याबाबतीत मी तुला अंधारात नाही ठेऊ शकत. माझे लग्न झालं होतं आणि माझा घटस्फोट सुद्धा झाला आहे.
पुढचा भाग वाचण्यासाठी येथे क्लीक करा
ह्या पण माझ्या निवडक कथा वाचा.
- एक खरीखुरी कथा : प्रवासात भेटलेला गे
- हॉरर स्टोरी : भयाण शांतता
- अपूर्ण प्रेम
- विवाहबाह्य संबंध
- गावाकडचं प्रेम
मी लिहिलेल्या कथा तुम्हाला आवडत असतील तर एक विनवणी आहे. याच कथेची लिंक तुम्ही तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत शेअर करा. कारण जेवढ्या लोकांपर्यत तुम्ही ही कथा पोहोचवाल तेवढाच पुढे अजून लिहिण्याचा आनंद वाढेल.
लेखक: महेंद्र पाटील (पाटीलजी)