Home कथा कर्नाळा खिंड

कर्नाळा खिंड

by Patiljee
818 views

तुम्हीं आम्ही सर्वच स्वामींचे भक्त आहोत. आपण स्वामींना मानतो पण कधी कधी अशाही घटना घडतात ज्यामुळे स्वामी खरंच आपल्यातच आहेत असा भास होतो. आज मी तुम्हाला अशाच एका प्रवासात घेऊन जाणार आहे.

माझे गाव आवरे, उरण तालुक्यात बसलेले हे सुंदर गाव, पण इथे सर्व सुख सुविधांचा अभाव असल्याने कामानिमित्त आम्हा मुलांना बाहेर पडावे लागते. असे नाही की आमच्या क्षेत्रात जॉब नाहीत पण जे जॉब आहेत त्यात कमी पगार मिळतो. अशात आम्ही मुले शहरी विभागात जॉबच्या शोधात पडतो. मला सुद्धा आताच पनवेलमध्ये जॉब मिळाला होता. चांगली कंपनी आणि चांगला पगार मिळाल्याने मी खुश होतो. पण जनरल आणि सेकण्ड शिफ्ट मध्ये काम करावे लागणार होते.

माझ्या गावापासून माझे जॉबचे ठिकाण ४० किमी होते. मध्ये येताना कर्नाळा खिंड लागत होती. खूप ऐकुन होतो की ह्या कर्णाला खिंडीत अनेक अपघात झाले आहेत. काही लोकांचे तर असेही म्हणणे होते की काही अमानवी शक्तींचा आभास रात्री तिथे जाणवतो. पण मला ह्या गोष्टीवर मुळीच विश्वास नव्हता. कारण आपले जग बदलत चालले आहे. देश विज्ञानात प्रगती करतोय आणि अजुन आपण भूत प्रेत ह्या अंधश्रद्धा पाळून आहोत. पण तरीही मला त्या खिंडीतून प्रवास करावा लागणार होता कारण माझ्या घरी येण्यासाठी तोच एक मार्ग होता.

ऑफिसमध्ये पहिला आठवडा जनरल शिफ्ट असल्याने छान गेला,. सर्वांशी चांगली ओळख झाली. पण दुसऱ्या आठवड्यात माझी सेकंड शिफ्ट लावण्यात आली. सोमवारी माझी सेकंड शिफ्ट ११ वाजता संपली आणि मी बाईकला किक दिली आणि घरचा रस्ता धरला. काही वेळात मी कर्नाळा खिंड गाठली. पहिल्यापासून या खिंडीत जे काय घडले होते ते ऐकुन होतो आणि आज त्या खिंडीत पोचल्यावर मला त्या भयानक गोष्टींची आठवण झाली. अजुन तस काही दिसलं नव्हतं पण तरी मनात असंख्य विचार तर होते पण ते विचार स्वतःवर हावी करून घेत नव्हतो. रस्त्यावर एकही गाडी दिसत नव्हती. जशी स्मशान शांतता पसरली होती, आणि हीच शांतता मला अजुन घाबरवत होती. विचार केला काही नाही होणार म्हणून गाडी चालूच ठेवली.

थंडगार वातावरण सुरू झाले. मला नवल वाटले की हा मे महिना आणि अतिशय उष्णतेचा महिना तरीसुध्दा एवढी थंडी कशी? खिंडीत थोडीफार थंडी नेहमीच असते कारण इथे अनेक झाडे झुडपे आहेत पण आज थंडी थोडी जास्तच जाणवत होती. अचानक येणारा वारा माझ्या गाडीचा वेग कमी करत होता, इतकी त्या वाऱ्याची तीव्रता होती. मधेच झुडुपात तून किर्र असा कर्कश आवाज कानी पडत होता, वाटलं पाखरं वैगेरे असतील, पण अचानक कोणी तरी रडतोय असा आवाज यायला लागला आणि मला इतक्या थंडीत ही मला घाम फुटला.

पण आता मात्र मला थोडी भीती वाटायला लागली होती. पण तरीही मी मनावर ताबा ठेऊन गाडी चालवत होतो. तो रडण्याचा आवाज कानाचे दडे बसवत होता. अचानक माझी गाडी एका वळणावर बंद पडली जे व्हायला नको तेच नेमके झाले. मी खूप घाबरुन गेलो होतो कारण गाडी घेऊन एक महिनाच झाला होता आणि असे बंद होणे शक्यच नव्हते. रडण्याचा आवाज बंद झाला आणि भयाण शांतता पसरली होती. जणू कुणी येणार आहे असेच वाटतं होते. माझ्या काळजात जोरजोरात धडधडायला लागले होते अखेर एक दोन किक मारल्यावर गाडी स्टार्ट झाली. गाडी पुढे चालू लागली तसा मी स्वामींचा नाव घेतले आणि पुढे निघालो पण हे काय मला माझी गाडी जड वाटू लागली असे वाटत होते की कोणीतरी मागच्या सिटवर बसलेय. पण पाठीमागे बघायची हिंमत नव्हती. काय करावं कळत नव्हतं कारण मला समजलं की कोणीतरी नक्की पाठच्या सिटवर बसले आहे. इतक्यात मला स्वामींचे बोल आठवले भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे. आणि त्या क्षणापासून मी जितक्या जोरात होईल तितक्या जोरात स्वामी समर्थांचा नामस्मरण करायला लागलो

