ओये कार्टून काय करतेस? झाले का जेवण की बसलीय अजुन टीव्ही समोर (नेहमी प्रमाणे मयुने साराला विचारले) नाही रे इच्छा नाहीये जेवायची. का ग काय झाले? बघ ना यार आपल्या देशात आणि संपूर्ण जगभरात हे काय चाललेय? कधी निघणार आहोत ह्यातून आपण? आपली बारावीची परीक्षा सुद्धा पुढे ढकलण्यात आली आहे. मला तर खूप भीती वाटतं आहे. मला काही झाले तर? अग सारा येडी आहेस का तु? सर्व होईल ठीक नको घाबरु तू. सरकार सर्वोतोपरी काम करत आहे. लवकरच होईल काही ना काही. भारताने असे कितीतरी मोठं मोठे संकट एकहाती पेलले आहेत.
फक्त तू ना एक काम कर घरी बसून ते न्यूज पाहण्यापेक्षा ना अभ्यास कर. आपली परीक्षा पुढे ढकलली आहे कॅन्सल नाही केली. त्यामुळे परीक्षा तर द्यावीच लागणार आपल्याला आणि हा तुला काहीच होणार नाही आहे ह्या व्हायरस पासून तू दगड आहेस माहीत आहे ना? दगडाला काय होतं का कधी? तू ना बुक्कीच खाणार माझ्या हातून बघ भेट फक्त रविवारी आता काल्या. अग नाही रविवारी नाही भेटू शकत आपण, सरकारने कर्फ्यु लावला आहे ना ७ ते ९ त्यामुळे आपण सोमवारी भेटू.
मयु आणि सारा दोघेही अंगणवाडी पासूनचे मित्र. मैत्री काय असते हे समजण्या अगोदरपासून त्यांचे एक वेगळं नातं निर्माण झालं होतं. आधी शालेय शिक्षण आणि आता कॉलेजमध्ये पण ते एकत्रच होते. मयु सारावर मनापासून खूप प्रेम करत होता. पण आजवर त्यांनी आपल्या मनातील भाव मनात दाबून ठेवले होते. साराच्या मनात नक्की काय आहे हे त्याला माहीत नव्हते. त्याला नेहमी असेच वाटायचे की जर आपण साराला प्रेमाची कबुली दिली आणि तिला माझे हे वागणे आवडले नाही तर एवढ्या वर्षाची मैत्रीही तुटून जाईल.
शाळेत आणि आता कॉलेजमध्ये सर्वांना असेच वाटतं होते की ह्या दोघांचे एकमेकावर खूप प्रेम आहे. दोघे फक्त आणि फक्त एकमेकांसाठी बनले आहेत. पण त्यांना ही गोष्ट माहीत नव्हती की मैत्रिपलिकडे त्यांच्यात कोणतेच नाते नव्हते. ठरल्या प्रमाणे ते सोमवारी भेटले. सर्व टॉकीज मॉल बंद असल्याने ते नजीकच्या गार्डन मध्ये जाऊन बसले.
ऐक ना मयू मला ना तुला गोष्ट सांगायची आहे. हे ऐकुन मयू खूप जास्त खुश झाला होता. हो हो सांग ना काय झाले सारा? लोकं का करतात रे लग्न? माहीत आहे ह्यात दुःख आहे, भांडणे आहेत, त्रास आहे तरीसुद्धा लग्न करतात? का आहे असे यार? अग सारा लग्न म्हटले मी वाद विवाद प्रेम आलेच की ग, त्यात काय एवढे जसे ते भांडतात तसे ते गोड होतातच की. नाही रे मयु काय सांगू आणि कसे सांगू तुला. माझे आई बाबा रोज भांडतात. असा एकही दिवस जात नाही की त्यांचे भांडण होत नाही.
सकाळी घराबाहेर पडताना, रात्री घरी आल्यावर, जेवणाच्या टेबलवर अगदी सर्वच जागा त्यांना भांडण्यासाठी कमी पडतात. बाबांना वाटते आई छोट्या छोट्या कारणावरून वाद घालते, अनेक गोष्टी एकत्र करून संशय घेते. आणि याउलट आईला वाटते बाबांचे बाहेर कुठे प्रेम प्रकरण चालू आहे. १० वर्ष झालीत मी ह्यांची रोज भांडणे पाहते. कधी बाबा आईला मारतो तर कधी आई काही फेकून मारते. रोजचे झाले आहे आता हे. म्हणून मला वैताग आला आहे आता ह्या सर्वाचा. लवकरच शिक्षण पूर्ण करून कुठे लांब जावे असे वाटत आहे.
अग सारा मी समजू शकतो तुझे आई बाबा भांडत आहेत पण कितीही भांडणे झाले तरीही एवढे वर्ष झाले तरी ते एकत्र आहेत ना? तू त्यांच्यात नको पडूस मस्त अभ्यास कर चांगला बाकी होईल सर्व ठीक आणि लांब कशाला कुठे जायचे? तुझे लग्न झाले की तुझा नवरा नेईल ना तुला त्याच्या घरी मग तू खुश असणार तिकडे. नाही हा अजिबात नाही. मला लग्नच करायचे नाहीये मयु. एवढी वर्ष आई बाबांचे हे नातं पाहून इच्छा मेली आहे लग्नाची. त्यामुळे मी आयुष्यभर एकटी राहणार असे ठरवले आहे. मस्त स्वतःच्या पायावर उभी राहणार आणि एकटे आयुष्य जगणार.
आता मात्र मयु पार गळून गेला होता. हिच्यासोबत आयुष्याची शंभरी पार करावी असे वाटत असताना तिला मुळात लग्नच करायचे नाहीये हे ऐकुन त्याला वाईट वाटले. पण मनातील भाव दाबून तो आनंदाने आजही तिचा चांगला मित्र म्हणूनच तिच्या आयुष्यात आहे.
मित्रानो तुम्हाला काय वाटतं की साराचे लग्न न करण्याचे निर्णय योग्य आहे का? मयु ने एकदा आपल्या मनातील भावना सारा सोबत व्यक्त कराव्या का? तुमची याबाबतची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा.
मी लिहलेल्या ह्या कथा पण वाचा
समाप्त
कथेचे सर्व अधिकार लेखकाधिन आहेत, लेखकाच्या नावासोबत कथा शेअर करायला हरकत नाही.
लेखक : पाटीलजी (आवरे उरण)