Home कथा कोमेजलेला गजरा

कोमेजलेला गजरा

by Patiljee
10362 views

नंदिनी आणि सूर्यकांत ह्यांच्या संसाराला १८ वर्ष पूर्ण झाली होती. दोघांचं एकमेकांवर जीवापाड प्रेम, परंतु एवढी वर्ष होऊनसुदधा त्यांच्या संसाराच्या वेलीला फुलं लागली नव्हती. बरेच उपाय केले, सगळे रिपोर्ट नॉर्मल असूनसुद्धा संतती प्राप्त होत नाही ह्यामुळे ते दुःखी होते. मात्र आता त्यांना त्या गोष्टीच जास्त वाईट वाटत नव्हतं, कारण नातेवाईकांच्या मुलांना त्यांनी आपलंसं करून घेतलं होतं. त्यांच्यावर खूप माया लावली होती. जरी लग्नाला एवढी वर्ष पूर्ण झाली होती, तरी त्यांच्या नात्यात प्रेमाचा ओलावा मात्र एखाद्या नवविवाहित जोडप्याला लाजवेल असा होता. कुठेही जाताना एकमेकांशिवाय कधीच जात नसत, मग कोणाच्या सुखात, दुःखात, कार्यात एवढंच नव्हे तर हळदीकुंकूच्या खरेदीसाठी सुद्धा दोघे सोबतच.

नंदिनीच्या सगळ्या ईच्छा सूर्यकांत पुरवत असत. नंदिनीला सजायला, नटायला खूप आवडायचं. संध्याकाळी सूर्यकांत ऑफिस मधून घरी यायचा तेव्हा ती प्रसन्न चेहऱ्याने त्याचे स्वागत करायची, नंतर सूर्यकांत तिच्या आवडीचा मोगऱ्याचा गजरा स्वतःच्या हाताने तिच्या केसात माळायचा. ऑफिसमधून येताना एखादं फुल किंवा गजरा हा नेहमीचा ठरलेलाच असायचा. ह्यातच ते दोघे खूप आनंदात असायचे. नंदिनीच्या वाढदिवसानिमित्त तिच्या आवडीच्या डिझाईनच ७ तोळ्याचं मंगळसूत्र सूर्यकांतने तिच्यासाठी आणलं आणि तिला आश्चर्याचा सुखद धक्का दिला.

त्या दिवशी सकाळी सूर्यकांतला थोडं अस्वस्थ वाटत होतं, थोडं पोटात दुखत होतं, त्यामुळे तो अंथरुणात लोळत पडला होता. थोड्या वेळाने अंघोळ आणि देवपूजा झाल्यावर गॅलरीमध्ये खुर्चीत बसल्यावर त्याला उलटी झाली. काय झालं असेल? काही उलटसुलट खाल्लं तर नाही ना? असा विचार मनात आला आणि दोघेही जवळच असलेल्या दवाखान्यात गेले. फूड इन्फेक्शन झालं आहे असं सांगून गोळ्या औषध घेतली आणि दोघेही घरी आले. परंतु सूर्यकांतचा त्रास वाढतच होता. मग दोघांनीही मोठ्या हॉस्पिटलमध्ये जाण्याचा निर्णय घेतला, तिथे सर्व टेस्ट झाल्या. दोन दिवसांनी रिपोर्ट मिळणार होते, त्यामुळे तात्पुरत्या गोळ्या औषध घेऊन ते दोघेही घरी आले. येताना बाजारातून काही खरेदीसुद्धा केली.

आज रिपोर्ट मिळणार म्हणून दोघेही लवकरच हॉस्पिटलमध्ये आले. जास्त गर्दी नसल्याने लगेच नंबर लागला. डॉक्टरांनी सगळे रिपोर्ट व्यवस्थित बघितले. त्यामध्ये सूर्यकांतच्या पोटात कसल्यातरी गाठी असल्याचे दिसून आले. डॉक्टरांनी अजून एक टेस्ट केली, तेव्हा त्यांच्या लक्षात आले की, सूर्यकांतला एक दुर्धर आजार झाला आहे आणि तो म्हणजे कॅन्सर. नंदिनीने जेव्हा हे ऐकलं तेव्हा तर तिच्या पायाखालची जमीनच सरकली. कसलंही व्यसन नसताना आज एवढा मोठा आजार कसा झाला असेल? काय करावं हे सुचत नव्हतं. दोघेही एकमेकाला सावरण्याचा प्रयत्न करत होते. डॉक्टरांनी दोघांनाही समजावून सांगितले, अजिबात घाबरून जाऊ नका. ही एकदम सुरवातीची स्टेप आहे आपण आजपासूनच ट्रीटमेंटला सुरुवात करू. हा रोग पूर्णपणे बरा झालेले खूप पेशंट आहेत. वयाने तुमच्यापेक्षा मोठे असलेले पेशंट एकदम ठणठणीत बरे झालेले आहेत. तुमचं वय तर फक्त ४८ वर्षे आहे, म्हणून तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका, तुम्ही पूर्णपणे बरे व्हाल अशी माझी खात्री आहे.