पण मला कळून चुकले होते की माझ्या आयुष्यतील हा शेवटचा दिवस असणार आहे. हे सर्व मी जवळून अनुभवत होतो. माझा स्वामी समर्थांचा धावा चालूच होता थोडे पुढे गेलो एक ४० ते ५० वयोगटतील इसम उभा होता. त्याची शरीरयष्टी इतकी तेजस्वी होती की मला त्या व्यक्तीकडे बघितल्यावर कसलेच भान राहिले नाही ती व्यक्ती पुढूनच हातवारे करत माझ्याकडे लिफ्ट मागत होता. आधीच मी खूप घाबरलो होतो त्यामुळे मनात असेच वाटत होते की ही समोर असलेली व्यक्ती सुद्धा कुणी अमानवी शक्ती असेल पण तरीही मी त्याला गाडी थांबवली आणि मागे बसवले. का माहीत नाही पण गाडी अचानक थांबली आणि ती व्यक्ती मागच्या सिटवर बसली तरीही माझे नामस्मरण चालूच होते. त्या व्यक्तीने मला विचारले तुम्ही कोणाचे नामस्मरण करता आहात. मी बोलो स्वामींचे त्यावर ती व्यक्ती म्हणाली खरंच इतका विश्वास आहे का तुमचा की तुमचे स्वामी या वेळीही तुमची मदत करण्यासाठी येतील. मी म्हणलो हो माझा विश्वास आहे त्यांनी नेहमीच मला साथ दिली आहे आणि आजही देतील.

ती व्यक्ती म्हणाली मी इथेच कर्नाळा अभय अरण्यात काम करतो. सेकण्ड शिफ्ट होती म्हणून आता निघालो. एवढ्या रात्री कुठे गेला होता तुम्ही? मला थोडा का होईना पण धीर आला होता. मी सांगितले की मी आताच कामावर रुजू झालोय आणि माझीही सेकंड शिफ्ट होती. त्या छोट्याश्या प्रवासात त्या माणसाने माझ्याशी गप्पा मारत मारत माझे लक्ष दुसरीकडे वळविले. मनात जी भीती होती ती किंचीत त्या माणसाच्या सोबतीने गायब झाली होती.

आता कर्नाळा खिंड संपून गाव लागलं होतं. मी त्या इसमाला विचारले तुम्हाला कुठे सोडू? तेव्हा ते म्हटले की पुढे जे तारा गाव आहे ना तिथे थांबवा मला. मी त्यांना तिथे उतरवले आणि त्यांचे मनापासून आभार मानले तेव्हा त्यांच्या तोंडून शब्द बाहेर पडले भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. तेव्हा मला त्या शब्दाचा काहीच अर्थ लागला नाही. काही कळले नाही म्हणून मी गाडी स्टार्ट करायला पुढे पाहिले नंतर माझ्या लक्षात आले की त्या भयाण रात्रीत चिटपाखरू नसताना ती व्यक्ती तिथे कशी? म्हणून मी परत मागे वळून पाहिले तर ती व्यक्ती गायब होती.

पण मला कळून चुकले होते की ते स्वामी होते. ज्यांनी ह्या अमानवी शक्ती पासून माझा जीव वाचवला. माझी आई स्वामींना खूप मनापासून मानते. तिच्याच भक्तीचे हे फळ होते. तेव्हा मला स्वामींच्या अघात शक्तिंचे आकलन झाले होते. कधी कधी खरंच हा सुद्धा भास होतो की खरंच ती कुणी व्यक्ती असेल, स्वामी नसतील पण स्वामी आहेत आणि त्याचा परिचय तुम्हा आम्हाला कधी ना कधी नक्कीच झाला असेल. माझ्यासोबत घडलेला हा प्रसंग मला नेहमी स्वामींची आठवण करून देईल. तेव्हा पासून माझ्या मुखात नेहमीच श्री स्वामी समर्थ नामाचा जप असतो.

लेखक : पाटीलजी आवरे उरण, रायगड

ह्या पण Horror कथा वाचा.

Related Articles

Leave a Comment

error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल