अरे सागर लॉक डाऊन मुळे लग्न लांबणीवर गेलं की तुझं? कसे होणार तुझे? एवढी सर्व स्वप्न पाहिली होती? कधी होणार ती स्वप्न पूर्ण? सागर मात्र सर्वांना व्हॉटसअप ग्रुप मध्ये हसत उत्तरे देत होता. अरे होईल रे लग्न, आता नाही झाले तर पुढच्या वर्षी होईल त्यात काय एवढं? लग्न ठरलं तर आहे मग माझी होणारी बायको कितीही थांबायला तयार आहे.
सागर हे मनातून बोलत असला तरी सुद्धा आतून तो खूप दुःखी होता. एप्रिल मध्ये लग्न होतं. साखरपुडा मोठ्या धुमधडाक्यात झाला होता. सागर आणि त्याची होणारी बायको खूप खुश होते. अरेंज मॅरेज पध्दतीने त्यांचं लग्न ठरलं होतं. साखरपुडा झाला आणि दोघेही छानपैकी एकविरा आईच्या दर्शनाला सोबत गेले. दोघात अजुन हवं तसं बोलणं झालं नव्हत. लग्न ठरून काहीच दिवसात घरच्यांनी साखरपुडा सुद्धा उरकून टाकला.
सर्व एवढं घाई घाईत झालं की दोघानाही हवा तसा वेळ मिळाला नव्हता. त्याच मुळे ते एकविरेला गेले होते. दिवसभर छान गप्पा मारल्या चांगला टाइम सोबत व्यतीत केला. आता प्रत्येक आठवड्याला भेटू हे आश्वासन घेऊन दोघेही घरी परतले होते. पण कदाचित त्यांच्या नशिबात अजुन भेटी गाठी सध्या तरी नव्हत्या. भारतात लॉक डाऊन सुरु झाले आणि त्यांच्या सर्व इच्छा आकांशावर पाणी फेरल. काहीच दिवसात लॉक डाऊन संपेल आणि आपण भेटू अशी इच्छा असताना लॉक डाऊन सरकारने अजुन ३ मे पर्यंत वाढवले.
दोघेही खूप हिरमुसले होते. आपला राजा राणीचा संसार असा असेल, आपण इथे फिरायला जाऊ, तू लग्नात माझ्याच आवडीच्या रंगाची साडी नेस, नवरा निघाला की तू हीच गॉगल घाल, लग्न झालं की आपण जेवताना हे नाव घेऊ, रात्री वऱ्हाड निघताना अजिबात रडायचं नाही. असे सर्वच ठरलं होतं. खूप रात्री त्यांनी चाट करून जागवल्या होत्या. लग्नाची सर्व कामेही झाली होती. बस्ता बांधला होता, बँजो वाल्यांना अडवांस दिला होता, लग्न मंडप सुद्धा सांगितलं होतं, लग्नपत्रिका छापल्या होत्या काहीच दिवसात आमंत्रण सुद्धा द्यायला सुरुवात होणार होती.
पण ह्या एका विषाणू ने सर्व होत्याचं नव्हतं करून ठेवलं आहे. सागर आणि त्याची बायको सर्वांना समजावत आहेत की आम्हाला काही वाटत नाही की लग्न उशिरा होणार आहे. कधी ना कधी तर होणारच आहे की त्यात काय एवढं? पण त्या दोघांच्याही मनाची अवस्था बिकट आहे. वरवर हसत खेळत असलेले ते दोघे आतून मात्र नक्कीच खंत व्यक्त करत असतील.