हे सगळं ऐकून दोघांनाही धीर आला आणि लगेचच ट्रीटमेंटला सुरुवात झाली, नंदिनीने पाण्यासारखा पैसा खर्च केला. सूर्यकांतला कसलीच कमतरता पडू नये म्हणून ती झटत होती. वेळेवर गोळ्या औषधं, खाणं पिणं ह्यात ती कुठेच कमी पडत नव्हती. परंतु ३ महिने होऊनसुद्धा काहीच फरक जाणवत नव्हता, उलट त्रास वाढतच चालला होता. नंदिनीच्या एका जवळच्या नातेवाईकाने मुंबईतल्या एका खाजगी हॉस्पिटलबद्दल सांगितले, तिथले अनेक पेशंट बरे होतात, आपल्या पेशंटकडे खूप लक्ष दिलं जातं, आपण तिकडे ट्रीटमेंट करूया असा सल्ला दिला. आयुष्यभरासाठी जपून ठेवलेली पुंजी आता संपत आली होती. नंदिनीने पुढचा मागचा कसलाच विचार न करता आपले मंगळसूत्र विकून टाकले. आता मुंबईत ट्रीटमेंटला सुरुवात झाली. खूप मोठं असं एकदम स्वच्छ हॉस्पिटल, मदतीला धावून येणारा सगळा स्टाफ, अनुभवी डॉक्टरांची टीम ह्या सगळ्यामुळे पेशंटवर चांगला परिणाम होतो असं ऐकलं होतं. तेच झालं, एका किमोथेरेपी मध्येच सुर्यकांतच्या प्रकृतीमध्ये खूप फरक पडला. आता सूर्यकांत हळूहळू बरा होत होता.

तिन महिने उलटून गेले आणि पुन्हा किमोथेरपी साठी दोघेही मुंबईत हॉस्पिटलमध्ये पोहोचले, परंतु सगळीकडे कोरोनाची साथ झपाट्याने पसरत असल्याने, हॉस्पिटलच्या नियमानुसार सूर्यकांतची टेस्ट करून, २ दिवसांनी रिपोर्ट निगेटिव्ह आल्यावरच त्यांना हॉस्पिटलमध्ये प्रवेश दिला. सूर्यकांतला ४ दिवस तिथे ठेवण्यात आलं. त्याच्या सेवेसाठी नंदिनीला सोबत राहण्याची परवानगी देण्यात आली. सततच्या धावपळीमुळे नंदिनीच्या अंगात थोडी किणकिण आली होती. ताप वाढत चालला होता. डॉक्टरांनी तिची तातडीने टेस्ट केली, रिपोर्ट २ दिवसांनी येणार असल्याने सूर्यकांतला संध्याकाळी डिस्चार्ज दिला. सगळं काही व्यवस्थित होईल ह्या आशेवर दोघेही जगत होते. परंतु पुढे त्यांच्या आयुष्यात नियतीने काय मांडून ठेवलंय हे कोणालाही माहीत नव्हते.

दुसऱ्या दिवशी हॉस्पिटलमधून कॉल आला आणि नंदिनी कोविड पॉसिटीव्ह असल्याची बातमी दिली. बघताबघता ही बातमी वाऱ्यासारखी सगळीकडे पसरली, आजूबाजूच्या लोकांनी धावपळ करून नंदिनीला जवळच असलेल्या कोविडच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले आणि सूर्यकांतच्या शरीरातील नमुने कोविड टेस्टसाठी पाठवण्यात आले. आजपर्यंत दोघेही एकमेकांशिवाय एक दिवससुद्धा वेगळे राहिले नव्हते.

सूर्यकांतला एकट्याला घर खायला लागले होते. घरामध्ये त्याला सतत नंदिनीचा भास होत होता. नंदिनीला कोरोना झाल्यामुळे सूर्यकांतच्या जवळ कोणीही फिरकत नव्हते, जेवण वेळेवर मिळत नव्हते, गोळ्या औषधांच्या वेळा निश्चित नव्हत्या, गोळ्या औषधांचे सगळे वेळापत्रक नंदिनीलाच माहीत होते. नंदिनीची सततची आठवण आणि किमोथेरपीचा त्रास ह्यामुळे तो लहान मुलाप्रमाणे खूप रडत होता, त्याला समजवायला नंदिनी मात्र जवळ नव्हती. त्याच्या मनात आत्महत्येचे विचार येऊ लागले, परंतु माझ्यानंतर माझ्या नंदिनीचं कसं होईल ह्या विचाराने तो थांबत होता. अश्या यमयातनेमध्ये त्याने कसेतरी दिवस काढले आणि सुर्यकांतचा रिपोर्टसुद्धा कोविड पॉसिटिव्ह आला. सूर्यकांतला ह्याचा खूप आनंद झाला. हा पहिला पेशंट असा होता की कोविड पॉसिटीव्ह असूनसुद्धा आनंदित होता, कारण त्याला ४ दिवसांच्या विरहानंतर नंदिनी दिसणार होती.

