आज ऑफिसचा पहिलाच दिवस होता त्यामुळे आनंद तर खूप होता पण भीतीही तेवढीच होती. काय होणार कसे होणार? हे विचार करूनच घाबरले होते. कॉलेजमध्ये तर मी टॉपर होते. कॉलेज संपल्यानंतर पहिल्याच प्रयत्नात मोठ्या कंपनीमध्ये इंटरव्ह्यू दिली आणि पासही झाले. घरचे खूप खुश होते. कारण चांगल्या कंपनीमध्ये त्यांची लेक रूजू झाली होती.
ऑफिसमध्ये पोहोचल्यावर माझ्या सिनियरने सर्वासोबत माझी ओळख करून दिली. माझा स्वतंत्र डेस्क मला मिळाला होता. मनात एक स्वप्न होतं. मस्त छान कंपनी असावी, स्वतःचा डेस्क असावा, यायला जायला कंपनीची गाडी असावी, मस्त कंपनीचा युनिफॉर्म असावा, कॅन्टीन असावी. अगदी सर्व स्वप्न माझी ह्या कंपनीत पूर्ण झाली होती. पहिला दिवस तर माझा संपूर्ण काम समजण्यातच गेला.
दुसऱ्या दिवशी ऑफिसची कार घरी न्यायला आली. आमची लेक कारने कामाला जाणार हे पाहूनच माझ्या वडिलांच्या डोळ्यात अश्रू आले. त्यांचेही साहजिकच आहे म्हणा. एवढी वर्ष त्यांनी मेहनत करून लेकीला स्वतःच्या पायावर उभी केली होती. आणि आता त्यांच्या कष्टाचे फळ त्यांना समोर दिसत होते. ड्रायव्हर काकांनी मला घेतले आणि गाडी पुढच्या गावात घेतली. त्या गावातून तो ही गाडीत बसला. तो म्हणजे धृव. माझी आणि त्याची ही पहिलीच भेट होती.
मी त्याला हॅलो केलं पण त्याने काहीच रिस्पॉन्स केला नाही. मला राग तर आला थोडा कारण मुलगी हॅलो बोलून मुलगा काहीच रिस्पॉन्स करत नाही. सहजासहजी असे घडत नाही. तो अकाउंट डिपार्टमेंटमध्ये आमच्याच कंपनी मध्ये होता. ऑफिसमध्ये पोहोचल्यावर आम्ही आमच्या आमच्या डेस्क वर निघून गेलो. त्या मुलांनी ऑफिसमध्ये येताना एकदाही माझ्याकडे पाहिले नाही, बोलला नाही, संपूर्ण वेळ फक्त त्या मोबाईलमध्ये तोंड घालून बसला होता.
हे असे प्रकार तीन चार दिवस घडले. सोबत येताना जाताना माझ्या सोबत तो असून नसल्या सारखा असायचा. एक दिवस मी ड्रायव्हर काकांना विचारलेच? काका हा ध्रुव असा काय आहे? बोलत नाही अजिबात कुणाशी? अहो मॅडम तो फक्त मुलींशी बोलत नाही. मुलांमध्ये बोलायला लागला की कुणाला बोलू देत नाही. पण तीन वर्ष पाहतोय मी त्या सराना ते कधीच कोणत्या मुलीसोबत जास्त बोलत नाहीत.
ड्रायव्हर काकांचे बोलणे ऐकून मनात जो राग माझा ध्रुव बद्दल होता तो निघून गेला होता आणि त्याचे रूपांतर आता चिंतेत झाले होते. रात्रभर मी ह्याच विचारात होते की हा मुलगा असा कसा आहे? दिसायला तर खूप सुंदर आहे. हा चष्मा आहे म्हणा त्याला पण तरीही ती चष्मा त्याला छान शोभते. मी मनाशी ठरवले होते. काही झाले तरी उद्या ध्रुव सोबत आपण बोलायचे.
दुसऱ्या दिवशी पण नेहमीप्रमाणे झाले. तो येऊन गाडीत फक्त न बोलता बाजूला बसला. मग मीच समोरून विषय काढला. ध्रुव नाव आहे ना तुझे? सॉरी हा मला कालच कळलं की तू मुका आहेस बोलता येत नाही तुला (हे सर्व मी त्याला राग येण्यासाठी मुद्दाम म्हटलं होतं) अहो नाही नाही मी मुका नाही काहीही काय सांगतात लोकं तुम्हाला. अहो मुके नाहीत मग बोलत का नाहीत तुम्ही मुलींशी? इतर मुलींचे सोडा पण मी तर तुमच्या सोबत जाता येता असते की? निदान माझ्याशी तरी बोलायचे ना?
