लॉक डाऊन असल्याने रस्त्यावर गाड्या सुद्धा कमीच धावत होत्या. आधीच उशीर झाला होता म्हणून मी बाईकचा वेग वाढवला. आज पुन्हा एकदा लेट मार्क आणि बॉसची ती भेदक नजर मला अनुभवायची नव्हती. समोर पाहिले तर एक मुलगी मला हात दाखवत होती माझ्याकडुन Lift मागत होती.
जसजसा जवळ गेलो तेव्हा कळलं की मुलगी खूप जास्त सुंदर आहे. जीन्स आणि टी शर्ट मध्ये अजूनच खुलून दिसत होती. मी मागे वळून शहानिशा केली की दुसरी कोणती गाडी तर नाही ना येत जी तिला हात करत असेल. पण मागे कुणीच नाही समजल्यावर मी तिच्यासमोर बाईक थांबवली.
प्लीज मला समोरच्या चौकात सोडाल का? मी काही म्हणण्या अगोदरच ती म्हणाली. तिचा हा प्रस्ताव मी नाकारू शकत नव्हतो. कारण माझ्या चेहऱ्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. आपल्या नशिबात एवढी सुंदर मुलगी कधी लांबून हाय सुद्धा करणार नाही. पण इथे लिफ्ट मागत आहे हे पाहून मी आतूनच खूप सुखावलो.
माझ्या खांद्यावर अलगद हाथ ठेवत एक पाऊल वर उचलुन ती माझ्या मागे बसली. तिचा तो स्पर्श एखाद्या वेगवान येणाऱ्या बाणा सारखा माझ्या हृदयाचा ठाव घेत गेला. तिचे विस्कटलेले केस आणि स्काफ सांभाळत ती म्हणाली चला आता. आज काही मी मोठा पराक्रम केला आहे असे मला वाटतं होतं

आजूबाजूच्या लोकांकडे येता जाता मी पाहत होतो आणि तुम्ही म्हणाल ते कशाला? तर नेहमीच मी सुद्धा असे पाहिले आहे की भरधाव बाईकवर मुलगा आणि सुंदर मुलगी जाताना दिसली की तुमच्या आमच्या सारख्या नजरा तिकडे भिडतात. आज तशीच काहीतरी फिलिंग माझ्या मनात चालू होती.
त्या तिथे ऑफिसजवळ मला थांबवा असे तिने आपल्या त्या डार्क भडक लावलेल्या लिपस्टिक मधल्या ओठांना दाबून म्हटलं. मी आतून खूप निराश झालो हा प्रवास लगेच का संपला? अजून काही लांब असते तिचे उतरण्याचे ठिकाण तर किती छान झाले असते? असे मी स्वतः सोबत पुटपुटले.
तिने हाथ समोर केला हाय मी दिव्यांशी समोरच्या ऑफिस मध्ये काम करते. थॅन्क्स मला तुम्ही लिफ्ट दिलीत. ह्या दिवसात कुणी थांबतच नव्हते. तुम्ही देवासारखे धावून आलात. तिच्या ह्या बोलण्याने मी लाजरा बुजरा झालो. फक्त वेलकम एवढेच बोलू शकलो. पण तिला माहित होत की मी पुढे काहीच म्हणणार नाही तेव्हा तिच म्हणाली मोबाईल द्या तुमचा.
माझा हाथ कधी माझ्या खिशात गेला, कधी मोबाईल बाहेर काढला आणि कधी माझा फोन तिच्या हातात गेला हे माझे मला सुद्धा कळलं नाही. तिने अलगद काही टाईप केले, मोबाईल माझ्या हातात दिला आणि पुढे चालू लागली. तिचे ते पाठमोरे रूप मी माझ्या नजरेत भरत होतो. जोपर्यत ती दिसेनाशी झाली मी तिला न्याहाळत बसलो होतो.
ती गेल्यानंतर मोबाईलकडे नजर फिरवली तर तिने तिचा नंबर दिला होता. बस… तो क्षण आणि मी थेट स्वर्गात पोहोचलो होतो. एवढा आनंद तर मला नोकरी मिळाली तेव्हा सुद्धा झाला नव्हता. ऑफिसमध्ये पोहोचताच मी तिला मेसेज केला हेलो. दिवसभर त्या मोबाईलकडे लक्ष लाऊन राहिलो. पण पाठवलेल्या हॅलो पुढे ग्रीन टिक काही दिसत नव्हती.
घरी आलो फ्रेश झालो तरी सर्व लक्ष त्या मोबाईल कडेच होते. जेवणात सुद्धा लक्ष लागले नाही. कॉल करून पाहावा का असे मनात आले पण खूप जास्त घाई होईल म्हणून स्वतःला सावरले. रात्रभर तिच्या रिप्लायची वाट पाहिली पण तिचा मेसेज काही आला नाही. बाहेर पाऊस आणि मनात आजच्या दिवसाच्या आठवणी सरी सारख्या बरसत होत्या.
सकाळी उठताच आधी मोबाईल हातात घेतला पण ग्रीन टिक काही झाली नव्हती. पण सर्दी आणि खोकला सुरू झाला होता. रात्री जास्त पाऊस पडला, वातावरण बदलले म्हणून असे झाले असेल म्हणून मी एक दोन दिवस काढले. पण आधी खोकला मग सर्दी आणि मग ताप, ना कशाची चव लागत होती ना कोणताच नाकाला वास येत नव्हता.
मोबाईलवर अलगद रिंग वाजली. Notification चा आवाज कानी आला. मोबाईल मध्ये डोकावून पाहिले तर दीव्यांशीचा मेसेज होता. कसा आहेस? काय करतोस? सॉरी रिप्लाय नाही केला? हे असे काही टाईप केलं नव्हतं तर मेसेज असा होता.
मी हॉस्पिटल मध्ये आहे, मला कोरोना झाला आहे. त्यामुळे माझ्या कॉन्टॅक्टमध्ये जेवढे पण लोक आलेत त्यांनाही हा होऊ शकतो. तू काळजी घे आणि काही लक्षणे आढळली तर लगेच डॉक्टरांना दाखव.
मी डोक्याला हाथ लाऊन खालीच बसलो कारण मला वाटलेला वातावरणातील बदल म्हणजे माझी कोरोनाची लक्षणे होती. पुन्हा कधीच आयुष्यात लिफ्ट देणार नाही आणि लॉक डाऊन मध्ये तर बाहेर सुद्धा पडणार नाही असा संकल्प करत मी हॉस्पिटल गाठले. टेस्ट केली आणि व्हायचं तेच झाले. माझे रिपोर्ट सुद्धा पॉझिटिव आले होते.
ह्या पण कथा वाचा
- लोक म्हणतात लग्नानंतर असे कुणा पुरुषाबद्दल काही वाटणे म्हणजे पाप असते पण जर नवराच घरात प्रेम देत नाही, समजून घेत नाही, तर मी काय करणे अपेक्षित होते. वाचा पूर्ण कथा तुमचेही डोळे उघडतील
- लॉक डाऊन आणि तिच्या आठवणी
समाप्त
कथेचे सर्व अधिकार लेखकाधिन आहेत, लेखकाच्या नावासोबत कथा शेअर करायला हरकत नाही.
लेखक : पाटीलजी (आवरे उरण)