जिथे नंदीनीवर उपचार चालू होते त्याच हॉस्पिटलमध्ये सुर्यकांतला दाखल करण्यात आलं. ज्याप्रमाणे विरहामुळे सुर्यकांतची अवस्था झाली होती, तशीच काहीतरी अवस्था इकडे नंदिनीची सुद्धा झाली होती. वॉर्डमध्ये दोघांनीही एकमेकाला पाहिल्यावर घट्ट मिठी मारली. पुन्हा एकदा दोघे एकत्र आले आणि विरह संपला.

सुर्यकांतला विश्वास होता की, आपली नंदिनी ह्यातुन नक्की बरी होईल. आज तिचा रिपोर्ट येणार होता. आजचा रिपोर्ट जर निगेटिव्ह आला तर तिला दुसऱ्या वॉर्डमध्ये विलगीकरण करण्यात येणार होते. आणि आनंदाची गोष्ट अशी की नंदिनीचा रिपोर्ट कोविड निगेटिव्ह आला. दोघेही खूप खुश झाले. आता ह्यापुढचे दोन्ही रिपोर्ट निगेटिव्ह आले तर नंदिनी पूर्णपणे बरी होऊन घरी जाऊ शकत होती. सुर्यकांत आणि नंदिनी जरी वेगवेगळ्या वॉर्डमध्ये असले तरी ते दरवाज्याला असलेल्या काचेतून एकमेकाला पाहू शकत होते. पुढच्या काही दिवसांत नंदिनीचे दोन्ही रिपोर्ट निगेटिव्ह आले. आज ती घरी जाईल म्हणून सुर्यकांतने एका कर्मचाऱ्याला पैसे देऊन मोगऱ्याचा गजरा आणायला सांगितला आणि परस्पर नंदिनीला द्यायला सांगितला.

दोघेही खूप खुश झाले, नंदिनीने आपले कपडे, सगळ्या वस्तू भरल्या आणि सुर्यकांतला निरोप देण्यासाठी काचेच्या दरवाजासमोर येऊन उभी राहिली. सुर्यकांत आपल्या बेडवर मागे टेकून दरवाज्याकडे एकटक बघत बसला होता, कदाचित तो नंदिनीचीच वाट बघत होता. दोघांनीही एकमेकाला डोळे भरून पाहिले. नंदिनीने त्याच्यासमोर तो गजरा आपल्या केसात माळला. तिच्याकडे बघून सुर्यकांत ने आपल्या पापण्या उघडझाप केल्या आणि चेहऱ्यावर प्रसन्नता आणून तिला निरोप दिला. दोघांचेही डोळे अश्रूंनी भरले होते. खूप महिन्यांनी सुर्यकांतने तिला तो गजरा दिला होता. “गोळ्या औषध वेळेवर घ्या, तुम्ही लवकरच बरे होऊन घरी परत या, मी तुमची घरी वाट बघत आहे.” असा इशारा करून अश्रू भरलेल्या डोळ्यांनी नंदिनी तिथून निघाली. “काळजी घे गं नंदिनी” असं स्वतःशीच पुटपुटत सुर्यकांतने तिला निरोप दिला. चालताना मागून तिच्या पाठमोऱ्या शरीराकडे, तिच्या केसातल्या हलणाऱ्या गजऱ्याकडे एकटक बघत असतानाच सुर्यकांतने उघड्या डोळ्याने आपला प्राण सोडला.

कोरोना झाल्यामुळे, सुर्यकांतचं प्रेत परस्पर दहन करण्यात आलं, ह्या धक्क्यातून नंदिनी मात्र बाहेर पडु शकली नाही, ती अजूनही रोज संध्याकाळी तयार होऊन सुर्यकांतची वाट पाहत आहे. सुर्यकांतने शेवटच्या भेटीत दिलेला गजरा जरी कोमेजला असला तरी, आयुष्याच्या पुस्तकात तिने तो जपुन ठेवला आहे.

लेखक श्री. अतिष म्हात्रे
आगरसुरे- अलिबाग
मोबाईल- ९७६९२०९९१९
(व्हाट्सएप साठी)

© या कथेचे सर्व हक्क लेखकास्वाधिन आहेत. लेखकाच्या नावासहित ही पोस्ट शेअर करायला हरकत नाही.

Related Articles

Leave a Comment

error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल