फार दुर आहे माझं माहेर कोल्हापूरात…इतकी वर्षे झाली पण तरीही घरी जायचं म्हणलं तर कसं मन सैरभैर होतं. प्रवासाच्या प्रत्येक टप्यात प्रत्येक भेटीची आठवण ताजी होते. मागे पडणारा रस्ता थोड्या वेळेसाठी सासर विसरायला भाग पाडतं आणि डोळ्यां समोर उभं राहतं माहेरचं अंगण…! त्या अंगणाच्या उजव्या बाजूला पहा ते मी लावलेलं पेरुचं झाडं ; त्या पेरूच्या झाडाचा जन्म पहा कसा झाला…!! गल्लीत एक रुक्मिणी आज्जी होती फार तरतरीत होती म्हातारी एकटीच राहायची अंगणात छोटसं शेतच फुलवलं होतं तिने आणि एक पेरुचं झाड पण मोठ्ठं सारखं होतं.
फार जपावं लागे तिला तीच्या त्या पेरूच्या झाडाला आम्हा मुलांपासून.. बिच्चारी काम संपवून दुपारी झोपायला गेली ना आम्ही तीच्या झाडाचे पेरु काढायची तयारी करत…मला आजही आठवतं मी तीच्या झाडाचा तोडलेला.. Sorry चोरलेला शेवटचा पेरु माझी मोठी ताई दोन मैत्रिणी आणि मी ; दुपारच्या वेळी आज्जी झोपायला गेल्या नंतर गपचूप झाडाजवळ गेलो त्या दोघींना लक्ष ठेवायला सांगुन ताईच्या मदतीने मी झाडावर चढली होती. दोनच पेरु तोडल्या बरोबर लगेच कशी कोणास ठाऊक आज्जी उठून बाहेर आली. त्या तिघी , “रंभे भाग आज्जी आयी ” असं ओरडतच पळून गेल्या.
माझं नाव actually रहिमा पण घरी सगळयांत लहान म्हणून आई चिंगळी म्हणायची आणि बाबा ” रहेमबी ” पण याच रहेमबीचं मैत्रिणींमधे ” रंभे ” असं नावं पडलं….तर आज्जी दोरी घेऊनच बाहेर आली कदाचित तेव्हा ती झोपलीच नव्हती पेरु चोरीला आळा घालण्यासाठी एका चोराला शिक्षा करणं गरजेचं आहे म्हणून….आज्जी आली या भितीनं माझी पण झाडावरची पकड ढिली झाली आणि गडबडीने उतरण्याच्या नादात मी घसरतच झाडावरून खाली पडले. दोन्ही हातांना थोडंफार खरचटलं पण आज्जी ने धावतच येऊन मला पकडल आणि त्याच झाडाला बांधलं तोपर्यंत घरी पण बातमी गेली होती.
बाबा दुपारी कामावरून घरी जेवायला आले होते ताईने घरी सांगितल्या बरोबर लगेच बाबा आले आज्जी सांगुन मला तिथंच दम देऊन घरी आणलं. घरी येऊन पुन्हा आईचा पण ओरडा खाल्ला आणि गपचूप अंगणात येऊन बसले चोरलेले दोन पेरु खिशात होते एक ताईला दिला आणि पेरु खात खात रागातच बोलली, ” म्हातारीला फार रुबाब आहे पेरूच्या झाडाचा” तेव्हा ताई म्हणाली, ” ए याच्या बिया टाकून आपणही झाड लावूया मग त्या म्हातारीच्या झाडाकडे पाहायचं पण नाही.” त्यावेळी लावलेलं ते झाड फार छान वाढलं दुपारी बाबा जेवायला आल्या नंतर त्याच झाडाला सायकल टेकवून ठेवत असत आज फार चांगलंच ते झाड वाढलंय.
आज बाबा नाहीत पण ती सायकल आजही तशीच तिथंच टेकवून लावलेली आहे. माझ्या लग्नानंतर बाबा वारले तेव्हा मीच म्हणाले होते आईला , “आई , बाबांची सायकल पेरूच्या झाडाला बांधून ठेव म्हणजे मी जेव्हा येईन बाबा घरीच आहेत असं मला वाटेल.” आज घरी जाते आहे दारात ती सायकल पाहून मनाला तेवढीच समजूत की, बाबा घरी आहेत…!! कारण भोळ्या मनाला तेवढंच समाधान..! असो, प्रवासात बसल्या बसल्या खुप काही आठवणी ताज्या झाल्या थोड्या तुमच्या सोबत शेअर केल्या…!!
लेखिका : रहिमा दांडीन