नाही वो मॅडम मी लहानपणापासून कधीच जास्त कोणत्या मुलीशी बोललो नाहीये. हा ते मला माहित आहे पण कारण काय त्या गोष्टीचे? कारण नाही सांगू शकत पण आहे आता असे त्याला काय करू नाही शकत. ठीक आहे ध्रुव सर पण इतर मुलींशी नका बोलू माझ्याशी तर बोला. एवढे बोलताना तो फक्त हसला आणि तेवढ्यात आमचं ऑफिस आलं होतं. पुढचे दोन तीन दिवस त्याने फक्त हाय हॅलो चालू होतं एम त्यापुढे गाडी जात नव्हती.
माझ्याशी फ्रँकली बोलायला त्याला वीस दिवस गेले. आता मात्र माझ्याशी खूप छान बोलू लागला होता. त्याच्या आयुष्यात त्याच्या आईनंतर त्याच्याशी एवढं बोलणारी कदाचित मीच एक मुलगी होते. आमचे रोज बोलणे होत होते. ऑफिस मध्ये सोबत येणं जाणं मग रात्रभर फोनवर चाट करणे चालूच होते. हा ह्यात पण मी जास्त बोलायचे आणि तो खूप कमी बोलायचा पण आता सवय झाली होती मला त्या गोष्टीची. हळूहळू त्याची प्रत्येक सवय मला आवडत होती.
त्याचे माझ्याशी बोलताना खाली नजर टाकून बोलणे. त्याने एवढ्या महिन्यात कधीच माझ्या डोळ्यात डोळे टाकून बोलणे केले नव्हते. त्याच्या अनेक छोट्या छोट्या गोष्टी मला आवडू लागल्या होत्या. मी त्याच्या प्रेमात पडले होते. आजवर कॉलेजमध्ये अनेक मुले पाहिली होती. पण ध्रुवची गोष्ट थोडी वेगळी होती. वेळ न दडवता मी त्याला चाट करत असताना माझे तुझ्यावर प्रेम आहे असे सांगून टाकलं. त्या मेसेज नंतर त्याने मला ब्लॉक केलं, कॉल ब्लॉक केलं, पुढील तीन दिवस तो ऑफिसमध्ये सुद्धा आला नाही.
त्याचे हे वागणे माझ्यासाठी अनपेक्षित होते. चौथ्या दिवशी जेव्हा तो ऑफिसमध्ये आला तेव्हा आमच्या गाडीत न येता दुसऱ्याच गाडीमध्ये आला. मी त्याला लंच टाईम मध्ये भेटले. पण तो धड माझ्याशी नीट बोलत सुद्धा नव्हता. अखेर मला माझे रडू थांबले नाही आणि मी तिथेच रडू लागले. त्याने कसे बसे मला गप्प केले. जेव्हा तो हे काय असे करत आहे मला सांगितले तेव्हा माझ्या पायाखालची जमीन सरकली.
त्याची कुंडली लहान असताना एका भटजी बुवांना दाखवली होती. त्या भटजी बुवांनी त्याच्या कुटुंबाला असे सांगितले आहे की जेव्हा तुमचा मुलगा लग्न करेल तेव्हा त्याचा मृत्यू होईल. त्याच्या कुंडलीत तसे लिहिले आहे. ह्याच कारणांमुळे त्याचा आई बाबांनी नेहमीच त्याला मुलींपासून लांब ठेवले होते.
हे सर्व ऐकुन मला खूप जास्त राग आला होता. आपण कोणत्या युगात राहतो आणि तुझे काय चाललेय हे ध्रुव? चुकी तुझीही नाही म्हणा. लहापणापासून तुझ्या आई बाबांनी हेच तुला सांगत आले म्हटल्यावर तू तरी काय करणार? पण ध्रुव असे काही नसते रे. माझे तुझ्यावर खूप मनापासून प्रेम आहे आणि मला तुझ्यासोबत माझे संपूर्ण आयुष्य व्यतीत करायचे आहे.
धृवला मी हे समजावण्यासाठी एक महिना गेला पण जेव्हा तो लग्नासाठी तयार झाला तर आता त्याचे आई वडील लग्नासाठी तयार होत नाहीयेत. त्यांचे म्हणणे एका बाजूने बरोबर आहे. ते आपल्या मुलाची काळजी करत आहेत पण असे काही नसते. हे त्यांना आम्ही कितीतरी वेळा सांगून सुद्धा कळत नाहीये.
आता माझ्या सर्व मित्रानो तुम्ही मला सांगा अशा परिस्थिती त मी आणि ध्रुवने काय करावं?
कथा लेखन : महेंद्र पाटील (पाटीलजी)